অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फाइन आर्ट : फाइन करिअर

फाइन आर्ट : फाइन करिअर

फाइन आर्ट अर्थात ललितकला क्षेत्रात ज्यांच्याकडे कौशल्य आहे त्यांना यशाची सर्व शिखरे पार पाडायला वयाची आणि काळाची गरज भासत नाही. संपूर्ण भारतात केवळ महाराष्ट्रात मुंबई येथे शासनाचे कला संचालनालय आहे. या कला विभागांतर्गत ललितकला प्रकारातील बहुविध अभ्यासक्रम हे व्यक्तीला स्वावलंबी बनवणारे आहेत. या अभ्यासक्रमांची माहिती संक्षेपाने देण्यापूर्वी, इच्छुक उमेदवार, काय काय पदनामाने ओळख निर्माण करू शकतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

फ्री-लान्स

एमबीबीएस होणाऱ्या उमेदवारास डॉक्टर ही उपाधी लागते वा एमई तसेच तत्सम शिक्षण घेणाऱ्या उमेदवारास ‘इंजिनियर’ म्हणून ओळख मिळते. कला क्षेत्रात असं नाहिए. जीएआर्ट, बीएफए, एमएफए या पदविका, पदव्या वा पदव्युत्तर पदव्या धारण करणाऱ्या उमेदवारास केवळ आर्टिस्ट म्हणूनच ओळख निर्माण होत नाही तर त्या उमेदवारास पेंटर, इलस्ट्रेटर (रेखांकनकार); फोटोग्राफर; स्टील फोटोग्राफर (स्थीर चित्रण छायाचित्रकार); मुव्ही फोटोग्राफर; मॉडेल फोटोग्राफर; प्रोडक्डिझायनर; कॅरेक्टर आर्टिस्ट; कला समिक्षक; कॉपीरायटर; पोर्ट्रेट आर्टिस्ट; मेटल आर्टिस्ट; शिल्पकार; मूर्तीकार; प्रिंट मेकर; कार्टुनिस्ट (व्यंगचित्रकार); अर्कचित्रकार (कॅरिकेचर आर्टिस्ट); कॅलेंडर आर्टिस्ट; कव्हरपेज आर्टिस्ट (मुखपृष्ठकार); स्टेज डिझायनर; पेपर स्कल्प्टर; फॅशन डिझायनर; कटिंग-पेस्टिंग आर्टिस्ट; ज्वेलरी डिझायनर; डायमंड कटिंग आर्टिस्ट; फिल्म फोटो डिझायनर; सेट डिझायनर; मशिन डिझायनर; बुक डिझायनर; पेज डिझायनर; वेब आर्टिस्ट हुश्श..!! अशा विविध नामाभिदानाने व्यक्तीस स्वत:ची ओळख निर्माण करता येते. हे झालं स्वतंत्र ओळख निर्माण झालेलं फ्री-लान्स काम. आता या कला शिक्षण झालेल्या उमेदवारास कॉर्पोरेट क्षेत्रात कुठे-कुठे संधी आहेत ते पाहणंही इच्छुकांस मार्गदर्शक ठरेल अशी खात्री आहे.

कॉर्पोरेट क्षेत्रातील संधी

विविध कला महाविद्यालयांमध्ये कला अध्यापक, जाहिरात संस्थांमध्ये कॉपी एक्झिक्युटिव्ह, क्रिएटिव्ह व्हिज्युलायझर, आर्टिस्ट, कॉम्प्युटर आर्टिस्ट, ले-आऊट आर्टिस्ट, सिम्बॉल डिझाईनर, आऊट डोअर आर्टिस्ट. विविध टिव्ही चॅनल्ससाठीचे ग्राफिक आर्टिस्ट्स, विविध कंपनी-इंडस्ट्रिजमध्ये, फिल्म इंडस्ट्रिज, स्टुडिओज, विविध प्रेस, दैनिके, निमेशन एजन्सीज-स्टुडिओज, हॉस्पिटल्समधील आर्ट डिपार्टमेंट्स-एक्स-रे विभाग, इंटेरिअर डिझायनर्स, टेक्सटाइल इंडस्ट्रिज, आऊट डोअर ॲडव्हर्टायझर्स, शासकीय, निमशासकीय कार्यालये, विविध उत्पादक कंपन्या, पॅकेजिंग इंडस्ट्रिज अशा विविध क्षेत्रात कला पदवीधारकांस नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.

विविध कला अभ्यासक्रम

अशा या बहुविध कला अभ्यासक्रमांमध्ये किती आणि कोणकोणते कोर्सेस आहेत? या प्रश्नाचे उत्तरदेखील उत्सुकता आणि उत्साह वाढविणारे आहे. जी.डी.आर्ट नावाने परिचित असलेली पदविका 10 वी नंतर पाच वर्षात पूर्ण करता येते. बी.एफ.ए. (बॅचलर ऑफ फाइन आर्ट) हा पदवी अभ्यासक्रम 12 वी (कुठलीही शाखा) उत्तीर्णास चार वर्षात पूर्ण करता येतो. याशिवाय आर्ट टीचर डिप्लोमा (ए.टि.डी.), डी.ए.एड. (डिप्लोमा इन.आर्ट एज्युकेशन), ए.एम.(आर्ट मास्टर) असे एक आणि दोन वर्षाचे तसेच अंशकालीन अभ्यासक्रम या क्षेत्रात शिकविले जातात. या सर्व अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे 022-22620231/2 या दूरध्वनीवर संपर्क साधून मिळवता येईल.

या अभ्यासक्रमांमध्ये प्लाईड

आर्ट (उपयोजित कला); पेंटिंग ड्रॉईंग; स्कल्पचर (मूर्ती-शिल्पकला); फोटोग्राफी (छायाचित्रण) ; दृश्यकला; आर्किटेक्चर (वास्तु रचना); टेक्सटाइल वेविंग; फॅब्रिक; निमेशन; निमेशन फिल्म मेकींग; डिजिटल निमेशन; डिजिटल फोटोग्राफी; निमेशन थ्रीडी; फॅशन डिझाईन; इंटेरिअर डिझाईन; ॲडव्हर्टायझिंग; मार्केटिंग; कम्युनिकेशन आर्ट; कॉपी रायटिंग; एडिटिंग अशा अनेक विषयांसह ऐच्छिक विषय किंवा स्वतंत्र विषय घेऊन कलाशिक्षण पूर्ण करून स्वावलंबी होता येते. कॉर्पोरेट जगताच्या गरजेप्रमाणे या क्षेत्रात वाट शोधता येते.

कलासंस्था

कलासंचालनालयांतर्गत 4 शासकीय, 31 शासनमान्य अनुदानित आणि सुमारे दीडशे शासनमान्य विनाअनुदानित कलासंस्था कार्यरत असून इतर शिक्षणाच्या शैक्षणिक शुल्काच्या तुलनेत या कला शिक्षणासाठी खुल्या प्रवर्गास रु.7000 तर आरक्षित प्रवर्गास रु.4500 च्या दरम्यान वार्षिक शैक्षणिक शुल्क आहे. या संस्थांव्यतिरिक्त खाजगी, अभिमत विद्यापीठांतर्गत असलेली आणि विश्वस्तांमार्फत चालविण्यात येणारी महाराष्ट्रात सुमारे 20 ते 25 कला महाविद्यालये आहेत. त्यांची माहिती ही वरील दूरध्वनीवरून सी.ई.टी. (कॉमन एन्ट्रन्स टेस्ट) विभागाकडे एक्स्टेशन मागून चौकशी करता येते. कारण चार शासकीय आणि उर्वरित वर उल्लेखलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी सदर सी.ई.टी. परीक्षा दरवर्षाच्या मे मध्ये राज्यातील सर्व विभागांमध्ये घेण्यात येते. ती माहिती 022-22632063 या दूरध्वनी नंबरवर उपलब्ध होऊ शकेल.

यशस्वी चेहरे

या क्षेत्रातून पुढे आलेल्या नामवंत व्यक्तिमत्त्वांमध्ये ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, ज्येष्ठ गायक सुदेश भोसले, व्यंगचित्रकार राज ठाकरे, छायाचित्रकार उद्धव ठाकरे, सतिश पुळेकर, पुरुषोत्तम बेर्डे, राज कांबळे अशा एक नव्हे हजारो डायमंड-आयकॉन्सस ची नावे लिहिण्याचे ठरवले, तर पेनाची शाई कमी पडेल.

एकूणच हे क्षेत्र आकाशाहून विशाल आणि हिमालयाहून उंच आहे. काम करण्याची जिद्द नावीन्य शोधण्याची कला, अथक परिश्रमाची मानसिक तयारी आणि आवडनिवड बाजूला ठेऊन निरीक्षण या चतु:सूत्रींवर व्यक्तिमत्त्वातील सुप्त कलाकारास मूर्त स्वरूपात साकारायला लावणारी ही कला आहे.

आय.टी. आणि डिजिटलायझेशनच्या युगात अनेक गोष्टी एकसारख्या बनवता येतील. मात्र कलाकाराची कल्पनाशक्ती आणि प्रतिभाशक्ती मात्र एकमेवच राहतील. त्यांचं डिजिटलायझेशन नाही करता येणार म्हणून या कलासाधकांना युनिकच म्हणावे लागेल!!

- गजानन सिताराम शेपाळ

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate