অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भाऊ दाजी लाड

भाऊ दाजी लाड

भाऊ दाजी लाड : (१८२२  - ३१ मे १८७४). महाराष्ट्रातील एक प्राच्यविद्या पंडित, समाजसेवाक व कुशल धन्वतंरी. त्यांचे पूर्ण नाव रामकृष्ण विठ्ठल लाड. त्यांच्या वडीलांना दाजी म्हणत व मित्र परिवारात ते भाऊ या नावाने परिचित होते. त्यामुळे पुढे भाऊ दाजी हे नाव रूढ झाले. त्यांचा जन्म आजोळी गोव्यातील मांजरे (पेडणे तालुका) या गावी झाला. वडील पार्से (गोवा) येथे शेती तसेच कारकुनीचे काम करीत. व्यवसायानिमित्त लाड कुटुंब मुंबईला गेले (१८३२). तिथे विठ्ठलराव मातीच्या बाहुल्या करून विकत असत. भाऊदाजींचे प्राथमिक शिक्षण नारायणशास्त्री पुराणिकांच्या मराठी शाळेत झाले. पुढे एल्फिन्स्टन विद्यालय व कॉलेजमधून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. खाजगीरित्या त्यांनी संस्कृतचे अध्ययन केले. त्यांची एल्फिन्स्टन विद्यालयात अध्यापक म्हणून नियुक्ती झाली (१८४३). या सुमारास त्यांचा पार्वतीबाई या मुलीबरोबर विवाह झाला. त्यांना विठ्ठल व व्दारकानाथ हे दोन मुलगे होते. व्दारकानाथ तारूण्यातच निधन पावला. वडीलांनी संन्यास घेऊन एलेफंटा (घारापुरी) येथे वास्तव्य केले.

भाऊंनी कच्छ, काठेवाड या गुजरातच्या विभागातील बालकन्या हत्येच्या प्रथेवर इंग्रजी व गुजराती अशा दोन्ही भाषांत एक निबंध लिहिला. निबंधस्पर्धेत त्यांना ६०० रूपयांचे पारितोषिक मिळाले आणि त्यांच्या चिकित्सक अभ्यासू संशोधनवृत्तीला चालना मिळाली. डॉ. जॉन विल्सन यांनी आपल्या ग्रंथात यातील मजकूर उद्‌धृत केला आहे.

मुंबईत १८४५ मध्ये ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना झाली. तेव्हा भाऊंनी शिक्षकाची नोकरी सोडून त्यात नाव घातले. फॅरिश शिष्यवृत्ती मिळविली आणि वैद्यकशास्त्रात पदवी घेतली (१८५१). कॉलेजमध्ये असताना त्यांनी ग्रंथपालाचेही काम केले. त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. अचूक निदान व शस्त्रक्रियेतील हातोटी (कौशल्य) यांमुळे त्यांना लोकप्रियता लाभली व पैसाही मिळू लागला. त्यांनी कुष्ठरोगावर खष्ठ नावाच्या वनस्पतीच्या बियांपासून तयार केलेले एक देशी औषध शोधून काढले. खष्ठ (कवटी) म्हणजेच चौलमुग्रा हा सदापर्णी वृक्ष असावा. त्यांच्या बियांपासून तयार केलेले तेल कुष्ठरोगावर गुणकारी आहे. बाँबे ॲसोसिएशनचे ते चिटणीस झाले. पुढे दादाभाई नवरोजींनी इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया ॲसोसिएशन नावाची संस्था काढली. तिच्या मुंबई शाखेचे भाऊ अध्यक्ष झाले. सामाजिक सुधारणांबरोबर त्यांनी औद्योगिक सुधारणांकडेही लक्ष दिले. मुंबईत कागद व कापूस यांच्या गिरण्या काढण्यात त्यांनी पुढाकार घेतला. १८५४ मध्ये ते वेस्टर्न इंडियन कॅनल अँड इरिगेशन या कंपनीचे संचालक झाले.

जुन्या रूढी व परंपरा यांना डावलून त्यांनी स्त्री शिक्षणासाठी अनेक वर्षे आर्थिक झीज सोसली. स्त्रियांना शिक्षण देणाऱ्या स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेचे ते पहिले भारतीय अध्यक्ष होत (१८६३-७३). या संस्थेतर्फे मुलींच्या तीन शाळा चालविल्या जात. विधवाविवाहाच्या चळवळीलाही त्यांनी सक्रिय पाठींबा दिला. लोहार चाळीतील कन्याशाळेला ते दरमहा आर्थिक साहाय्य देत. याच शाळेला पुढे ‘भाऊ दाजी गर्ल्स स्कूल’ हे नाव देण्यात आले. जातीव्यवस्थेचे निर्मूलन करावे आणि अंधश्रध्देला फाटा द्यावा, या मताचे ते होते. त्यांचे सार्वजनिक कार्य लक्षात घेऊन सरकारने त्यांची शेरीफ पदावर नियुक्ती केली (१८६४-६९).

वनस्पती व प्राचीन इतिहास यांच्या संशोधनात त्यांनी विशेष लक्ष घातले. राणीचा बाग (जिजामाता बाग), ॲल्बर्ट म्यूझीयम, नेटिव्ह जनरल लायब्ररी, पेटीट इस्टिट्युट इ. संस्था स्थापन करण्यात ते अग्रेसर होते. जिजामाता बागेत त्यांच्या स्मरणार्थ एक वस्तुसंग्रहालयही उभारले आहे. भाऊंनी भारतभर दौरा करून हस्तलिखिते, शिलालेखांचे ठसे, दुर्मिळ चित्रे, नाणी, ताम्रपट, शस्त्रे इ. वस्तूंचा संग्रह केला. मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीचे ते सदस्य होते व पुढे उपाध्यक्ष झाले. वेगवेगळ्या परिषदांत त्यांनी त्यांनी प्राच्यविद्येच्या संदर्भात अनेक शोधनिबंध सादर केले. मुकुंदराज, हेमाद्री, सायण, हेमचंद्र इ. व्यक्तींचे तसेच कालीदासाचा कालनिर्णय आणि शिलालेख व ताम्रपट यांवरील त्यांचे शोधनिबंध अभ्यासपूर्ण होते. माक्स म्यूलर व रा. गो. भांडारकर यांनी या शोधनिबंधांविषयी गौरवोद्‌गार काढले आहेत. कालीदासाचे कुमारसंभव व मेरूतुंगाचार्याचा प्रबंध चिंतामणि हे ग्रंथ त्यांनी संपादित केले. तथापि त्यांनी लिहिलेला एकही स्वतंत्र ग्रंथ नाही. त्यांच्या मरणोत्तर रामचंद्र घोष यांनी द लिटररी रिमेन्स ऑफ भाऊ दाजी या शीर्षकाने त्यांचे संशोधनात्मक शोधनिबंध प्रसिध्द केले. तसेच रायटिंग्ज अँड स्पिचिस ऑफ डॉ. भाऊदाजी या शीर्षकाने त्र्यं. गो. माईणकर यांनी त्यांचे समग्र लेखन संपादित करून प्रसिध्द केले (१९७४).

त्यांच्यावर १८६५ मध्ये आर्थिक संकट आले. त्यातून ते अखेरपर्यंत सावरले नाहीत. परिणामत: त्यांचे उर्वरित आयुष्य दु:ख, दैन्य व वैफल्य यांनी ग्रासले गेले. त्यातच पक्षाघाताने त्यांचा मुबईमध्ये अंत झाला. त्यांच्या स्मरणार्थ संस्कृत विषयात बी. ए. ला पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्याला भाऊ दाजी हे पारितोषिक देण्यात येते.

 

संदर्भ : १. कर्नाटकी, श्री. ना. डॉ. भाऊ दाजी लाड, मुंबई १९३०

२. कीर, धनंजय, तीन महान सारस्वत, मुंबई, १९७९.

३. प्रियोळकर, अ. का. डॉ. भाऊ दाजी : व्यक्ती, काल आणि कर्तृत्व मुंबई, १९७१.

लेखक - सु. र. देशपांडे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate