অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नाशिक जिल्हा - पर्यटन

नाशिक जिल्हा - पर्यटन

  1. प्रस्तावना
  2. त्रंबकेश्वर मंदिर
  3. श्रीसिहस्थ गोदावरी मंदिर
  4. श्रीगंगा गोदावरी मंदिर
  5. श्रीकाळाराम मंदिर
  6. सीतागुंफा
  7. श्रीकपालेश्वर मंदिर
  8. सुंदर नारायण मंदिर
  9. श्री सप्तश्रृंगी देवी मंदिर व श्री नारोशंकर (रामेश्वर) मंदिर
  10. बालाजी मंदिर
  11. मुरलीधर मंदिर
  12. यशवंतरावमहाराज मंदिर / समाधी
  13. मोदकेश्वर गणपती
  14. कपूरथळा छत्री
  15. काटया मारूती
  16. तपोवन
  17. भद्रकाली मंदिर
  18. समर्थ रामदासांची टाकळी
  19. भक्तीधाम (कैलासमठ)
  20. मुक्तीधाम
  21. कोदंडधारी राम
  22. सोमेश्वर मंदिर
  23. गंगेश्वर वेदमंदिर
  24. प्रेक्षणीय स्थळे
    1. पांडव लेणी
    2. चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारक
    3. बुध्दस्मारक
    4. चांभार लेणी
    5. श्रीसप्तश्रृंगी देवी
    6. टाकेद तीर्थ
    7. रामसेज डोंगर
    8. चांदवडची रेणुकादेवी व रंगमहाल

प्रस्तावना

नाशिक शहरात गोदावरी जेथे दक्षिणवाहिनी झाली तेथे अनेक पवित्र कुंडे असून प्रत्येक कुंडाचे वेगळे महत्व आहे. अरूणा संगमाच्या ठिकाणी असलेल्या रामकुंडात प्रभू रामचंद्र व सीतामाई स्नान करीत. संगमाच्या ठिकाणी असलेल्या रामकुंडातच अस्थीविलय कुंड असून तेथे प्रभू रामचंद्राने श्राध्दविधी केले. या कुंडातच अस्थीविलय कुंड असून तेथे अस्थी विसर्जन केले जाते. साडेतीन तासात अस्थीचे विलय होते. १६९६ मध्ये सातारचे चित्राव यांनी रामकुंड बांधले तर १७२८ मध्ये या रामकुंडाला गोपीकाबाईंनी लक्ष्मण कुंडाची जोड दिली. तसेच सीताकुंड, धनुष्यकुंड, अहिल्याकुंड, दुतोंडया मारूती कुंड, सूर्य कुंड, गोरेराम कुंड, रामगया कुंड, पेशव्यांचे कुंड, रामकुंडाच्या येथे गोदावरी दक्षिणवाहिनी होते. म्हणून नाशिकला तिचे वेगळे महत्व आहे. रामकुंडाच्या ठिकाणी वंशवृध्दीसाठी एकवस्त्र विधी करतात. तसेच श्राध्द व पिडाला काकस्पर्शाने मुक्ती मिळविणे याचे ही इथे महत्व आहे.

त्रंबकेश्वर मंदिर

निसर्गरम्य परिसर - त्रंबकेश्वर डोंगराच्या कुशीत वसलेले नयनरम्य स्थान आहे. श्रावण महिन्यात हिरव्या पाचूच्या बेटासारखे हे चिमुकले गाव दिसते. मध्यभागी गंगासागर कुंड आहे. गावाचा पाणीपुरवठा येथून होतो. कुशावर्त कुंड तर तीर्थांचे तीर्थ म्हणून समजले जाते. ब्रम्हगिरी पर्वत समुद्रसपाटीपासून १२९४ मीटर्स (४२४६ फुट ) उंच आहे. अनेक धार्मिक विधी केले जातात. नारायण नागबली विधीसाठी देशाच्या कानाकोप-यातून मान्यवर येत असतात. येथे क्षेत्रस्थ ब्राहमणांनी आपल्या यजमान घराण्याच्या पुरातन वंशावली जपल्या आहेत. त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अनेक ऐतिहासिक मान्यवरांचे हस्ताक्षर आहे.

भगवान शंकराचे हे भव्य मंदिर हेमाडपंथी पध्दतीने बांधलेले आहे. या मंदिरास त्या काळी सुमारे ३० लाख रूपये खर्च आला. १७४५ ते १७७५ च्या दरम्यान पेशव्यांनी हे पवित्र कार्य केले. मंदिराचे काम संपूर्ण काळया दगडात आहे. कोरीव काम अतिशय सुबक असून मंदिर भव्य आणि पवित्र आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराशी नगारा घर आहे. मंदिराच्या चहुबाजूंनी मोठी तटवजा भिंत आहे, तर परिसर दगडांनी बांधलेला आहे, आत भक्तांना स्नान करायला व पाय धुवायला कुंड आहे. मंदिराचा गाभारा अतिशय शांत व पावित्राने आणि मांगल्याने भरलेला आहे. शिवलिग हे स्वयंभू आहे. पिडीत ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे दर्शन होते. दर सोमवारी पालखी निघते. मंदिराचा कळस सोन्याचा आहे.

श्रीसिहस्थ गोदावरी मंदिर

रामकुंडाच्या उत्तरेस हे मंदिर असून फक्त १२ वर्षांनी, म्हणजेच सिहस्थ कुंभमेळयाचे वेळीच १ वर्षभर हे मंदिर उघडते. वर्षातून दोनदा ज्येष्ठ शु !! १० (दशहरा) व कार्तिक शु !! १५ त्रिपुरी पौर्णिमा दीपोत्सवासाठी हे मंदिर उघडले जाते. या मंदिरात भगिरथीची मूर्ती आहे. सिहस्थ गोदावरीचे मंदिर फक्त नाशिकक्षेत्रीच आहे.

श्रीगंगा गोदावरी मंदिर

हे मंदि रामकुं डाच्या पूर्वेला अरूणा संगमाजवळ असून येथे मकर वाहिनी गोदावरी व भागिरथी अशा दोन मूर्ती आहेत. तीर्थयात्रेची गंगाभेट या मंदिरात करतात. या मंदिराची व्यवस्था श्रीगंगा गोदावरी पंचकोटी ( पुरोहीत संघ ) या संस्थेकडे आहे. हया मंदिरात नित्य अभिषेक, पूजा, सप्तशती पाठ, आरती इ. कार्यक्रम होतात.

श्रीकाळाराम मंदिर

नाशिक क्षेत्रातील हे प्रमुख मंदिर मानले जाते. प्रभू रामचंद्र वनवासात असताना पंचवटीत आल्यानंतर जेथे त्यांनी वास केला होता, त्या ठिकाणी पुरातन मंदिर होते. हया पुरातन मंदिराचा जीर्णोध्दार पेशव्यांचे सरदार श्री. ओढेकर यांनी केला. इ.स.१७७८ ते १७९० म्हणजेच १२ वर्षे मंदिराचे बांधकाम चालले हाते. भव्य मंदिर व सभामंडप यासाठी २३ लाख रूपये खर्च झाल्याची नोंद आहे. हे मंदिर रामसेज येथील काळया दगडांचे बांधले असून अतिशय सुंदर व कलात्मक असे आहे. मंदिराच्या चारही दिशांना भव्य द्वार आहेत. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिरातील मूर्ती वालूकामय आहेत. तसेच मंदिराचा कळस सोन्याचा आहे. चैत्र शुध्द प्रतिपद (गुडीपाडवा) ते शुध्द नवमी (रामनवमीपर्यंत) ‘‘श्रीराम जन्मोत्सव‘‘ मोठया प्रमाणात साजरा केला जातो. चैत्र शुध्द एकादशीला रामरथ व हनुमानरथाची यात्रा निघते. हया रथयात्रेचे दृश्य पाहण्यासाठी असंख्य भाविक नाशिकला येतात.

सीतागुंफा

श्रीकाळाराम मंदिराच्या उत्तरेस हे स्थान आहे. सीतचे वास्तव्य या ठिकाणी होते म्हणून हे स्थान सीतागुंफा नावाने ओळखले जाते. सीतागुंफेत भुयारा सारख्या अरूंद मार्गातून जावून येण्यास लहान मुलांना गंमत वाटते. या ठिकाणी पाच वटवृक्ष आहेत. म्हणून ते ‘पंचवटी‘ नावाने प्रसिध्द आहे.

श्रीकपालेश्वर मंदिर

ज्या मंदिरात भगवान शंकराच्या पुढे नंदी नाही असे एकमेव मंदिर म्हणजे नाशिकचे कपालेश्वर मंदिर, त्याची आख्यायिका अशी आहे की, ब्रह्मदेवाच्या एका मुखाने केलेली भगवान विष्णूची निदा ऐकून भगवान शंकराने त्या मुखाचा छेद केला. परंतू त्यामुळे ब्रह्महत्येचे पातक लागले म्हणून ते पळू लागले. पळताना विश्रांतीसाठी थांबले असताना गाय - वासराचा (बैलाचा) संवाद ऐकला. बैल म्हणत होता की, ‘‘उद्या मी माझ्या मालकाला ठार करीन ‘‘ तेव्हा गाय म्हणाली की, ‘‘तू असे करू नको. कारण ब्रह्महत्येचे पातक लागेल‘‘. तेंव्हा बैल गाईला म्हणाला की, मला ब्रह्महत्या विनाशाचे तीर्थ कोठे आहे याची माहीती आहे‘‘ त्याप्रमाणे दुस-या दिवशी त्या बैलाने आपल्या मालकाला ठार केल्यावर तो तेथून पळत निघाला हे पाहून शंकरही त्याच्या मागे निघाले. त्या बैलाने (नंदिने) नाशिकला रामतीर्थावर अरूणा संगमाच्या ठिकाणी उडी मारताच तो शुध्द झाला. हे पाहून भगवान शंकरही या अरूणा संगमावर स्नानादी कर्मे करून शुध्द झाले व समोरच कपारीत बसले. त्यांच्या मागचे ब्रह्महत्येचे पातक नाहिसे झाले. नंदीमुळे ब्रह्महत्या विनाशाच्या स्थानाचे ज्ञान झाले म्हणून त्यास गुरूसमान मानून शंकराने नंदिला आपल्यासमोर बसविले नाही. त्यामूळेच संपूर्ण भारतात भगवान शंकरापुढे नंदी असला तरी कपालेश्वरसमोर मात्र नंदि नाही. असे हे एकमेव आहे.

सुंदर नारायण मंदिर

भगवान विष्णूंना जालंदर पत्नी वृंदा हिच्या शापाने कृष्णवर्णरूप प्राप्त झाले. (त्याला आपण शालिग्राम म्हणतो) तेव्हा महाविष्णूंनी गोदावरी तीर्थावर स्नान करून आपले रूप पूर्ववत प्राप्त करून घेतले व तेथेच वास्तव्य केले तेंव्हापासून सुंदरनारायण मंदिर प्रसिध्द झाले. गोदावरीच्या तीरावर व्हिक्टोरिया पुलाजवळ म्हणजे आताच्या होळकर पुलाजवळील हे मंदिर १७५६ मध्ये गंगाधर यशवंत चंद्रचुड यांनी पुन्हा बांधले. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराचे वैशिष्टय म्हणजे २० व २१ मार्च रोजी सूर्याचे किरण विष्णूच्या मूर्तीवर पडतात. म्हणून याला ‘हरिहर भेट‘ असेही म्हणतात. हेच मंदिर औरंगजेबाने उध्वस्त करून तेथे थडगे बांधले होते. पेशवे काळात हे थडगे काढून तेथे भव्य मंदिर साकार झाले व आक्रमणाचे पाप धुतले गेले.

श्री सप्तश्रृंगी देवी मंदिर व श्री नारोशंकर (रामेश्वर) मंदिर

ही दोन्ही मंदिरे रामगया तीर्थावर पंचवटीमध्ये वसलेली आहेत. ही दोन्ही स्थाने जागृत असून सरदार राजेबहादूर या घराण्याची आहेत. हया ठिकाणी इतिहासप्रसिध्द नारोशंकराची घंटा आहे. वसईच्या लढयातून पेशव्यांनी ही घंटा जिकून आणलेली आहे.

बालाजी मंदिर

रामसेतू पुलाअलिकडे सरकारवाडयाजवळ हे मंदिर उभे आहे. ते १७७१ मध्ये बांधले गेले. मंदिरातील देखण्या मूर्ती तामिळनाडू राज्यातील पण्णवेल्ली गावात गणपतीबुवा गोसावी यांना सापडल्या. बालाजीचा मुकूट सोनेरी असून त्यावर रत्ने व माणके जडविलेली आहेत. या मंदिराचा ट्रस्ट असून संस्थानचा कारभार व गरजूंना आर्थिक मदत या ट्रस्ट तर्फे होते.

मुरलीधर मंदिर

गोरेराम गल्ली-कापड पेठेतील हे मंदिर १८२८ मध्ये कै. दादाबुवा यांनी बांधले. मुरली वाजविणा-या कृष्णाची मूर्ती आणि दोन्ही बाजूला सवंत्स धेनू आहेत. कृष्णजन्माच्या उत्सावात दररोज वेगळे रूप सजविले जाते. ते अत्यंत मनोहरी असते.

यशवंतरावमहाराज मंदिर / समाधी

साधूपुरूष यशवंतरावमहाराज देव-मामलेदार यांचे मंदिर गोदावरीच्या काठी आहे. हे देवालय १८८७ मध्ये देव मामलेदारांनी समाधी घेतल्यानंतर बांधले गेले. यशवंतरावमहाराज सटाणा येथे मामलेदार असतांना मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी सरकारी नियम धाब्यावर बसवून त्यांनी गोरगरीबांना मदत केली होती. अत्यंत साधुवृत्तीचे संत पुरूष म्हणून त्यांचा लौकिक होता. एखाद्या सरकारी अधिका-याचे असे जगातले हे एकमेव मंदिर असावे. याच पटांगणात दरवर्षी वसंत व्याख्यानमाला होते.

मोदकेश्वर गणपती

संत गाडगेबाबा महाराजांच्या धर्मशाळेच्या अलिकडे श्रीमोदकेश्वराचे मंदिर लागते. हे एक जागृत स्थान असून हा गणपती नावाला पावतो अशी भक्तांची नितांत श्रध्दा आहे. आजूबाजूच्या उत्खननात मोदकाच्या आकाराचे दगड सापडले म्हणून त्या मंदिराला मोदकेश्वर मंदिर असे नाव पडले.

कपूरथळा छत्री

गाडगेमहाराज पुल वरामसेतू पूल यांच्या मधोमध ३० फु ट उंचीची संपूर्ण संगवरवरी कपूरथळा छत्री आहे. कपूर-थळा (पंजाब) संस्थानच्या माजी नशेशांचे १८७० मध्ये एडन येथे निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ही छत्री बांधण्यात आली. समोरच कपूरथळा धर्मशाळा आहे.

काटया मारूती

हे स्थान पंचवटीत वरूणा नदीच्या पुलाजवळ आहे. येथील मारूतीची मूर्ती १० फू ट उंचीची आहे. म्हणून या मारूतीला ‘लंबे हनुमान‘ असेही म्हणतात.

तपोवन

हे स्थान पंचवटीपासून ३ कि.मी.वर आहे. येथे कपिला व गोदावरीचा संगम आहे. सांख्य शास्त्राचे प्रणेते श्री. कपिल मुनींची ही तपोभूमि आहे. या संगमावर १. ब्रह्मयोनी, २. विष्णुयोनी, ३.रूद्रयोनी, ४. मुक्तीतीर्थ, ५. अग्रीतीर्थ, ६. सौभाग्य तीर्थ, ७. कपील तीर्थ, ८. कपिला संगम हया अष्टतीर्थांचा उल्लेख स्कंद पुराणात आहे. तपोवनात श्री कपिल महामुनी दर्शन, कपिला गाय आणि प्रभु रामचंद्र व लक्ष्मणाने शूर्पनखाचे नाक कापले ते दर्शविणा-या मूर्ती आहेत. तपोवनातील नैसर्गिक सौदर्य रमणीय आहे. या ठिकाणी श्री. संत जनार्दन भेट झाल्याचा उल्लेख आढळतो. कपिला गोदावरीचा संगम, कपिमुनींची तपोभूमि अष्टतीर्थ, रामायणातील महत्वाचे स्थान इत्यादी स्थानमहात्म्य असलेली पंचवटीतील तपोवन ही भूमी पौराणिक महात्म्य सांगून जाते. पर्यटकांच्या दृष्टीने महत्वाच्या या जागेवर महानगरपालिकेच्यावतीने दर्शनी भागात आकर्षक बांधकाम करून तेथील परिसर सुशोभित करण्यात येत आहे.

भद्रकाली मंदिर

नाशिक शहरात श्रीभद्रकाली नवदुर्गाचे पुराणप्रसिध्द मंदिर आहे. येथे दररोज कथा, किर्तन व प्रवचने होतात. नवरात्र उत्सव मोठया प्रमाणावर साजरा केला जातो.

समर्थ रामदासांची टाकळी

नाशिक च्या पूर्वेस हे स्थान आहे. नासर्डी व गोदावरीच्या संगमावर हे वसले आहे. येथे राष्ट्रसंत श्रीसमर्थ रामदासस्वामी यांनी १३ वर्षे तपश्चर्या करून गोमय मारूतीची स्थापना केली. दासनवमी व श्रीरामनवमी तसेच श्रीहनुमान जयंती या दिवशी या ठिकाणी मोठी यात्रा भरते. टाकळी येथील वास्तव्यातच गुरूनानक यांचा नातू व गोसावी सांप्रदायाचे प्रवर्तक चंद्राचार्य यांची व समर्थ्यांची भेट झाल्याचा उल्लेख आढळतो. भक्ती आणि शक्ती, ज्ञान आणि युक्ति याची सांगड घालून आक्रमकांचा संहार करण्याची व महाराष्ट्र धर्माची प्रेरणा देणारे हे शक्तीस्थान आहे.

भक्तीधाम (कैलासमठ)

भक्तीधाम (कैलासमठ) हे स्थान पंचवटीमध्ये पेठरोडवर आहे. येथे विद्वान वेद-वेदांग शास्त्राचे पठण करण्यासाठी येतात. तसेच येथे विद्यार्थ्यांसाठी निवासी वेदपाठशाळा चालविली जाते. यात्रेकरूंना राहण्यासाठी या ठिकाणी चांगली व्यवस्था आहे.

मुक्तीधाम

नाशिकरोड मधील सर्वात भव्य मंदिर कै.जयरामभाई बिटको यांनी २३ लाख रूपये खर्च करून एक आधुनिक संगमरवरी देवस्थान उभे केले आहे. राजस्थान मधील मक्रान (जयपूर) येथून आणलेला दगड व राजस्थानी कारागीर यांनी हे शिल्प घडविले . गीतेचे श्लोक या मंदिराच्या भितीवर कोरलेले आहेत. सर्व म्हणजे १२ ज्योर्तिलिगांचे देखावे प्रेक्षणीय आहेत. बहुतेक सर्व मोठया देवदेवतांचे दर्शन येथे एकत्र होते. जवळच एक उद्यान आहे. भक्तांसाठी राहण्याची सोय मुक्तीधामच्या परिसरात आहे.

कोदंडधारी राम

धर्मवीर डॉ.मुंजे यांनी स्थापन केलेल्या भोसला मिलीटरी स्कूलच्या परिसरात कोदंडधारी रामाचे हे सुंदर मंदिर आहे. नेमबाजी शिकवितांना बंदूकिच्या ज्या गोळया उडविल्या जातात. त्या गोळयांच्या (काडतूस) उरलेल्या धातूतून ही अप्रतिम मूर्ती घडविलेली आहे.

सोमेश्वर मंदिर

नाशिकच्या उत्तरेस म्हणजे नाशिक गंगापूर रस्त्यानजिक सुमारे ४ कि.मी. अंतरावर हे मंदिर असून गोदावरी नदीच्या काठी आहे. तेथे स्वयंभू सोमेश्वर प्रकट झाले आहेत. त्या स्थळावर सोमेश्वराचे आद्य मंदिर असून मंदिराखालून गुप्त गंगा वहात असून ती जवळच असलेल्या एका झाडाखालून प्रकट झाली आहे. तिचा प्रवाह अव्याहत चालू असतो. मंदिराचा परिसर अतिशय रमणीय आणि नयनमनोहर आहे. पुढे गंगापूरचा धबधबा असून त्याच्या पुढे शंकराचार्य डॉ.कुर्तकोटींचा आश्रम व समाधी आहे.

गंगेश्वर वेदमंदिर

वेदग्रंथाचे संगमरवरी शिल्प असलेले हे मंदिर वैशिष्टयपूर्व आहे. इटालीयन मार्बलमध्ये मंदिराचे बांधकाम आहे. प्रवेशद्वार भव्य असून सुबक काचेची दालने आहेत. मंदिरात श्रीराम, लक्ष्मण, सीतामाई यांच्या मूर्ती आहेत. गुरू गंगेश्वरांचा पुतळा मनोहरी आहे, हे मंदिर नाशिक-त्रंबक रस्त्यावर आहे.

प्रेक्षणीय स्थळे

पांडव लेणी

नाशिकच्या अलिकडे दक्षिणेस सुमारे ८ किलोमीटर्सवर डोंगरात कोरलेली लेणी आहेत. शहराच्या नैऋत्येस शंखाच्या आकाराचे तीन डोंगर आहेत. त्यांना ‘‘त्रिराशी‘‘ असे संबोधतात. मध्याला डोंगरावर ही लेणी आहेत. ती सुमारे इ.स.पूर्व १०० ते ११० या वर्षी खोदलेली असावीत. एकूण २९ गुंफा आहेत. शालिवाहन हया हिदू राजाने बौध्द भिक्कूसाठी प्रवासात विश्रांती घेण्यासाठी ही लेणी बांधली . आतील भगवान गौतम बुध्दाच्या तसेच बोधीसत्वाच्या मूर्ती प्रेक्षणीय आहेत.

चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारक

चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांचे अत्यंत आकर्षक स्मारक पांडवलेण्याच्या पायथ्याशी नाशिक महानगरपालिकेने साकारले आहे. या जागेचे क्षेत्रफळ ११.७५ एकर असून डोंगराच्या पूर्व आणि उत्तरेच्या उतरणीवरून वाहणा-या पाण्याचा नैसर्गिक उपयोग करून हे नयनरम्य स्थान निर्माण झाले. मध्यवर्ती जलसंचय हे केंद्रस्थान मानून भोवताली टेरेसेसची आखणी करून खुला रंगमंच उभारला आहे. तसेच २५० प्रेक्षक बसतील असे छोटे चित्रपटगृह, कॅन्टीन व रंगबेरंगी तरंगती कारंजी व येथे विहरण्यासाठी हिरवेगार लॉन असे चित्ताकर्षक नवे पर्यटन स्थळ निर्माण झाले आहे.

बुध्दस्मारक

कै.दादासाहेब फाळके स्मारक उद्यानाचा एक अविभाज्य भाग दिसावा अशी रचना येथील बुध्दस्मारकाची करण्यात आली आहे. स्मारक उद्यानापैकी पांडवलेण्याच्या प्रवेशद्वाराजवळील पाच एकर जमिनीत बुध्दस्मारकाची उभारणी करण्यात आली आहे. बुध्दस्मारकांच्या तळमजल्याला प्रदर्शनासाठी कलादालन व अभ्यासिक ा असून सांचीस्तुपांचा प्रतिकृतीच्या गोलाकाराचे चैत्य सभागृह आहे. चैत्य सभागृहाकडे जाण्यासाठी प्रदर्शन मार्गाला चार प्रवेशद्वारे आहेत. या प्रवेशद्वारावर चार समप्रमाणात आसांची चार तोरणे उभारण्यात आली आहेत.

(पांडवलेणी,फाळके स्माकर, व बौध्द स्मारक हे तीनही एकाच ठिकाणी असून येथे सिटी बस व रिक्षाने जाता येते)

चांभार लेणी

नाशिकच्या उत्तरेस (पंचवटीच्या पुढे) पाच मैलावर म्हसरूळजवळ जैनांची गजपंथी लेणी आहेत. त्याला ‘चांभार लेणी ‘ असेही म्हणतात. गजपंथी टेकडीच्या पायथ्याजवळील म्हसरूळ या गावी १९४२ साली पारसनाथ मंदिर बांधण्यात आले. ही लेणी ११ व्या शतकात बांधली गेली असून ती जैनांच्या पवित्र तीर्थापैकी मानली जातात. खाली सीताकुंड आहे. पौष महिन्यात दर रविवारी येथे यात्रा भरते.

श्रीसप्तश्रृंगी देवी

महाराष्ट्रत शक्तीची साडेतीन पीठे मानली जातात. त्यापैकी वणीच्या देवीचा सप्तश्र्रृंगी गड हे आदिशक्ती स्थान मानले जाते. ओंकारातील आकार पूर्ण रूप होवून सप्तश्र्रृंगी गडावर स्थिरावला. म्हणून आदिमायेचे हे पूर्णरूप मानले जाते. नाशिकपासून ६५ कि.मी. दूर सहयाद्री पर्वतांच्या पूर्व-पश्चिम पर्वतरांगेत हे स्थान आहे. समुद्रसपाटीपासून ४६०० फुट उंचीवरचे हे ठिकाण निसर्गाने नटलेले व भाविकांना आकर्षित करणारे आहे. गडावर चढून आल्यावर ५०० पाय-या चढून मंदिराकडे जाता येते. डोंगराच्या कपारीत ८ फुट उंचीची व १८ बाहू असलेली स्वयंभू पाषाणमूर्ती आहे. विशेष म्हणजे, या मुर्तिच्या चेह-यावरील भाव महाकाय व महिषासुरमर्दिनीरूप असूनही अत्यंत प्रसन्न आहे. दर पौर्णिमेला व नवरात्रात भाविकांची गर्दी असते. चैत्र पौर्णिमेला तर लक्षावधी भाविक येतात. गडावर पूर्वी १०८ कुंडे होती. परंतु, सध्या त्यापैकी १० ते १५ कुंडे दिसतात. जलगुंफा, शिवतिर्थ, तांबुल तीर्थ व काजळ तीर्थ इ.१०-१२ तीर्थ दिसतात. शिवालयतीर्थापासून जवळच शितकडा नावाची १२०० फुट खोल दरी आहे. यालाच ‘सतीचा कडा‘ असेही म्हणतात.

(वणीतील नाशिक दिडोरी रस्त्याने बसने जाता येते. तसेच पंचवटीत दिडोरी रस्त्यावरून टॅक्सीही मिळते. गडावर रहाण्याची अल्प दरात सोय आहे. भोजन प्रसाधानाची ही व्यवस्था आहे.)

टाकेद तीर्थ

नाशिक पासून ७१.१ कि.मी. व इगतपूरी पासून ६२.३ कि.मी. अंतरावर असलेले टाकेद हे गाव आहे. या ठिकाणी रावण सीतेला नेत असता जटायूशी युध्द झाले ते ठिकाण होय. टाकेद या ठिकाणी महाशिवरात्रीस मोठी यात्रा भरते.

रामसेज डोंगर

पंचवटीच्या उत्तरेस १० मैलावर हा डोंगर आहे. या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्र शय्येसाठी जात. या रामसेज पर्वताच्या दगडांचेच श्री काळाराम मंदिर बांधलेले आहे.

चांदवडची रेणुकादेवी व रंगमहाल

नाशिकपासून ६५ कि.मी. अंतरावर आग्रारोडवर चांदवड येथे रेणुकामाता देवीचे डोंगरातील मंदिर प्रसिध्द आहे. अहिल्याबाई होळकर यांनी १७५० ते १७६५ या काळात चांदवड येथे अनेक सुधारणा केल्या तसेच भव्य रंगमहाल बांधला. हया रंगमहालातील नक्षीकामात असलेले रंग आजही रसिकांना आकर्र्षत करतात. याशिवाय डोंगरावर चंद्रेश्वराचे मंदिर आहे.

 

माहिती संकलक : अतुल पगार

स्त्रोत : https://zpnashik.maharashtra.gov.in/html/tourism.asp

अंतिम सुधारित : 8/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate