অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

धोंडो केशव कर्वे

धोंडो केशव कर्वे

धोंडो केशव कर्वे

(१८ एप्रिल १८५८ - ९ नोव्हेंबर १९६२). आधुनिक भारतातील एक श्रेष्ठ व कर्ते समाजसुधारक. महर्षी अण्णासाहेब कर्वे या नावानेच ते सर्वांना परिचित आहेत. त्यांचा जन्म कोकणातील मुरुड या गावी एका गरीब कुटुंबात झाला. शालेय शिक्षण मुरूड व रत्नागिरी येथे. १८९१ मध्ये मुंबई येथून ते बी. ए. झाले. त्याच वर्षी लो. टिळकांनी फर्ग्युसन कॉलेजमधील आपल्या जागेचा राजीनामा दिल्यावर नामदार गोखल्यांनी त्यांची गणिताचे प्राध्यापक म्हणून नेमणूक केली. त्यानंतरच त्यांच्या समाजकार्यास चालना मिळाली.

पहिली पत्नी वारल्यानंतर (१८९१) त्यांनी पंडिता रमाबाईंच्या ‘शारदा सदन’ या संस्थेतील एका विधवेशी पुनर्विवाह केला.महर्षी अण्णासाहेब कर्वे   आनंदीबाई तथा बाया कर्वे यांनी कर्व्यांना आयुष्यभर साथ दिली. या पुनर्विवाहामुळे कर्व्यांना तत्कालीन ब्राह्मण समाजाने वाळीत टाकले; पण तरीही न डगमगता त्यांनी विधवांच्या उद्धाराचे कार्य चालूच ठेवले. १८९३ साली त्यांनी ‘विधवाविवाह प्रतिबंध निवारक मंडळ’ काढले आणिपुनर्विवाहितांचे कुटुंब-मेळेही भरविले. याच दिशेने विधवांच्या शिक्षणासाठी त्यांनी १८९९ साली‘अनाथ बालिकाश्रम’ या संस्थेची स्थापना केली.

पुण्याजवळील हिंगणे येथे १९०० सालापासून हाआश्रम सुरू झाला. पुढे सुगृहिणीपदाच्या दृष्टीने योग्य असेच शिक्षण स्त्रियांना दिले पाहिजे, याजाणिवेने ते स्वतंत्र महिला विश्वविद्यालयाच्या स्थापनेसाठी प्रयत्न करू लागले. त्यातूनचठाकरसी कुटुंबाच्या आर्थिक मदतीने १९१६ मध्ये श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिलाविद्यापीठ उभे राहिले. या विद्यापीठातील अभ्यासक्रमामध्ये स्त्रीजीवनाशी संबद्ध अशा विविधविषयांचा समावेश असून शिक्षणाचे माध्यम मातृभाषा आहे.

अनाथ बालिकाश्रम आणि महिलाविद्यापीठ या संस्थांतून महाराष्ट्रातील हजारो स्त्रियांनी आपले शिक्षण पुरे केले आहे. या दोनसंस्थांच्या उभारणीसाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी अण्णासाहेब कर्व्यांनी आयुष्यभर स्वदेशात आणि परदेशातही (१९२९-३२)मिशनरी बाण्याने वणवण केली.

महर्षी कर्वे यांचे आयुष्य संस्थामय होते. वरील संस्थांखेरीज ‘मुरुड फंड’ (१८८६), स्त्रियांच्या उद्धारासाठी आमरण कार्य करणारेकार्यकर्ते निर्माण व्हावेत म्हणून काढलेला ‘निष्काम मठ’ (१९१०), ग्रामीण शिक्षणासाठी ‘महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ’ (१९३६), जातिभेद आणि अस्पृश्यता यांच्या निर्मूलनाच्या उद्दिष्टाने काढलेला ‘समता-संघ’ (१९४४) इ. संस्था त्यांनी स्थापन केल्या.त्यांचे आत्मवृत्त १९१५ मध्ये प्रकाशित झाले असून ते अत्यंत उद्बोधक आहे.

आधुनिक भारताच्या सामाजिक सुधारणेच्या इतिहासात व विशेषतः स्त्रीशिक्षण, विधवाविवाह या बाबतींत कर्व्यांनी आपल्याआमरण कार्याने, चिकाटीने आणि ध्येयवादाने एक अपूर्व आदर्श निर्माण केला. या शतायुषी महर्षीचा गौरव भारत सरकारनेपद्मविभूषण (१९५५), भारतरत्न (१९५८) या पदव्या देऊन केला. त्यांच्या कार्याचे दिग्दर्शन करणारा एक अनुबोधपटही सरकारनेकाढलेला आहे.

संदर्भ : १. नित्सुरे, य. गो. भाग्यवान शतायुषी, पुणे, १९५८.

२. शिखरे, दा. न. महर्षि अण्णासाहेब कर्वे, पुणे, १९५८.

 

लेखक - अं. दि. माडगूळकर

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate