অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सांगली जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन

सांगली जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन

चांदोली, सागरेश्वर अभयारण्य सांगली जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन सांगली जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे आहेत. प्रशासनातर्फे जिल्ह्यात 41 प्रमुख पर्यटनस्थळे निश्चित करण्यात आली आहेत.

सर्वच पर्यटनस्थळांना विशेष महत्त्व आहे. कृष्णेकाठी वसलेले सांगली हे जिल्ह्याचे मुख्यालय असून गावात मध्यभागी गणेशदुर्ग हा किल्ला आहे.

श्रीमंत अप्पासाहेब पटवर्धन यांनी बांधलेले येथील गणेश मंदिर प्रसिद्ध असून भारताच्या स्वातंत्र्य लढ्यावेळी महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांनी या मंदिरात बैठका घेतल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.

सांगलीपासून जवळच हरिपूर येथे कृष्णा व वारणा या नद्यांचा संगम झाला असून येथील संगमेश्वराचे मंदिर प्रसिद्ध आहे. येथेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे स्फूर्तीस्थळ हे स्मारक आहे.

कृष्णा-येरळा संगमावरील ब्रम्हनाळ आणि बहे (ता.वाळवा) येथील रामलिंग इत्यादी ठिकाणे प्रसिद्ध आहेत. जिल्ह्यातील एकूण पर्यटनाची थोडक्यात माहिती आपण घेऊया...

रामलिंग बेट

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात बोरगावजवळ बहे येथे कृष्णा नदीच्या पात्रात रामलिंग बेट तयार झालं आहे. इस्लामपूरहून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.

या निसर्गरम्य व कृष्णामाईच्या संथ वाहणाऱ्या प्रवाहात धनाजी पाटील व माणिक कारंडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने बालाजी बोट क्लब स्थापन केला आहे. बोरगाव-रेठरे रस्त्यावरील रामलिंग येथील कृष्णा नदीवरील भव्य पूलाच्या उजव्या बाजूला रामलिंग पुरातन मंदिर परिसर तर डाव्या बाजूला कृष्णेचं विस्तीर्ण पात्र व शांत डोह पसरलेला आहे. हे ठिकाण इतक मोहित करणारं आहे की तिथं पोहोचल्यावर कृष्णेच्या शांत आणि मनाला उल्हासित करणाऱ्या पात्रात नौका विहाराला प्रवृत्त व्हायलाच होत.

एकूणच आता नौका विहारासाठी लांबवर कोकणात जायला नको. सांगली जिल्ह्यात एक चांगली व अनोखी अशी नौका-नयनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. शांत व विस्तीर्ण कृष्णामाईचा प्रवाह, कृष्णाईच्या काठावरची हिरवीगार शिवारं, निसर्गरम्य वातावरण, रामलिंग बेटावरची पुरातन देवालय आणि नौका-विहार.

रोजच्या दैनंदिन जीवनातील तोच-तोचपणा घालवायचा असेल व मनाला चैतन्य प्राप्त करून घ्यायच असेल तर रामलिंग नौका विहाराचा आनंद लुटायला लवकरच जायला हवं. संपर्क:
रामलिंग बेट नौका विहारासाठी भोजन आदी सुविधेबाबत बालाजी बोटिंग क्लबचे सदस्य धनाजी पाटील (भ्रमणध्वनी-9552940507) किंवा माणिक कारंडे (भ्रमणध्वनी-9594795400) यांच्याशी पर्यटकांनी संपर्क साधावा.

श्री गणपती मंदिर

सांगली शहरातील गणपती मंदिर हे सांगलीचे इतिहासदत्त आकर्षण आहे. सांगली संस्थानचे पहिले अधिपती अप्पासाहेब पटवर्धन यांनी हे मंदिर 1843 साली बांधले. मिरज व सांगली संस्थानच्या वाटणीनंतर पटवर्धन हे 1808 पूर्वी सांगलीस आले व सांगली हेच त्यांनी राजधानीचे ठिकाण ठरविले.

पटवर्धन हे सांगलीत आले त्यावेळी सांगली शहर हे केवळ पाच हजार लोकवस्तीचे लहान गाव होते. ते राजधानीचे ठिकाण केल्याने गणेशदुर्ग किल्याची उभारणी करण्यात आली. त्याचवेळी सन 1813 च्या सुमारास श्री गणपती मंदिराच्या कामास सुरुवात झाली.

कृष्णा नदीच्या काठी हे देऊळ बांधलेले असून पूरापासून ते सुरक्षित रहावे म्हणून या मंदिराची कल्पकतेने उभारणी करण्यात आली आहे. सर्व मंदिराचा आकार तीस/चाळी फूट खोल चुनेगच्चीने भरुन कितीही पाणी वाढले तरी ते देवालयात येणार नाही अशी रचना करण्यात आली आहे.श्री गणपती मंदिर हे सांगली संस्थानचे आराध्य दैवत असून सांगलीकर नागरिकांचे श्रद्धास्थान आहे. केवळ हिंदूच नव्हे तर सर्व धर्मियांची या श्री गजाननावर दृढ श्रद्धा आहे.

सध्या गणपती मंदिर परिसर अतिशय देखणा करुन गणपती मंदिर परिसराचा कायापालट करण्यात सांगलीचे राजेसाहेब श्रीमंत पटवर्धन यांनी महत्वाकांक्षी योजना राबविली आहे.
सांगली रेल्वे स्टेशनपासून सुमारे अडीच कि.मी. अंतरावर सांगली शहरात हे श्री गणपती मंदिर आहे.

ख्वाजा शमशोद्दिन मिरासाहेब दर्गा

मिरज शहराच्या लौकिकात व सौंदर्यात भर टाकणाऱ्या ज्या अनेक वास्तू आहेत त्यामध्ये ख्वाजा शमशोद्दिन मिरासाहेबांचा दर्गा हे मिरजेचे खास आकर्षण आहे. हजारो हिंदू-मुस्लिम भक्तांचे हे श्रद्धास्थान आहे. हुतात्मा अवलिया हजरत पीर ख्वाजा शमशोद्दिन हे तुर्कस्थानातील काशगर या गावचे. त्यांच्या बालमनावर जनसेवा म्हणजेच ईश्वरसेवा या उच्च तत्वाचे संस्कार झाले होते. ते बालपणीच कुराण पठण करू लागले. वयाच्या 18व्या वर्षी ख्वाजा शमशोद्दिन हिंदुस्थानात आले.ख्वाजा साहेबाबद्दल खूपच आख्यायिका आहेत.

मिरजेचे राजे श्रीमत पटवर्धन ख्वाजासाहेबांना मानीत असत. मिरजेच्या किल्ल्याला एकदा पडलेला वेढा ख्वाजासाहेबांच्या कृपेनेच निघाला व संकट टळले, अशी आख्यायिका आहे. मिरजेचा हा दर्गा सन 1668 मध्ये बांधण्यात आला. 200 फूट लांब आणि 200 फूट रुंद अशा चौथऱ्यावर हा दर्गा बांधला आहे.

स्वरसम्राट मरहूम अब्दुल करीम खाँ यांची कबर याच दर्ग्याच्या आवारात असून त्यांचे शिष्य त्यांची पुण्यतिथी येथेचे संगीत सेवेन साजरी करतात. त्यावेळी दर्ग्यामध्ये सतत तीन-चार दिवस देशातील विख्यात संगीत कलाकार येऊन आपली हजेरी लावत असतात. या भागातील संगीत शौकिनांना ही एक प्रकारची पर्वणीच असते.
मिरज रेल्वे स्टेशनपासून मिरज शहरात 1 कि.मी. अंतरावर हा दर्गा आहे.

सागरेश्वर अभयारण्य

सागरेश्वरच्या डोंगरावर शासनाच्या वन विभागाने अभयारण्याची योजना मूर्त स्वरुपात आणली आहे. त्यादृष्टीने देवराष्ट्र, ताकारी व तुपारी, मोहित्याचे वडगाव, दुधारी, आसद या गावच्या सरहद्दीची 5.21 चौ.कि.मी. डोंगरावर असंख्य झाडे लावली असून या भागाचे जंगलात रुपांतर होऊ लागले आहे.

या अभयारण्यामध्ये अनेक जातीची हरणे सोडण्यात आली आहेत. अनेक प्रकारचे वृक्ष आणि प्राणी या अभयारण्यात आढळतात. सागरेश्वर अभयारण्य हे आज पर्यटकांचे एक आकर्षण ठरले आहे.

सागरेश्वर मंदिर

देवराष्ट्र गावच्या हद्दीत सागरेश्वराचे एक फार प्राचीन मंदिर आहे. मुख्य मंदिराच्या सभोवताली लहान-मोठी 40 ते 50 मंदिरे आहेत. मध्यभागी असणारे देऊळ सर्वात प्राचीन असून ते समुद्रेश्वराचे आहे. याठिकाणी पूर्व मुनी राहत असत असे म्हणतात. या भागास पूर्वी ‘कुंताड’ राष्ट्र म्हणत. त्यापैकी ही देवालये बांधली असावीत असे संशोधकाचे मत आहे. देवळांची बांधणी हेमाडपंथी आहे. सागरेश्वराहून देवराष्ट्र गावात जाताना एक प्राचीन तळे आहे.

हे कुंतल नरेशाने दुरुस्त केले असे म्हणतात. पूर्वी सूत नावाचे एक महाऋषी होते. त्यावरुन सूत उवाच असा पुराणातील उल्लेख आहे. सूत हा पुराणचा मोठा कथाकार होता. सूताने एकदा व्यासास म्हटले गुरुदेव मी सारी तीर्थे हिंडलो परंतु मला मानसिक समाधान नाही. मला आत्मिक समाधान लाभेल असे ठिकाण सांगा. व्यासानी समुदेश्वराच्या महादेवाचे मंदिर सुचविले. तेव्हापासून ऋषीनी याठिकाणी अनंत तप केले व ती भूमी पावन झाली असे म्हणतात.

हरिपूर

सांगली शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर हरिपूर हे छोटेसे गाव आहे. येथे कृष्णा आणि वारणा नद्यांचा संगम होतो. याठिकाणी संगमेश्वर हे देवस्थान असून श्रावण महिन्यातील सोमवारी अनेक भाविक येथे येतात. नद्याच्या संगमाचे विहंगम दृष्य पाहण्यासाठी लोक येतात. तसेच नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांनी येथील चौकातील पारावर बसून ‘संगीत शारदा’ हे नाटक लिहिले आहे. तो पार आजही येथे पहावयास मिळतो.

रेवणसिध्द

विटा-खानापूर रस्त्यावर रेणावी गावाजवळ श्री रेवणसिद्धाचे स्वयंभू स्थान आहे. देवालयाच्या पूर्व बाजूस उसळसिद्ध व पश्चिम बाजूला भुयारात विश्वाराध्य आहे. देवापुढे एक मोठा नंदी असून नंदीमागे पंच कलशाप्रमाणे प्राचार्य आहेत. हा रेणावी डोंगर पूर्वी पंच धातूचा म्हणजे सुवर्ण, तांबे, लोखंड वगैरे धातूंचा होता अशी आख्यायिका आहे.

डोंगरावरील पांढऱ्या खड्यांचा भस्माप्रमाणे उपयोग करतात. तालमीसाठी लागणाऱ्या तांबड्या मातीच्या खाणी या डोंगरावर आहेत. येथे निरनिराळ्या रंगाची माती सापडते. त्यामुळे संशोधन करण्यासारखे हे ठिकाण आहे.

या डोंगरावर 84 तिर्थे होती असा उल्लेख आहे.

श्री खरसुंड सिद्ध (खरसुंडी )

आटपाडी तालुक्यामध्ये श्री खरसुंड सिद्धाचे एक प्राचीन देवस्थान असून ते सुमारे 1125 वर्षांपूर्वीचे आहे. मयाप्पा गवळी नावाच्या एका भक्ताला दृष्टांत होऊन सिद्धनाथांच्या कृपेने त्यांच्या खिलारातील एका कालवडीच्या स्तनातून दुधाची धार सुरु झाली. या कच्च्या दुधाचा खरवस होऊन त्यातून दोन लिंगे तयार झाली. म्हणूनच या स्थानास खरसुंड-सिद्ध-खरवस शुंड-सिद्ध असे नाव प्राप्त झाले. शंकराच्या देवालयात नंदी असतो असा रिवाज आहे. परंतु या देवापुढे प्रतिष्ठापना ज्या कालवडीच्या स्तनातून दूध निघून ‘खारसुड सिद्ध’ तयार झाले त्या गोमातेची सुंदरशी पितळी प्रतिमा आहे.

यावरुन या कथेची सत्यता पटते. पुढे याचे खरसुंडी असे नामकरण झाले.माणदेशाचे आराध्य दैवत व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून खरसुंडी येथील सिद्धनाथ मंदीर प्रसिद्ध आहे. श्री सिद्धनाथांचे मंदीर दक्षिणाभिमुख, पुरातन दगडी आहे. त्याचे बांधकाम हेमाडपंथी पद्धतीचे आहे.मुख्य प्रवेशद्वार, नगारखाना, सभामंडप, गाभारा आणि प्रदक्षिणा मार्ग अशी मंदिराची रचना आहे.
या भागात खिलार जनावरांची पैदास चांगली आहे. वर्षातील पौष आणि चैत्र महिन्यात येथे मोठी यात्रा भरते. येथील यात्रेमध्ये खिलार जनावरांच्या खरेदीसाठी नागपूर, कर्नाटक भागातून लोक येतात. खरसुंडीच्या यात्रेत 50 हजाराहून अधिक खिलार जनावरे येतात. खरसुंडीची यात्रा अंदाजे 300 वर्षांपूर्वी सुरु झाली आहे.

कसे जाल

सांगलीपासून सुमारे 70 किमी. अंतरावर हे तीर्थक्षेत्र आहे. एस.टी.ने किंवा जीपनेच जावे लागते. सांगली जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांपैकी श्री क्षेत्र औदुंबर हे एक श्री दत्तात्रयाचे जागृत देवस्थान आहे.

पलूस तालुक्यात भिलवडी गावाजवळ कृष्णा नदीच्या काठी रम्य वनश्रीमध्ये नदीच्या काठावर हे देवालय आहे. देवालयामध्ये श्री दत्ताच्या पादुका आहेत. भिलवडी रेल्वे स्टेशनपासून पश्चिमेस चार किलोमीटरवर हे तीर्थक्षेत्र आहे. कृष्णेच्या घाटावरील श्री दत्तात्रयाचे देऊळ, ब्रम्हानंद स्वामीचा मठ, श्री भूवनेश्वरी देवीचे देऊळ या सर्व क्षेत्र समुहामुळे या परिसराचे महात्म्य वाढले आहे.

श्री ब्रम्हानंद स्वामी इ.एस.1826 मध्ये श्री क्षेत्र औदुंबर येथे आले व त्यांनी मठी उभारुन तप करण्यास सुरुवात केली. पुढे या क्षेत्रीच त्यांनी समाधी घेतली. त्यांची शिष्य परंपरा अजूनही चालू आहे.

श्री दत्त पादुकावर दगडी देवालय पूर्वाभिमुखी आहे. नदी पलिकडे श्री भूवनेश्वरीचे सुंदर देवालय आहे. देवीची मुर्ती काळ्या दगडाची असून सुंदर आहे. एक जुनी शिल्पकला म्हणून देवळावरील गोपूर पाहण्यासारखे आहेत. दरवर्षी महाशिवरात्रीला याठिकाणी मोठी यात्रा भरते.
याठिकाणी विश्रामगृह बांधण्यात आले असून मंदिरासाठी नदीकिनारी पूरसंरक्षक भिंतीचे काम करण्यात आले आहे.

तासगाव गणेश मंदिर व गोपूर

सांगली जिल्ह्यातील तासगाव या तालुक्याच्या ठिकाणी श्री गजाननाचे जुने मंदिर आहे. पेशव्याचे प्रसिद्ध सेनानी परशुराम भाऊ पटवर्धन यांनी सुमारे 200 वर्षांपूर्वी हे मंदिर आणि दक्षिणी घाटणीचे सात मजली गोपूर गणेश मंदिराच्या पुढे बांधले आहे. गोपूरावर खालपासून वरपर्यंत विविध देवदेवतांच्या मुर्ती कोरल्या आहेत.

मंदिरात जाताना उजव्या बाजूस श्री गजाननाचा एक मोठा लाकडी रथ होता, तो निकामी झाल्याने त्याच्याऐवजी आता लोखंडी रथ तयार केला आहे. दरवर्षी गणपती उत्सवात हा रथ बाहेर काढतात. तो शेकडो माणसे मोठ्या भक्तीभावाने ओढतात. तासगावचा हा श्री गजानन उजव्या सोंडेचा असून तो जागृत आहे.

वारणा धरण : चांदोली अभयारण्य

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम टोकास चांदोलीजवळ वारणा नदीवर ‘वारणा प्रकल्प’ हे 34.20 टी.एम.सी क्षमतचे धरण बांधले आहे. वसंतसागर जलाशय म्हणून ओळखल जाते.

धरणाची लांबी 1580 मीटर असून ह्या धरणाचा बांध मातीचा आहे. या धरणाचा सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील जमिनीच्या सिंचनासाठी लाभ होत आहे. अलिकडेच बांधण्यात आलेले मोठे धरण आहे. धरण परिसर पर्यटकांचे आकर्षक ठिकाण झाले आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांदोली अभयारण्य असून हे नैसर्गिक अभयारण्य सांगली-कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर आहे.
कसे जावे...
चांदोली राष्ट्रीय उद्यान हे मुंबईपासून ३८० किलोमीटरवर तर पुण्यापासून २१० किलोमीटरवर आहे. सांगली शहरापासून फक्त ८५ किलोमीटर तर कोल्हापूरपासून ८० किलोमीटरवर आहे. याठिकाणी बसने जाता येते.

दंडोबा हिल स्टेशन

मिरज तालुक्यात सांगली-पंढरपूर रस्त्यावर देशिंग गावच्या हद्दीत डोंगरावर एक महादेवाचे स्वयंभू स्थान आहे. डोंगर पोखरुन तेथे देवालय बांधले आहे. त्यावर शिखर केले आहे.

डोंगरावर वन विभागाने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केल्याने जुनी व नवीन अशी फार दाट झाडी आहे. दंडोबाच्या डोंगरावर वीज चमकू लागली की पाऊस पडतोच, अशी या भागातील लोकांची समजूत आहे. हे हिल स्टेशन व्हावे यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत.

श्री. शुक्राचार्य (पळशी)

खानापूर तालुक्यात खानापूर-जत या हमरस्त्याच्या उत्तरेच्या बाजूस दोन किलोमीटर आत श्री शुक्राचार्याचे एक प्राचीन जागृत देवस्थान आहे. शुक्राचार्य हे एक महान योगी होते. त्यांचे तप हरण करण्यासाठी इंद्राने रंभा नावाची अप्सरा पाठविली. परंतु शुक्राचार्य हे ब्रम्हचारी असल्याने स्त्रीचे दर्शन नको म्हणून ते डोंगरावर अदृष्य झाले. त्याचठिकाणी देवस्थान आहे.

याची साक्ष म्हणजे ते ज्याठिकाणी अदृष्य झाले, त्याठिकाणी त्यांच्या शरीराची मागील बाजू व जटा डोंगरात स्पष्ट दिसत. विटा परिसरातील हे एक जागृत देवस्थान असून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. याठिकाणी निसर्ग सौंदर्य व गर्द झाडी असल्याने ते पर्यटन स्थळ व्हावे यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत.

सांगली जिल्ह्यातील प्रेक्षणीय ठिकाणे

मिरज तालुका

  • सांगली येथील श्री गणेश मंदीर व कृष्णाकाठी कै. वसंतदादा पाटील यांची समाधी.
  • सांगली येथील आयर्विन पुल व गणेश दुर्ग.
  • हरिपूर येथील कृष्णा व वारणा नद्यांचा संगम व श्री संगमेश्वर देवालय, बागेतील गणपती.
  • तुंग येथील समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले श्री मारुती मंदीर.
  • मिरज येथील रेल्वे जंक्शन, ख्वाँजा शमशुद्दीन मिरासाहब दर्गा.
  • भोसेजवळ दंडोबा डोंगरावरील दंडेश्वर मंदीर व अभयारण्य.
  • बेळंकीजवळ श्री सिद्धश्वर मंदीर.
तासगाव तालुका
  • तासगाव येथील श्री गोपूर, गणेश मंदीर.
  • कवठेएकंद येथे अतिप्राचीन श्री सिद्धराज देवालय, खंडोबा मंदिर.
  • बेदाणा व द्राक्षांसाठी प्रसिद्ध तालुका
पलूस तालुका
  • अंकलखोपजवळ श्री क्षेत्र औदुंबर व दत्त मंदीर.
  • पलूस येथील श्री धोंडी महाराज समाधी.
  • ब्रम्हनाळ येथील कृष्णा व वेरळा संगम.
  • भिलवडीजवळ (भुवनेश्वरवाडी) येथील भुवनेश्वरी देवीचे अति प्राचीन मंदीर.
वाळवा तालुका
  • बहे येथे कृष्णा नदीच्या पात्रातील श्री रामलिंग बेट.
  • नरसिंहपूर येथील भुयारातील श्री नृसिंह मंदीर.
  • किल्ले मच्छिंद्रगड येथे श्री मच्छिंद्रनाथाचे देवालय.
  • येडेनिपाणी येथील मल्लिकार्जुन मंदीर (डोंगरमाथ्यावर).
  • ऊरण इस्लामपूर येथील संभूआप्पा देवालय.
  • शिवपुरी येथील सिद्धेश्वर देवालय.
  • कवठेमहांकाळ तालुका
  • कवठेमहांकाळ येथील श्री महांकाली मंदीर.
  • आरेवाडी येथील श्री बिरोबा देवालय.
शिराळा तालुका
  • शिराळा येथील श्री गोरखनाथ मंदीर, येथेच समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले श्री मारुती मंदीर.
  • चांदोली येथील वारणा धरण (वसंतसागर) व अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान.
  • प्रचितगड प्रेक्षणीय किल्ला.
  • चांदोली खु. प्रेक्षणीय कंधार डोह धबधबा.
  • गिरजवडे येथील जोतिर्लिंग देवस्थान.
आटपाडी तालुका
  • आटपाडी येथील कैद्यांची खुली वसाहत (तुरुंग) (स्वतंत्रपूर).
  • खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ मंदीर.
  • करगणी येथील श्री राम मंदीर.
  • वलवण येथील मोराचे थवे.
  • राजेवाडी येथील इंग्रज काळातील तलाव.
जत तालुका
  • जत येथील श्री यलम्मा देवी मंदीर व श्रीराम मंदीर.
  • गुड्डापूर येथील दानम्मा मंदीर.
  • बनाळी येथील बनशंकरी मंदीर.
  • गिरगांव येथे डोंगरावरील श्री लक्ष्मी मंदीर.
  • सोर्डी येथील श्री दत्त मंदीर, मलाकसिद्ध.
  • गुडघरी सिद्धनाथ येथे हेमाडपंथी देवालय.
  • खानापूर तालुका
  • रेणावी येथील श्री रेवणसिद्ध मंदीर.
कडेगांव तालुका
  • देवराष्ट्रे येथील कै. यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी व सागरेश्वर अभयारण्य.
  • कडेपूर येथील श्री डोंगराई देवी.


संकलन- जिल्हा माहिती कार्यालय, सांगली.

स्रोत: महान्यूज, गुरुवार, २१ मे, २०१५

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate