অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

माध्यम क्षेत्र

माध्यम क्षेत्र

सध्याचे युग हे माहितीयुग आहे. आल्विन टॉफलर या विचारवंताने म्हटल्याप्रमाणे कृषी, औद्योगिक या दोन युगानंतर आलेल्या ‘माहिती युगात’ ज्ञान हीच खरी संपत्ती बनली आहे. त्यामुळे माहितीचे ज्ञानात रुपांतर करणारी माध्यमे व त्यातील पत्रकार हे माहिती युगातील अत्यंत महत्त्वाचे घटक बनले आहेत. त्यामुळे माध्यम क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी आहेत.

मागील तीन दशकात माध्यमांच्या क्षेत्राचा अफाट विस्तार झाला. भारतात झपाट्याने विकसित होत असलेल्या क्षेत्रात माध्यम आणि रंजन क्षेत्राचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल. वार्षिक 13.9 टक्के विकासदराने या क्षेत्राची वाढ होत असल्याने माध्यम व रंजन उद्योग क्षेत्रातील उलाढाल 2019 सालापर्यंत 2000 अब्ज रुपयापर्यंत जाईल असे अपेक्षित आहे. यावरून या क्षेत्रातील वाढीचा धडाका आपल्या लक्षात येऊ शकेल.

माध्यमांचा अफाट विस्तार

भारतात आजच्या घडीला 70 हजार वृत्तपत्रे आणि 800 टेलिव्हिजन चॅनल्स आहेत. याशिवाय रेडिओ, सिनेमा, वेबपोर्टल, ऑनलाइन वृत्तपत्रे, मोबाइल न्यूज, इव्हेंट मॅनेजमेंट, सोशल मीडिया, जाहिरात, जनसंपर्क इत्यादी क्षेत्रेही विस्तारत आहेतच. त्याचबरोबर माध्यम संशोधन क्षेत्र, बाह्य प्रसिद्धी माध्यमे, प्रकाशन क्षेत्र, माहितीपट व चित्रपट क्षेत्र, जनसंपर्क क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, भारत सरकार व विविध राज्य सरकारांच्या माहिती व जनसंपर्क यंत्रणा, कॉर्पोरेट क्षेत्र, शासकीय कार्यालये यात पत्रकारितेचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.

आवश्यक बाबी

पूर्वी केवळ हस्ताक्षर चांगले असले तरी पत्रकार होण्यासाठी पुरेसे असायचे. आता मात्र पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण असणे, किमान दोन भाषांवर चांगले प्रभुत्व असणे, संगणक हाताळण्याचे चांगले ज्ञान असणे या तीन बाबी पत्रकारितेच्या क्षेत्रातील नोकरीसाठी अत्यावश्यक आहेत. पत्रकारितेच्या क्षेत्रात नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. त्यामुळे पत्रकारितेचे शिक्षण देणारी महाविद्यालयेही वाढत आहेत. एकट्या मुंबई शहरात पत्रकारितेचे शिक्षण देणारी 80 पेक्षा अधिक महाविद्यालये आहेत. इतर शहरातील महाविद्यालयांची संख्याही वाढली आहे.

व्यापक संधी

वृत्तपत्रांच्या खपाच्या बाबतीत भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. भारतात दररोज वृत्तपत्राचे 12 कोटींपेक्षा अधिक अंकांची दररोज विक्री होते, अशी आकडेवारी आहे. आपल्या महाराष्ट्रातही नव-नवी वृत्तपत्रे येत आहेत. पूर्वीपासून सुरू असलेल्या वृत्तपत्राच्या आवृत्ती वाढत आहेत. त्यामुळे वृत्तपत्र क्षेत्रात मोठ्या प्रमाणात करिअर संधी आहेत. या क्षेत्रात बातमीदार, उपसंपादक, विशेष प्रतिनिधी, ब्यूरो चीफ यासारखी पदे उपलब्ध असतात. स्वतःचे वृत्तपत्र सुरू करणे हे देखील शक्य आहे. प्रत्येक वृत्तपत्राच्या ऑनलाइन आवृत्ती निघू लागल्या आहेत, त्यातही कंटेट एडिटर होता येते. वृत्तपत्रात इव्हेंट मॅनेजमेंट हा स्वतंत्र विभाग सुरू झालेला आहे. त्यातही इव्हेंन्ट मॅनेजर व इतर पदावर काम करण्याची संधी मिळू शकते. छायाचित्र पत्रकार हे पदही उपलब्ध असते. मॅगझिन जर्नालिजमचे क्षेत्रही नव्याने भरारी घेत आहे. या क्षेत्रातही उपसंपादक व इतर पदावर काम करता येते. प्रकाशन व्यवसाय क्षेत्रातही उपसंपादक, संपादक, लेखक, चरित्र लेखक म्हणून कार्य करता येते.

आकाशवाणी

रेडिओच्या क्षेत्रात एफ.एम.च्या विस्ताराचा तिसरा टप्पा सुरू आहे. त्यामुळे एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या प्रत्येक शहरात एफ.एम.रेडिओचे केंद्र असणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. रेडिओ जॉकी, निवेदक, वृत्त निवेदक, वृत्त संपादक, ड्युटी ऑफिसर, कार्यक्रम अधिकारी, केंद्र संचालक यासारख्या पदांवर काम करण्याची संधी प्राप्त होऊ शकते.

दूरचित्रवाहिन्यांतील संधी

टेलिव्हीजन क्षेत्रातही नोकरीच्या भरपूर संधी आहेत. यात स्ट्रींजर, अँकर, कंटेंट एडिटर, जिल्हा प्रतिनिधी यासह विविध पदावर नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. चित्रपट क्षेत्रात चित्रपट समीक्षक, पटकथा लेखक, चित्रपट प्रसिद्धी अधिकारी, चित्रपट दिग्दर्शक, लघुपट व माहितीपट तयार करणे यासारखी कामे करण्याची संधी मिळू शकते.

जाहिरात क्षेत्र

जाहिरात क्षेत्रात जाहिरात लेखक,जाहिरात प्रतिनिधी, जाहिरात व्यवस्थापक, जाहिरात सल्लागार, माध्यम खरेदी व्यवस्थापक, इत्यादी पदांवर कार्य करण्याची संधी लाभू शकते. स्वतःची जाहिरात संस्था सुरू करणेही सहज शक्य आहे. रेडिओसाठी, टेलिव्हिजनसाठी, इंटरनेटसाठी, होर्डिंगसारख्या बाह्य प्रसिद्धी माध्यमासाठीही जाहिराती तयार करण्याची संधी मिळू शकते.

वेब मीडियातील संधी

स्मार्टफोन युजर्सची संख्या झपाट्याने वाढत असल्याने वेब मीडियामध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. आज जवळपास सर्वच राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील दैनिके वेबपोर्टल आणि अॅपद्वारे वाचकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहेत. त्यामुळे कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यत ही माध्यमे पोहोचत आहेत. त्यातूनच वेबपोर्टल आणि न्यूज ॲपमध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. न्यूज अॅप, न्यूज साईट, युट्यूब चॅनेल, सोशल मीडिया, डिजिटल मार्केटींग, ऑनलाइन अॅडव्हरटायजिंग, गुगल अॅडव्हर्टायजिंग, युट्यूब अॅडव्हर्टायजिंग, बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कंटेट एडिटर म्हणून अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. सोशल मीडिया मार्केटिंगसाठी कंटेंट एडिटर हवे असतात. त्यामध्ये फेसबूक पेज, ट्विटर अकाऊंटन्ट, सोशल इमेज बिल्डींग करण्यासाठी माध्यम क्षेत्रातील पदवीधरांना प्राधान्याने संधी दिली जाते. अॅप क्षेत्रात सध्या, डेली हंट, न्यूज हंट, वे टू ऑनलाइन यांसारखे बहुभाषिक अॅप आहेत. यामध्ये कंटेंट एडिटर म्हणून संधी उपलब्ध आहेत. तर शॉर्टन्यूज अॅप क्षेत्रात रिलायन्ससारखा ग्रुपही उतरत असल्याने नोकरीच्या संधी वाढणार आहेत.

माध्यमाचे शिक्षण व संशोधन क्षेत्रातही नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. बॅचलर ऑफ जर्नालिझम, बॅचलर ऑफ मीडिया मॅनेजमेंट, एम.ए.मास कम्युनिकेशन यासारखे अभ्यासक्रम प्रत्येक शहरात उपलब्ध आहेत. माध्यमाच्या क्षेत्रात चांगले करिअर करू इच्छिणाऱ्यांनी एम.ए. मास कम्युनिकेशन हा अभ्यासक्रम पूर्ण करणे हितावह ठरते.

जनसंपर्क

जनसंपर्क क्षेत्रात शासकीय, सहकार, शिक्षण, बँकिंग, कार्पोरेट क्षेत्र यासह सर्वच क्षेत्रात जनसंपर्क अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, माहिती अधिकारी, जनसंपर्क सल्लागार यासारख्या पदांवर कार्य करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. केंद्र शासनाच्या प्रसार यंत्रणेत प्रवेश करण्यासाठी इंडियन इन्फॉर्मेशन सर्विसेस (आय.आय. एस.) ही स्पर्धा परीक्षा आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यास प्रेस इफॉर्मेशन ब्युरो, रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स, क्षेत्रीय प्रचार कार्यालय यासह विविध कार्यालयात महत्त्वाच्या पदांवर कार्य करता येते.

विशेषीकरणाचे युग

आजच्या काळात वृत्तपत्राचा वाचक, रेडिओचा श्रोता, टीव्हीचा दर्शक बदललेला आहे. त्यामुळे त्यांच्या अपेक्षांची व गरजांची पूर्तता करणारी पत्रकारिता करणे अवघड बनले आहे. आता बातमी देताना अत्यंत कमी वेळात, सखोल, अचूक, इतरांपेक्षा वेगळी बातमी द्यावी लागते. त्यासाठी त्या क्षमतेचे पत्रकार निर्माण होणे गरजेचे असते. नेमके प्रश्न विचारता येणे, शोधक दृष्टी असणे, तर्क लढवता येणे व विश्लेषण करता येणे आवश्यक असते. आता विशेषीकरणाचे युग आहे, त्यामुळे पर्यावरण, शेती, उद्योग, उर्जा, शिक्षण, राजकारण, सहकार, गुन्हेगारी वृत्त, न्यायालयीन वृत्त, आंतरराष्ट्रीय राजकारण, वित्त, संरक्षण अशा कोणत्यातरी एका विषयात सखोल अभ्यास असणाऱ्या पत्रकाराला सर्वत्र मागणी असते. पी. साईनाथ यांना केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात महत्त्व दिले जाते कारण ग्रामीण भारताशी संबंधित समस्यांचा पूर्ण अभ्यास त्यांनी केला आहे. पत्रकारितेत करिअर करणाऱ्याने कुठल्या तरी एका विषयाबाबत सखोल ज्ञान मिळवणे उपयुक्त ठरते. हे क्षेत्र आव्हानात्मक आणि तेजोवलय लाभलेले आहे. उच्चपदस्थ राजकारणी, समाजकारणी, अधिकारी, चित्रपट कलावंत, साहित्यिक, शास्त्रज्ञ इत्यादींच्या सतत संपर्कात राहण्याची संधी पत्रकारांना मिळते.

लेखक:  डॉ.रवींद्र चिंचोलकर

(सोलापूर विद्यापीठमध्ये पत्रकारिता विभागाचे प्रमुख.)

संपर्क: 09860091855

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate