অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चवदार मिठसागरे

चवदार मिठसागरे

वेशीवरच्या पाऊलखुणा : चवदार मिठसागरे

गावागावानुसार जशी बोली भाषा बदलते तशीच पदार्थांची चवही बदलते. त्या पदार्थाचे मसाले बदलतात, ते बनविण्याची पध्दतही बदलते अन् त्या पदार्थांचे अंतरंगही बदलते. मात्र यात महत्त्वाची भूमिका पार पाडते ते म्हणजे मीठ. एखाद्या पदार्थात मीठ नसेल तर? पदार्थ कितीही मेहनतीने बनविलेला असला तरी त्याची चव मीठ ठरविते. मात्र एखाद्या गावाच्या नावातच ‘मीठ’ दडलेले असेल तर ते गाव किती चव‌िष्ट असेल! अर्थातच यादवकालीन बारव, भागोजी नाईकांच्या इंग्रजांबरोबर झालेल्या लढाईचा संदर्भ, गोरक्षनाथांना मानणारे गाव अन् गावातील अनेक अवशेष म‌िठसागरे गावचा वेगळेपणा दाखवून देतात. म्हणूनच म‌िठसागरेची सफर चवदार ठरते.

नाशिक जिल्ह्यातील अनेक गावे आपला इतिहास हरवून बसण्याच्या कक्षेत आली आहेत. कालांतराने मागे पडत असलेली जुनी पिढी अन् नव्या पिढीचा ग्रामीण जीवनाशी तुटत चालेला ऋणानुबंधांचा फटका त्या गावच्या लोकसंस्कृतीवर परिणाम करताना दिसतो आहे. त्यातच गावकुसांच्या स्मृतीपटलावरील आख्यायिका, लोककथा, परंपरा, लोकगीते अन् ऐतिहासिक घटना घडामोडींचा वैभवशाली पट नोंदविला न गेल्याने जेवढं काही मौखिक स्वरूपात पुढे जाईल तेवढंच थोडफार शिल्लक असल्याचं पहायला मिळतं. अर्थात हा बदल जरी अपेक्ष‌‌ित असला तरी त्याचा वेग मात्र अधिक असल्याने इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा आपण हरवत चाललो आहोत, असे अनेक गावांकडे पाहिले की वाटायला लागते.

नाशिकच्या प्रत्येक गावात काही ना काही इतिहास दडला आहे, असे प्रत्येक गाव टाहो फोडून सांगताना दिसते. स्थानिकांनी या आठवणींचे, स्मृतींचे अन् इतिहासाचे संकलन करून ठेवण्याची गरज असल्याचे सिन्नर तालुक्यातील म‌िठसागरे हे गाव पाहिले की होते. म‌िठसागरेला स्वातंत्रवीर भागोजी नाईक अन् इंग्रजांमधील युद्धाची पार्श्वभूमी असल्याने या गावाला वेगळेच महत्त्व लाभले आहे. मात्र या स्मृती आता म‌िठसागरेच्या स्मृतीपटलावरून पुसट होत चालल्या आहेत. यादवकालीन विहीर, वाडे अन् अनेक युद्धवीरांच्या समाधी या उरलेल्या काही खाणाखुणा गावचा इतिहास उलगडतात; मात्र त्या खाणाखुणांची अवस्थाही अत्यंत बिकट असून, त्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.

सिन्नर-शिर्डी मार्गावर १२ किलोमीटरवर डाव्या हाताला पांगरी बुद्रक हे गाव लागते. या गावातून एक रस्ता म‌िठसागरे गावाकडे जातो. पाच किलोमीटर गेल्यावर एखाद्या ओसाड माळावर गाव वसल्याचे दिसते. गावाला म‌िठसागरे असे नाव कशामुळे पडले हा प्रश्न तेथील ग्रामस्थांनाही सतावतो आहे. मात्र त्यांच्या या प्रश्नांचे उत्तर गावातच दडलेले आहे. म‌िठसागरे या गावाचे मूळ नाव आहे रेवळगाव, असे दत्तात्रेय जाधव सांगतात. रेवळगाव असे गावाचे आधीचे नाव असल्याने आजोबा-पणजोबांकडून ऐकल्याचे ते सांगतात. मात्र अचानक गावाला म‌िठसागरे कधीपासून म्हटले जाऊ लागले हे कोडे त्यांना उलगडलेले नाही. मात्र गावातील व्यापाऱ्यांची मोडकळीस आलेली घरे म‌िठसागरेचे गूढ उलगडतात. हे गाव पूर्वी मारवाड्यांची पेठ अन्‌ बाजारपेठेचे ठिकाण होते. यामुळे गावात अनेक व्यापाऱ्यांची लहानमोठी वाडावजा घरे होती.

आता त्यातील जवळपास सर्व जमीनदोस्त झाली आहेत. हे व्यापारी मीठाचा व्यापार करीत असावेत अन् आजूबाजूची गावे मीठासाठी रेवळगावावर अवलंबून असावेत. त्यामुळे इतर गावांसाठी सागरातून येणारे मीठ कोठे मिळते तर मिठाचे सागर असलेल्या म‌िठसागरे या गावात. यामुळे गावचे मूळ नाव मागे पडले व ज्या नावाने गाव ओळखले जाऊ लागले ते म‌‌िठसागरे नाव प्रचलित झाले. अर्थात हा एक अंदाज तेथील परिस्थितीवरून लावता येतो. असेच काहीसे घडले असण्याची शक्यता आहे, अशी पुष्टी म‌िठसागरेचे रहिवाशीही देतात. दरम्यान, गेल्या शंभर वर्षात म‌िठसागरेतील मारवाडीमंडळी बदलत्या परिस्थितीनुसार मुख्य शहराकडे वळाली असावीत अन् म‌िठसागरेचा बाजारपेठ म्हणून असलेला लौकिक मागे पडला असावा; मात्र हा इतिहास सांगायला गावाचे म‌िठसागरे हे नाव मात्र कायम राहिले आहे.

गावात शिरण्यापूर्वी एक किलोमीटर अलीकडे उजव्या हाताला दगडी बांधणीची एक विहीर पहायला मिळते. जलस्थापत्य रचनेतील एक अनोखा नमुना म्हणून याकडे पाहता येईल. विहीर कोरडी पडली आहे. त्यामुळे तिचा तळही पाहता येतो. तळाला आठ लाकडी ओंडक्यांवर विहीर उभी आहे. वरच्या बाजूची विह‌िरीची बांधणीही दगडी असून, आवर्जून पाहण्यासारखी आहे. तेथून पुढे गावात शिरण्यापूर्वी उजव्या हाताला एक समाधी दिसते. त्या समाधीवर मोठ्या वृक्षाने बस्तान बांधल्याने ती समाधी त्या वृक्षाभवतीचा ओटा वाटायला लागतो. ही समाधी कोणाची हे कोणालाही ठाऊक नाही. मात्र या समाधीला भागोजी नाईक व इंग्रजांमधील लढाईचा संदर्भ आहे. त्यावरील शिलालेखात म‌िठसागरेत भागोजी नाईक व इंग्रजांमध्ये झालेल्या लढाईचा उल्लेखही आहे. १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात भागोजी नाईकांनी क्रांतीज्वाळा पेटती ठेवली होती. त्यामुळे इंग्रजांना भागोजींना पकडणे गरजेचे झाले होते. भागोजी नाईक म‌िठसागरेत असल्याची माहिती पांचाळेतील पाटलाने इंग्रज अधिकाऱ्याला कळविली. त्यानंतर म‌िठसागरेला इंग्रजांनी वेढा घातला. तेथून भागोजी नाईक व इंग्रजांमध्ये तुंबळ युद्ध सुरू झाले.

या लढाईत भागोजींचे चाळीस-पन्नास लढवय्ये तर इंग्रजांचेही अनेक सैनिक मारले गेले. त्यातील अनेकांच्या समाधी या घटनांची आजही साक्ष देण्यासाठी तेथे असल्याचे दिसते. म‌िठसागरेत भागोजींना गोळी लागल्याने ते सहकाऱ्यांसह घोड्यावर पांचाळेत पोहचले. तेथेही तुंबळ युद्ध झाले. तेथून ते सांगवीत गेले अन्‌ तेथेच त्यांचा मृत्यू झाला व त्यांच्यावर तेथेच अंत्यसंस्कार केले गेले, अशी माहिती नाशिक व नगर गॅझेटियर तसेच संतोष खेडलेकर यांनी लिहिलेल्या क्रांतीवीर भागोजी नाईक या पुस्तकातून मिळते. मात्र भागोजींचा मृत्यू येथेच झाला असावा, असे म‌िठसागरेतील ग्रामस्थ मानतात, अशी माहिती गोरक्षनाथ कासार यांनी दिली. भागोजींच्या मृत्यूबाबात अनेक मतप्रवाह असले तरी म‌िठसागरेत उडालेल्या क्रांतीच्या ठिंणगीमुळे अनेकांना इंग्रजांविरूद्ध लढण्याची प्रेरणा मिळाली अन्‌ स्वातंत्रयुद्ध पेटत ठेवण्यात भागोजींनी मोठी भूमिका निभावल्याने म‌िठसागरेत `स्वातंत्र्ययुद्ध प्रेरणा स्मारक’ उभा होण्याची गरज गोरक्षनाथ कासार व्यक्त करतात. असे स्मारक गावात उभे राहिल्यास भागोजी नाईक व त्यांच्या लढवय्या सैनिकांना खरी श्रद्धांजली ठरेल.

वावीकडून म‌िठसागरेत येताना रस्त्यालगत असलेली समाधी पाहून डाव्या हाताकडचा रस्ता आपल्या नव्याने बांधलेल्या राम मंदिरासमोर घेऊन जातो. यात परिसरात मारूती, खंडोबा, विठ्ठल रूक्मिणी, पांडूरंग, गणपती, महादेव, सटुबाई, बालाजी मंदिर आहे. गावात रामनवमीचा व चंपाष्टीला खंडेराय उत्सव जल्लोषात साजरा केला जातो. रामनवमीतील कावड सजावट पाहण्यासारखी असते. या उत्सवांमध्ये आजही आखाडी म्हणजेच सोंगे मिरविण्याची पद्धत म‌िठसागरेने आजही जपली आहे. मंदिरासमोर लहान लहान दगडी बांधणीतील दोन-तीन मंदिरे आहेत. छोट्याशा महादेव मंदिराशेजारी दोन समाध‌ी पहूडलेल्या आहेत. या समाध्या सैनिकांच्या असाव्यात, असे ग्रामस्थ सांगतात. त्या समाध्यांवर शिलालेख आहे. मात्र त्यावर डांबर पडल्याने आता ते शिलालेख वाचता येत नाहीत. असाच शिलालेख असलेल्या तीन-चार समाधी गावात आहेत. गावात अनेक वीरगळ आहेत. या वीरगळीपासून रस्त्यापलीकडे दगडी बांधणीची एक बारवही आहे. ही बारव यादवकालीन असावी.

कारण वावीतील बारवेशी ती साम्य दाखविते. तिचे पाणी वापरात असले तरी बारवेची अवस्था बिकट झाली आहे. राममंदिराजवळील भक्कम लाकडी दरवाजाची पूर्वीची वेस गावाला वेसकोट असल्याची साक्ष देते. अर्थात जुन्यावेशीची जागा आता नव्याने बांधलेल्या वेशीने घेतली आहे. पूर्वी गावाला दोन वेशी व गावाभवती भक्कम कोट होता. गावात मारवाडी पेठ वसलेली होती. त्यामुळे गाव श्रीमंत असावे, असे दिसते. याच्या खाणाखुणा लहान लहान माडीवजा टुमदार पण आता कोसळेल्या इमारतीतून दिसतात, असे दत्तात्रेय जाधव व अरूण चतुर सांगतात. गावाच्या संरक्षणासाठी कोटांवर गोफणधारी सैनिक असायचे. त्यांनी अनेकदा दरोडेखोरांना पळवून लावल्याचे ग्रामस्थ सांगतात. म्हणूनच काय की, सिन्नर तालुक्यात एक म्हण प्रचलित होती,`शहा, पचाळं तांगे तंगडी अन्‌ म‌िठसागरेचे पहिलवान गडी’!

म‌िठसागरेतील अंधारवड नावाच्या वडाच्या झाडाची कथाही प्रसिद्ध आहे. शिंदेवाडी रस्त्यावर अंधारवड नावाचा वड होता. या वडाला अंधारवड म्हणण्यामागे कारण ग्रामस्थ असे सांगतात की, त्या वडाचा विस्तार दोन-तीन एकरात होता. त्यामुळे त्या वडाखाली नेहमी अंधार असल्याने त्याचे नाव अंधारवड असे पडले. नंतर ही जागा कोणीतरी विकत घेतली व तो वड पाडण्यात आला. तेव्हा त्या वडाचे लाकूड ती व्यक्ती सात वर्षे जाळत होती, असेही त्या वडाचे वैभव सांगताना म्हटले जाते. आता तो वड तेथे नसला तरी त्याच्या आठवणी मात्र ग्रामस्थांच्या मनातील अंधाऱ्या कोपऱ्यात दडलेल्या आहेत. असाच वारसा चावडी रूपात गावात होता. मात्र नंतर तिही पडली. गावातील दगडी शाळाही आता नजरेआड होण्याच्या मार्गावर आहे तर गावातून जाणारा एक लहानसा ओढा पुढे गोदेला जाऊन मिळतो. म‌िठसागरेचे नेहमीच चर्चेत असलेले एक वेगळेपण म्हणजे.

दोन-तीन हजार लोकसंख्येच्या गावात गोरक्षनाथ कासार नावाची साधारण वीस-पंचवीसजण आहेत. त्यामुळे गोरक्षनाथ कासार यांना शोधत आलेल्या व्यक्तीची चांगलीच फजिती होते. त्या व्यक्तीला ते नेमके कुठे राहतात व कसे दिसतात याची माहिती नसेल तर त्या व्यक्तीला किमान पाच-दहा घरे तर नक्की भटकंती करावी लागते, असे ग्रामस्थ गंमतीने सांगतात. गावातील पोस्टमनही गोरक्षनाथ कासार नावाचे होते. एकाच नावाची साम्यता असण्यामागचे कारण म्हणजे गेली चाळीस-पन्नास वर्षांपासून दडलेली एक परंपरा अन्‌ श्रद्धा. सिन्नर- शिर्डी रस्त्यावर वावीपासून चार किलोमीटर असलेल्या या गावाजवळ धामोरी (ता. कोपरगाव) हे लहान गाव आहे. येथे श्री गोरक्षनाथांचे प्राचीन मंदिर, तसेच दुर्मिळ असलेले गोरखचिंच नावाचे झाड आहे. या झाडाचे खोड प्रचंड मोठे असून, तेथे किमान नऊ व्यक्ती एकावेळी बसून पारायण करू शकतात. म‌िठसागरे ग्रामस्थांचे हे गोरक्षनाथ मंदिर श्रद्धास्थान असल्याने आपल्या मुलांची नावे गोरक्षनाथ ठेवण्याची कासार कुटुंबीयांमध्ये परंपरा चालत आलेली आहे. म‌िठसागरेतील ग्रामस्थांनी श्रद्धा, परंपरा अन्‌ आपल्या संस्कृतीचे पैलू पुढील पिढीमध्ये रूजविण्यासाठी चालविलेली ही अनोखी पद्धत थक्क करते.

अनेक लहानलहान वाडे, वीरगळी, समाधी, बारव, टिकवून ठेवलेली आखाडी संस्कृती, गोरक्षनाथांच्या नावाचा वारसा अन् म‌िठसागरेच्या नावातील वेगळेपण हा प्रवास अल्हाददायक करतो. तर भागोजी नाईकांची म‌िठसागरेतील लढाई आजही लढत राहण्याची अनेकांना प्रेरणा देत राहते. आपण या योद्धांच्या बलिदानाला विसरू नये, अशी साद म‌िठसागरे घालत राहते.

 

लेखक : रमेश पडवळ

अंतिम सुधारित : 2/12/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate