অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चित्रपट क्षेत्रातील करिअर

चित्रपट क्षेत्रातील करिअर

चित्रपट क्षेत्रातील करिअर - एक उत्तम संधी
मंदार करंजाळकर

गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशातील चित्रपट उद्योग आणि त्याच्याशी निगडित इतर माध्यमांची झपाटय़ाने वाढ होत आहे. भारत हा आजच्या घडीला जगात सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणारा देश आहे. त्यामुळे या क्षेत्रांशी निगडित अभिनय, दिग्दर्शन, पटकथा लेखन, सिनेमॅटोग्राफी, संकलन, ध्वनी, संगीत, नृत्य दिग्दर्शन, ग्राफिक्स इ. वेगवेगळ्या विभागांमध्ये करिअर करण्याच्या उत्तम संधी विद्यार्थ्यांना आज उपलब्ध होत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना या चित्रपट क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असते, परंतु योग्य वेळी योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे बहुतांश जण खूप धडपडत आपले मार्गक्रमण करत असतात. त्यामुळे सुरुवातीला या क्षेत्रात काम करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत गोष्टींची आपण माहिती करून घेऊ या.

स्वत:चा कल ओळखणे

या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपला स्वत:चा कल ओळखणे अतिशय गरजेचे आहे. आपल्याला या क्षेत्रात खरेच करिअर का करण्याची इच्छा आहे याचे थोडे आत्मपरीक्षण प्रत्येकाने करण्याची गरज आहे. नुसती आवड किंवा इच्छा असणे वेगळे आणि त्यासाठी मेहनत करण्याची तयारी असणे वेगळे. आपल्या क्षमता आणि बलस्थानांचा विचार करून मग निर्णय घेणे कधीही चांगले जसे की काही जणांनी शाळा-कॉलेज पातळीवर वेगवेगळ्या नाटय़ स्पर्धामध्ये भाग घेतलेला असतो आणि त्यांना आता या क्षेत्रात पूर्णवेळ अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून आपले नशीब अजमवायचे असते.

मेहनत आणि जिद्द

आजचे जग जागतिक स्पध्रेचे युग असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रातच गुणवत्तेला अतिशय महत्त्व आले आहे, म्हणूनच हे क्षेत्र खूप आव्हानात्मक आहे. भरपूर मेहनतीची तयारी असेल आणि जिद्द असेल तर या क्षेत्रात यश मिळवता येते.
- चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी प्रत्येकाला पॅशन (कामाचे वेड), पेशन्स(धीर) आणि पर्सविरन्स (चिकाटी) या ३ ढ ची खूपच गरज आहे, कारण कामाचे वेड असल्या शिवाय तुम्हाला या क्षेत्रात भरीव कामगिरी करणे अवघड आहे. शिवाय तीव्र स्पर्धा असलेल्या या क्षेत्रात खूप धीर ठेवण्याची गरज असते, अनेक गोष्टी घडून येण्यासाठी वाट पाहावी लागते आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची गरज असते. त्यामुळे तुमचा दृष्टिकोन सकारात्मक असावा लागतो.

गटामध्ये काम करण्याची आवड

चित्रपटसृष्टीमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने सुरुवातीला हे समजून घेणे गरजेचे आहे की चित्रपट निर्मिती ही नुसतीच कला नसून ती एक व्यावसायिक कला आहे. वेगवेगळी कौशल्य असणारे कलाकार आणि तंत्रज्ञ एकत्र काम करून चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेत आपले योगदान देत असतात. ज्यामध्ये अभिनय, दिग्दर्शन, पटकथा लेखन, सिनेमॅटोग्राफी, संकलन, ध्वनी, संगीत, नृत्य दिग्दर्शन, ग्राफिक्स इ. गोष्टींचा सहभाग असतो आणि त्यातून एक चित्रपट अंतिमत: पडद्यावर साकारला जातो. त्यामुळे इथे वेगवेगळ्या विभागातील कलाकार आणि तंत्रज्ञांसोबत मिळून मिसळून काम करणे हे अत्यावश्यक असते.

संवादकौशल्य

चित्रपट हे माध्यम नुसतेच करमणुकीचे माध्यम नाही तर ते प्रेक्षकांशी संवाद साधण्याचे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. चित्रपट दिग्दर्शक आपल्या कलाकृतीद्वारे लेखकाच्या कथेमध्ये त्याला जाणवलेला अनुभव प्रेक्षकांना देऊ पाहत असतो. असे संवाद साधण्याचे आणि एकत्रित परिणाम साधण्याचे कौशल्य ज्यांच्याकडे उत्तम असते त्यांच्यासाठी या माध्यमामध्ये खूप संधी आहेत.
चित्रपटकला ही जरी कला असली तरीही त्यात तांत्रिक गोष्टींचा समावेश असल्यामुळे प्रत्येकाने त्याचे योग्य पद्धतीने प्रोफेशनल प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. प्रशिक्षणानंतर मग आपल्या आवडत्या विभागामध्ये खालच्या स्तरापासून सुरुवात करून वरवर जात राहणे हीच इथे कामाची एक रूढ पद्धत आहे.
आता आपण चित्रपट क्षेत्रातील निगडित वेगवेगळे विभाग, कामाचे स्वरूप आणि उपलब्ध असणाऱ्या संधी याची आपण माहिती करून घेऊ या.

दिग्दर्शन

चित्रपटाचा दिग्दर्शक हा चित्रपटाचा सर्वेसर्वा असतो. त्याच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक विभागातील कलाकार आणि तंत्रज्ञ एकत्रपणे काम करतात. दिग्दर्शकावर कथासूत्र तयार करणे, पटकथा लेखकासोबत बसून पटकथा तयार करणे, सिनेमॅटोग्राफर, कलादिग्दर्शका सोबत चर्चा करून कथेचा दृश्य परिणाम साकारण्यासाठी योग्य ती तयारी करून मग त्यापद्धतीने चित्रीकरण पूर्ण करणे इ. कामाची जबाबदारी असते. दिग्दर्शकाला संगीत, नृत्य, ध्वनी, ग्राफिक्स आणि स्पेशल इफेक्ट्स इ. संबंधित कलाकार आणि तंत्रज्ञांशी चर्चा करून अंतिम निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे दिग्दर्शकाचे काम अतिशय आव्हानात्मक असते, त्याला सर्वच विभागांच्या कार्यप्रणालीची माहिती असणे गरजेचे असते.

पटकथा लेखन

चित्रपट लेखनाचे भारतामध्ये सर्वसाधारणपणे कथा, पटकथा आणि संवादलेखन असे तीन भाग पाडण्यात येतात. त्यातला पटकथा लेखन हा भाग अत्यंत महत्त्वाचा असतो. एकदा कथा लिहून पूर्ण झाल्यावर त्यातील वेगवेगळ्या दृश्यांची प्रसंगामध्ये विभागणी करून ते प्रसंग संवादासहित लिहावे लागतात. ही एक कला तर आहेच, पण त्यात एक तंत्रही आहे. भारतामध्ये लिखाणाला योग्य महत्त्व न दिल्या गेल्यामुळे म्हणावा तेवढा व्यावसायिकपणा त्यात आलेला नाही. पण आता चित्र बदलू लागले आहे आणि अनेकजण पूर्णवेळ पटकथा लेखक म्हणून उत्तम कामगिरी करत आहेत. यामध्ये आपले करिअर करण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांना लिखाणाची आवड तर पाहिजेच शिवाय जर चांगले प्रशिक्षण घेतले आणि भरपूर सराव केला तर यासारखा कलात्मक आनंद कुठलाही नाही.

अभिनय

चित्रपटामध्ये कथेच्या आणि भूमिकेच्या गरजेनुसार योग्य ते अभिनेते आणि अभिनेत्री यांची निवड केली जाते. याशिवाय अनेक छोटय़ा-मोठय़ा भूमिकांसाठी चांगल्या कलाकारांची गरज असते. त्यामुळे अभिनय ही जर तुमची आवड असेल तर त्याला आपल्या पूर्णवेळ व्यवसायामध्ये रूपांतर करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत करण्याची तयारी ठेवावी लागेल.

सिनेमॅटोग्राफी

: कथेच्या अनुषंगाने चित्रपटातील दृश्ये चित्रित करून दिग्दर्शकाला अभिप्रेत असणारा आवश्यक तो दृश्य परिणाम साध्य करण्याचे अतिशय महत्त्वाचे काम सिनेमॅटोग्राफर किंवा कॅमेरामन करत असतो. सिनेमॅटोग्राफर असण्यासाठी तुम्हाला व्हिजुअल आर्ट, रंगसंगती आणि प्रकाशाचे महत्त्व माहीत असण्याची गरज असते. स्वत: ची कलादृष्टी, चित्रपटातील कथेचा आवाका, काळ याचे भान तसेच उत्तम तांत्रिक जाण ही एका चांगल्या सिनेमॅटोग्राफरची लक्षणे आहेत. तसेच तुमचा स्थिर चित्रणाचा पूर्वानुभव इथे कामाला येऊ शकतो. आज चित्रपटाच्या तंत्रांमध्ये डिजिटल क्रांतीमुळे आमूलाग्र बदल घडताना दिसतो आहे. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण आता डिजिटल कॅमेऱ्याच्या साहाय्याने केले जात आहे. त्यामुळे डिजिटल तंत्र अवगत असणाऱ्या कॅमेरामनला आज उत्तम मागणी आहे. त्या संदर्भातील व्यावसायिक प्रशिक्षण घेतल्यास या विभागात अनेक चांगल्या संधी मिळू शकतात.

संकलन

चित्रपट चित्रित करून झाल्यावर त्यातील रीळमधील अनावश्यक भाग वेगळा केला जातो आणि मग वेगवेगळ्या शॉट्सचे तुकडे एकत्रित जोडून प्रसंग तयार करण्याचे काम संकलक करत असतो. असे अनेक प्रसंग जोडून त्यातून योग्य तो एकत्रित परिणाम साध्य करणे म्हणजे संकलन. सध्याच्या काळात सगळीकडे नॉन लिनीअर संकलन प्रणाली चा वापर केलाजातो, ज्यात मुख्यत: AVID आणि FINAL CUT PRO या सॉफ्टवेअरचा समावेश असतो. प्रशिक्षण आणि सरावाने संकलन या प्रकारामध्ये तुम्ही मास्टर होऊ शकता.

ध्वनी

चित्रपट निर्मिती प्रक्रियेमध्ये ध्वनी खूप महत्त्वाचा घटक आहे. ध्वनिमुद्रणचे मुख्यत: चार भाग असतात.
१. लोकेशन साउंड - ३५ मि.मि. कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण होणार असेल तर त्या त्या लोकेशनवर कलाकारांचे संवाद ध्वनिमुद्रित केले जातात. हे संवाद उत्तम निर्मिती प्रक्रियेमध्ये रेफरन्स म्हणून वापरले जातात. यासाठी सर्वसाधारणपणे NAGRA या उपकरणाचा उपयोग केला जातो.
२. पुनध्र्वनिमुद्रण (रि-रेकॉìडग) - लोकेशनवर ध्वनिमुद्रित केलेल्या संवादाची तांत्रिक गुणवत्ता चांगली नसल्यामुळे चित्रपटातील सर्व कलाकारांचे संवाद स्टुडिओमध्ये पुन्हा रेकॉर्ड केले जातात. या प्रक्रियेला डिबग असे म्हणतात. साऊंड इफेक्ट्स आणि इतर आवाजांचेही वेगळे रेकॉìडग करून त्याचे वेगवेगळे ट्रॅक्स बनवले जातात. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आता सिंक साउंड या अद्ययावत पद्धतीने लोकेशनवरच रेकॉर्ड केलेले संवाद अंतिमत: वापरता येणे शक्य झाले आहे. त्यामुळे चित्रपटाचा वास्तववादी परिणाम साधण्यात मदत झाली आहे.
३. संगीत आणि पाश्र्वसंगीत : संगीतकाराच्या मार्गदर्शनाखाली त्याने बनवलेल्या चालीनुसार चित्रपटातील गाण्याचे रेकॉìडग केले जाते. तसेच प्रसंगांच्या मूडनुसार पूर्ण चित्रपटाचे पाश्र्वसंगीत बनवले जाते आणि त्याचे रेकॉìडग करून त्याचा एक वेगळा ट्रॅक बनवला जातो.
४. मििक्सग: रेकॉर्ड केलेले वेगवेगळे ट्रॅक्स मग साउंड स्टुडिओमध्ये योग्य पद्धतीने एकत्र केले जातात, या प्रक्रियेला साउंड मििक्सग असे म्हणतात.
याशिवाय चित्रपटाच्या साउंडचा एकसंध परिणाम साध्य करण्यासाठी संपूर्ण साउंडची संकल्पना जो तयार करतो त्याला साउंड डिझायनर म्हणतात. रसूल पुकुटी यांना ‘स्लॅमडॉग मिलेनियर’ सिनेमासाठी ऑस्कर पारितोषिक मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने भारतामध्ये साउंडचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. याशिवाय या विभागासाठी रेकॉìडग/ मििक्सग इंजिनीयर, फोली आर्टस्ट्सि, वादक तसेच इतर तंत्रज्ञांची गरज असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना इथेही भरपूर संधी मिळू शकतात.

स्पेशल इफेक्ट्स, ग्राफिक्स आणि अ‍ॅनिमेशन

मारधाडीचे वेगवेगळे प्रसंग असो की इतर अनेक विनोदी प्रसंग असोत, व्हिजुअल स्पेशल इफेक्ट्स आणि ग्राफिक्सच्या साहाय्याने चित्रपटामध्ये दृश्यांची परिणामकारकता वाढवता येते. यासाठी अद्ययावत तंत्रज्ञाच्या साहाय्याने दृश्यांवर प्रक्रिया केली जाते. तर 2D आणि 3D चित्रपटांची संख्या आता वाढत असल्यामुळे अ‍ॅनिमेशन तयार करणाऱ्या कलाकार आणि तंत्रज्ञांना ही मोठी संधी निर्माण होत आहे.

प्रॉडक्शन डिझाइन (कला)

चित्रपटाच्या कथेनुसार लोकेशन्स निवडणे, वेगवेगळे सेट्स बनवणे तसेच प्रसंगांच्या गरजेनुसार लागणाऱ्या वस्तू, सामग्री आणि इतर गोष्टींची मांडणी करणे हे काम प्रॉडक्शन डिझायनर / कला दिग्दर्शकाचे असते. त्यामुळे प्रेक्षकांना कथेतील काळ आणि पात्राविषयी माहिती समजण्यास मदत होते. यासाठी आवश्यक असणाऱ्या चित्रकला, स्ट्रक्चरल डिझाइन, आíकटेक्चर, इ. कलेचे शिक्षण किंवा इतर काही वेगळ्या स्किल्स आपल्याकडे असतील तर आपण या विभागामध्ये मोठी झेप घेऊ शकता.

मेकअप आणि कॉश्च्युम्स (ड्रेसेस)

चित्रपट निर्मितीमध्ये मेकअप आणि कॉश्च्युम्स (ड्रेसेस) यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कथेतील पात्राप्रमाणे अभिनेत्याचा लुक ठरवला जातो आणि त्याप्रमाणे ते पात्र प्रेक्षकांसमोर सादर केले जाते. विक्रम गायकवाडसारख्या मेकअप दिग्दर्शकाने ‘सरदार’, ‘हे राम’, ‘ओंकारा’, ‘चाची 420’ ‘3 इडियट्स’, ‘तुकाराम’ अशा चित्रपटांद्वारे मेकअप या कलेला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवलंय. तर कॉश्च्युम्स डिझाइन या क्षेत्रात भानू अथय्या ते नीता लुल्ला यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला एक दर्जा प्राप्त करून दिला आहे.

निर्मिती

चित्रपट निर्मितीसाठी निर्मात्यासोबत एका अनुभवी टीमची गरज असते. त्यामुळे कार्यकारी निर्माता, निर्मिती प्रबंधक, फायनान्स मॅनेजर, अकाउंटंट्स तसेच इतर सपोìटग स्टाफ हा रात्रंदिवस मेहनत करून दिग्दर्शकाला चित्रपट निर्मितीमध्ये मदत करत असतो.
या क्षेत्रामध्ये असलेल्या ग्लॅमरचे अनेक जणांना आकर्षण असते, परंतु त्यामुळे हुरळून न जाता आपल्याला आवडणाऱ्या विभागात काम सुरू करून पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करत राहावा. वर उल्लेख केलेल्या विभागांव्यतिरिक्तही इतर अनेक पद्धतीनी तुम्हाला चित्रपट क्षेत्राशी निगडित काम करता येऊ शकते. जसे की मार्केटिंग, वितरण, प्रसिद्धी, जनसंपर्क इ. आज टेलिव्हिजनमुळेही अनेक कलाकार आणि तंत्रज्ञांना चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत. शिवाय अ‍ॅडव्हर्टायिझग आणि डिजिटल/ इंटरनेट या क्षेत्रांतही अनेक संधी उपलब्ध होत आहेत. त्याचा योग्य पद्धतीने फायदा करून घेतल्यास यश निश्चित आहे.

 

चित्रपट आणि माध्यमविषयक प्रशिक्षण देणाऱ्या काही संस्था


१. भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन संस्था, पुणे : या संस्थेमध्ये दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी, संकलन आणि ध्वनी या अंगांचे प्रशिक्षण देणारा ३ वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम उपलब्ध आहे. तसेच पटकथा लेखन (१ वर्ष), अभिनय (२ वष्रे) आणि प्रॉडक्शन डिझाइन असे अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत.
अधिक माहिती : http://www.ftiindia.com/
२. व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल, मुंबई.
- दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी, संकलन, ध्वनी, स्पेशल इफेक्ट्स तसेच अभिनय आणि इतर अंगांचे पूर्णवेळ प्रशिक्षण देणारे पूर्णवेळ अभ्यासक्रम उपलब्ध.
अधिक माहिती : www.whistlingwoods.net
३. सत्यजित रे फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट संस्था, कोलकाता.
- दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी, संकलन आणि ध्वनी या अंगांचे प्रशिक्षण देणारे पूर्णवेळ अभ्यासक्रम उपलब्ध. अधिक माहिती : http://www.srfti.gov.in/
४. एम. जी. आर. गव्हर्नमेंट फिल्म आणि टी. व्ही. इन्स्टिटय़ूट ऑफ तमिळनाडू, चेन्नई.
- दिग्दर्शन, पटकथा लेखन आणि टी.व्ही. प्रॉडक्शन संदर्भातील अभ्यासक्रम.
अधिक माहिती : http://www.collegesintamilnadu.com
५. एसआरएम शिवाजी गणेशन फिल्म इन्स्टिटय़ूट, चेन्नई.
- बॅचलर ऑफ फिल्म टेक्नोलॉजी
अधिक माहिती : http://www.srmuniv.ac.in
६. एशियन अ‍ॅकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन, नोइडा, उत्तर प्रदेश.
अधिक माहिती : http://www.aaft.com
response.lokprabha@expressindia.काम

 

 

स्त्रोत : lokprabha

अंतिम सुधारित : 7/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate