অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सिंहगड किल्ला

सिंहगड किल्ला

सिंहगड किल्ला Sinhagad Fort – ४४०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
पुणे जिल्ह्यातील पुणे डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.

पुण्याच्या नैऋत्येला साधारण २५ कि.मी. अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. दोन पायऱ्यांसारखा दिसणारा खांदकड्याचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा ह्यामुळे पुण्यातून कुठूनही तो पटकन ध्यानी येतो. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलूख गडावरुन दिसतो.

इतिहास

हा किल्ला पूर्वी आदिलशाहीत होता. दादोजी कोंडदेव हे विजापूरकरांकडून म्हणजेच आदिलशाहीकडून सुभेदार म्हणून नेमले होते. पुढे इ.स. १६४७ मध्ये दादोजी कोंडदेवाचे निधन झाल्यावर कोंडाण्यावरील किल्लेदार सिद्दी अंबर याला लाच देऊन शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला व या गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. पुढे इ.स. १६४९ मध्ये शहाजी राजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी तो परत आदिलशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये सिंहगड पण होता. मोगलांतर्फे उदेभान राठोड हा कोंडाण्याचा अधिकारी होता. हा मूळचा राजपूत होत पण तो बाटून मुसलमान झाला.

सिंहगड हा मुख्यतः प्रसिद्ध आहे तो तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे. शिवाजी महाराज जेव्हा आग्ऱ्याहून सुटून परत आले तेव्हा त्यांनी दिलेले गड परत घ्यायला सुरुवात केली. तेव्हा तानाजीने कोंडाणा आपण घेतो म्हणून कबूल केले. या युद्धाबाबत सभासद बखरीत पुढीलप्रमाणे उल्लेख आढळतो:तानाजी मालूसरा म्हणून हजारी मावळ्यांचा होता त्याने कबूल केले की, ‘कोंडाणा आपण घेतो’, असे कबूल करून वस्त्रे, विडे घेऊन गडाचे यत्नास ५०० माणूस घेऊन गडाखाली गेला आणि दोघे मावळे बरे, मर्दाने निवडून रात्री गडाच्या कड्यावरून चढवले. गडावर उदेभान रजपूत होता त्यांस कळले की, गनिमाचे लोक आले. ही खबर कळून कुल रजपूत कंबरबस्ता होऊन, हाती तोहा बार घेऊन, हिलाल (मशाल), चंद्रज्योती लावून बाराशे माणूस तोफाची व तिरंदाज, बरचीवाले, चालून आले. तेव्हा मावळे लोकांनी फौजेवर रजपुतांचे चालून घेतले. मोठे युद्ध एक प्रहर झाले. पाचशे रजपूत ठार झाले. उदेभान किल्लेदार खाशा त्यांशी व तानाजी मालुसरा सुभेदार यांशी गाठ पडली. दोघे मोठे युद्ध, महाशूर, एक एकावर पडले. तानाजीचे डावे हातची ढाल तुटली. दुसरी ढाल समयास आली नाही. मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करून त्याजवरि वोढ घेऊन, दोघे महारागास पेटले. दोघे ठार झाले. मग सूर्याजी मालूसरा (तानाजीचा भाऊ), याने हिंमत धरून, कुललोक सावरून, उरले राजपुत मारिले. किल्ला काबीज केला. शिवाजी महाराजांना गड जिंकल्याची पण तानाजी पडल्याची बातमी मिळाली तेव्हा ते म्हणाले ‘एक गड घेतला, परंतु एक गड गेला.’ माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ च्या रात्री हे युद्ध झाले.

दारूचे कोठार

दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे जी दगडी इमारत दिसते तेच दारू कोठार दि. ११ सप्टेंबर १७५१ मध्ये या कोठारावर वीज पडली. ह्या अपघातात गडावरील त्यावेळच्या फडणीसांचे घर उध्वसत होऊन घरातील सर्व माणसे मरण पावली.

टिळक बंगला

रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच्या ह्या बंगल्यात बाळ गंगाधर टिळक येत असत. १९१५ साली महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांची भेट याच बंगल्यात झाली.

कोंढणेश्वर

हे मंदिर शंकराचे असून ते यादवांचे कुलदैवत होते. आत एक पिंडी व सांब असणारे हे मंदिर यादवकालीन आहे.

श्री अमृतेश्वर भैरव मंदिर

कोंढाणेश्वराच्या मंदिरावरून थोडे पुढे गेले की डावीकडे हे अमृतश्वराचे प्राचीन मंदिर लागते. भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे. यादवांच्या आधी ह्या गडावर कोळ्यांची वस्ती होती. मंदिरात भैरव व भैरवी अशा दोन मुरत्या दिसतात. भैरवाच्या हातात राक्षसाचे मुंडके आहे.

देवटाके

तानाजी स्मारकाच्या मागून डाव्या हाताच्या छोट्या तलावाच्या बाजूने डावीकडे गेल्यावर हे प्रसिद्ध असे देवटाके लागते. या टाक्याचा उपयोग पिण्याचे पाणि म्हणूनहोत असे व आजही होतो. महात्मा गांधी जेव्हा पुण्यास येत तेव्हा मुद्दाम ह्या टाक्याचे पाणी मागवत असत.

कल्याण दरवाजा

गडाच्या पश्चिमेस हा दरवाजा आहे. कोंढणपूरवरून पायथ्याच्या कल्याण गावातून आल्यास ह्या दरवाजातून आपला प्रवेश होतो. हे एकामागोमाग असे दोन दरवाजे आहेत. यापैकी वरच्या दरवाज्याच्या दोन्हीकडील बुरुजांच्या भिंतीत अर्धवट बाहेर आलेला हत्ती व माहूत अशी दगडी शिल्पे होती. श्रीशालीवाहन शके १६७२ कारकीर्द श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान असा शिलालेख आढळतो.

उदेभानाचे स्मारक

दरवाजाच्या मागच्या बाजूस वर असलेल्या टेकडीवर यावे. येथे जो चौकोनी दगड आहे तेच उदेभान राठोडचे स्मारचिन्ह म्हणून ओळखले जाते. मोगलांतर्फे उदेभान हा सिंहगडचा अधिकारी होता.

झुंजार बुरूज : झुंजारबुरूज हे सिंहगडचे दक्षिण टोक होय. उदयभानूच्या स्मारकापुढून समोरची टेकडी उतरून या बुरुजावर येता येते. येथून समोरच टोपीसारखा राजगड, त्याच्याच उजवीकडे तोरणा हे गड दिसतात तर खाली पानशेतचे खोरे दिसते. पूर्वेकडे लांबवर पुरंदर दिसतो.

डोणगिरीचा उर्फ तानाजी कडा : झुंजारबुरूजावरून मागे येऊन तटाच्या भिंतीच्या बाजूने पाय वाटेने तानाजीच्या कड्याकडे जाता येते. हा कडा गडाच्या पश्चिमेस आहे. येथूनच तानाजी मावळ्यांसह वर चढला.

राजाराम स्मारक : राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी जी घुमटी दिसते तीच छत्रपती राजाराम महाराज यंची समाधानी. मोगली फौजेला सतत ११ वर्षे टक्कर देणाऱ्या राजाराम महाराजांचे वयाव्या अवघ्या ३० व्या वर्षी शनिवार दि. २ मार्च इ.स. १७०० या दिवशी सिंहगडावर निधन झाले. पेशव्यांतर्फे या स्मारकाची उत्तम व्यवस्था ठेवली जायची.

तानाजीचे स्मारक : अमृतेश्वराच्या मागच्या बाजूनेवर गेल्यावर डाव्या बाजूस सुप्रसिद्ध तानाजीचे स्मारक दिसते. ‘तानाजी स्मारक समितीच्या’ वतीने हे बांधण्यात आले आहे. माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ या दिवशी झालेल्या लढाईत तानाजी मारला गेला. दरवर्षी माघ वद्य नवमीस येथे मंडळातर्फे तानाजीचा स्मृतिदिन साजरा केला जातो.

गडावर जाण्याच्या वाटा

पुणे-कोंढणपूर : पुणे-कोंढणपूर बसने कोंढणपूरला उतरून कल्याण गावातून कल्याण दरवाजातून आपण गडावर जातो. या मार्गाने दोन दरवाजे पार केल्यावर आपला गडावर प्रवेश होतो.

पुणे दरवाजा : पुणे-सिंहगड या बसने जाताना वाटेत खडकवासला धरण लागते. या मार्गाने तीन दरवाजे पार केल्यावर आपला गडावर प्रवेश होतो.

गडावर राहण्यची सोय नाही. गडावर छोटॆ हॉटेल्स यामध्ये जेवणाची सोय होते. देवटाक्यांमधील पाणी पिण्यासाठी बारामहिने पुरते. गडावर जाण्यासाठी २ तास लागतात.

माहिती संकलन - अमरीन पठाण

स्त्रोत - मराठीमाती

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate