অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कुसुमाग्रज

विष्णू वामन शिरवाडकर

(२७ फेब्रुवारी १९१२ - १० मार्च १९९९) एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार. पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. ‘कुसुमाग्रज’ या टोपण नावाने काव्यलेखन. जन्म पुणे येथे. नासिक येथे शिक्षण. बी. ए. झाल्यावर १९३४ ते १९३६ या काळात ते चित्रपटव्यवसायात होते. पुढे १९४९ पर्यंत पुणे, मुंबई व नासिक येथील विविध नियतकालिकांत संपादक म्हणून त्यांनी काम केले. नंतर ते नासिकला स्थायिक झाले. काही पाठ्यपुस्तकांचे संपादनही त्यांनी केले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी सत्याग्रह केला होता. कुसुमाग्रज जीवनलहरी (१९३३), विशाखा (१९४२), किनारा (१९५२), मराठी माती (१९६०), स्वगत (१९६२), हिमरेषा (१९६४) व वादळवेल (१९७०) हे त्यांचे काही प्रकाशित काव्यसंग्रह. विशाखा हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण आहे.

काव्यसंग्रह

कवीच्या क्रांतिप्रवण मनोवृत्तीचा, विजिगीषू मानवतेचा व ध्येयवादी प्रीतीचा भव्योदात्त कल्पनाचित्रांनी व संपन्न शब्दकळेने केलेला स्फूर्तिदायक आविष्कार त्यातील विविध कवितांतून आढळतो. ‘अग्निसंप्रदायी काव्य’ या नावाने विशाखेची एक परंपराच नंतर मराठी काव्यात निर्माण झाली. त्यांची कविता संघर्षातून अवतरते. विशाखानंतरची त्यांची कविता अधिक अंतर्मुख होऊन सामाजिक संघर्षाबरोबरच मानसिक व तात्त्विक संघर्षाकडे वळली. वाढत्या वयाबरोबर कवीच्या अंतर्जीवनाशी सतत एकरूप होऊन वाढत जाणारी कविता दुर्मिळ असते. कुसुमाग्रजांचे काव्य या अर्थाने मराठीच अनन्यसाधारण आहे.

केशवसुतांच्या क्रांतिकारक काव्याशी त्याचे नाते आहे. आधुनिक काव्य हा कुसुमाग्रजांच्या चिंतनाचाही विषय असून त्यांनी काही मार्मिक काव्यसमीक्षात्मक निबंधही लिहिले आहेत. शिरवाडकरांच्या स्वतंत्र नाटकांत दुसरा पेशवा (१९४७), कौंतेय (१९५३), आमचं नाव बाबुराव (१९६६), ययाति आणि देवयानी (१९६६), वीज म्हणाली धरतीला (१९७०), नटसम्राट (१९७१) यांचा समावेश होतो. दूरचे दिवे (१९४६), वैजयंती (१९५०), राजमुकुट (१९५४), ऑथेल्लो (१९६१) व बेकेट (१९७१) ही त्यांची नमुनेदार रूपांतरित नाटके आहेत. प्रकृतीने गंभीर व रचनाशिल्पाच्या दृष्टीने रेखीव व निर्दोष असलेल्या त्यांच्या नाटकांत प्रभावी व्यक्तिमत्त्वांच्या अंतःकलहाचे सखोल दर्शन घडते. मार्मिक नाट्यदृष्टी, काव्यात्म भाषाशैली व स्वतंत्र आशयानुकूल रचनातंत्र या गुणामुळे प्रयोगदृष्टीनेही त्यांची नाटके यशस्वी झाली आहेत.

१९७४ मध्ये त्यांच्या नटसम्राट ह्या नाटकला साहित्य अकादेमीचे पारितोषिक मिळाले. वैष्णव (१९४६), जान्हवी (१९५२) व कल्पनेच्या तीरावर (१९५६) या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांच्या कथासंग्रहांत फुलवाली (१९५०), सतारीचे बोल आणि इतर कथा (१९६८), काही वृद्ध, काही तरुण (१९६१), प्रेम आणि मांजर (१९६४) व निवडक बारा कथा (१९६८) यांचा अंतर्भाव होतो. काव्यात्मता व विचारप्रेरकता हे त्यांच्या कथासाहित्याचे विशेष होत. कालिदासाच्या मेघदुताचे मराठी रूपांतर (१९५६), समिधा (१९४७) हा मुक्तकाव्यांचा संग्रह, आहे आणि नाही (१९५७) हा लघुनिबंधसंग्रह तसेच काही बालकथा व बालगीते यांचाही समावेश त्यांच्या लेखनात होतो. अन्य मराठी कवींचे काही काव्यसंग्रहही त्यांनी संपादित केले आहेत.

१९६४ मधील गोव्याच्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

 

लेखक: रा. ग. जाधव

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate