অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महादेव हरिभाई देसाई

महादेव हरिभाई देसाई

महादेव हरिभाई देसाई : (१ जानेवारी १८९२–१५ ऑगस्ट १९४२). महात्मा गांधीजींचे स्वीय सहायक व एक निष्ठावान गांधीवादी कार्यकर्ते. गुजरातमधील सरस (सुरत जिल्हा) गावी मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म. वडील हरिभाई प्राथमिक शाळेत शिक्षक होते. पुढे ते अहमदाबाद येथे स्त्रियांच्या प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. त्यांनी रामायण, महाभारत, उपनिषदे तसेच गुजराती साहित्य यांचा व्यासंग केला होता. त्यांचे विचार व जुन्या धार्मिक वृत्ती यांची महादेवभाईवर छाप पडली. महादेवभाई सात वर्षांचे असतानाच त्यांच्या मातोश्री जमनाबेन वारल्या. सुरत येथे मॅट्रिक झाल्यावर (१९०६) ते मुंबईस आले आणि अनेक शिष्यवृत्त्या मिळवून बी. ए. (१९१०), एल्एल्. बी (१९१३) झाले. तत्पूर्वी १९०५ मध्ये दुर्गाबेन या तरुणीबरोबर त्यांनी विवाह केला. त्यांनी काही दिवस वकिली केली, पण फारसे यश आले नाही ; तेव्हा त्यांनी एका सहकारी बँकेत नोकरी धरली. लॉर्ड मोर्ले यांच्या ऑन कॉम्प्रोमाइज व टागोर यांच्या चित्रांगद या ग्रंथांचे त्यांनी गुजरातीत भाषांतर केले. पहिल्यास १,००० रुपयांचे पारितोषिक मिळाले. याच काळात त्यांनी मराठी, बंगाली, इंग्रजी हिंदी, गुजराती वगैरे भाषांतील साहित्य वाचले.

रुक्ष वाटणारी बँकेतील नोकरी सोडून १९१७ मध्ये ते गांधीजींच्या सहवासात आले व अखेरपर्यंत त्यांच्यासोबत चिटणीस व निकटचे सहकारी म्हणून वावरले. चंपारण्य सत्याग्रह (१९१७), बार्डोली सत्याग्रह (१९२८) व मिठाचा सत्याग्रह (१९३०) वगैरे सत्याग्रहांत त्यांनी भाग घेतला. तसेच १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात महादेवभाईंनी गांधीजींच्याबरोबर तुरुंगवास भोगला. जेथे गांधीजी तेथे महादेवभाई असत. महादेवभाई हे साहित्यिक व पत्रकार होते. त्यांनी इंडिपेंडंट, यंग इंडिया, हरिजन, नव जीवन वगैरे नियतकालिकांतून अनेक लेख लिहिले. याशिवाय विथ गांधी इन सीलोन (१९२८), द स्टोरी ऑफ बार्डोंली (१९२९), इक्लिप्स ऑफ फेथ (१९२९), द नेशन्स व्हॉइस (१९३२), द एपिक ऑफ त्रावणकोर (१९३७) वगैरे इंग्रजी पुस्तके लिहिली. त्यांची खेती नि जमीन (१९४२), वीर वल्लभभाई, खुदाई खिदमतगार, एक धर्मयुद्ध वगैरे गुजराती पुस्तकेही प्रासिद्ध आहेत. बाराव्या गुजराती वृत्तपत्र परिषदेचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या गांधीजींविषयीच्या सेवेबद्दल देवदास गांधी व व्हेरिअर एल्विन यांनी गौरवोद्‌गार काढले आहेत. एल्विन त्यांना ‘बापूज बॉस्वेल’ म्हणत. महादेवभाईंच्या लेखनातून गांधीवादी तत्त्वज्ञान व त्याचे समर्थन दिसते. मानाची,कीर्तीची, महत्त्वाकांक्षेची आशा न बाळगता त्यांनी गांधीजींबरोबर एकनिष्ठेने सेवा केली. पुण्याच्या आगाखान राजवाड्यात कैदेत असताना हृदयविकाराच्या झटक्याने ते मरण पावले. त्यांच्या मृत्यूनंतर ‘आपण पोरके झालो’ असे म. गांधींनी उद्‌गार काढले. महादेवभाईंची दैनंदिनी नंतर आठ खंडांत प्रकाशित करण्यात आली.

 

लेखक : त्र्यं. र. देवगिरीकर

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate