অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बीपीओ क्षेत्रातील करिअर

बीपीओ क्षेत्रातील करिअर

करिअरची अनेक पारंपारिक क्षेत्रे आहेत मात्र बदलत्या जगाच्या तुलनेत नवीन क्षेत्रे विस्तारत आहेत. अलीकडच्या दशकात सर्वात जास्त चर्चिले गेलेले हे करिअर असून अल्पावधीत तरुणांसाठी हे प्राधान्याचे क्षेत्र बनले आहे. उत्तम पगार, भौतिक सुविधांची रेलचेल आणि बदलती जीवनशैली यामुळे या क्षेत्राकडे तरुणाईचा जास्त ओढा असल्याचे दिसून येते. बीपीओ म्हणजे बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग अर्थात एका संस्थेकडून दुसऱ्या संस्थांची कामे करणे आणि त्याचे नियोजन करणे. भारतात कुशल मनुष्यबळ कमी खर्चात उपलब्ध असल्याने परदेशातील कंपन्यांनी भारतातील कंपन्यांच्या माध्यमातून सेवा देण्यास सुरुवात केली आणि तिथल्या तुलनेत इथे मोठ्या रकमेचे पॅकेज मिळत असल्याने या क्षेत्रात करिअर करण्याचा नवा पायंडा पडला. चला तर मित्रहो जाणून घेवूया या क्षेत्रातील करिअरच्या संधी खास करिअरनामा या लोकप्रिय सदरासाठी.

पात्रता

या क्षेत्रात दमदार करिअर करण्यासाठी महत्वाचे आहे ते संवाद कौशल्य तसेच दोनपेक्षा अधिक भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. कोणत्याही विषयातील पदवीधर यात करिअर करू शकतो. सध्या एमबीए झालेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाते. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व हवे. आजकाल प्रशिक्षण देणाऱ्या अनेक खाजगी संस्थाही उपलब्ध आहेत. त्या माध्यमातून तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते. हिंदी तसेच प्रादेशिक भाषेतही आता संधी निर्माण होत आहेत.

संधी

येणाऱ्या काळात या क्षेत्रात रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. देशातील अनेक मेट्रो शहरांमध्ये आयटी बीपीओ हब भविष्यात तयार होतील. यामध्ये नागपूर, मुंबई, अहमदाबाद, जयपूर, लखनौ, शिमला, वाराणसी, श्रीनगर, रांची, लुधियाना, गोवा, सुरत आदी शहरात हे हब तयार होतील. तसेच प्रादेशिक सेवा देणाऱ्या संस्थाही आता या क्षेत्रात उतरत आहेत त्यामुळे प्रादेशिक भाषा येणाऱ्यानाही रोजगार मिळेल.

कामाचे प्रकार

या क्षेत्रात कामाचे विविध प्रकार आहेत. आपल्या आवडीनिवडी आणि कलानुसार आपण काम निवडू शकता.

कस्टमर सपोर्ट सर्विस

या माध्यमातून ग्राहकाला त्याच्या समस्या सोडविण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. ग्राहकाकडून येणाऱ्या प्रश्नांना इथे उत्तरे दिली जातात. तसेच त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातात. यात टेलिफोन कॉलिंग, ई – मेल या माध्यमाद्वारे काम केले जाते

टेक्निकल सपोर्ट सर्विस

या माध्यमातून तांत्रिक बाबींवर मार्गदर्शन केले जाते. यामध्ये संगणक त्यांचे सॉफ्टवेअर, इंटरनेट इन्फ्रास्ट्रक्चर, मॅन्यूफॅक्चरिंग आदी बाबत मार्गदर्शन केले जाते.

टेली मार्केटिंग सर्विस

यात ग्राहकाला फोन कॉल करून उत्पादनाची माहिती दिली जाते तसेच त्या उत्पादनाच्या खरेदीच्या बाबतीत ग्राहकाशी बोलणे केले जाते. ठराविक वर्ग निवडून त्यांना कॉल केले जातात. यासाठी खास करून महिलांना मोठ्या प्रमाणात संधी दिली जाते.

आईटी सर्विस

या माध्यमातून तांत्रिक सेवा देण्याचे काम केले जाते. त्यात संगणक आदी बाबींच्या समस्यांविषयी सेवा दिल्या जातात. उदा. डेस्कटॉप, नोटबुक, कनेक्टीव्हिटी, आईटी ऑपरेशन समस्या याबाबत सेवा पुरविल्या जातात.

डाटा एंट्री / प्रोसेसिंग सर्विस

या माध्यमातून कंपनीचे व्यावसायिक ट्रान्झेक्षन, खरेदी, विक्री, आदी कामे असतात. माहितीची साठवणूक, त्याची वर्गवारीही केली जाते. अकाउंटिंग सर्विस, प्रोसेसिंग सर्विस आदी क्षेत्रातही काम करता येईल.

प्रशिक्षण संस्था

* नॉर्थ कॉल सेंटर कॉलेज, नोएडा

* सेपहायर कॉलनेट, नवी दिल्ली

* हॉलीस्टिक एन्टरप्राईज, नवी दिल्ली

* रांस इंडिया मॅनजमेंट सिस्टम, अहमदाबाद

मित्रहो चांगले वातावरण, वेळेचे बंधन नाही, घरपोच वाहन सुविधा उपलब्ध असल्याने हे क्षेत्र आकर्षण ठरले आहे. उत्तम संवाद कौशल्य, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, सुमधुर आवाज, भुरळ पाडणारे संवाद तंत्र असल्यास आपणही या क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकता. शिक्षणाच्या फारश्या अटी नसल्याने अनेक भाषा येणाऱ्यांसाठी हा मार्ग योग्य आणि फायद्याचा ठरेल.

- सचिन के. पाटील, संपर्क: ९५२७७७७७३२

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 2/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate