অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मराठवाडा पर्यटन

मराठवाडा पर्यटन

27 सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त मराठवाडा विभागातील पर्यटन स्थळांची ही थोडक्यात ओळख….

अजिंठा व वेरुळ लेणी

जागतिक वारसा स्थान म्हणून घोषित झालेली ही बौद्धकालीन लेणी बुद्ध व बोधिसत्वाचे विहंगम दर्शन घडवतात. सन 1879 मध्ये एका ब्रिटीश अधिकाऱ्याने काळाच्या ओघात हरवलेली ही लेणी पुन्हा शोधून काढली. जगभरातून पर्यटक येथे येत असतात.

हिंदू, जैन व बौद्ध धर्माचा प्रभाव असलेली ही लेणी स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना अाहे. तेराव्या शतकातील या लेण्यांमधील कैलास मंदिर हे एक महत्वाचे व जगातील सर्वात मोठे अखंड शिल्प आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी हे एक आहे.

औरंगाबाद

औरंगाबाद येथे ताजमहालची प्रतिकृती असलेला ‘बिबी का मकबरा’ प्रसिद्ध आहे. 1678 साली तो बांधण्यात आला. याशिवाय पवनचक्की, 52 ऐतिहासिक दरवाजे, सोनेरी महाल, सलीम अली सरोवर, गौताळा अभयारण्य पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. अजिंठा व वेरुळच्या जगप्रसिद्ध लेण्या तसेच आसपासच्या परिसरातील महत्वाच्या ठिकाणांमुळे औरंगाबाद हे एक मध्यवर्ती केंद्र झाले आहे. औरंगाबाद रेल्वे, रस्ते व हवाई मार्गाने जोडले गेले आहे.

म्हैसमाळ

सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये सुमारे 913 मीटर उंचीवर वसलेले हे ठिकाण गिरीजा भवानी मंदिरासाठी सुप्रसिद्ध आहे. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी येथे मोठा उत्सव भरतो.

पैठण

गोदावरी नदीच्या काठी वसलेले पैठण हे शहर जरीकाम केलेल्या पैठणी साड्यांकरिता प्रसिद्ध आहे. तसेच पैठण हे शहर संत एकनाथांचे जन्मगाव म्हणून प्रसिद्ध आहे.

पितळखोरा लेणी

ही भारतातील सर्वात जुन्या लेण्यांपैकी असून ती अंदाजे 2300 वर्षापूर्वी कोरण्यात आली आहेत. पितळखोऱ्याची लेणी अजिंठा लेण्यापेक्षाही जवळपास 100 वर्षे आधी कोरली आहेत.

अंबेजोगाई

बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई मराठी साहित्यातील संत कवी श्री मुकूंदराज आणि श्री दासोपंत यांचे जन्मस्थान आहे.

बीड

बीड हे शहर छागल व गुप्ती यांच्या निर्मितीकरिता प्रसिद्ध आहे. बीड येथील अनेक ऐतिहासिक स्थाने व राजा सिंघलदेव याने बांधलेला किल्ला पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत.

परळी वैजनाथ

बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे एक प्रमुख ज्योतिर्लिंग आहे. महाशिवरात्रीस येथे मोठी जत्रा भरते.

उस्मानाबाद

उस्मानाबाद शहरामध्ये अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. विशेषत: चांभार व धाराशीव लेणी यामध्ये प्रमुख आहेत.

तेर

तेरणा नदीच्या दोन्ही काठांवर हे गाव वसलेले आहे. श्रीसंत गोराकुंभार यांचे ठिकाण म्हणून तेर ओळखले जाते. त्यांचे मंदिरही येथे आहे.

तुळजापूर

तुळजा भवानी मातेच्या मंदिरामुळे तुळजापूर प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराज या देवीच्या दर्शनासाठी येत असत. तुळजा भवानी मातेनेच महाराजांना भवानी तलवार आशीर्वाद म्हणून भेट दिली अशी आख्यायिका आहे.

नांदेड

शीख धर्मियांच्या पाच प्रमुख धर्मस्थानांपैकी नांदेड हे एक महत्वाचे स्थान आहे. येथेच गुरु गोविंद सिंह यांनी आपल्या आयुष्याची शेवटची वर्षे घालविली. येथील सच खंड श्रीहुजूर साहिब गुरुद्वारा तसेच अनेक हिंदू मंदिरेही येथे प्रसिद्ध आहेत.

माहूर

असे मानले जाते की हे तीर्थस्थान श्रीदत्तात्रेयांचे जन्मस्थान आहे. रामगड किल्ला तसेच अनेक लहान मोठी मंदिरे या परिसरात आहेत. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेली माहूरची रेणुकादेवी हे ही पर्यटकांचे आकर्षणआहे.

औंढा नागनाथ

बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे आद्य ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. याचे उत्कृष्ट कोरीव काम मनास आनंद देते. मराठवाड्यातील महत्वाच्या तीर्थस्थळांपैकी हे एक आहे.

चला तर मंडळी, भेट देऊ या मराठवाड्याला !

लेखक: देवेंद्र भुजबळ

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 7/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate