অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

विद्यार्थी घडविणारी शासकीय विज्ञान संस्था

विद्यार्थी घडविणारी शासकीय विज्ञान संस्था

“मुलांच्या शिक्षणाला किती खर्च येत आहे..!” “शिक्षण फारचं महागलं आजकाल.. आमच्या वेळी अस नव्हतं..”, “आमच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाला जेवढा खर्च आला ना त्याच्यापेक्षा जास्त खर्च आज प्राथमिक शिक्षणाला येतो..” “उच्च शिक्षण तर घ्यायची सोयच राहिली नाही..” अशी वाक्य आपल्या कानावर रोजच येतात. मुलांच्या शिक्षणाला लागणाऱ्या खर्चाची ओरड तर नेहमीच होते. खरं तर आपल्या परिसरातच अशा अनेक संस्था असतात जिथे विद्यार्थ्यांना मोफत किंवा अल्पदरात उत्तम शिक्षण मिळते. विद्यार्थ्यांसाठी अनेक सुविधा उपलब्ध असतात परंतु आपण या विषयी अनभिज्ञ असतो. अशीच एक संस्था औरंगाबादला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाजवळील ‘शासकीय विज्ञान संस्थे’मध्ये विज्ञान शाखेतील अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या संस्थेत अत्यल्प फीस आहे. अनेक विद्यार्थी येथे शिकून परदेशात शास्त्रज्ञ म्हणून काम पाहत आहेत. जाणून घेऊया याच ‘शासकीय विज्ञान संस्थे’विषयी…

औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाजवळ असलेल्या शासकीय विज्ञान संस्थेची 14 ऑगस्ट 1974 रोजी स्थापना करण्यात आली. पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि संशोधनासाठी या संस्थेची निर्मीती करण्यात आली. या संस्थेची निर्मिती महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने केली आहे. खासगी महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण स्वस्त राहिले नाही. अनेकदा असेही आढळून आले आहे की, अनेक महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा, ग्रंथालय आदी सुविधा नसतात किंवा असल्या तर अपुऱ्या असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागते. या शासकीय विज्ञान संस्थेची निर्मिती करण्यामागे याचा उपयोग मराठवाड्यामधील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्हावा हाच उद्देश शासनाचा होता. 2017 मध्ये या संस्थेच्या स्थापनेला 43 वर्षे पूर्ण होतील.

सध्या शासकीय विज्ञान संस्थेच्या संचालक म्हणून डॉ. हेमलता वानखेडे कार्यभार सांभाळतात. संस्थेविषयी माहिती देताना त्या म्हणतात, “विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळेत आवश्यक असणारी सर्व उपकरणे संस्थेत उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. संस्थेतील सर्व प्राध्यापक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमार्फतच निवडली जातात. त्यामुळे गुणवत्ताधारक प्राध्यापक मंडळीच विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाला असतात. विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालय आहे. त्यात दहा हजार पुस्तके उपलब्ध आहेत. त्यात संदर्भपुस्तके, अभ्यासक्रमांसाठीचे क्रमिक पुस्तके यांचा समावेश आहे. शिवाय दररोजची 15 वर्तमानपत्रे आणि 20 मासिके ग्रंथालयात असतात. संस्थेतील संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी 10 रिसर्च गाईड आहेत. दरवर्षी सी. व्ही. रमन आणि जगदीशचंद्र बोस व्याख्यानमाला संस्थेत आयोजित केल्या जातात. ‘कमवा आणि शिका’ ह्या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आर्थिक साहय केले जाते. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार त्यांना हव्या असलेल्या सर्व सुविधा संस्था तात्काळ पुरवते. ”

शासकीय विज्ञान संस्थेत बायोफिजिक्स (जीवभौतिकशास्त्र), बायोटेक्नॉलॉजी (जैविकतंत्रज्ञान), बॉटनी (वनस्पतीशास्त्र), जिओलॉजी (प्राणीशास्त्र), भूगर्भशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी आणि संशोधन करता येते. यातील बायोफिजिक्स (जीवभौतिकशास्त्र) हा विषय भारतात केवळ चार ठिकाणी आणि महाराष्ट्रात फक्त औरंगाबाद येथे आहे. या संस्थेतील विद्यार्थ्यांनी एम.एस्सी. करत असतानाच गुणवत्तेच्या बळावर अनेक शिष्यवृत्ती मिळवल्या आहेत. सेट नेट परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही मोठे आहे. 2016-17 या शैक्षणिक वर्षात शासकीय विज्ञान संस्थेतील 18 विद्यार्थी GATE, ICAR, DBT, JRF, SET, NET या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. संस्थेचे अनेक विद्यार्थी परदेशात शास्त्रज्ञ म्हणून काम करतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षेमध्ये अधिकारी म्हणून या संस्थेतील विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे.

भूगर्भशास्त्र या विषयाचे विभागप्रमुख डॉ. कमलाकर वांजरवाडकर या विषयासंदर्भात सांगतात, “विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासाठी धरण बांधण्याच्या प्रतिकृती संस्थेत उपलब्ध आहेत. विविध खडक त्यांच्या नावासह विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी देण्यात येतात. विभागात खडकांचे संग्रहालय आहे. देशातील अनेक भागातील मृदा, खडक संस्थेत संशेधनासाठी ठेवण्यात आली आहेत. शिवाय शेकडो वर्षांपूर्वीचे यावर अनेक विद्यार्थ्यांचे संशोधन चालू आहे.”

डॉ. अभय साळवे यांनी वनस्पतीशास्त्र या विषयाची माहिती देताना प्रयोगशाळेमधील टिश्यू कल्चर आणि त्यासंबंधातील संशोधनाची माहिती दिली. आपण 21 मार्च हा ‘जागतिक वन दिन’ म्हणून साजरा करतो. आज वनस्पतीशास्त्र या विषयात आपण लक्षणीय प्रगती केली आहे. कोणत्याही नष्ट होणाऱ्या वनस्पतीचे संवर्धन आपण ऊती संवर्धन (टिश्यू कल्चर) द्वारे करू शकतो. याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे एका वेळी हजारोंच्या संख्येत आपण वनस्पती संवर्धन करू शकतो. संवर्धन केलेल्या हजारो वनस्पतींचे गुणधर्म सारखेच असतात. शासकीय विज्ञान संस्थेत विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनेक प्रदेशातील वनस्पती उपलब्ध आहेत.

डॉ.अरविंद पेठकर हे सूक्ष्मजीवशास्त्र या विषयाचे विभागप्रमुख आहेत. त्यांच्या विभागात विद्यार्थी पर्यावरणातील लाखोंच्या संख्येने असणाऱ्या सूक्ष्मजीवांचा अभ्यास करतात. त्यासाठी आवश्यक असणारी सर्व उपकरणे प्रयोगशाळेत आहेत. अनेक आजार पसरवणारे सूक्ष्मजीव आणि मानवाला उपयुक्त असणारे सूक्ष्मजीव या दोहोंचाही अभ्यास संशोधक विद्यार्थी करतात. हे संशोधन भविष्यात मानवासाठी फार उपयुक्त ठरणारे आहे.औरंगाबादमधील शासकीय विज्ञान संस्थेत जीवभौतिकशास्त्र हा विषय पदव्युत्तर पदवी आणि संशोधनासाठी आहे. महाराष्ट्रात फक्त येथेच या विषयाचे अध्ययन-अध्यापन केले जाते. ‘गामा रेडिएशन चेंबर’ संस्थेत असून विभागप्रमुख डॉ. सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विविध गामा किरणांचा अभ्यास करतात.

विज्ञान शाखा खरं तर रुक्ष समजली जाते. यात केवळ यांत्रिकी अभ्यास असतो असाही एक सर्वसामान्य समज असतो. पण यांत्रिकी अभ्यासाबरोबरच या विज्ञान संस्थेत अनेक उपक्रम विद्यार्थ्यांच्या सहभागाने राबविले जातात. यावर्षी जून महिन्यात संस्थेने 100 झाडे लावली आणि जगवली. संस्थेचा परिसर औरंगाबाद लेण्या आणि डोंगरांजवळ आहे. पावसाळ्यात हिरवळ असते पण उन्हाळ्याची चाहूल लागली की परिसर उजाड होतो. आसपासच्या पशु-पक्ष्यांचे चारापाण्या अभावी हाल होतात. यावर उपाय म्हणून संस्थेत ठिकठिकाणी पाण्याचे कॅन बसवले आहेत. पाणवठे बनवले आहेत. या पाणवठ्यांवर मोर आणि वानर मोठ्या प्रमाणावर येतात. पाण्याची पातळी वाढावी म्हणून यावर्षी राष्ट्रीय सेवा योजना आणि विभागीय आयुक्त कार्यालयाच्या मदतीने संस्थेत सहा लाख लीटर पाणी मावेल एवढ्या क्षमतेचे शेततळे खोदण्यात आले आहे. डोंगरावरून येणारे पाणी आतापर्यंत वाहून जायचे. आता हेच पाणी या शेततळ्यात साठवले जाईल. त्यामुळे परिसरातील भूगर्भातील पाणीपातळीत नक्कीच वाढ होईल, असा विश्वास शासकीय विज्ञान संस्थेच्या संचालक हेमलता वानखेडे व्यक्त करतात.

विज्ञान विषयात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय विज्ञान संस्थेने अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. विशेषत: संशोधन क्षेत्रात काम करण्याची मनिषा बाळगून असणाऱ्यांनी येथे प्रवेश घेतला तर त्यांना त्याचा फायदा होईल. जून महिन्यामध्ये विद्यापीठ नियमाप्रमाणे 100 गुणांची प्रवेश परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. प्रवेश आरक्षणाच्या शासन नियमानुसार दिले जातात. बायोफिजिक्स (जीवभौतिकशास्त्र), बायोटेक्नॉलॉजी (जैविकतंत्रज्ञान), बॉटनी (वनस्पतीशास्त्र), जिओलॉजी (प्राणीशास्त्र), भूगर्भशास्त्र यापैकी जो विषय पदवी अभ्यासक्रमासाठी असेल त्यात पदव्युत्तर पदवी मिळवण्यासाठी शासकीय विज्ञान संस्थेत प्रवेश घेता येईल.

लेखक - क्षितिजा हनुमंत भूमकर
विभागीय माहिती कार्यालय, औरंगाबाद.

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 7/25/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate