मुंबईहून येताना मंडणगड तालुक्यापासून रत्नागिरी जिल्ह्यात निसर्गाच्या सान्निध्यातील भटकंतीची सुरुवात करता येते. मुंबई-गोवा महामार्गावर म्हाप्रळ पासून 18 किलोमीटर अंतरावर मंडणगड आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र हरिहरेश्वरला भेट देऊन रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करायचा असल्यास केवळ 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या बागमंडला गावाला लागून असलेल्या बाणकोटच्या खाडीत फेरीबोटची सुविधा आहे. आपल्या वाहनासह या बोटीतून प्रवास करतांना केवळ पाच मिनिटात मंडणगड तालुक्यातील वेसवी गावात प्रवेश करता येतो. वेसवी मंडणगड अंतर साधारण 30 किलोमीटर आहे.
मंडणगड किल्ला
मंडणगड एसटी स्टँडपासून 5 किलोमीटर अंतरावर किल्ला आहे. वाहन किल्ल्याच्या वरच्या भागापर्यंत जाते. रत्नागिरीतील सर्वात प्राचीन किल्ला म्हणून ह्या किल्ल्याचा उल्लेख केला जातो. किल्ल्याची उभारणी बाराव्या शतकात पन्हाळ्याचा राजा भोज याच्या कारकिर्दीत झाली. किल्ल्याची पडझड झालेली असली तरी जुने अवशेष याठिकाणी पाहायला मिळतात. 'गिरीदुर्ग' प्रकारात मोडणाऱ्या किल्ल्याची तटबंदी 8 एकर क्षेत्रात पसरली आहे. किल्ल्यावर कातळात बांधलेल्या तळ्यात बारमाही पाणी असते. या किल्ल्यावरून दिसणारे परिसराचे दृष्य अत्यंत मनोहारी असते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक:किल्ल्यावरून खाली उतरल्यावर स्टँडच्या बाजूला असलेल्या रस्त्याने आंबडवे गावाकडे जाण्यासाठी रस्ता आहे. मंडणगडपासून 18 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या गावात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे हे मूळ गाव. त्यांच्या घराचेच स्मारकात रुपांतर करण्यात आले आहे. स्मारक परिसराचे सुशोभिकरण करण्यात येत असून परिसरही अत्यंत सुंदर आहे. आंबडवे गावाला जाण्यासाठी पाचरळ फाट्याहून रस्ता आहे.
फेरीबोटची सफर
आंबडवेहून बाणकोट किल्ल्याकडे जाताना पाचरळ फाट्याला परत येऊन वेसवीमार्गे पुढे जावे लागते. वेसवीच्या अलिकडे रस्त्याच्या कडेलाच मोठी तळी दिसतात. या ठिकाणी पूर्व परवानगीने कोळंबी पालनाची प्रक्रीया जवळून पाहता येते. वेसवीला पर्यटकांसाठी फेरीबोटची व्यवस्था करण्यात आली आहे. या बोटीत गाडीसह बसण्याची मजा अनुभवता येते. अत्यंत अल्पदरातील या प्रवासात पाच मिनिटातच बागमंडला येथे बोट पोहचते. बागमंडला ते श्रीक्षेत्र हरिहरेश्वर अंतर केवळ चार किलोमीटर आहे. श्री हरिहरेश्वराचे दर्शन घेऊन तास-दोन तासात परतता येते.
बाणकोट किल्ला
वेसवीपासून बाणकोटचा किल्ला 3 किलोमीटर अंतररावर आहे. वाट अरुंद असली तरी वाहन अगदी वरपर्यंत जाते. किल्ला अजूनही चांगल्या स्थितीत आहे. किल्ल्यापासून काही अंतरावर सावित्री नदी वाहते. हीच नदी बाणकोटची खाडी म्हणूनही परिचीत आहे. खाडीतील विहंगम दृष्य नजरेत भरणारे आहे. लिनी या ग्रीक तज्ज्ञाने पहिल्या शतकात या किल्ल्याचा उल्लेख 'मंदगीर' म्हणून केला होता. पोर्तुगीजांकडून मराठ्यांकडे आल्यावर या किल्ल्याला 'हिंमतगड' नाव देण्यात आले. इंग्रजांनी किल्ला आंग्र्यांकडून ताब्यात घेतल्यावर त्यास 'व्हिक्टोरीया' असे नाव दिले. किल्ल्याची तटबंदी अजूनही चांगल्या स्थितीत असून समुद्राच्या बाजूने असलेले भव्य प्रवेशद्वार नजरेत भरते. प्रवेशद्वाराजवळ उभे राहिल्यास समोर खाडीच्या पलिकडे हरिहरेश्वराचा डोंगर दिसतो. किल्ल्यावरून अथांग समुद्राचे दर्शन घडते. खालच्या बाजूस बांधलेले 'ऑर्थर सीट' किल्ल्यावरून स्पष्ट दिसते. हे स्मारक 1791 मध्ये पुण्याचा रेसिडेंट असलेल्या चार्ल्स मॅलेट याच्या पत्निची दफनभूमी आहे.
वेळास
बाणकोट किल्ल्यापासून तीन किलोमीटर अंतरावर नाना फडणवीसांचे वेळास हे गाव आहे. गावात शिरण्यापूर्वी रस्त्याच्या बाजूला काळ्या कातळावर तयार झालेल्या विविध आकारांचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे. तर दुसऱ्या बाजूला खाडीत तयार झालेला सुंदर वाळूचा पट्टा आणि त्याबाजूचे सुरुबनाचे सौंदर्यही पर्यटकांना आकर्षित करते. नाना फडणवीसांनी या गावात तटबंदी आणि दोन देवालये उभारली आहेत. गावात प्रवेश केल्यावर टेकडीलगतच महादेव आणि कालभैरवाची ही दोन मंदिरे दिसतात. गावात नाना फडणवीसांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला आहे.
वेळास समुद्र किनारा
वेळास गावाबाहेरील पुलाजवळ खाली उतरण्यासाठी पायऱ्या केल्या आहेत. या वाटेने दाट झाडीतून पाच मिनिटे चालत गेल्यास वेळासच्या सुंदर समुद्र किनाऱ्याचे दर्शन घडते. वेळासच्या समुद्र किनाऱ्यावर थंडीच्या दिवसात 'ऑलिव्ह रिडले टर्टल' जातीची कासवे अंडी घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात येतात. कासवाच्या अंड्यांना काही इजा होऊ नये यासाठी पर्यटकांनी काळजी घेतल्यास निसर्गाच्या या अद्भूत ठेव्याचा निखळ आनंद आपल्याला नेहमी घेता येईल. समुद्र किनाऱ्यावरील सुरुबनाचे सौंदर्यही निराळेच आहे.
चिपळूण तालुका
मुंबई-गोवा महामार्गावर मुंबईपासून 250 किलोमीटर अंतरावर चिपळूण शहर आहे. पुण्यापासून कुंभार्ली घाटमार्गे चिपळूणसाठी मार्ग आहे. 'परशुरामाची भुमी' म्हणून या परिसराची ओळख आहे. घाटमार्गाने वेढलेल्या या तालुक्यातील निसर्गसौंदर्य पर्यटकांनास भुरळ पाडते. वशिष्ठी नदीपात्राभोवतीचे सौंदर्यही अप्रतिम दिसते. उंच डोंगरमाथ्यावरून कोसळणाऱ्या धबधब्याची शोभा चिपळूणच्या भेटीत पाहता येते. रत्नागिरी-चिपळूण अंतर 91 किलोमीटर आहे.
डेरवणची शिवसृष्टी
कोकण-गोवा महामार्गावरील सावर्डे या गावापासून 2 कि.मी. अंतरावर डेरवण हे गाव असून या ठिकाणी सितारामबुवा वालावलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य शिवसृष्टी उभारण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध ऐतिहासिक प्रसंगांची शिल्पे या शिवसमर्थ गडावर उभारण्यात आली आहे. ही शिल्पाच्या माध्यमातून साकारलेले ऐतिहासिक प्रसंग प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. शिवराज्याभिषेक सोहळ्याचे शिल्प अत्यंत अप्रतिम असेच आहे. येथे भारतीय वेशातच प्रवेश देण्यात येतो. सकाळी 8 ते सायंकाळी 6 या वेळेत शिवसृष्टी पर्यटकांना पाहण्यासाठी खुली असते. सितारामबुवा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे डेरवण येथे भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर रुग्णालय उभारण्यात आले असून या ठिकाणी अत्याधुनिक वैद्यकीय सुविधानी सुसज्य असे भव्य रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णालयात गोरगरिबांना वाजवी शुल्कात आरोग्य सेवा दिली जाते.
(वालावलकर ट्रस्ट, डेरवण-02355-264159, 264137)
विंध्यावासिनी
चिपळूणच्या रावतळे परिसरात विंध्यावासिनीचे पुरातन मंदिर आहे. शाक्तपंथीयांना भावणारी यादवकालीन मुर्ति विध्यावासिनी म्हणून ओळखली जाते. ती अष्टभुजा आहे. नवरात्रात येथे मोठा उत्सव होतो.
गोवळकोट किल्ला:गोविंदगड किंवा गोवळकोट या नावाने ओळखला जाणारा हा किल्ला 'डोंगरी किल्ले' प्रकारातील आहे. चिपळूण शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर कोवळकोट गावाच्या पूर्वेस हा किल्ला आहे. किल्ल्याला उत्तरेकडून वशिष्टी नदीने आणि पश्चिम व दक्षिण दिशेस वाटोळी नदीने विळखा घातलेला आहे. किल्ल्यात तळी, तोफा आणि काही अवशेष पाहायला मिळतात. किल्ल्यास एकूण सात बुरुज आहेत. 1670 मध्ये किल्ल्याची डागडुजी शिवाजी महाराजांनी केल्याचा उल्लेख पाहायला मिळतो. किल्ल्याच्या पायथ्याशी श्रीदेवी करंजेश्वरीचे मंदिर आहे.
श्री क्षेत्र परशुराम
विष्णूचा सहावा अवतार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परशुरामाचे प्राचीन मंदिर चिपळूणपासून 12 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणच्या अलिकडे डाव्या बाजूला डोंगरावर जाणारा रस्ता आहे. हा रस्ता थेट मंदिराजवळ जातो. मंदिराभोवती जांभ्या दगडाची तटबंदी आहे. मधल्या भागात प्राचीन मंदिरे आणि जलकुंड आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात ब्रह्मा, विष्णू आणि महेशाच्या मुर्त्या आहेत. मंदिराच्या दुसऱ्या गाभाऱ्यात श्री परशुरामाचा पलंग असून त्यावर श्रींच्या पादुका ठेवण्यात आल्या आहेत. मंदिराच्या मागच्या बाजूस श्री रेणुकेचे मंदिर आहे. या मंदिराच्या खांबावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. या मंदिराच्या बाजूलाच परशुरामाने बाण मारून निर्माण केलेला 'बाणगंगा तलाव' आहे. दरवर्षी वैशाख शुद्ध प्रतिपदेला तीन दिवसाचा परशुराम जन्मोत्सव असतो. परशुराम मंदिराच्या खालच्या बाजूस महामार्गाच्या कडेला उभे राहून वशिष्ठी नदीच्या पात्राचे विहंगम दृष्य दिसते. मंदिर परिसरात भक्तनिवासाची सोय करण्यात येत आहे.
(संपर्क-02355-258381, 205454)
सवतसडा धबधबा
चिपळूणपासून 5 किलोमीटर अंतरावर सवतसडा धबधबा आहे. मुंबईहून येताना महामार्गाच्या कडेला डाव्या बाजूस उंचावरून हा धबधबा कोसळताना दिसतो. जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत या धबधब्याला भरपूर पाणी असते. धबधब्याच्या पात्रात चिंब होण्यासाठी शनिवार आणि रविवारी येथे गर्दी होते. पर्यटकांसाठी येथे शेड आणि धबधब्यापर्यंत पाऊलवाटेची व्यवस्था करण्यात आली आहे. पावसाळ्यात पाण्याचा ओघ अधिक असल्याने जरा जपूनच पाण्यात उतरलेले चांगले.
श्रीरामवरदायिनी मंदिर, दादर
वास्तूशिल्प शास्त्राचा अप्रतिम अविष्कार या मंदिरात पाहायला मिळतो. जयपूरहून आणलेल्या श्रीरामवरदायिनी, श्री वाघजाई देवी आणि श्रीमहिषासूरमर्दिनी देवी यांच्या मुर्त्या हे मंदिराचे खास वैशिष्ट्य आहे. मंदिर परिसर आणि उद्यान पर्यटनाचा आनंद देणारे आहे.चिपळूणपासून 20 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे.
भैरवगड
भैरवगड किल्ला 'गिरीदुर्ग' किल्ले प्रकारातील आहे. चिपळूणपासून 45 किलोमीटर दक्षिणेस आणि रत्नागिरीपासून 90 किलोमीटर पूर्वेस हा किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी दुर्गवाडी, गोवल, मंजुत्री आणि पाते ही गावे आहेत. किल्ला चढण्यास आणि उतरण्यासाठी कठीण असून गिर्यारोहकांसाठी आव्हानात्मक आहे. दुर्गवाडीवरून जाणारी पायवाट अधिक सोईची आहे. किल्ल्यास सरळ कड्यामुळे नैसर्गिक तटबंदी आहे. किल्ल्यात केवळ इमारतीचे चौथरे शिल्लक आहेत.
शारदादेवी मंदिर, तुरंबव-
मुंबई-गोवा महामार्गावर सावर्डे गावापासून 12 किलोमीटर अंतरावर तुरंबव हे तीर्थक्षेत्र शारदादेवीचे देवस्थान म्हणून परिचीत आहे. या तीर्थक्षेत्राला 'क' वर्ग पर्यटनाचा दर्जा आहे. निसर्गसुंदर परिसर लाभलेल्या या देवस्थानाच्या परिसरात नवरात्रातील तिसऱ्या माळेनंतर शारदोत्सवाची सुरुवात होते. त्यानिमित्ताने दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जिल्ह्याच्या अनेक भागातून भाविक आणि पर्यटक या उत्सवात सहभागी होतात. श्री शारदादेवी मंदिराची सुंदर रचना केली आहे. मंदिराच्या समोरच्या बाजूस प्रवेशद्वार असनूा इतर तिही बाजूस दाट झाडी असल्याने हा परिसर सुंदर दिसतो. एरवी इथे असणारी शांततादेखील भाविकांना भावते.
वीरचा धबधबा-
वीर येथे देवपाटचा बारमाही धबधबा आहे. काळ्या कातळातून डोहात कोसळणाऱ्या धबधब्याचे सौंदर्य काही वेगळेच आहे. डोहात जलक्रीडेचा आनंद घेता येतो. धबधब्यापर्यंत जाणारा रस्ता दाट झाडीतून जातो. वीर गावापासून दोन किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे.
संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी माहिती
स्त्रोत : महान्युज