অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

‘वास्तुविशारद’ कल्पनाशक्तीला वाव देणारे करिअर

‘वास्तुविशारद’ कल्पनाशक्तीला वाव देणारे करिअर

स्थापत्यशास्त्राचे अजोड नमुने पहिले की आपण आश्चर्यचकित होतो आणि अबब ! असे शब्द तोंडातून आपोआप बाहेर पडतात. देशातील ताजमहाल, लाल किल्ला, महाराष्ट्रातील डोंगर कपारीतील भव्यदिव्य किल्ले, इजिप्त मधील पिरॅमिड, चायनाची भिंत, अमेरिकेतील ट्वीन टॉवर्स, सोळाव्या शतकातील गढी, मोठाली धरणे ही स्थापत्यशास्त्राची मानवाला लाभलेली देणगी आहे. कालानुरूप या अभ्यास शाखेत बदल होत गेले त्याला तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने या शाखेचा विकास झालेला पाहायला मिळतो. शहरातले मोठे स्कायवॉक, गगनाला भिडणाऱ्या इमारती त्यांच्या अद्भुत रचना, अत्याधुनिक बांधकामे, त्यात कलेचा खुबीने केलेला वापर यामुळे ही शाखा आणखीनच अद्भुत ठरली आहे. मानवाच्या प्रतिभा आणि श्रेष्ठत्वाची प्रचीती यामधून येते. मानवी विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या या शाखेतील करिअरच्या संधी कोणत्या आहेत ते आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत खास करिअरनामासाठी..

कामाचे स्वरूप

मुख्यत: आर्किटेक्टचे काम कोणत्याही इमारतीची रचना आणि डिझाईन तयार करणे हे असते. ग्राहकाच्या, कंपनीच्या गरजेनुसार तो नियोजन करून देत असतो. जागेचा आकार, वैशिष्टे पाहून त्यानुसार नियोजन केले जाते. अनकेदा जुन्या घरांची नव्याने पुनर्बांधणीही केली जाते . आजकाल कमीत कमी वेळात पर्यावरणपूरक रचनेस वाढती मागणी आहे.

शैक्षणिक पात्रता

आर्किटेक्ट म्हणून करिअर करताना गणित या विषयवार प्रभुत्व असणे गरेजेचे आहे. पदवी शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था देशात आहेत. या विषय शाखेत पदवीधर(बी.आर्च) होता येते. त्याचा कालावधी पाच वर्षाचा असतो. यासाठी उमेदवार भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित या विषयातून बारावी पास असावा. प्रवेशासाठी ‘द कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर’ या संस्थेकडून प्रवेश परीक्षा घेतली जाते. काही शिक्षणसंस्था स्वतः प्रवेश परीक्षा घेतात. पदव्युत्तर पदवीही संपादन करता येते. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आर्किटेक्चर फर्ममध्ये आंतरवासिता पूर्ण करून नोकरीसाठी सज्ज होता येते.

आवश्यक कौशल्य

ही विषयशाखा इतर शाखांपेक्षा वेगळी आहे. यासाठी ध्वनी संवाद कौशल्य आवश्यक आहे तसेच विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे कारण अनकेदा त्यांना प्रत्यक्ष प्रकल्पाच्या जागेवर जाऊन काम करावे लागते. लवचिकता, संयम, नेतृत्वगुण, जबाबदारी स्वीकारण्याची आणि पार पाडण्याची तयारी हवी. डिझाईन बनविण्याचे काम अधिक असल्याने सर्जनशील विचार(क्रीएटीव्ह) असणे आवश्यक असते. गणित आणि भौतिकशास्त्र या विषयवार पकड असणाऱ्यांना काम करणे सोप्पे जाते. चित्रकलेची आवड असल्यास त्याचा फायदाही होतो. तसेच अनेकदा कायदेशीर बाबींवर काम करावे लागत असल्याने त्यासंबंधी प्राथमिक ज्ञान ठेवावे लागते. उत्तम संवाद कौशल्य आणि साईटवर काम करण्याची मात्र तयारी हवी.

संधी

बांधकाम क्षेत्र विस्तारत असल्याने कुशल आर्किटेक्टना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. खाजगी क्षेत्राबरोबर सरकारी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत आहेत. शासनात पुरातन विभाग, संरक्षण मंत्रालय , रेल्वे, सार्वजनिक राष्ट्रीय इमारत संस्था, देशातील नियोजन संस्था, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ़ अर्बन अफेयर्स, नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कार्पोरेशन, सिटी डेवलपमेंट ऑथॅरीटी, स्टेट डिपार्टमेंट, हौसिंग बोर्ड आदी विभागात काम करता येते. तसेच काही वर्षाच्या अनुभवानंतर स्वत:ही व्यावसायीकरीत्या स्वतंत्र काम करता येते.

वेतन

आर्किटेक्ट म्हणून काम करताना सुरवातीस २० ते ३० हजार वेतन मिळते. पाच वर्षाचा अनुभवानंतर ५० ते ७० हजारापर्यंत वेतन मिळू शकते. सध्या पॅकेजनुसारही खाजगी कंपन्यांत वेतन ठरते. आजघडीला किमान दहा हजार कुशल आर्किटेक्टची गरज भासते आहे.

शिष्यवृत्ती

आगा खान फौंडेशनकडून काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. जून आणि जुलैच्या दरम्यान शिष्यवृत्ती प्रक्रिया राबविली जाते.

संस्था

• स्कूल ऑफ प्लानिंग अँड आर्किटेक्चर नवी दिल्ली.

• चंदिगढ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर पंजाब विद्यापीठ

• स्कूल ऑफ आर्किटेक्चर नवरंगपूरा अहमदाबाद

• गव्ह. कॉलेज ऑफ आर्किटेक्चर लखनौ

• कॉलेज ऑफ आर्किटेक्चर गोवा विद्यापीठ

• सर जे. जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मुंबई विद्यापीठ

• इंडियन एज्यू. सोसायटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मुंबई

• मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर पुणे

• स्कूल ऑफ प्लानिंग अँड आर्किटेक्चर जवाहरलाल नेहरू तंत्र. विद्यापीठ हैद्राबाद

• स्कूल ऑफ प्लानिंग अँड आर्किटेक्चर अण्णा विद्यापीठ चेन्नई

मित्रहो, वास्तुविशारद(आर्किटेक्चर) ही व्यवसायाभिमुख अभ्यास शाखा विद्यार्थ्याच्यात अनेक बदल घडविते. सामाजिक समस्यांचा अभ्यास, शिस्त, नवं काहीतरी करण्याची उर्मी असेल तर हे क्षेत्र समाधान आणि प्रतिष्ठा देणारे आहे. आजकाल नाविन्यपूर्ण गोष्टी राबविणाऱ्या प्रत्येकाला मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरही नामांकित कंपन्यात काम करण्याची संधी अनेक भारतीयांना लाभत आहे. स्वत:ची वेगळी ओळख करू पाहणाऱ्यांसाठी हे क्षेत्र महत्वाचे आणि कल्पनाशक्तीला पुरेपूर वाव देणारे आहे.

सचिन पाटील, संपर्क- ९५२७७७७७३२

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate