অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भाऊराव कृष्णराव गायकवाड

भाऊराव कृष्णराव गायकवाड

दादासाहेब गायकवाड
(१५ ऑक्टोबर १९०२–२९ डिसेंबर १९७१). डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ज्येष्ठ सहकारी, दलित समाजाचे नेते व सुधारक. दादासाहेब या नावानेच ते ओळखले जात. नासिक येथे एका गरीब कुटुंबात जन्म. तेथील सरकारी माध्यमिक शाळेत त्यांचे शिक्षण झाले. त्यानंतर डॉ. आंबेडकरांसमवेत त्यांनी दलितोद्धाराच्या कार्यास सुरुवात केली. १९४२ ते ४६ ह्या काळात ते सरकारी नोकरीत होते. १९४७ मध्ये जलंदर व कुरुक्षेत्र येथे निर्वासितासांठी खास अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले. नासिकच्या ‘ज्ञानविकास केंद्र’ ह्या शिक्षणसंस्थेचे तसेच नागपूरच्या डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे ते अध्यक्ष होते. अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष, तसेच पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे ते सदस्य होते. प्रबुद्ध भारतह्या साप्ताहिकाच्या संपादक मंडळाचे अध्यक्ष तसेच मुंबई येथील ‘शेड्यूल्ड कास्ट्स इंप्रूव्हमेंट ट्रस्ट’चे ते विश्वस्त व सदस्य होते. नासिक, नागपूर, पुणे, मुंबई इ. ठिकाणच्या अनेक सार्वजनिक संस्थांशी ते या ना त्या प्रकारे निगडित होते.

ते मुंबई विधानसभेचे (१९३७–४६) तसेच लोकसभेचे (१९५७–६२) सदस्य होते. १९५७–५८ मध्ये ते लोकसभेत रिपब्लिकन पक्षाच्या गटाचे नेते होते. १९६२ मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली. १९५८ मध्ये त्यांनी डॉ. आंबेडकरांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.

दलितांच्या उद्धारार्थ त्यांनी आपले सर्व आयुष्य वेचले. महाडच्या सत्याग्रहात (१९२७) व नासिकच्या काळाराम मंदिरप्रवेश सत्याग्रहात (१९३०) ते आघाडीवर होते. त्यावेळी त्यांना निर्दय मारपीट सहन करावी लागली व तुरुंगातही जावे लागले. १९५३ मध्ये त्यांना भूमिविषयक सत्याग्रहात तुरुंगवास भोगावा लागला. १९५८ मध्ये त्यांनी भूमिहीनांना भूमी मिळावी, म्हणून मोठे आंदोलन सुरू केले.

डॉ. आंबेडकरांसोबत प्रथमपासून त्यांनी आघाडीवर राहून काम केले. त्यांच्या गुणांची आणि नेतृत्वाची अनेक वेळा कसोटी लागली. डॉ. आंबेडकरांचे एक ज्येष्ठ, विश्वासू व कर्तबगार सहकारी म्हणून त्यांचा लौकिक होता. साधी राहणी, मनमिळाऊ स्वभाव, विशुद्ध चारित्र्य, प्रखर ध्येयनिष्ठा, प्रभावी वक्तृत्व, अन्यायाविरुद्ध झगडण्याची जिद्द इ. गुणांमुळे त्यांचे नेतृत्व आदरणीय ठरले. भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ देऊन (१९६८) त्यांच्या कर्तृत्वाचा व समाजसेवेचा गौरव केला. त्यांच्या कार्यरत जीवनामुळेच लोक त्यांना ‘कर्मवीर’ ही उपाधी लावत होते. दिल्ली येथे त्यांचे निधन झाले.

 

लेखक - भा. गा. सुर्वे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate