অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पर्यावरण विज्ञानातील करिअर

पर्यावरण विज्ञानातील करिअर

जग दिवसेंदिवस बदलत आहे. भौगोलिक सीमा ओलांडून प्रत्येक समूह आणि राष्ट्रांनी एकमेकांशी नवे संबंध प्रस्थापित केले आहेत. ज्ञान, विज्ञान, कला, पर्यावरण आदी क्षेत्रातील एकमेकांशी असणारी देवाणघेवाणही वाढली आहे. तंत्रज्ञानाच्या शोधामुळे नवनवीन संज्ञा उदयास येत आहेत. संशोधन शाखा विस्तारत असून जगभरात पर्यावरण शाखेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो आहे. सजीवसृष्टी आणि पर्यावरण यांच्याशी संबंध असणारी पर्यावरण विज्ञान ही शाखा असून पर्यावरणाचा शास्त्रीय अभ्यास आणि समस्या सोडविण्यासाठी ही शाखा कार्यरत असते. पर्यावरणातील अनेक अंतर्भूत बाबींचा आढावा यामध्ये घेतला जातो. पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक जीवाचा पर्यावरणाशी संबंध येतोच. घर, कपडे, पाणी, सूर्य, हवा, जीवनाला आकार देणाऱ्या प्रत्येक गोष्टीशी पर्यावरणाचे एक नाते आहे. वाढत्या शहरीकरण आणि औद्योगीकीकरणामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत असून ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे त्याचा विकास आणि वृद्धी होत नाही. या शाखेचा मुळचा हेतू पर्यावरणातील अमुल्य पदार्थ आणि त्यांच्या विविध घटकांची सुरक्षितता हा आहे. पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिक आणि तज्ञांची ती प्रमुख जबाबदारी मानली जाते. पर्यावरणाच्या विकासासाठी अनेक नव्या प्रणालींचा शोध घेणे आणि मानवी विकासाचा पर्यावरणावर परिणाम होणार नाही याची काळजी या माध्यमातून घेतली जाते. आजकाल सतत पर्यावरणीय बदल दिसून येत आहेत. ओझोन थराच्या परिणामाविषयीही गांभीर्याने पाहणे गरजेचे बनले असून त्या अनुषंगाने पर्यावरण विज्ञान ही शाखा महत्वाची आहे. मित्रहो या क्षेत्रात करिअरचे नवनवीन मार्ग खुले होत आहेत त्याचा घेतलेला आढावा खास करिअरनामासाठी.

पर्यावरण विज्ञान काय आहे?

हा विषय व्यापक आणि सखोल आहे. तो करिअरच्या कुठल्याही एका व्याख्येत बसू शकणार नाही इतकी खोली या विषयाची पहावयास मिळते. कदाचित यात करिअर करण्याचा मार्ग निवडल्यास तुम्हाला जगभर फिरून प्रवासही करावा लागू शकतो किंवा प्रत्यक्ष प्रयोगशाळेत बसून कामही करावे लागते. या विषयात उत्तम करिअर करण्यासाठी भौतिकशास्त्र, गणित या विषयाचा अभ्यास आणि लिखाणाची आवड असणे गरजेचे आहे.

पात्रता

पर्यावरण विज्ञान या विषयाला सजीवसृष्टीतील प्रत्येकाशी जोडता येते. यात शारीरिक आणि जैविक विज्ञान, पर्यावरणशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, प्राणीशास्त्र, भूगोल या सगळ्या विषयांचा आणि त्यातील समस्यांचा अभ्यास तसेच त्यावर उपाययोजना या शाखेच्या माध्यमातून सुचविल्या जातात. पर्यावरण वैज्ञानिक होण्यासाठी बीएसस्सी आणि एमएसस्सी असणे गरजेचे आहे. यामध्ये एम.फीलही करता येते. यासाठी विद्यापीठ स्तरावर प्रयोगशाळा व इतर सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातात.

कामाचे स्वरूप

पर्यावरण वैज्ञानिक हा पर्यावरणाला हानीकारक ठरणाऱ्या गोष्टींचा आणि तत्वांचा अभ्यास करतो. तो थांबविण्यासाठी संशोधन करून वैज्ञानिक मार्ग काढतो. यामध्ये हवा, पाणी, माती एकत्र करून त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम याचाही अभ्यास केला जातो. अतिशय सूक्ष्म स्तरावर त्याचे विश्लेषण करण्याची प्रक्रिया पार पाडली जाते. अनेक नामांकित जर्नल्समध्येही लेखन करावे लागते किंवा आंतरराष्ट्रीय पर्यावरणासंबधी काम करणाऱ्या समूहांसमोर सादरीकरणही करावे लागते.

प्रदूषण नियंत्रण

या शाखेत प्रदूषणाच्या समस्येवरही संशोधनात्मक काम केले जाते. प्रदूषण रोखण्यासाठी विशेष योजना तयार करण्याचे काम पर्यावरण वैज्ञानिक करत असतात. त्यानुसार पर्यावरणासंबधी धोरण ठरवणे, शासनाला सल्ला देणे तसेच प्रदूषणाला हातभार लावणाऱ्या कंपन्याविषयी मत देण्याचा अधिकार यांना असतो.

करिअरच्या संधी

पर्यावरण ही शाखा व्यापक असल्याने कामाच्या अनेक संधी इथे उपलब्ध होतात. कृषी क्षेत्रातही नोकरी मिळू शकते. पाणी आणि माती वैज्ञानिक म्हणूनही आपण काम करू शकता.

राष्ट्रीय स्तरावरील संधी

• उद्योग, खते, खाण, रिफायनरी, वस्त्रोद्योग आदी

• सामाजिक विकास

• संशोधन आणि विकास

• वन्यजीव व्यवस्थापन

• स्वयंसेवी संस्था

• प्रदूषण नियंत्रण मंडळ

• नागरी योजना

• जलसंपदा आणि कृषी

• खाजगी उद्योग

• वन आणि पर्यावरण मंत्रालय

आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधी

• हवामान बदल संबंधीत शासकिय संघटना पॅनेल (आय.पी.सी.सी.)

• संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम(यू.एन.ई.पी)

• भू- प्रणाली शासन प्रकल्प

• दूतावास आणि पर्यावरणाशी सबंधित अन्य संस्था

भारतातील पर्यावरण विज्ञान संस्था

• डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद (महाराष्ट्र)

• पुणे विद्यापीठ पुणे (महाराष्ट्र)

• अलिगढ मुस्लीम विद्यापीठ उत्तरप्रदेश

• जामिया हमदर्द विद्यापीठ दिल्ली

• दिल्ली इंजीनिअरिंग महाविद्यालय दिल्ली

• पर्यावरण जीवविज्ञान विभाग दिल्ली विद्यापीठ दिल्ली

• गुरु गोविंद सिंह इंद्रप्रस्थ विद्यापीठ दिल्ली

• जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जे.एन.यू) नवी दिल्ली

• पूर्वांचल विद्यापीठ उत्तरप्रदेश

• गुरु जाम्भेश्वर विद्यापीठ हिसार (हरियाणा)

• जम्मू विद्यापीठ जम्मू. (जम्मू काश्मीर)

• मैसूर विद्यापीठ मैसूर

• मद्रास विद्यापीठ चेन्नई, (तामिळनाडू)

मित्रहो या विषय शाखेत काम करण्यासाठी अभिरुची, जिज्ञासूवृत्ती आणि विषयाची आवड असणे गरजेचे आहे. अनेक सामाजिक समस्या आणि पर्यावरणाशी संबंधित अडचणी सोडविण्याची तसेच समस्येची उकल करण्याची तयारी हवी. नेतृत्वगुण आणि संघटक म्हणून काम करण्याची वृत्ती असल्यास या महत्वपूर्ण क्षेत्रात आपण ठसा उमटवू शकता.

- सचिन के. पाटील, संपर्क- ९५२७७७७७३२

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 4/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate