অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

माहिमचा किल्ला

माहिमचा किल्ला

माहिमहून वांद्रयाकडे जाताना जिथे माहिमची हद्द संपते त्याच्या किंचित आधी समुद्रकिनाऱ्यावर हा किल्ला आहे. वांद्रयाच्या दक्षिण किनाऱ्यावरुनही हा किल्ला स्पष्टपणे दिसतो.

या किल्ल्याचे बाह्यांग मुंबईतील 15व्या ते 18व्या शतकात बांधलेल्या युरोपीय किल्ल्यांपेक्षा निराळे आहे. विशेषत: या किल्ल्याचे बुरुज एतद्देशीय किल्ल्यांसारखेच आहेत. त्यावरुन किल्ल्याच्या तलविन्यासाची बाह्यरेषा मूळ किल्ल्याचीच (म्हणजे मुसलमानांनी बांधलेल्या किल्ल्याचीच) असावी असा निष्कर्ष निघतो.

ब्रिटिशांनी ज्यावेळी 1701-1702 या काळात किल्ल्याची पुर्नउभारणी केली खंड, दोन खंडांच्यामधील भागांमध्ये असलेले दिवे किंवा पणत्या ठेवण्यासाठी असलेले चौकोनी कोनाडे व तोफांकरता असलेल्या खाचांच्या तळाशी सांडपाणी जाण्यासाठी असलेले नलिकांच्या स्वरुपातील मार्ग ही भारतातील पाश्चिमात्य दुर्गशैलीची खास वैशिष्ट्ये या किल्ल्यात आढळतात.

या किल्ल्याच्या तलविन्यास सर्वसाधारणपणे चौकोनी असून तटबंदीची जाडी सुमारे चार मीटर आहे. अंतर्भागातील जागाही चौकोनीच आहे. या उपरोक्त वैशिष्ट्यांमुळे हा किल्ला ब्रिटिशांनी स्वत:ला अनुरुप करुन घेतला असे म्हणता येईल. मात्र असे करताना बरेचसे वास्तुघटक एतद्देशीय धाटणीचेच राहून गेले आहेत. याचाच अर्थ ही पुर्नउभारणी आमूलाग्र स्वरुपाची नसून अंशात्मक प्रकारची होती.

या किल्ल्याची तटबंदी 25 फुटांहून अधिक उंचीची असून त्याला एकूण तीन बुरुज आहेत. एकेकाळी आतमध्ये सैनिकांना राहण्यासाठी खोल्या व धान्याची कोठारे होती. एकंदरीत या किल्ल्याचे वास्तुस्वरुप चौकी सारखे नसून रुढार्थाने ज्याला किल्ला म्हणता येईल असे होते.

आश्यर्याची बाब अशी की हा किल्ला अगदी समुद्रालगत असूनही थेट समुद्रातून गलबतांमार्फत ये-जा करता येऊ शकेल अशी कोणतीही सोय या किल्ल्याला दिसत नाही. किनाऱ्यावर उतरुन थोडे आत येऊनच किल्ल्याच्या पूर्वाभिमुख दरवाज्याकडे जाता येते. आज या किल्ल्यात इतकी प्रचंड प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत की आपण किल्ल्याच्या नेमक्या कोणत्या भागातून फिरतो आहे हेही समजणे अशक्य होऊन बसले. जेमतेम दोन माणसे कसरत करुन एकाच वेळी जाऊ शकतील असे बोळ आणि सर्व बाजूंनी दुमजली झोपड्या अशी स्थिती आहे. खुद्द प्रवेशद्वाराच्या रुंदीचा 75 हून अधिक भाग एका झोपडीने व्यापला आहे. साहजिकच अशा स्थितीत किल्ल्याची अतिक्रमण होण्यापूर्वी काढलेली छायाचित्रे व बॉम्बे पोर्ट ट्रस्टकडे असलेला नकाशा व बाहेरुन दिसणारा किल्ला एवढ्यावरुनच त्याचे वर्णन करण्यात आहे.

या जुन्या छायाचित्रांवरुन वरळीच्या किल्ल्याप्रमाणे या किल्ल्यातही घंटेकरता बांधलेली कमान होती असे दिसते. त्याचप्रमाणे ब्रिटिशांच्या काळात करुन घेण्यात आलेल्या ठराविक अंतरावर येणाऱ्या तोफांच्या खाचा, दोन खाचांच्यामध्ये असलेल्या दगडी कठड्यात दिवे ठेवण्याकरता चौकोनी कोनाडे हीही वैशिष्ट्ये होती असे दिसते. मात्र या चौकोनी कोनाड्यांचा तळभाग वरळीच्या किल्ल्यातील तटांच्या कोनाड्यांप्रमाणे अर्धवर्तुळाकार नसून साधा सपाट आहे. छायाचित्रांचे विस्तरण (एन्लार्जमेंट) व हा किल्ला ज्यांनी अतिक्रमणपूर्व काळात पाहिला आहे अशांनी दिलेली माहिती यावरुन ही बाब निश्चितपणे सांगता येते. काही छायाचित्रांवरुन तटबंदीच्या रुंदीवर किंवा निदान रुंदीच्या आतील भागात तरी काही दालने होती असे दिसते.

हा किल्ला लष्करी दृष्ट्या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे हा किल्ला किल्ला म्हणून कार्यरत होता त्याकाळी (म्हणजे मुंबईची सात बेटे जोडली जाण्यापूर्वी) किल्ल्याच्या उत्तरेस वांद्रे आणि सालसेट बेटे होती तर दक्षिणेस वरळी बेट होते. या मधल्या सागरी भागातून होणाऱ्या नौकानयनावर या किल्ल्यावरुन नियंत्रण ठेवता येत असे.

मुळातील एतद्देशीय किल्ला व त्यानंतर ब्रिटीशांनी केलेले बदल यामुळे हा किल्ला वैशिष्ट्यपूर्ण बनला आहे. अर्थात आधीच नमूद केल्याप्रमाणे हे बदल अंशात्मक आहेत. म्हणूनच माहिम किल्ल्याचा अंतर्भाव एतद्देशी किल्ल्यांमध्ये करण्यात आला आहे.

 

लेखन - संकलन - विलास सागवेकर,
उपसंपादक

स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 4/18/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate