অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शंकरराव भाऊराव चव्हाण

शंकरराव भाऊराव चव्हाण

शंकरराव भाऊराव चव्हाण : (१४ जुलै १९२० ते २६ फेब्रुवारी २००४)  महाराष्ट्र राज्याचे चौथे मुख्यमंत्री. शेतकरी कुटुंबात पैठण येथे जन्म. प्राथमिक शिक्षण पैठण येथे घेऊन पुढे उस्मानिया (हैदराबाद) विद्यापीठातून ते बी.ए., एल्‌एल्‌.बी. झाले. १९४५ मध्ये त्यांनी वकिलीची सनद मिळवली. पण रामानंदतीर्थ यांच्या सल्ल्याने ते हैदराबाद मुक्तिसंग्रामात सहभागी झाले. पुसद तालुक्यातील उमरखेड हे गाव त्यांच्या कार्याचे केंद्र होते. १३ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान भारतात सामील झाले आणि शंकररावांच्या कर्तृत्वाचे एक पर्व पूर्ण झाले. १९४८-४९ मध्ये नांदेड जिल्हा काँग्रेसचे ते सरचिटणीस झाले. १९५२ च्या निवडणुकीत पराभव होऊनही ते खचले नाहीत. त्यांनी नांदेड नगरपालिकेत, सहकारी क्षेत्रात व कामगारवर्गात कार्य केले. नांदेडचे नगराध्यक्ष (१९५६), नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष आणि हैदराबाद राज्य सहकारी बॅंकेचे संचालक इ. विविध पदे त्यांनी भूषविली. १९५६ मध्ये मराठवाडा महाराष्ट्रात समाविष्ट झाला, त्यावेळी शंकररावांना मंत्रिमंडळात उपमंत्रिपद मिळाले. पुढे १९६० मध्ये पाटबंधारे व वीज खात्याचे ते मंत्री झाले आणि नंतर १९७२ पासून फेब्रुवारी १९७५ पर्यंत ते कृषिमंत्री होते. २१ फेब्रुवारी १९७५ रोजी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

पाटबंधारे मंत्री म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली. कृष्णा-गोदावरी पाणी तंट्यात त्यांची भूमिका वाखाणण्यासारखी आहे. गोदावरी, पूर्णा आणि मांजरा या धरणांद्वारा त्यांनी मराठवाड्याचा विकास घडवून आणला. जायकवाडी प्रकल्प हा शंकररावजींच्याच प्रयत्नाचे मोठे फळ आहे. भ्रष्टाचाराचे निर्मूलन, अधिक कार्यक्षम प्रशासन, १० लाख टनांहून अधिक धान्य उत्पादन वगैरे त्यांची धोरणे आहेत.

कोणताही राजकीय प्रश्न ते समझोत्याने सोडवितात. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मे १९७५ मधील संप ज्या पद्धतीने त्यांनी हाताळला, त्यावरून हे सिद्ध होते. ते रामानंदतीर्थ व गोविंद श्रॉफ यांना राजकीय गुरू मानतात. मितभाषी व कर्तव्यदक्ष प्रशासक आणि अभ्यासू वृत्ती हे गुणविशेष त्यांच्यामध्ये प्रकर्षाने दिसतात. शंकररावांच्या सामाजिक सेवाव्रताशी समरस झालेल्या त्यांच्या पत्नी सौ. कुसुमताई घरगुती शेतीवाडीतही जातीने लक्ष घालतात.

 

लेखक - दिनकर साक्रीकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate