অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

विदर्भ पर्यटन- वाशिम

विदर्भ पर्यटनाच्या या शेवटच्या टप्प्यावर आपण आपली भटकंती वळवूयात वऱ्हाडातल्या वत्सगुल्म उर्फ बासम अर्थात वाकाटक राजाची राजधानी असलेल्या वाशिम जिल्ह्याकडे !

ऐतिहासिक शहर वाशिम

वाशीमचे प्राचीन नाव वत्सगुल्म / वात्सुलग्राम आहे. यास बच्छोम, बासम असेही म्हणतात. इ.स.पूर्व सुमारे ३०० पासून येथे सातवाहन या राजवंशाची सत्ता होती. प्राचीन विदर्भात प्रशासकीय सोईसाठी दोन ठिकाणी राजधान्या करण्यात आल्या. एक म्हणजे वाशीम व दुसरे नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील 'नंदिवर्धन' (सध्याचे नगरधन) वाशीम येथे वाकाटकांची राजधानी होती. वाकाटकांचे साहित्यातील योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या काळात 'वत्सगुल्म'च्या परिसरात अनेक तीर्थक्षेत्रे होती. आजही वाशीमचे बालाजी मंदिर प्रसिद्ध आहे. येथे पद्मतीर्थ नावाचे तीर्थस्थानही आहे. त्यानंतर चालुक्यांचे राज्य आले. त्यांनी आपली राजधानी दुसऱ्या ठिकाणी नेली. त्यामुळे या शहराचे महत्त्व कमी झाले. त्यानंतर आलेल्या यादवांच्या राजवटीत पुन्हा या स्थानाचे महत्त्व वाढू लागले.

वाशिम येथे निजामाची टाकसाळ होती. त्यानंतर इंग्रजांच्या राज्यात वऱ्हाड हा मुलूख आल्यावर त्यांनी वाशीमला जिल्ह्याचे ठिकाण केले. परंतु, महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या १९०५ मध्ये झालेल्या पुनर्रचनेत हा भाग नजिकच्या अकोला जिल्ह्याला जोडण्यात आला. २६ जानेवारी १९९८ मध्ये पुन्हा वाशीम हा जिल्हा घोषित करण्यात आला.

रिसोड

रिसोड हे एक पौराणिक शहर आहे. रिसोडचे मूळ नाव ऋषिवट असे आहे. असे म्हणतात की रिसोड परिसरात पुराणकाळी असंख्य वडाची झाडे होती. तिथे ऋषिमुनी तपस्या करीत असत. रामायणात उल्लेख असणारा दंडकारण्याचा हा भाग आहे. संतांची भूमि म्हणून रिसोडची ख्याती पूर्वीपासून आहे. या ठिकाणी अनेक महादेवाची प्राचीन मंदिरे आहेत. अजूनही या परिसरात उत्खननात महादेवाच्या पिंडी सापडतात. रंगारी लोकांचे शहर म्हणूनसुद्धा रिसोडची ख्याती होती. रिसोड हे तलावांचे गाव म्हणून प्रसिद्ध होते. या तलावांमुळे रिसोडला नेहमीच लष्कर आपले तळ ठोकून असत. १७२४ साली येथील रहिवाशांनी हे तलाव नष्ट केले. तरीही आजतागत पिंगलाक्षी देवी तलाव अस्तित्वात आहे. रिसोड क्षेत्र लखूजी जाधवांना मिळाल्यावर काझीखानाने रिसोडवर मोठा दरोडा घालून हा परगणा लुटला होता. १८५७ च्या दरम्यान पेंढारे व रोहिल्यांनीही रिसोडवर दरोडे घातले होते. मात्र त्यांना रहिवाशांनी एकत्रित येऊन लढा दिल्याचे इतिहास सांगतो.

विदर्भ प्रांतातील हा तालुका मराठवाड्याच्या सीमेस लागून आहे.

महत्त्वाचे म्हणजे रिसोडला कापसाची व अन्य कृषिउत्पादनांची अधिकृत बाजारपेठ (Agri and Cotton Market Committee) १८९९ साली स्थापन झाली.

अमरदासबाबा संस्थान

अमरदासबाबा मंदिर संस्थान हे रिसोड गावातील अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे. संत अमरदासबाबा हे रिसोड गावात वास्तव्यास असणारे योगी होते. अमरदासबाबा मंदिर हे त्यांचे पावन समाधी स्थळ आहे. मंदिराचा परिसर अतिशय रम्य असून तेथे गंगा माँ उद्यान सुद्धा आहे. मंदिराच्या कमानीवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिर परिसरात श्री सिद्धेश्वर मंदिर आहे. त्याचप्रमाणे मारूती व इतर देवी - देवतांची मंदिरे आहेत. महाशिवरात्री पर्वावर येथे मोठी जत्रा असते. या काळात गावाच्या आठवडी बाजाराचे आयोजन मंदिर परिसरात करण्यात येते.

कारंजा लाड

जैनांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अत्यंत प्राचीन असलेल्या नगरीचे महात्म्य स्कंदपुराणातील पातालखंडात आले आहे. करंज ऋषीवरूनच या नगरीला करंजपूर हे नाव मिळाले असे म्हणतात. करंजपूरचे कार्यरंजकपूर आणि नंतर कारंजा झाले. या नगरीत जैन लाड समाजाची वस्ती असल्याने 'कारंजा लाड' असा या गावाचा उल्लेख केला जातो. वाकाटकपूर्व राजवटीपासून तो देवगिरीचे यादव, मोगल, निजामशाही, ईमादशाही, नागपूरकर भोसले अशा अनेक राजवटी या नगरीने अनुभवल्या आहेत. या साम्राज्यांत उभारलेल्या दिल्ली वेस, दारव्हा वेस, मंगरूळ वेस आणि पोहा वेस या चार भग्नावस्थेतील वेशी आजही कारंजा लाड या गावात आहेत. अहमदनगरच्या बादशहाच्या मुलीला स्त्रीधन म्हणून कारंजा गाव आंदण दिले असल्याचा उल्लेख आढळतो. त्यामुळे या गावाचा उल्लेख जुन्या कागदपत्रात बिबीचे कारंजे असाही येतो. किल्ला म्हणून ओळखली जाणारी एक गढी अगदि आत्ताआत्तापर्यंत अस्तित्वात होती. तिथे आता बिबीसाहेब दर्गा आहे. त्याचा दरवर्षी उरूस निघतो. या लगतचा भागाला बिबीसाहेबपुरा म्हणतात. नगरपालिकेची इमारत म्हणजे प्राचीन हमामखाना आणि पोलीस ठाण्याची इमारत म्हणजे हत्तीखाना असल्याचे सांगितले जाते. अशा या नगरीने अलोट ऐश्वर्यसंपन्नता अनुभवली. याची साक्ष म्हणून कस्तुरीच्या हवेलीचा उल्लेख केला जातो. उंटावरून कस्तुरी विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्याकडून सर्व कस्तुरी खरेदी करून हवेलीच्या बांधकामात तिचा वापर करणाऱ्या व त्या मोबदल्यात अकबरकालीन नाणी देणाऱ्या लेकुर संघई यांची ही कथा पिढ्यान्‌पिढ्या सांगितली जाते. या संघईची एकोणिसावी पिढी आज कारंज्यात अस्तित्वात असल्याचे बोलले जाते. मात्र या हवेलीची प्रचंड दुर्दशा झाली आहे. अशा प्राचीन हवेल्यातील भिंतीतून जाणारे जिने, तळघरे, बाराद्वारी नावाची विहीर आणि त्यातील भुयारी वाटा मात्र पर्यटकांसाठी अजूनही शिल्लक आहेत.

नृसिंह सरस्वती

हे शहर इ.स.च्या १४व्या शतकातील हिंदू गुरू नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. शिवपूर्वकाळापासून वैभवसंपन्न असलेले कारंजे हेच नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान असले पाहिजे हे प्रथम वासुदेवशास्त्री सरस्वतींनी शोधून काढले. येथील काळे आडनावाच्या घराण्यात नृसिंह सरस्वतींचा जन्म झाला. त्यांच्या बंधूंची वंश-परंपरा अद्याप नांदती आहे. काशी येथील पंचगंगेश्वरमठाधिपती ब्रह्मानंद सरस्वती ऊर्फ लीलादत्त यांनी या वाड्यासमोरची मोकळी जागा मिळवून आणि तेथे मंदिर उभारून त्यांत चैत्र वद्य प्रतिपदा, शा.श. १८५६ या दिवशी नृसिंह सरस्वतींच्या पादुकांची स्थापना केली आणि पूजेअर्चेची शाश्वत व्यवस्थाही केली. आज हजारो दत्तोपासकांच्या नित्य-नैमित्तिक गर्दीने हे स्थान गाजते-जागते बनले आहे. या स्थानाचे प्राचीन माहात्म्य दाखविणारी 'श्री करंजमाहात्म्य' नावाची संस्कृत पोथी उपलब्ध आहे. त्या पोथीनुसार या स्थानाचे नाव वसिष्ठ ऋषीचे शिष्य असलेल्या करंज नामक ऋषीशी निगडित आहे. कारंजे येथे हस्तलिखित जैन ग्रंथांचे मोठे भांडार आहे.

जैनांची काशी

कारंजा लाड गावातली जैन मंदिरे, शिक्षण संस्था तसेच आश्रमशाळा यामुळे या नगरिस 'जैनांची काशी' असेही संबोधले जाते. चंद्रनाथ स्वामी काष्ठसंघ दिगंबर जैन मंदिर (पद्मावती देवीचे मंदिर) मूलसंघ चंद्रनाथ स्वामी दिगंबर जैन मंदिर आणि दिगंबर जैन पार्श्वनाथ स्वामी सेनगण मंदिर ही देहरासरे प्रसिद्ध आहेत. संमतभद्र महाराज यांनी १९१८ मध्ये स्थापन केलेला 'महावीर ब्रह्मचर्याश्रम' गरजु जैन विद्यार्थाना अनमोल ठरतो. संमतभद्र महाराजांच्याच प्रेरणेने समाजातील विधवा वा निराधार महिलांच्या शिक्षणासाठी १९३४ मध्ये स्थापन झालेला 'कंकूबाई श्राविकाश्रम' म्हणजे जणू सावित्रीचा शिक्षण वसाच !

कारंजा एक ऐतिहासिक-सांस्कृतिक शहर

स्वराज्याच्या मोहिमेच्या दरम्यान विदर्भाच्या दौऱ्यावर आलेले लोकमान्य टिळक ९ जानेवारी १९१७ ला कारंजाला आले. कारंजा रेल्वेस्थानकालगतच्या मैदानात झालेल्या त्यांच्या भव्य जाहीर सभेने भारावलेल्या तरुणांनी जंगल सत्याग्रहात भाग घेतला. त्यात बंकटलाल किसनलाल बंग यांना कारावास भोगावा लागला.

१७ नोव्हेंबर १९३३ मध्ये गांधींजी आणि १९३७ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर कारंज्यात आले होते. १९४२ च्या ‘चले जाव’ चळवळीत जे.डी. चवरे विद्यामंदिरचे शिक्षक देवराव पासोबा काळे यांनी चौकात इंग्रज सरकारविरुद्ध भाषणे दिली. त्यामुळे त्यांना १३ महिन्यांचा तुरुंगवासही भोगावा लागला. त्याच शाळेचे विद्यार्थी अवधूत शिंदे व उत्तमराव डहाके यांनीही तुरुंगवास भोगावा लागल्याचे नमूद केले आहे. या चळवळीतील २० स्वातंत्र्यसैनिकांची नावे असलेला दगडी खांब स्वातंत्र्याच्या रौप्य महोत्सवी वर्षांनिमित्त जयस्तंभ चौकात लावण्यात आला होता. आता तो जेसिज गार्डनमध्ये हलवण्यात आला आहे.

कारखाने आणि इतर उद्योगधंदे चवरे कुटुंबियांची स्वयंचलित सूतगिरणी, बाबासाहेब धाबेकर यांनी स्थापन केलेली कापूस पणन महासंघ कर्मचारी सूतगिरणी, रुईवालेंचा अ‍ॅल्युमिनियमची भांडी करण्याचा कारखाना, प्रमोद चवरे आणि बागवान यांचा हॅन्डमेड कागदाचा कारखाना तालुक्याला उद्योजगतेकडे घेऊन जाते. नानासाहेब दहीहांडेकर, गजानन देशपांडे, सखारामपंत साधू, बाबासाहेब दातार, वामनराव मोकासदार यांनी पुढाकार घेऊन १९५६ मध्ये बालकिसन मुंदडा, मोहनलाल गोलेच्छा, डॉ.शरद असोलकर यांच्या सहकार्याने सुरू केलेली शरद व्याख्यानमाला. अमरावतीचे बाबासाहेब खापर्डे यांनी पहिले व्याख्यानपुष्प गुंफले. गेली त्रेपन्न वर्षे ही व्याख्यानमाला सुरू आहे. कार्यकर्त्यांची तिसरी पिढी सध्या कार्यरत आहे.

शांता दहीहांडेकर, गजानन देशपांडे, पवार गुरुजी यांनी कलोपासक मंडळाची स्थापना करून ख्यातनाम गायकांच्या मैफिली आयोजित केल्या. कारंजामध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेची शाखा आहे.

अंतरिक्ष पार्श्वनाथ जैन मंदिर शिरपुर

जगप्रसिद्ध अंतरिक्ष भगवान पार्श्वनाथ यांची मूर्ति शिरपुर मधील पवईमंदिरात स्थापलेली आहे. काळ्या पाषाणाच्या या मूर्तिसंदर्भात बऱ्याच पौराणिक सांगितल्या जातात. कट्टर दिगंबरपंथी श्रीपाल यांनी पवई येथे या अधांतरी मूर्तिची स्थापना केल्याचा उल्लेख आढळतो. मुघल काळात विहीरीत लपविलेली ही मूर्ति ३ फुट ८ इंच ऊंच आणि २ फुट ८ इंच रुंद असून अर्धपद्मासन अवस्थेत विराजमान

पवईच्या भुयारात स्थापलेली आहे. बऱ्याच वर्षापासुन पंथ भेदाच्या भोवऱ्यात अडकलेली ही मूर्ति अत्यंत अतिशयसंपन्न आणि मनोवेधक आहे. या मूर्तिच्या शीर्षावर सप्तफणा असून ती डाव्या बाजूने फक्त एक बोटभर टेकलेली असून मागील भाग व इतर बाजूने पूर्णतः अधांतरी आहे. या मूर्तिच्या दर्शनासाठी भुयाराला एक झरोखा केलेला आहे. साऱ्या विश्वाचे व्याप विसरून वाटसरू पवईत काही काळ विसावतो आणि मुलनायकाच्या दर्शनाने प्रसन्न होतो.

पौराणिक नगरी अनसिंग

एक शिंगी या शब्दाचा अपभ्रंश होऊन पुढे या गावास अनसिंग असे नाव पडले. रामायणकालीन पौराणिक कथा असे सांगते की विभांडक यांचा मृग-पुत्र श्रृंगऋषी यांस एक शिंग होते ज्याला पिता विभांडक याने विश्वापासून दूर ठेऊन सर्व शिक्षण दिले. श्रृंगऋषी मुनींनी केलेल्या पुत्रकामेष्ठी यज्ञामुळे राजा दशरथ यांना राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशी पुत्ररत्न प्राप्ती झाली असे मानले जाते. गावात श्रृंगऋषीचे मंदिर असून येथे मोठी यात्रा भरते. तसेच येथे पद्मप्रभु दिगंबर जैन मंदिर असून गाभाऱ्यातील प्राचीन मूर्ति, वेदी, शिखर मंदिरातील रेखीव काम मन प्रसन्न करते. वाशिम-पुसद मार्गावर स्थित हा गाव परिसरातील जवळपास चाळीस खेड्यांसाठी एक मोठी बाजारपेठ आणि शिक्षण केंद्र म्हणून ओळखला जातो. वाशिमहून गावाकडे मार्गक्रमण करताना कित्येकदा मनोहारी हरणांचे दर्शन होते.

आपण पूर्व आणि पश्चिम विदर्भाची. ईथल्या ऐतिहासिक वास्तुंची... तलावांची.. जंगलांची आणि मनःशांती देणाऱ्या मंदिरांची मोठ्या आनंदाने भटकंती केली. वऱ्हाडी ठेचा भाकरी, सावजी जेवण, पुरण पोळी, शेगाव कचोरी, कोथिंबीर वडी, पाटोडी असोत वा साधी बेसन खिचडी ईथल्या हवा पाण्यात आणि ईथल्या मातीत वरवरचा दिसणारा गोडवा फारसा नसला तरी ईथल्या माणसांची आंतरिक आपुलकी लोभसवाणीच!

लेखन आणि संकलन - तृप्ती अशोक काळे

नागपूर, संपर्क- ८२७५५२१२६३

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 7/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate