অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

विश्वनाथ काशीनाथ राजवाडे

विश्वनाथ काशीनाथ राजवाडे

विश्वनाथ काशीनाथ राजवाडे : (२४ जून १८६३ – ३१ डिसेंबर १९२६) मराठीतून इतिहास, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण इ. बहुविध विषयांवर व्यांसगपूर्ण संशोधन आणि लेखन केलेले एक अतिशय परिश्रमी, प्रतिभावान, दृढनिश्‍चयी आणि निष्ठावान असे महाराष्ट्रीय विद्वान. इतिहाससंशोधक म्हणून विशेषेकरून ते मान्यता पावले. त्यांचा जन्म पुण्यास झाला. १८८२ मध्ये पुण्यातून ते मॅट्रिक झाले. मुंबईस एल्फिन्स्टन कॉलेज व पुण्यास डेक्कन कॉलेज येथे महाविद्यालयीन शिक्षण घेऊन १८९० मध्ये बी.ए.झाले. १८९१ मध्ये ते पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले, पण सु.अडीच वर्षांनी १८९३ मध्येच त्यांनी ती नोकरी सोडली. पुढे आयुष्यात त्यांनी कधीही, कसलीही नोकरी अशी केली नाही. विद्यार्थिदशेतच १८८९ मध्ये त्यांचा विवाह झाला होता, पंरतु १८९२ मध्येच त्यांची पत्नी निवर्तली आणि त्याच वेळी त्यांनी दुसऱ्या विवाहाचा विचारही  न करता स्वतःस प्रापंचिक पाशातून कायमचे सोडवून घेतले.

पुढे ते पुणे, सातारा, वाई, धुळे, मिरज, तळेगाव-दाभाडे इ. ठिकाणी कमी-अधिक वर्षे वास्तव्य करून असले, तरी बहुधा महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेरही ऐतिहासिक साधनांच्या आणि प्राचीन साहित्याच्या शोधात सतत हिंडत राहिलेले दिसतात. दऱ्याखोऱ्यातून प्राचीन अवशेष पहात व कोनाकोपऱ्यातून जुनी दप्तरे गोळा करीत असतानाच, त्यांचे लेखनकार्यही अव्याहतपणे सुरू होते. १८९४ पासून स्वतः सुरू केलेल्या भाषांतर तसेच कोल्हापूर येथील समर्थ, तसेचग्रंथमाला, विश्ववृत्त, सरस्वती मंदिर, प्राचीप्रभा इ. नियतकालिकांतून ते भरपूर लिहू लागले. मराठ्यांच्या इतिहासाची साधने ह्या शीर्षकाचे अस्सल मराठी साधनांचे बावीस खंड त्यांनी संपादून प्रसिद्ध केले(१८९८ – १९१७). ह्यापैंकी नऊ खंडांना त्यांनी विस्तृत प्रस्तावना लिहिल्या आहेत. राधामाधवविलासचंपू आणि महिकावतीची बखर हे दोन जुने ग्रंथ त्यांनी अनुक्रमे १९२२ व १९२४ मध्ये संपादून छापले व त्यांनाही मोठ्या विवेचक प्रस्तावना  जोडल्या. ज्ञानेश्‍वरीची फार जुनी हस्तलिखित पोथी, निङ्त विचार, सुबंतविचार, संस्कृत भाषेचा उलगडा, महाराष्ट्राचा वसाहतकाल असे काही त्यांनी संपादिलेले व लिहिलेले ग्रंथ त्यांच्या हयातीतच प्रसिद्ध झाले. मराठी धातुकोश, नामादिशब्दव्युत्पत्तिकोश इ. ग्रंथ त्यांच्या मृत्यूंनतर प्रसिद्ध होऊ शकले. राजवाड्यांच्या लेखांचे आणि प्रस्तावनांचे काही खंड शं. ना. जोशी आदींनी संपादून प्रसिद्ध केले आहेत. धुळ्याच्या संशोधकच्या अंकांमधून त्यांचे समग्र स्फुट लेखन प्रकाशित झालेले आहे.

मराठ्यांच्या इतिहासाची साधने प्रसिद्ध करू लागल्यामुळे राजवाड्यांचा बोलबाला होऊ लागला; तथापि ह्या स्वरूपाच्या कार्याचा प्रारंभ त्यांच्या आधीच का.ना. साने वगैरे संशोधकांनी केलेला होता. साधनांचा उपयोग करून मराठी सत्तेचा प्रत्यक्ष वृत्तांतात्मक इतिहास ग्रँट डफने इंग्रजीतून बराच सविस्तर असा सिद्ध केला होता. अगदी लहान प्रमाणावर का होईना; पण मराठीतही तसे प्रयत्न राजवाड्यांपूर्वीच सुरू झाले होते आणि ह्याचबरोबर इतिहास ह्या विषयाचा मूलगामी विचार करण्याचा उद्योगही काही विचारवंत करीत होते. उदा., मराठी सत्तेचा उत्कर्ष (राइज ऑफ द मराठा पॉवर) हा निबंध म.गो.रानडे यांनी लिहिला. हा निबंध इतिहासाचे तत्त्वज्ञान जाणणाऱ्या पंडितांनी लिहिला आहे असे लक्षात येते. राजवाड्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने जमविण्यासाठी जो प्रचंड खटाटोप केला, तसा त्यांच्या आधी कोणी केला नव्हता हे खरेच. अस्सल आणि अमूल्य अशी कागदपत्रे त्यांनी देशाच्या सर्व भागांतून, शहरांतून व खेड्यांतून अखंड भ्रमंती करून जमविली. परंतु ह्या साधनांचा उपयोग करून डफप्रमाणे मराठ्यांचा समग्र असा इतिहास त्यांनी सिद्ध केला नाही. आणखी भरपूर साधनसाहित्य हाती पडल्याशिवाय ते काम हाती घ्यायचे नाही, अशी त्यांची धारणा होती. तथापि संत रामदास आणि छ. शिवाजी यांच्या कार्याविषयी त्यांनी पुष्कळ लिहिले. संत रामदासांनी ज्ञानदेवांपासून तुकारामांपर्यत झालेल्या वारकरी संतांपेक्षा वेगळा, आक्रमक, लढाऊ,धार्मिक भक्तिमार्गाचा ध्येयवाद सांगितला, असे त्यांचे मत होते. पानिपतच्या लढाईसारख्या काही घटनांवरही त्यांनी प्रस्तावनांतून प्रदीर्घ विवेचने केली आहेत. मराठ्यांच्या सत्ताविस्ताराच्या राजकारणामागे महाराष्ट्र धर्माची स्थापना करण्याचा ध्येयवाद होता; हिंदुपदपातशाहीच्या ध्येयाने मराठे प्रेरित झालेले होते, असे ते कित्येक ठिकाणी प्रतिपादितात. मराठे शेवटी पराभूत झाले ते आधुनिक तंत्रज्ञानाच्या अभावी. लांब पल्ल्यांची नवीन आधुनिक शस्त्रे व तंत्रज्ञान यांनी संपन्न असलेल्या इंग्रजांनी मागासलेल्या मराठ्यांचा पराभव केला, असा निष्कर्ष त्यांनी काढला.

राजवाड्यांची १९०५ मध्ये प्रसिद्ध झालेली इतिहासमीमांसाही त्या वेळी खूप गाजली. राजवाडे फक्त मराठ्यांच्या इतिहासाची साधने गोळा करीत हिंडणारे एक सग्राहक आणि मराठ्यांच्या भूतकाळावर बहुधा स्वाभिमानमूलक आणि स्वाभिमानपोषक असे लिहिणारे एक इतिहासकार एवढेच नसून, एकूण इतिहास ह्या विषयावरचे मूलग्राही भाष्यकार होते, हे त्यांनी तत्कालीन महाराष्ट्राला जाणवून दिले. तथापि भूतकाळ म्हणजे सर्व मानवजातीचा इतिहास, एखाद्या प्रांताचा किंवा एखाद्या लोकसमूहाचा नव्हे आणि त्याचप्रमाणे इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन, केवळ राजकीय घडामोडी,सत्तातरांसाठी कटकारस्थाने आणि युद्धे ह्यांच्याच हकिकती नव्हेत, हे त्यांचे प्रतिपादन निश्चितच व्यापक आणि प्रागतिक दृष्टीचे द्योतक होते. निर्मत्सर, तटस्थ,निरहंकार व निर्लेप वृत्तीने झाली असेल ती हकीकत प्रामाणिकपणे दिली पाहिजे, हा त्यांचा आग्रह स्पृहणीय असाच आहे. राजवाड्यांपूर्वी त्यांनी केले तसे निरुपण मराठीत कोणी केले नसेल, पण कित्येक पाश्चिमात्य विचारवंतानी अठराव्या शतकाच्या प्रारंभापासून तशा भूमिका घेतलेल्या होत्या. शिवाय, ‘स्वतःच्या   किंवा समाजाच्या, देशाच्या किंवा स्वकीय कालाच्या अभिमानाला बळी पडून कोणत्याही प्रकारच्या पूर्वग्रहांना थारा देता उपयोगी नाही; इष्टानिष्ट मतांचे अधिष्ठान मनात कल्पून हकीकतीवर अभिप्राय देण्याचा किंवा हकीकत इष्टानिष्ट भासविण्याच्या खोट्या भरीस पडता कामा नये’, असे निःसंदिग्धपणे राजवाडे सांगतात. अस्सल साधने कोणती व ती कशी पारखावीत; बखरींसारखी साधने दुय्यम का मानावयाची आणि ती पूर्णतया त्याज्य किंवा अंशतः स्वीकारार्ह अशी केव्हा समजावयाची इ. स्वरूपाचा त्यांचा ऊहापोह फार महत्त्वाचा आहे; परंतु विश्वसनीय कागद सांगतील तोच आणि तेवढाच इतिहास, त्यात आपल्या कल्पितांना स्थान असता कामा नये, असे ठामपणे सांगणारे राजवाडे स्वतः  मात्र नेहमीच ते पाळतात असे नाही. ‘शिवाजी आग्र्यास गेला होता. तो भर मोगल दरबारात औंरगजेबाचा खून पाडण्याच्या हेतूनेच’, ह्या राजवाड्यांच्या शोधाला काही तरी आधार मिळू शकेल काय ?

मराठ्यांच्या इतिहासाचा म्हणजे प्रथम मुख्यतः राजकीय इतिहासाचा शोध घेत घेत ते त्यांच्या प्राचीन साहित्याकडेही वळले. जुन्या मराठी साहित्याचा अर्थ उलगडण्यासाठी तत्कालीन मराठी भाषेचे ज्ञान अपरिहार्य ठरले. ह्यांतून ते शब्दाच्या उगमांकडे-व्युत्पत्तिशास्त्राकडे व भाषेतील स्थित्यंतरांच्या अनेकविध प्रश्नांकडे वळले. महाराष्ट्रातील व्यक्तींची उपनामे, ग्रामनामे वगैंरेची मुळे ते शोधू लागले आणि ती बहुशः संस्कृतोद्भव आहेत, अशा निष्कर्षाप्रतही ते पोहोचले. त्यासाठी संस्कृत भाषेचा आणि वैदिक भाषेचाही सखोल विचार करणे आवश्यक झाले आणि त्या दृष्टींनीही त्यांनी संशोधन करून काही प्रंबधही सिद्ध करून ठेवले. त्यांपैकी काही त्यांच्या हयातीत तर काही त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाले. राजवाड्यांचे ह्या क्षेत्रातील कार्य गौरवास्पद असले, तरी त्यांचे भाषाव्युत्पत्तिविषयक निबंध सदोष असल्याचे काही भाषाशास्त्रज्ञांनी दाखवून दिले. ह्या एवढ्या गहन विषयात शिरणाऱ्या राजवाड्यांनी ललित साहित्याचे वाचन आणि रसग्रहणही सुंदर रीतीने केले, हे त्यांच्या ‘कांदबरी’ ह्या दर्जेदारसमीक्षात्मक लेखावरून कळून चुकते.

सर्व प्रकारचे कार्य सिद्धीस नेण्यासाठी संघटनांची (मंडळ्या) गरज असते, हे त्यांनी चागंले ओळखले होते. पुण्याच्या प्रसिद्ध भारत इतिहास संशोधक मंडळाची त्यांनीच १९१० मध्ये स्थापना केली. समाजशास्त्र मंडळ आणि आरोग्यमंडळ अशा संस्थाही त्यांनी उभ्या केल्या. एवढेच नव्हे तर रेल्वे प्रवाशांची संघटना बांधण्याचाही त्यांनी उद्योग आरंभिला होता. टिळकयुगात वावरूनही प्रत्यक्ष राजकारणात ते पडले नाहीत,पण तशी त्यांची इच्छा नव्हतीच असे मात्र म्हणता येणार नाही. लोकमान्य टिळक मंडालेच्या तुंरुगात असता, त्यांचे कार्य मागे पडू नये, म्हणून त्यांच्या गोटातले कार्यकर्ते दर आठवड्याला एक बैठक घेत. अशा एका बैठकीत एकदा टिळकांचे गैरहजेरीत आपण आपल्यापैकी कुणाला तरी पुढारी करून कार्य चालू ठेवले पाहिजे, अशी सूचना आली. तेव्हा तत्काळ ‘मलाच का नाही पुढारी नेमीत?’ म्हणून राजवाड्यांनी विचारिले होते. अशी आठवण मा. श्री. अणे ह्यांनी नमूद करून ठेवली आहे. तथापि अत्यंत आग्रही आणि एककल्ली स्वभावामुळे ते राजकारणात टिकू शकले नसते. केवळ बौद्धिक कार्यासाठी स्थापन झालेल्या ‘मंडळ्या’ मध्येही ते फार काळ राहू शकले नाहीत.

राजवाड्यांनी देशासाठी प्रत्यक्ष राजकारण केले नाही, तरी त्यांच्या संपूर्ण बौद्धिक कार्याची प्रेरणा देशप्रेमातूनच आलेली होती. स्वभाषेच्या आणि स्वदेशाच्या इतिहासातून स्वाभिमान जागृत करणे आणि सर्वसामान्यास संघर्षाला प्रवृत्त करणे, हीच आपल्या कार्याची दिशा त्यांनी पक्की केली होती. आयुष्यभर त्यांनी एवढा व्यासंग केला; पण आपले सर्व संशोधन आणि चिंतन त्यांनी प्रतिज्ञापूर्वक मराठीतून आणि फक्त मराठीतूनच व्यक्त केले. त्यांच्या संशोधनाचा आवाका फार मोठा होता आणि त्यांनी केलेली कामगिरी भरीव झालेली आहे, हे संशयातीत आणि वादातीतच आहे. कीर्ती, संपत्ती, अधिकार ह्या सर्वांचा मोह टाकून, एकनिष्ठ वृत्तीने ज्ञानोपासना करण्याचा आदर्श मागे ठेवून ते धुळे येथे निवर्तले.

 

संदर्भ: १.  प्र.न. राजवाडे विचारदर्शन, पुणे, १९८५.
२. जोशी, लक्ष्मणशास्त्री, संपा. राजवाडे लेखसंग्रह, नवी दिल्ली, १९६७.
3. भट, भा.वा. राजवाडे चरित्र, धुळे, १९४६.

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate