অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नॅनो तंत्रज्ञानातील करिअर

नॅनो तंत्रज्ञानातील करिअर

तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मानवी जीवन सुसह्य झाले आहे. मानवाच्या गरजानुसार अनेक शोध लागत गेले. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इलेक्ट्रोनिक, संगणक, गणित विज्ञान प्रगत होत असताना नॅनो तंत्रज्ञानही विकसित होते आहे. अलीकडे आपण नॅनो कारचे नाव ऐकले असेल या कारने ‘नॅनो’ या नावाला जनमानसापर्यंत पोहचविले. या तंत्रज्ञानाचा मात्र मानवाला विशेष फायदा होतो आहे. २१ व्या शतकातील हा महत्वाचा घटक असून, हे शतक नॅनो शतक म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पूर्वी अजस्त्र वाटणाऱ्या अनेक गोष्टी आता तळहातावर सामावल्या आहेत. सुरुवातीचा मोठा संगणक आणि आताचा लॅपटॉप किंवा छोटेसे मेमरी कार्ड हा या संकल्पनेचा एक भाग आहे. या अतिसूक्ष्म कणांपासून अनेक गोष्टींची निर्मिती होत असल्याने मानवाचे सर्व जीवन व्यापून टाकले आहे. अगदी औषध निर्मिती ते मोठाले उद्योग सगळ्याच बाबीत या तंत्राला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. नॅनो टेक्नोलॉजी इंडस्ट्री विस्तारत असून यात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. जगभरात या तंत्रावर मोठे संशोधन चालले असून संशोधक म्हणूनही आपणही यात महत्वाची भूमिका बजावू शकता. चला तर मग या क्षेत्राची करिअरच्या दृष्टीने माहिती घेवूया खास करिअरनामा या लोकप्रिय सदरासाठी.

पात्रता

नॅनो तंत्रज्ञान या विषयात पदव्युत्तर पदवी घेता येते. यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित या विषयात ५० टक्के गुणासहित पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच एम.टेक करण्यासाठी मटेरीयल सायन्स, मेकॅनिकल, बायोमेडिकल, केमिकल, बायोटेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक आणि कॉंम्प्युटर सायन्स या विषयातून बीटेक पदवी मिळविणे गरजेचे आहे.

कामाचे स्वरूप

हे क्षेत्र अत्यंत व्यापक आणि विस्तृत आहे. सद्यस्थितीत प्रत्येक क्षेत्रात याचा वापर आणि संशोधन होत असून जीवशास्त्र, जैविकशास्त्र, पर्यावरणशास्त्र, मुक्त ऋण विद्युत कणांचे शास्त्र (इलेक्ट्रॉनिक्स) सौंदर्य प्रसाधने, वैद्यकशास्त्र आणि काही इतर क्षेत्रांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आहे. या सर्व क्षेत्रात नवीन संशोधन करून आधुनिकता आणण्यावर भर दिला जातो.

आवश्यक गुण

हे संशोधनात्मक काम असून या क्षेत्रात येऊ इच्छीत असणारा व्यक्ती हा धैर्यशील असणे आवश्यक आहे. सतत अद्यवत राहण्याची तयारी, संशोधक वृत्ती, दूरदृष्टी, परिश्रमपूर्वक काम करण्याची मनाची तयारी हवी. तसेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र या विषयावर प्रभुत्व असेल तर त्याचा लाभ निश्चितच होतो.

संधी

या क्षेत्रातील आव्हानांचा विचार करता यात संशोधनास विशेष महत्व प्राप्त झाले आहे. यात करिअरच्या अपार संधी उपलब्ध आहेत. नॅनो मेडिसीन, बायोइन्फोर्मेटीक्स, स्टेम सेल डेवलपमेंट, नॅनो टॉक्सिकॉलॉजी, नॅनो पावर जनरेक्टींग सेक्टर, इलेक्ट्रोनिक/ सेमी कंडक्टर इंडस्ट्री, मटेरियल्स सायन्स(टेक्स्टाईल, पॉलीमर्स. पॅकेजिंग), ऑटो अँड एरोस्पेस इंडस्ट्रीज, स्पोर्टस एक़्विपमेंट, हेल्थ इंडस्ट्री, अॅग्रीकल्चर, एनवायरमेंट इंडस्ट्री, स्पेस रिसर्च, प्रॉडक्ट डेवलपमेंट, जेनेटिक्स, बायोटेक्नॉलॉजी, फोरेन्सिक सायन्स, टेक्सटाईल इंडस्ट्री, औषध कंपन्या, खाजगी संशोधन संस्था आदी ठिकाणी नोकरीच्या संधी हमखास मिळतील.

वेतन

तसे पहिले तर या क्षेत्रात वेतनाचा असा ठरलेला आकडा नसतो पण २५ ते ३० हजारापासून सुरुवात होते. ठराविक अनुभवानंतर मात्र चांगले पॅकेज मिळू शकते. काही खाजगी कंपन्यात अगदी लाखापर्यंत देखील वेतन मिळू शकते.

प्रशिक्षण संस्था

• इंडियन इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई

• मुंबई विद्यापीठ, मुंबई

• आयआयटी, मुंबई, भोपाल

• शिवाजी विद्यापीठ विद्यानगर, कोल्हापूर

• अमीटी विद्यापीठ पनवेल, मुंबई

• नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे

लेखक: सचिन के. पाटील

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 7/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate