অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आद्य नाटककार विष्णूदास भावे

आद्य नाटककार विष्णूदास भावे

5 नोव्हेंबर 1843 रोजी विष्णुदासांनी "सीता स्वयंवर" या पहिल्या मराठी नाटकाचा प्रयोग सांगलीत केला. पण त्यापूर्वी ते कठपुतळ्यांचे खेळ करीत असत. त्यांनी बनविलेल्या व खेळविलेल्या या कठपुतळ्या त्यांच्या निधनानंतर तशाच पेटाऱ्यात पडून होत्या. भावे यांच्या कठपुतळी खेळाच्या तीन चार संहिता उपलब्ध आहेत. द्रौपदी, स्वयंवर, ढोंगी महंताची नक्कल अशी त्यांची नावे आणि कठपुतळ्या या लाकडी असल्या तरी अतिशय हलक्या होत्या. शक्यतो उंबराच्या लाकडाचा व कागदाचा लगदा यापासून बनविल्या जात. रेखीव आकार प्रमाण बद्धता असूनही त्या चाकावर बसविल्या होत्या. त्या लोखंडी काठीच्या आधाराने आणि दोरीच्या साह्याने अशा दोन्ही प्रकारे खेळविता येत असत.

कर्नाटकातील भागवत मंडळी खेळ पाहून सांगलीचे संस्थानिक थोरले चिंतामणराव अप्पासाहेब पटवर्धन यांनी आपल्या पदरी असणाऱ्या सुभेदार अमृतराव भावे यांच्या विष्णू या बुद्धिमान मुलाला भागवत मंडळीतील नाटकाप्रमाणे खेळ करण्याची आज्ञा केली. त्यांची आज्ञा प्रमाण मानून 1843 साली सांगलीच्या राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये मराठीतील पहिले नाटक "सीता स्वयंवर" नाटकाचा जन्म झाला. त्यासाठी त्यांनी कानडी नाट्य परंपरेत आवश्यक तेथे बदल केले. भावे यांनी स्वत:च नवीन पदाची रचना केली. "सीता स्वयंवर" करण्याआधी अहिल्योद्धार आख्यान श्रीमंतांपुढे सादर केले. हेच मराठीतील पहिले नाटक मानण्यात येते. इथंच मराठी रंगभूमीची मुहुर्तमेढ रोवली गेली. या सर्व आख्यानात खुद्द विष्णुदासांनी नाट्य कवितासंग्रह या नावाने 1885 मध्ये संग्रहित केले. "सीता स्वयंवर" मराठी रंगभूमीवर आले तो दिवस होता 5 नोव्हेंबर 1843. म्हणूनच हा दिवस नाट्यपंढरीत मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा करतात.

विष्णुदासांनी रामावतारी आख्यानेच सादर केली. हीच मराठी रंगभूमीची सुरूवात होती. 1843 ते 1851 या काळात विष्णुदासांना राजाश्रय लाभला. विष्णुदासांच्या कंपनीने मुंबईलाही नाटकाचे प्रयोग केले. तेथे प्रेक्षकांनी या नाटकांना रसिकतेने राजाश्रयानंतर लोकाश्रयाला "सांगलीकर नाटककार मंडळी" फिरतीवर निघाली. 1843 साली मुंबईच्या दौऱ्यापासून या सांगलीकर मंडळीनी तिकीटे लावून प्रयोग सादर केले. पैसे मोजून तिकिटे काढून नाटक पाहण्याची सवय लावली. राजाश्रयानंतर प्रशासकांनी विष्णूदासांच्या नाटकावर झालेल्या खर्चाची वसुली सुरू केली. त्याचा परिणाम विष्णूदासांनी सांगलीकर नाटक मंडळी स्थापन करून 1851 ते 1862 सालापर्यंत एकूण सात दौरे केले. 14 फेब्रुवारी 1853 साली प्रथमच वृतपत्रातून नाटकाची जाहिरात आली. मुंबईच्या ग्रँट रोड थिएटरमध्ये मराठी नाटकाचा प्रयोग झाला. प्रथमच "गोपीचंद" या हिंदी नाटकाचा प्रयोग 1954 मध्ये झाला. त्यामुळे हिंदी रंगभूमीचे जहनक म्हणून विष्णूदासांचे नाव अखिल भारतात गाजले, म्हणूनच "सांगली ही नाट्यपंढरी " म्हणून ओळखली जाऊ लागली. या विष्णूदासांनी एकूण 52 नाटके लिहिली. त्यांची सर्व नाटके पौराणिक होती. नाटक मंडळीत पुढे 1862 सुमारास विष्णूदासांनी नाट्य संन्यास घेतला पण त्यापूर्वी दरबारचे कर्ज व तसल मातीचा उलगडा करण्यास हा नाट्याचार्य विसरला नाही.

सांगलीकर संगीत हिंदी नाटक मंडळी आणि नूतन सांगलीकर मंडळीनी विष्णुदास भावे यांच्या पद्धतीची नाटके 1910 पर्यंत चालू होती. 9 ऑगस्ट 1901 साली नाट्याचार्य विष्णूदास अमृत भावे यांचे निधन झाले. त्यांच्या नावाने भावे पुरस्कार 5 नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिना दिवशी देण्यात येतो. त्यांच्या नावाने सांगलीतील विष्णूदास भावे नाट्य मंदिराची उभारणी झाली आहे. नाटक कंपनीने नाटक बसविले की त्यांचा पहिला प्रयोग या नाट्य पंढरीच्या विष्णूदास भावे रंगमंचावर करायचा ही जणू प्रथाच पडली आहे. नाट्य पंढरीबद्धल सर्वच नाट्य रसिकांना मनोमन आदराचे स्थान आहे.

 

लेखक - विजय बक्षी,
विश्रामबाग, सांगली.

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 7/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate