অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जगातील सर्वात मोठ्या संवाद यंत्रणेचा भाग होण्याची संधी…

जगातील सर्वात मोठ्या संवाद यंत्रणेचा भाग होण्याची संधी…

नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टपाल दिनानिमित्त...

पूर्वी पारंपरिक पद्धतीने संदेश पाठविले जात असत. यामध्ये महत्वेकरून राजे–महाराजे मनुष्याच्या सहाय्याने संदेश वहन करीत असत. यासाठी बराच कालावधी जात असे. पत्राद्वारे संदेश वहन हे संवाद माध्यमातील क्रांतीकारी पाऊल होते. यानंतर संवाद माध्यमात जागतिक स्तरावर अनेक बदल आणि प्रगती होत गेली. जगातील पहिली टपाल सेवा २६ जुलै १७७५ मध्ये संयुक्त राष्ट् येथे सुरू झाली.

टपाल सेवेच्या माध्यमातून दूरवर संवाद साधणे आणि महत्वपूर्ण माहिती कमी वेळात पोहोचविणे सोपे होऊ लागले. ‘डाक सेवा हीच जन सेवा’ या बोधवाक्यासह भारतात १ एप्रिल १८५४ साली टपाल कार्यालयाची स्थापना झाली.

१५० वर्षाहून अधिक काळ जगातील सर्वात मोठे टपाल सेवेचे नेटवर्क म्हणून भारतीय टपाल कार्यालयाची ओळख आहे. भारतात एकूण टपाल कार्यालये १,५४,९१० यापैकी शहरी १५,९५५ तर ग्रामीण १,३८,९५५ कार्यालये आहेत. यापैकी विभागीय टपाल कार्यालये २५,५६४ तर ग्रामीण डाक सेवक टपाल कार्यालये १,२९,३४६ , ग्रामीण डाक सेवक २,५५,०२९ आणि टपाल अधिकारी कर्मचारी १,९३,८११ इतके कार्यरत आहेत. मोठ‌्या प्रमाणात असलेल्या कर्मचाऱ्यांसमवेत टपाल सेवा देशाच्या संपर्काचा आधार आहे आणि देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासातील महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

मुंबईतील टपाल कार्यालय हे देशातील सर्वात मोठे कार्यालय असून १७९४ मध्ये कार्यालयाची स्थापना झाली. पोस्टाच्या सेवेबाबत जनजागृती व्हावी म्हणून ९ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय टपाल दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. बदलत्या काळानुसार स्पीड पोस्ट, बिझनेस पार्सल, बिझनेस पोस्ट, ई-पोस्ट, मनी ट्रान्सफर या नाविन्यपूर्ण सुविधा अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबत भारतीय टपाल कार्यालयाने सुरू केल्या आहेत.

याचबरोबर लघु बचत योजनांच्या अंतर्गत ठेवी स्वीकारणे, पोस्टल लाइफ इन्शुरन्स (पीएलआय) आणि ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स (आरपीएलआय) अंतर्गत जीवन विम्याचे संरक्षण देणे आणि बिल संग्रह जसे किरकोळ सेवा प्रदान करणे, मेल वितरीत करणे. फॉर्म्स इ., महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (एमजीएनआरईजीएस) वेतन वितरण आणि वृद्ध पेन्शनचे वाटप यांसारख्या सेवांचा लाभ नागरिकांना दिला जातो.

टपाल कार्यालयाच्या बचत योजनेमध्ये बचत खाते, रिकरींग बोर्ड, मुदत ठेव, मासिक गुंतवणूक बचत, पीएफ, नॅशनल सेव्हींग स्कीम, सुकन्या समृद्धी खाते, किसान विकास पत्र या योजना नागरिकांसाठी उपलब्ध आहेत.

या विभागात अधिकारी पदापासून ते वाहन चालक पदांपर्यंत तुम्ही शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करू शकता. पोस्टल सहायक आणि वर्गीकरण सहायक या पदासाठी १० + २ उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. स्टेनोग्राफर या पदासाठी १२ वी आणि टंकलेखनाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. पोस्टमन आणि मेलगार्ड या पदासाठी दहावी किंवा समतूल्य शिक्षणक्रम असणे आवश्यक असून १८ ते २७ वयोमर्यादा आहे. मल्टी टास्कींग स्टाफसाठी दहावी किंवा आयआयटी शिक्षणक्रम पूर्ण असणे आवश्यक आहे. मोटर वाहक यांत्रीक, मोटर वाहन इलेक्ट्रीशियन, वेंडर, पेंटर यासाठी ७ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. टपाल क्षेत्रात आपले करियर करू इच्छिणारे भविष्यात जगातील सर्वात मोठ्या टपाल व्यवस्थेचा भाग होऊ शकतात.

अधिक माहितीसाठी https://www.indiapost.gov.in या संकेतस्थळास भेट द्या.

लेखिका - श्रद्धा मेश्राम-नलावडे

meshram.shraddha@gmail.com

माहिती स्रोत : 'महान्यूज'

अंतिम सुधारित : 7/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate