অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नोकरी, व्यवसाय, छंद जोपासूनही सेना दलात अधिकारी होण्याची संधी

नोकरी, व्यवसाय, छंद जोपासूनही सेना दलात अधिकारी होण्याची संधी

9 ऑक्टोबर प्रादेशिक सेना स्थापना दिवस..त्यानिमित्त..

टेरिटोरियल आर्मी म्हणजेच प्रादेशिक सेनेची स्थापना सप्टेंबर 1948 मध्ये पारित झालेल्या प्रादेशिक सेना अधिनियम 1948 नुसार 9 ऑक्टोबर 1949 मध्ये करण्यात आली. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी यांनी संकटकाळात देशाच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी पेलणे, आवश्यकता निर्माण झाल्यास नियमित सेनेला मदत करणे, देशातील तरुणांना नागरी जीवनाबरोबरच सैन्यदलात सेवा करुन देशसेवेची संधी देणे या उद्देशाने प्रादेशिक सेनेची स्थापना केली. तेव्हापासून 9 ऑक्टोबर हा दिवस प्रादेशिक सेनेचा स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तर जाणून घेऊया काय आहे टेरिटोरियल आर्मी अर्थात प्रादेशिक सेना….

टेरिटोरियल आर्मी म्हणजेच प्रादेशिक सेना :-

Territorial Army म्हणजेच प्रादेशिक सेना होय, अशी सेना जी नियमित सैन्यदलाला आवश्यकता असेल तेव्हा Second line defence म्हणून मदत करते.

यामध्ये काही महिन्यांचे प्रशिक्षण देऊन सैनिक तसेच अधिकारी घडविले जातात. या सेनेचे ब्रीदवाक्य आहे “सावधानी व शूरता” “Vigilant & Valour” यात काम करणाऱ्या जवान/ अधिकाऱ्यांना अभिमानाने Terriers म्हटले जाते.

आत्तापर्यंत प्रादेशिक सेनेने नियमित सैन्यदलाला भारत-चीन 1962, भारत-पाकिस्तान 1965, भारत-पाकिस्तान 1971, ऑपरेशन पवन (श्रीलंका), ऑपरेशन रक्षक (पंजाब), ऑपरेशन ऱ्हिनो (जम्मू काश्मीर), ऑपरेशन बजरंग (उत्तर पूर्व भागातील) अशा युद्ध वा लष्करी कारवायांच्या वेळी मदत करुन महत्वाची भूमिका निभावली आहे.

कोणाला भरती होता येते ?

भारतीय नागरिकत्व असलेल्या, 18 ते 42 वर्षे वय असलेल्या, मान्यताप्राप्त पदवीधारक, शारिरीक व मानसिक सक्षम असलेल्या आणि साधारणत: ज्यांचे मासिक उत्पन्न व्यवस्थित आहे अशा पुरुष उमेदवारांना प्रादेशिक सेनेमध्ये अधिकारी पदासाठी तसेच सर्वसाधारण सैनिक जवान म्हणूनही भरती होता येते.

याचप्रमाणे केंद्र शासन/ राज्य शासन/ केंद्रशासित प्रदेश/ खाजगी क्षेत्र/ स्वत:चा व्यवसाय असणाऱ्या पुरुष उमेदवारांनाही Territorial Army मध्ये भरती होता येते. मात्र नियमित भूसेना/ नौसेना/ वायुसेना/ पोलीस/ निमलष्करी दल यातील सदस्यांना Territorial Army मध्ये भरती होता येत नाही. भविष्यात नियमित सैन्यदलाच्या सेवेतून निवृत्त झाल्यावर आणि शारिरीक, मानसिक सक्षम असल्यास अशा सदस्यांकरिता विशेष भरती असते त्यावेळी ते त्या भरतीकरिता अर्ज करणे वा तत्सम भरती प्रक्रियेत उमेदवार म्हणून सहभागी होऊ शकतात. त्यांची निवड प्रक्रिया वेगळ्या पद्धतीने होते.

Territorial Army त अधिकारी कसे होता येते :-

मुख्यत: अधिकारी पदाकरिता Departmental म्हणजे खातेनिहाय व Non-departmental म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना या भरती प्रक्रियेत सहभागी होता येते.

अधिकारी :- For Civilians.

ही जाहिरात साधारणत: “मे” महिन्यात येते. जून महिन्यात ऑनलाईन अर्ज भरण्यात येतो, जुलै महिन्यात परिक्षा घेतली जाते.

यासाठी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक असते. परिक्षा शुल्क रु. 200/- असते. लेखी परिक्षा (Objective Type) एकूण 200 गुणांची असते. यासाठी प्रत्येक पेपरसाठी 2 तासांचा वेळ दिला जातो. चुकीच्या उत्तराला Negative Marking System असते.

पेपर- 1

अ) तार्किक योग्यता (Reasoning) – 50 गुण - 50 प्रश्न.

ब) गणित (Maths) – 50 गुण - 50 प्रश्न.

पेपर-2

अ) सामान्य ज्ञान (General Knowledge) – 50 गुण – 50 प्रश्न.

ब) इंग्रजी (English) - 50 गुण – 50 प्रश्न.

या लेखी परिक्षेत प्रत्येक भागात 40 टक्के स्वतंत्र तर सर्व भाग मिळून सरासरी 50 टक्के इतके गुण मिळविणे अनिवार्य असते, असे गुण मिळाले तरच त्या उमेदवाराला लेखी परिक्षेत उत्तीर्ण केले जाते. त्यानंतर विविध ठिकाणी असलेल्या केंद्रांवरच मुलाखत घेतली जाते.

ही मुलाखत “Preliminary Interview Board” यांच्यामार्फत घेतली जाते. यात उत्तीर्ण झाल्यास SSB Interview करिता उमेदवारास पाठविले जाते. पुढे SSB मध्ये उत्तीर्ण झाल्यास वैद्यकीय चाचणी घेण्यात येते.

त्यानंतर संबंधित उमेदवाराचे चारित्र्य पडताळणी व इतर कायदेशीर बाबींची पूर्तता करुन त्या उमेदवारास Commissioned Officer चा दर्जा प्रदान करण्यात येऊन त्यास लेफ्टनंट ही रँक सन्मानपूर्वक देण्यात येते. त्यानंतर त्यांना विविध प्रकारचे आवश्यक ते लष्करी प्रशिक्षण देण्यात येते. ही झाली अधिकारी पदासाठीची भरती प्रक्रिया.

सैनिक जवान भरती :-

प्रादेशिक सेनेत जवानांच्या भरतीसाठी संपूर्ण भारतात 1) पश्चिम हिमालयीन विभाग, 2) पूर्व हिमालयीन विभाग, 3) पश्चिम विभाग, 4) पूर्व विभाग, 5) मध्य विभाग- मध्यप्रदेश/गुजरात/महाराष्ट्र/दादरा-नगर हवेली/दीव-दमन/गोवा, 6) दक्षिण विभाग असे विभाग कार्यरत आहेत.

संपूर्ण भारतात अंबाला/ बंगलूर/ चैन्नई/ दानपूर/ जबलपूर/ जालंधर/ कोलकाता/ लखनौ/ पुणे/ शिलाँग/ जयपूर या केंद्रांवर प्रादेशिक सेनेसाठी जवानांची भरती होते. यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील युवकांसाठी मध्य विभाग, पुणे येथे कार्यरत आहे.

जवानांसाठी विविध प्रकारची शारिरीक क्षमता, शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे आहे :-

अ) जवान (सर्वसाधारण व ट्रेडसमन ) करिता उंची 168 सें.मी., छाती 77 सें.मी. वजन 50 कि.ग्रॅ. शिक्षण – 10 वी.

ब) जवान (तांत्रिक व नर्सिंग असिस्टंट) करिता उंची 167 सें.मी., छाती 77 सें.मी., वजन 50 कि.ग्रँ. शिक्षण- पदाच्या आवश्यकतेनुसार आवश्यक त्या ट्रेडनुसार.

क) जवान (लिपिक व भांडारपाल) करिता उंची 162 से.मी., छाती 77 से.मी., वजन 50 कि.ग्रँ. शिक्षण- मान्यताप्राप्त कोणत्याही शाखेचा पदवीधर.

याशिवाय जवानांच्या भरतीसाठी त्यांना काही शारिरीक क्षमतेच्या चाचण्यांनाही सामोरे जावे लागते. जसे 1.6 कि.मी. अंतर कमीत-कमी 5 मि. 40 सेकंदात तर जास्तीत-जास्त 6 मि. 20 सेकंदात धावणे, 10 पुल अप्स काढणे, झिगझॅक वर संतुलन राखून चालणे, 9 फूट उडी मारणे.

प्रादेशिक सेनेतील अधिकारी व जवानांसाठीचे प्रशिक्षण :-

प्रादेशिक सेनेत अधिकारी म्हणून निवड झालेल्या अधिकाऱ्यांना 1 महिना संबंधित युनिटमध्ये, 1 महिना प्रादेशिक सेना प्रशिक्षण शाळा, देवळाली(नाशिक)येथे आणि 3 महिने इंडियन मिलिटरी ॲकॅडमी, डेहरादून येथे प्रशिक्षण देण्यात येते.

प्रादेशिक सेनेत जवान म्हणून निवड झालेल्या जवानांना 1 महिना संबंधित युनिटमध्ये आणि 9 महिने संबंधित रेजिमेंटच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण देण्यात येते.

भरती झालेल्या अधिकाऱ्यांचे वेतन, त्यांची पदे/ प्रमोशन :-

प्रादेशिक सेनेत भरती झालेल्या जवान वा अधिकाऱ्यांना नियमित सैन्यदलाप्रमाणेच वेतन व भत्ते तसेच इतर सर्व प्रकारच्या सोयीसवलती देण्यात येतात.

प्रादेशिक सेनेत अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर सर्वात पहिली पोस्टींग लेफ्टनंट म्हणून देण्यात येते, तर त्यानंतर पदोन्नतीने कॅप्टन, मेजर, लेफ्टनंट कर्नल, कर्नल आणि ब्रिगेडिअर या पदापर्यंत पोहोचता येते. प्रादेशिक सेनेचे वैशिष्ट्य म्हणजे आपणास वर्षातून दोन महिने सैन्यात तर उर्वरीत 10 महिने आपली मूळ नोकरी, व्यवसाय करता येतो. प्रादेशिक सेनेत आवश्यकतेनुसार आपली सेवा घेण्यासाठी सैन्याकडून आदेश काढले जातात.

प्रादेशिक सेनेची रचना व विभाग :-

सेनादलाचे प्रमुख हेच प्रादेशिक सेनेचेही सर्वोच्च प्रमुख असतात. सध्या जनरल बिपीन रावत हे प्रादेशिक सेनेचे सर्वोच्च प्रमुख आहेत तर प्रमुख म्हणून अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल चतुर्वेदी हे आहेत. यांचे कार्यालय दिल्ली येथे आहे.

प्रादेशिक सेनेचे एकूण 5 विभाग आहेत, ज्याला ग्रुप हेडक्वार्टर्स (Group Headquarters) म्हणतात. ते पुढीलप्रमाणे आहेत.

दक्षिण कमांड (Southern Command) :- पुणे (महाराष्ट्र)

पूर्व कमांड (Eastern Command) :- कोलकाता (प.बंगाल)

पश्चिम कमांड (Western Command) :- चंदीगढ (चंदीगढ)

मध्य कमांड (Central Command) :- लखनौ (उत्तरप्रदेश)

उत्तर कमांड (Northern Command) :- उधमपूर (जम्मू-काश्मिर)

नैऋत्य कमांड (South Western Command) :- जयपूर (राजस्थान)

प्रादेशिक सेनेची संख्या आज जवळपास पहिल्या फळीतील 40 हजार तर दुसऱ्या फळीत 1 लाख 60 हजार इतकी आहे.

यामध्ये Departmental Units, Non-departmental Units, Infantry Unit तसेच Ecological (पर्यावरण) बटालियन अशी रचना आहे. Departmental Units (खातेनिहाय युनिट) मध्ये रेल्वे (Railway), इंडियन ऑईल कार्पोरेशन (IOC), ओ.एन.जी.सी. (O.N.G.C.), दूरसंचार (Telecommunication) आणि सामान्य रुग्णालय (General Hospital) या क्षेत्रातील अधिकारी/ कर्मचाऱ्यांचा समावेश होतो. तर Non Departmental Units व Ecological (पर्यावरण) बटालियनमध्ये निवड झालेल्या नागरिकांची अधिकारी/ जवान म्हणून सेवा घेण्यात येते.

या संपूर्ण प्रादेशिक सेनेत रेल्वे (Railways) 13 युनिट., सामान्य रुग्णालय (General Hospitals) 7 युनिट, मार्केर्टिंग (Marketing) 1 युनिट, दूरसंचार (Telecommunication) 1 युनिट, इंजिनिअर (Engineer) 1 युनिट, रिफायनरीज आणि पाईप्स (Refineries & Pipelines) 1 युनिट, इंजिनिअर ओ.एन.जी.सी. (Engineer ONGC) 1 युनिट, इंन्फंट्री (Infanrty) जवळपास 42 युनिट, पर्यावरण (Ecological) बटालियन जवळपास 10 युनिट अशाप्रकारे जवळपास 77 विविध युनिटस् कार्यरत आहेत.

आत्तापर्यंत Departmental TA Units ने लातूर येथील भूकंप, गढवाल हिमालय मधील उत्तरकाशी येथील जलप्रलय, ओडिसा येथील वादळ अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी अत्यंत उल्लेखनीय काम केले आहे. याशिवाय Ecological (पर्यावरण) बटालियनने मसुरी, बिकानेर, जैसलमेर, चंबळ येथील 20 हजार हेक्टर जमीन क्षेत्रावर 2 कोटी 5 लक्ष वृक्ष लागवड केली आहे.

गरजेनुसार या युनिटस् चा प्रत्यक्ष युद्धातही समावेश असतो. यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी वा जवानालाही नियमित सैन्यदलासारखेच शौर्यचक्र, वीरचक्र देऊन गौरविण्यात येते.

अलिकडे प्रादेशिक सेनेमध्ये भरती होण्यासाठी महिलांसाठीही अंशत: प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

आपल्या भारतीय सैन्याबाबत, प्रादेशिक सेनेबाबत अधिक माहितीसाठी आपण https://indianarmy.nic.in या संकेतस्थळाला जरुर भेट द्यावी.

लेखक: मनोज शिवाजी सानप

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 7/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate