অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सुधागड वन्यजीव अभयारण्य

सुधागड हा एक ऐतिहासिक किल्ला आहे. पूर्वी या गडाला भोरपगड असेही म्हणत. सुधागड आणि सभोवतालचे 76.88 चौ.कि.मी. क्षेत्र 27 ऑगस्ट 2014 रोजी अभयारण्य म्हणून घोषीत करण्यात आले. पुण्यापासून साधारणत: 115 ते 135 कि.मी अंतरावर रायगड आणि पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगात हे अभयारण्य वसले आहे. सुधागडचा परिसर दाट वनश्रीने नटलेला आहे. गडाची समुद्र सपाटीपासून ऊंची 619 मीटर आहे. सुधागड परिसरात 2200 वर्षांपूर्वीची ठाणाळे लेणी आहेत. गडावर अनेक तलाव आहेत पंत सचिवांचा वाडा, भोराई देवी तसेच भोरेश्वराचे मंदिर आहे. पाच्छापूर दरवाजा, दिंडी दरवाजा, धान्य कोठारे, भांड्याचे टाके, हवालदार तळे, हत्तीमाळ अशी बरीच ऐतिहासिक स्थळे पाहण्यासारखी आहेत. गडाच्या सभोवताली अनेक औषधी वनस्पती आणि वन्यजीवांचा वावर आहे. गडावर टकमक टोक आहे. या टोकावर उभे राहिल्यावर समोर उभा असणारा धनगड, कोरीगड तेलबैला दिसतो. एकूणच दुर्गप्रेमी आणि वनवाटांवर प्रेम असणाऱ्यांसाठी सुधागड हे नेहमीच आकर्षणाचे ठिकाण राहिले आहे.

वन्यजीव-वृक्ष संपदा

पंच सचिवांचा वाडा व भोराई देवी मंदिरात साधारणत: 50 ते 60 लोकांची निवास व्यवस्था आहे. साग, खैर, काटेसावर, बीजा, कुंभा, आष्टा, अंजनी, जांभूळ, पिसा, वारस, आसाना, ऐन, बेहडा, पारजांभूळ, नाना यासारखे वृक्ष वैभव, कारवी, करवंद, धायटी, रामेठा, मुरूडशेंग, फापट, कुडा, दिंडा सारखी झुडूप प्रजाती येथे मोठ्या प्रमाणात आहेत. वेली आणि वानस प्रकारात उक्षी, पिळुकी, मालकांगोणी, खाज कोयली, वाटोळी, ओंबळ, पहाडवेल, घोटवेल, कडुकारंदा, आंबगुळी, तोरण, कुसर, बेडकीचा पाला, करटूली अशा वेली तर सोनकी, निचुरडी, काळीमुसळी, भुई आमरी, पांगळी, खुळखुळा, कचोरा, पानतेरडा, पंद, बृम्बी वाघचौरा ही वानसे ही येथे विपूल प्रमाणात आहेत.

हे वन निम्न सदाहरित, सदाहरित, वन आणि आर्द्र पानझडीचे वन या प्रकारात मोडते. येथे बिबट्या, भेकर, उदमांजर, रानमांजर, खवल्या मांजर, मुंगूस, साळींदर, वानर, शेकरू हे वन्यजीव आपल्याला पहायला भेटतात. अजगर, नाग, धामण, चापडा, हरणटोळ, कवड्या दिवड, व घोरपड हे सरपटणारे प्राणीही येथे आहेत. पर्वतकस्तूर, युवराज, स्वर्गीयनर्तक, चंडोल, सर्पगरूड, मोरघार, हळद्या, कुरटूक, निखार, शमा, नवरंग, टकाचोर, असे विविध मनमोहक पक्षी या वनात स्वच्छंद विहार करतांना दिसतात. महाराष्ट्र राज्याचे मानचिन्ह असलेल्या ब्ल्यू मॉरमॉन फुलपाखराबरोबर अनेकप्रकारची रंगीबेरंगी फुलपाखरं इथे आहेत.

गडाचा इतिहास

हा गड म्हणजे भोर संस्थांनचे वैभव. झाडांमध्ये लपलेला हा गड विस्ताराने फारच मोठा आहे. या गडाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झाला आणि त्यांनी या गडाचे नाव सुधागड असे ठेवले. पुराणात भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख आढळतात. याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना या डोंगरावर केली अशीही आख्यायिका येथे सांगितली जाते.. गडावर वाड्याच्या मागील बाजूस चोरवाट विहीर आहे. त्याच्यात एक भुयार असून. संकटाच्या वेळी गडावरून खाली जाण्यासाठी त्याचा उपयोग केला जायचा अशी माहिती येथे मिळते. भोराई देवीच्या मंदिराच्या मागील बाजूस अनेक समाध्या आहेत. त्यांवर सुबक नक्षीकाम आहे.

भरपूर चालण्याची तयारी ठेऊन या गडकिल्ल्याची सफर करता येते. पैज लावून गड चढणाऱ्यांची संख्याही कमी नाही. अस असतांनाही तुम्ही थकत नाही कारण सभोवतालचा हिरवागार निसर्ग तुम्हाला ऑक्सीजन तर पुरवतोच पण आनंदही देतो. अशी ही आनंददायी गिरीदुर्गाची सफर करायची असेल तर सुधागड मुंबई- पुणेकरांसाठी फार लांब नाही. त्यांनी तर जावच पण इतर सर्व पर्यटकांनीही जावं… कारण तिथं जाणं आणि वनसौंदर्य पाहतांना गिरीभ्रमण करणं खरच खुप आनंददायी आहे.

कसे जाणार?

गडावर बहिरामपाडा किंवा धोंडसे गावातून महादरवाज्यामार्गे आत जाता येते.

तेलबैलावरून घोडजिन्याने महादरवाजामार्गे, धोंडसे गावातून चोरदरवाजामार्गे पाच्छापूर गावातून पाच्छापूर दरवाजामार्गे, ठाकूरवाडीतून पाच्छापूर दरवाजामार्गे (शिडीची वाट), ठाकूरवाडीतून बोलत्या कड्यांमधील घळीमार्गेही गडावर जाता येते.

लेखक-डॉ. सुरेखा म. मुळे

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate