অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वेब पत्रकारितेतील संधी

वेब पत्रकारितेतील संधी

पत्रकारिता क्षेत्रामध्ये दूरचित्रवाणी, वृत्तपत्रे या माध्यमांप्रमाणेच आता वेब पत्रकारितेचेही महत्त्व वाढत आहे. आज अनेक देशांमधील वृत्तपत्रे बंद झाली असून तेथे केवळ वेब पत्रकारिता हा प्रकार प्रचलित आहे. सद्याच्या आधुनिक जगात कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त माहिती वाचकांना हवी असते. आताचा वाचकवर्ग हा संगणकीयदृष्ट्या साक्षर तर आहेच पण त्‍याचबरोबर स्मार्टफोनचा वापर करणारा वर्गही मोठा आहे. यामुळे वाचकांचा कल हा ऑनलाईन बातम्या पाहण्याकडे जास्त दिसून येतो. कारण एखादी जर महत्त्वाची घटना घडली की, लगेच त्या बातमीविषयी संपूर्ण माहिती घेण्यात वाचकांचा जेवढा जास्त रस असतो. वाचकाला त्याच्या सोयीनुसार कुठेही आपले वृत्तपत्र जसेच्या तसे वाचायला मिळावे. याकरिता बऱ्‍याच वर्तमानपत्रांनी स्वत:ची ई-आवृत्ती सुरु केली आहे. यामध्ये इंग्रजी वृत्त वाहिनी सीएनए, एनडीटीव्ही, बीबीसी अशा वाहिन्यांच्या वेबसाईट त्‍याचप्रमाणे टाइम्स ऑफ इंडिया, हिंदुस्थान टाइम्स, डीएनए अशा वृत्तपत्राच्या वेबसाईट आहेत.

इंग्रजी वेब पत्रकारितेप्रमाणेच आता मराठी वेब पत्रकारितादेखील हळूहळू पुढे येत आहे. आज अनेक मराठी वाहिन्या आणि न्यूजपेपरच्या वेबसाईटस् पहायला मिळतात. तरुण वर्ग हा सतत मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेटमध्ये व्यस्त पहायला मिळतो. त्यामुळे त्यांना वृत्तपत्रे वाचायला वेळच नसतो. तसेच ऑफिसला जाणाऱ्‍या लोकांना टीव्ही पाहायला अथवा वर्तमानपत्र वाचायला वेळ मिळत नाही. मग ते अशावेळी सतत अपडेट राहण्यासाठी वेबसाईटसचा वापर करतात. यामुळे वृत्तपत्रे आणि न्यूज चॅनल्स यांचा वाचकवर्ग हा वेबसाईटसकडे वळू लागला आहे.

21 व्या शतकामध्ये तरुण पिढी वेब, इंटरनेट, माहिती तंत्रज्ञानाशिवाय राहणे म्हणजे आपण जगाच्या किमान दहा पावले तरी मागे आहोत असे समजले जाते. त्यामुळे फेसबुक, गुगल, ट्विटर आणि व्हॉटस्ॲप शिवाय आजची पिढी राहूच शकत नाही. असे चित्र सध्या आपल्याला दिसत आहे. इंटरनेट म्हटलं की, इंग्रजी अपरिहार्य आहे. असे काल-परवापर्यंत वाटत होतं. मात्र हिंदी, मराठी किंवा अगदी बंगाली, तमिळ, तेलगू सारख्या भाषांचे युनिकोड फॉन्टस् उपलब्ध झाल्याने आज हजारो वेबसाईटस आणि ब्लॉग हे भारतीय भाषांमधून सहजपणे वाचायला मिळतात. यामुळे इंग्रजी पत्रकारितेबरोबरच मराठी पत्रकारितेने वेब जगात आपले पाऊल ठेवले आहे. यामुळेच मराठी वेब पत्रकारिता हे करीअर क्षेत्र म्हणून निवडल्यास आपले भविष्य उज्ज्वल असणार यात कोणतीही शंकाच नाही.

मराठी वेब पत्रकारितेत आपले भविष्य घडविण्यासाठी पत्रकारामध्ये बातमी लिहिण्याचे कौशल्य असण्याबरोबरच आपल्याला स्वत:ला संगणकावर टंकलेखन करता येणे महत्त्वाचे असते. तसेच त्या बातमीसाठी आवश्यक असणारे फोटो, व्हिडीओ, ऑडिओ इत्यादी संगणकाशी निगडीत असणाऱ्‍या तांत्रिक बाबींचे पत्रकाराला ज्ञान असणे गरजेचे आहे. वेब जगात लागलेल्या नवीन शोधांचीही वेब पत्रकारिता करणाऱ्‍या पत्रकाराला माहिती पाहिजे. आपल्या वाचकाला वेबसाईटवरून बातमी बघण्यासाठी ती तांत्रिकदृष्ट्या कशी करायची याचीही माहिती वेब पत्रकारिता करणाऱ्‍या पत्रकाराला माहिती पाहिजे. मराठी वेब पत्रकारितेचा कोर्सचा कालावधी 1 वर्षाचा असून तो बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर करू शकतो. याचबरोबर संगणकाचे मुलभूत ज्ञान असणे गरजेचे असते. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमाविषयी अधिक माहितीसाठी मराठी पत्रकार संघाच्या http://patrakarsangh.com या संकेतस्थळास भेट द्यावी.

दिवसेंदिवस लोकांवरील वाढत चाललेला इंटरनेटचा प्रभाव आणि वेबसाईटवरून बातमी बघणाऱ्‍यांमध्ये वाढत चाललेला वाचक वर्ग यामुळे वेब पत्रकारितेला महत्त्व आले आहे. या क्षेत्रात ई-पेपर वेबसाईटच्या ऑफिसमध्ये नोकरी तसेच स्वत:ची वेबसाईट व ब्लॉग चालवू शकतो. अशा चांगल्या संधी उपलब्ध आहेत.

लेखिका:  रेश्मा वाघ

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 3/31/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate