অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रघुनाथ माशेलकर

रघुनाथ माशेलकर

रघुनाथ अनंत माशेलकर - (जन्म - १ जानेवारी १९४३). आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय थोर शास्त्रज्ञ. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (एन्.सी.एल्.) माजी संचालक आणि कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (सी. एस्. आय. आर्.) या संस्थेचे महासंचालक.

माशेलकर यांचा जन्म माशेल (गोवा) येथे सामान्य गरीब कुटुंबात झाला. लहानपणीच पित्याचे छत्र हरपलेल्या माशेलकरांना त्यांच्या आईने अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून, जिद्दीने शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. त्यांचे प्राथमिक शिक्षण अप्पर खेतवाडी येथील प्राथमिक शाळेत तर पुढील शिक्षण युनियन हायस्कूलमध्ये झाले. ते महाराष्ट्र राज्यात सर्व विद्यार्थ्यांत अकरावा क्रमांक मिळवून एस्. एस्. सी. उत्तीर्ण झाले (१९६०). त्यांनी उच्च शिक्षण जयहिंद महाविद्यालय व युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या ठिकाणी घेतले. मुंबई विद्यापीठातून त्यांनी १९६६ मध्ये रासायनिक अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली. पुढे त्यांनी पीएच्.डी पदवीचे संशोधन तीन वर्षांत पूर्ण केले (१९६९). त्यांनी काही काळ युनिव्हर्सिटी ऑफ सॅलफोर्ड (लंडन) येथे व्याख्याता म्हणून काम केले. तसेच यांनी डेन्मार्कमधील एका विद्यापीठात अध्यापनाचे कार्य केले.

माशेलकर अमेरिकेतील डेलावेअर विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना, त्यांची पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा येथे संचालक म्हणून नेमणूक झाली (१९८९). त्यांनी या प्रयोगशाळेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. त्यांच्या प्रयत्नांमुळे भारतीय शास्त्रज्ञांचे अनेक शोध अमेरिका व यूरोपमध्ये निर्यात होत आहेत. बहुवारिकीय विज्ञान व अभियांत्रिकी ही त्यांची अभ्यासाची आणि संशोधनाची क्षेत्रे होत. त्यानंतर त्यांची कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या संशोधन संस्थेचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी संशोधनाच्या माध्यमातून देशाची प्रगती ह्या सूत्रावर भर दिला. या संस्थेच्या अनेक शाखा त्यांनी कार्यान्वित केल्या, तसेच या माध्यमातून त्यांनी असंख्य संशोधक तयार केले. भारताचे बौद्धिक ज्ञानसंपदेच्या हक्कांविषयीचे धोरण ठरविण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या धोरणाबाबत सल्ला देण्यासाठी १९९८-९९ मध्ये नियुक्त करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय उच्चाधिकार समितीत ते एक प्रमुख सदस्य असून २००१-०२ दरम्यान स्थापन झालेल्या उच्चाधिकार समितीच्या अध्यक्षपदी ते होते. जिनीव्हा येथे भरलेल्या जागतिक बौद्धिक ज्ञानसंपदा संघटनेच्या माहिती तंत्रज्ञानविषयक स्थायी समितीत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले; या समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. बौद्धिक ज्ञानसंपादनाच्या हक्काविषयीची (पेटंट) धोरण याबाबत माशेलकर यांचे योगदान मोठे आहे. पेटंट ऑर पेरिश (perish) असा इशाराच त्यांनी दिला होता. हळद, बासमती तांदूळ व कडुनिंब यांवरील संशोधन आणि त्यांवर भारतीयांचा असणारा परंपरागत हक्क अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि पुराव्यांसह मांडून त्यांची एकस्व (पेटंट) पाश्चिमात्यांच्या विशेषत: अमेरिकेच्या हातात जाऊ दिली नाहीत. ‘व्यवसायाभिमुख संशोधन’ या तत्त्वाचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. ‘ज्ञान’ ही संपत्ती आहे, तसेच ज्ञानातून संपत्ती निर्माण होते, म्हणून ते ज्ञान व संशोधन कायदेशीर रीत्या सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. ही त्यांची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरली आहे. त्यांचे स्पुट लेखन विपुल आहे. त्यांनी शंभराच्या वर शोधनिबंध लिहिले आहेत. त्यांचे अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले असून त्यांची सु. २० पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. ते उत्तम वक्तेही आहेत. गरीब-गरजू बालकांच्या शिक्षणासाठी त्यांनी अनेकविध योजना आपल्या व्याख्यानांतून सांगितलेल्या आहेत. त्याकरिता
त्यांनी ‘रीड इंडिया’ ही मोहीम हाती घेतली आहे. डॉ. माशेलकरांना अनेक मानसन्मान लाभले असून पन्नासाहून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. पद्मश्री (१९९१), पद्मभूषण (२०००), शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार (२००१), मटेरिअल सायंटिस्ट ऑफ दी इयर, पं. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुरस्कार, भारतीय विज्ञान परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार, प्रियदर्शनी ग्लोबल ॲवॉर्ड (२००२) व महाराष्ट्र भूषण (२००३) हे त्यांपैकी काही होत. तसेच लंडन येथील जगत्‌विख्यात रॉयल सोसायटी, लंडनची फेलोशिपही त्यांना १९९८ मध्ये मिळाली. जागतिक स्तरावरील माशेलकर यांचे वैज्ञानिक कार्य लक्षात घेऊन रॉयल सोसायटीने त्यांचा दि. १७ जुलै १९९८ रोजी सन्मान केला. अमेरिकन नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस या जगत्‌विख्यात संस्थेवर माशेलकरांची मानद सल्लागार म्हणून निवड करण्यात आली (मे, २००५). हा मान मिळविणारे ते केवळ सातवे भारतीय शास्त्रज्ञ आहेत. विश्वचरित्र संशोधन केंद्र, पर्वरी (गोवा) येथे संपादित झालेल्या मराठी विश्वचरित्र कोशाच्य प्रकल्प संस्थेचेही ते सन्माननीय अध्यक्ष होते. सध्या डॉ. माशेलकर कौन्सिल ऑफ सायंटिफिक ॲण्ड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेचे महासंचालक आहेत.

 

लेखक - सु. र. देशपांडे

स्त्रोत -मराठी विश्कोश

अंतिम सुधारित : 5/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate