অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

विठ्ठल रामजी शिंदे

विठ्ठल रामजी शिंदे

महर्षी विठ्ठल रामजी
विठ्ठल रामजी शिंदे : (२३ एप्रिल १८७३ –२जानेवारी १९४४)महाराष्ट्रातील अस्पृश्यतानिवारण कार्यातील थोर समाजसुधारक, ब्राह्मधर्म प्रचारक, संशोधक व लेखक. त्यांचा जन्म कर्नाटक राज्यातील जमखंडी या संस्थानच्या गावी खानदानी मराठा कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजीबाबा व आईचे नाव यमुनाबाई. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह आत्याची मुलगी रुक्मिणी हिच्याशी झाला. घराण्याची पूर्वापार श्रीमंती गेल्यामुळे वडील रामजीबाबा हे संस्थानामध्ये काही काळ शिक्षकाची व कारकुनी स्वरूपाची नोकरी करीत होते. ते पंढरपूरचे वारकरी होते. आई सात्त्विक वृत्तीची होती व घरातील वातावरण जातिभेदाला थारा न देणारे होते. जमखंडी येथील इंग्रजी शाळेतून १८९१ साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले व १८९३ मध्ये पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात पुढील शिक्षणासाठी दाखल झाले.

विठ्ठल रामजींची धाकटी बहीण जनाबाई हिचा तिच्या सासरी छळ होऊ लागल्यामुळे तिलाही त्यांनी पुण्यास आणून हुजूरपागा शाळेत घातले. श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्याकडून मिळणारी कर्जाऊ शिष्यवृत्ती व खाजगी शिकवण्यांची अल्पस्वल्प मिळकत यांवर काटकसरीने राहून १८९८ मध्ये ते बी.ए. झाले. १८९५ साली अमेरिकन युनेटिरियन मिशनरी रेव्ह. जे. टी. संडरलंड यांच्या व्याख्यानामुळे एकेश्वरमताचा परिचय होऊन तसेच माक्स म्यूलर यांचे ग्रंथ वाचून त्यांची आंतरिक धर्मप्रेरणा प्रबळ झाली. एकेश्वरवादी प्रार्थनासमाजातील न्या. रानडे, रा. गो. भांडारकर, का. बा. मराठे यांच्या विचारांचा व सहवासाचा त्यांच्यावर प्रभाव पडून १८९८ मध्ये त्यांनी प्रार्थनासमाजाची दीक्षा घेतली. त्याचवर्षी ते कायद्याच्या पदवी परीक्षेचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी मुंबईस गेले.

मुंबई येथील प्रार्थनासमाज व कोलकात्याचा ब्राह्मो समाज यांनी शिंदे यांची शिफारस केल्यावर ब्रिटिश अ‍ॅण्ड फॉरिन असोसिएशनने त्यांची ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजात धर्मशिक्षणासाठी निवड केली. १९०१ ते १९०३ ही दोन वर्षे त्यांनी मँचेस्टर कॉलेजात तौलनिक धर्मशास्त्र, पाली भाषा व बौद्ध धर्म, ख्रिस्ती धर्मसंघाचा इतिहास, समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास केला. भारतात येण्यापूर्वी १९०३ च्या सप्टेंबरमध्ये अ‍ॅमस्टरडॅम येथे भरलेल्या त्रैवार्षिक आंतरराष्ट्रीय उदारधर्म परिषदेस ब्राह्मो समाजाचे भारतातील प्रतिनीधी म्हणून उपस्थित राहून ‘हिदुस्थानातील उदारधर्म’ या विषयावरील निबंध त्यांनी सादर केला. १९०३ च्या अखेरीस मुंबई प्रार्थनासमाजाचे धर्मप्रचारक म्हणून त्यांनी कार्यास आरंभ केला.

धर्मप्रचारकार्यात त्यांनी आपली कल्पकता व आपले संघटन कौशल्य दाखवले. पोस्टल्अ मिशन, उदारधर्मग्रंथ वाचनवर्ग, तरुण ब्राह्मोसंघ हे उपक्रम सुरू केले. मुंबई व मुंबईबाहेरील प्रार्थनासमाजात शेकडो धर्मपर व्याख्याने दिली. प्रार्थनासमाजाच्या सुबोधपत्रिका या मुखपत्रात सातत्याने धर्मविषयक लेखन केले. शिंदे यांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मिशन स्थापून धडाडीने चालविलेले काम तसेच त्यांची राजकारणविषयक जहाल मते मुंबई प्रार्थनासमाजातील धुरीणांना पसंत नसल्याने प्रार्थनासमाजचे प्रचारक म्हणून असलेला त्यांचा संबंध १९१० मध्ये संपुष्टात आला. त्यानंतरदेखील त्यांचे धर्मकार्य चालूच राहिले. १९२३ मध्ये मंगळूर येथे ब्राह्मो समाजाचे आचार्य म्हणून कार्य केले. १९२८ मध्ये पुण्यास कौटुंबिक उपासना मंडळाची स्थापना करून ते चालविले. १९३३ पासून वाई येथील ब्राह्मो समाजाच्या धर्मविषयक कार्यात ते सहभागी होत राहिले. जीवनाच्या अंतापर्यंत ते एकनिष्ठ ब्राह्म होते.

भारतातील विविध प्रांतांत केलेल्या प्रवासात अस्पृश्य वर्गाची दुरवस्था पाहिल्यानंतर त्यांच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य खर्ची घालावे, अशी प्रेरणा शिंदे यांना झाली. त्यांच्या दृष्टीने हे धर्मकार्यच होते. १९०१ च्या खानेसुमारीचा आधार घेऊन, भारतातील विविध प्रांतांतील अस्पृश्यांची लोकसंख्या एकषष्ठांश असल्याचे लेखाच्या व व्याख्यानाच्या द्वारा मांडून ह्या अस्पृश्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी एक देशी मिशन स्थापन करण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली, व त्याप्रमाणे न्यायमूर्ती नारायण चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘ड्रिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेची स्थापना १६ ऑक्टोबर १९०६ मध्ये केली आणि स्वतः सेक्रेटरी राहून कामाला प्रारंभ केला. शतकानुशतके बहिष्कृत अवस्था लादून अस्पृश्य ठरविल्यामुळे ह्या वर्गाला प्राप्त झालेला निकृष्टपणा नाहीसा करून त्यांना स्वाभिमानी, सुशिक्षित आणि उद्योगी बनविणे, हा त्यांनी आपल्या कार्याचा एक भाग मानला; तर उच्चवर्णियांच्या मनातील अस्पृश्यताविषयक भ्रामक समजूत नष्ट करणे, हा त्या कार्याचा दुसरा भाग मानला. मिशनच्या स्थापनेनंतर लगेच मुंबईत परळ, देवनार, कामाठीपुरा अशांसारख्या भागांत त्यांच्यासाठी मराठी शाळा, उद्योगशाळा काढल्या. निराश्रित स्त्रियांची सेवा करण्यासाठी निराश्रित सेवासदन सुरू केले. शिंदे यांच्या भगिनी जनाबाई व वृद्ध आई-वडिल हे ह्या लोकांची सेवा करण्यासाठी त्यांच्या वस्तीत जाऊन राहिले.

मुंबईबाहेर पुणे, मनमाड, अकोला, अमरावती, नागपूर, महाबळेश्वर तसेच भावनगर, हुबळी, धारवाड, बंगलोर, चेन्नई इ. ठिकाणी मिशनच्या शाखा काढल्या. मिशनच्या स्थपनेनंतर सहा वर्षांतच एकंदर १४ ठिकाणी २३ शाळा, ५५ शिक्षक, १,१०० मुले, ५ वसतिगृहे, अन्य १२ संस्था व ७ आजीव प्रचारक एवढा मिशनच्या कामाचा व्याप शिंदे यांनी पश्चिम आणि दक्षिण भारतातील सात प्रांतांत वाढविला. १९१२ मध्ये त्यांनी मिशनचे कार्यालय मुंबईहून पुण्यास हलविले. महात्मा फुले यांनी भोकरवाडीत ज्या जागेत अस्पृश्यांसाठी शाळा उघडली होती, ती जागा नगरपालिकेकडून संपादित करून, श्रीमंत तुकोजीराव होळकरांच्या व मुंबई सरकारच्या आर्थिक साहाय्याने सव्वा लाख रुपये खर्च करून मिशनसाठी ‘अहल्याश्रम’ ही सोयीस्कर इमारत बांधली. अस्पृश्यता निवारणकार्याचे १९२० पर्यंतचे पहिले पर्व हे जागृतीचे म्हटले, तर विठठ्ल रामजी शिंदे हे ह्या पर्वाचे प्रवर्तक ठरतात. पुढचे पर्व संघर्षाचे व त्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत. १९२३ साली मिशन ही संस्था अस्पृश्यवर्गीय प्रतिनीधीच्या स्वाधीन करून शिंदे मिशनबाहेर पडले. त्यानंतरही पर्वती मंदिरप्रवेश सत्याग्रह, अस्पृश्यांची शेतकी परिषद, संयुक्त मतदारसंघाची योजना इ. बाबतींत ते अस्पृश्यवर्गाच्या हिताच्या दृष्टीने सक्रियपणे भाग घेत होते. अस्पृश्यता निवारणकार्याची तळमळ त्यांच्या ठिकाणी अखेरपर्यंत होती.

शिंदे यांनी महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक चळवळींत उच्चनैतिक भूमिकेवरून भाग घेतला. मुंबई कायदे-कौन्सिलच्या १९२० च्या निवडणुकीत पुण्यातून मराठयांसाठी राखीव असलेल्या जागेसाठी त्यांनी निवडणूक लढवावी ही चाहत्यांची विनंती त्यांनी अव्हेरली; कारण त्यांना जातीय तत्त्व मान्य नव्हते. उलट मागासलेला जो बहुजनसमाज, त्याचा कैवार घेणारा बहुजनपक्ष स्थापन करून त्याच्यावतीने शिंदे यांनी ही निवडणूक लढवली. या पक्षाने शेतकरी, शिपाई, शिक्षक, उदमी, दुकानदार, मजूर यांच्या जोडीनेच अस्पृश्य व स्त्रीवर्ग यांच्या हितसंबंधांसाठी झटण्याचा निर्धार प्रकट केला. या निवडणुकीत शिंदे यांना यश मिळाले नाही. महात्मा गांधी-प्रणीत १९३० च्या कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला. त्याबद्दल त्यांना सहा महिन्यांची शिक्षा झाली. देवाच्या नावावर मुलींना अनीतीच्या मार्गात लोटणारी मुरळीची चाल बंद व्हावी, अशा मुलींचे या दुष्ट चालीपासून संरक्षण करावे, या हेतूने मुंबई शहरातील प्रतिष्ठित मंडळींची एक संस्था १९०७ मध्ये स्थापन करण्यात आली. तिचे एक कार्यवाह म्हणून त्यांनी काम केले. १९११ साली मुंबईत एक ‘मुरळी प्रतिबंधक परिषद’ भरविली. १९१८ च्या सुमारास पुणे नगरपालिकेतर्फे मुलांप्रमाणे मुलींनाही प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे, यासाठी त्यांनी चळवळ केली. पुणे येथे १९२८ साली भरलेल्या ‘मुंबई इलाखा शेतकरी परिषदे’चे नेतृत्व शिंदे यांनी केले. अखेर सरकारला सारावाढ व तुकडेबंदी ही संकल्पित विधेयके मागे घ्यावी लागली. १९२६ ते १९३२ या काळात त्यांनी शेतकऱ्यांच्या परिषदांमध्ये त्यांच्या समस्यांचे विवरण करून शेतकऱ्यांनी आपापसांत एकी करावी, कामगारांसमवेत एकजूट करावी तसेच उत्पादनाच्या जोडीने अर्थकारणाकडेही लक्ष द्यावे, असे प्रतिपादन केले.

शिंदे यांना संशोधन-लेखनाची ओढ असल्यामुळे कामाच्या धावपळीतून वेळ काढून त्यांनी संशोधनपर, वैचारिक व ललित स्वरूपाचे महत्त्वपूर्ण लेखन केले. अस्पृश्यताविषयक संशोधन हा त्यांचा एक प्रमुख आस्थाविषय होता. अस्पृश्यवर्गाच्या एकंदर लोकसंख्येची निश्चिती करून त्यांच्या स्थितीसंबधी १९०५ मध्ये इंडियन सोशल रिफॉर्मर मध्ये त्यांनी इंग्रजीत लेख लिहिला. ‘बहिष्कृत भारत’ (१९०८), ‘अस्पृश्यता निवारणाचा आधुनिक इतिहास’ (१९२२), ‘ब्रह्मदेशातील बहिष्कृत वर्ग’ (१९२७) हे लेख व ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ (१९३३) हा समाजशास्त्रीय प्रबंध हे त्यांचे या विषयावरील प्रमुख लेखन होय. त्यांच्या या प्रबंधात अस्पृश्यतेच्या उगमापासूनचा इतिहास, बुद्धपूर्वकाळापासून वर्तमानकाळापर्यंत दिसणारी अस्पृश्यतेची विविध रूपे, त्यांचा इतिहास, धर्म, सामाजिक स्थिती, राजकारण इ. विषयांचे विवेचन केले असून अस्पृश्य मानले गेलेले लोक एकेकाळचे राज्यकर्ते होते व धर्माने ते बौद्ध होते; हे मत त्यांनी विविध प्रकारचे पुरावे व आधार देऊन मांडले आहे. कानडी आणि मराठी या भाषांमधील संबंधांचा सविस्तर ऊहापोह करून कानडीचा शब्दसंग्रह तसेच व्याकरण यांचा मराठीवर मोठा प्रभाव पडला आहे, हे त्यांनी दखविले आहे.

‘भागवत धर्माचा विकास’ ह्या लेखमालेमध्ये भक्ती या तत्त्वाचा विकास प्राचीन काळापासून वर्तमानकाळापर्यंत कसकसा होत गेला, याचे विवेचन केले आहे. विठ्ठल रामजी शिंदे यांचे लेख, व्याख्याने आणि उपदेश (१९१२) या पुस्तकात प्राधान्याने धर्मपर लेख, तर पुढील कार्यकाळातील अनेकविध सामाजिक, शैक्षणिक व संशोधनपर विषयांवर लिहिलेले लेख शिंदे लेखसंग्रह (१९६३) या पुस्तकात संग्रहीत करण्यात आले आहेत. त्यांचे धर्मविषयक तसेच प्रवासवर्णनपर, व्यक्तिविषयक व अन्य स्फुट स्वरूपाचे लेखन धर्म, जीवन व तत्त्वज्ञान (१९७९) ह्या ग्रंथात एकत्रित केलेले आहे. शिंदे यांनी फर्ग्युसन कॉलेजात (१८९८), इंग्लंडमध्ये (१९०१–०३) व येरवड्याच्या तुरुंगात (१९३०) असताना लिहीलेली रोजनिशी (प्रकाशन १७७९) व माझ्या आठवणी व अनुभव (प्रकाशन १९४३; १९५८) हे पुस्तक त्यांचे आत्मपर स्वरूपाचे लेखन आहे. या लेखनातून त्यांच्या मनाची आध्यात्मिक ठेवण, तरल संवेदनशीलता, सूक्ष्म सौंदर्यदृष्टी आणि प्रसन्न विनोदवृत्ती हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष प्रत्ययाला येतात.

अस्पृश्यता निवारणासाठी व या वर्गाच्या उन्नतीसाठी शिंदे यांनी त्यागवृत्तीने व समर्पणाच्या भावनेने आयुष्यभर जे कार्य केले, त्याबद्दल त्यांचा ‘कर्मवीर’ तसेच ‘महर्षी’ या उपाधींनी गौरवपूर्ण उल्लेख केला जातो. त्यांचे पुणे येथे निधन झाले.

 

संदर्भ : १. कदम, शंकरराव; मुलाटे, उषा; महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, औरंगाबाद, २०००.

२. चव्हाण, रा. ना. महर्षी शिंदे यांच्या आठवणी, वाई, १९७५.

३. दिघे, पी. डी. दोन कर्मवीर, कोल्हापूर, १९९२.

४. पवार, गो. मा. विठठ्ल रामजी शिंदे, नवी दिल्ली, १९९०,

५. बाबर, कृ. भा. कर्मवीर विद्यार्थी, भिलवडी १९३०.

लेखक - गो. मा. पवार

 

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate