অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हॉस्पिटल मॅनेजमेंटमधील करिअर...!

हॉस्पिटल मॅनेजमेंटमधील करिअर...!

देशाची वाढती लोकसंख्या पाहता रुग्णसेवेतही कुशल मनुष्यबळाची गरज दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात भासत आहे. सध्या आरोग्याच्या बाबतीत लोकात जागृती पाहवयास मिळते आणि शासनही आरोग्य सेवा देण्यावर भर देत आहे. आरोग्य क्षेत्र विस्तारत असून नवनवीन तंत्रज्ञान यात येत असल्याचे दिसते. मोठ्या हॉस्पिटल मधील सर्व व्यवस्थापन करून देणाऱ्या काही संस्थाही कार्यरत असल्याचे आपण पाहतो. चांगल्या सुव्यस्थेची मागणी या क्षेत्रात आहेच. हॉस्पिटल मॅनेजमेंट या पायाभूत गोष्टींची अंमलबजावणी करत असते. आजकाल व्यवस्थापन या घटकाला कोणत्याही क्षेत्रात विशेष महत्व प्राप्त झाले आहे आणि वैद्यकीय क्षेत्रही आता त्यापासून वेगळे राहिलेले नाही. विदेशातही प्रशिक्षित लोकांची मोठ्या प्रमाणात गरज भासत असल्याने रोजगाराच्या अमाप संधी आहेत. हॉस्पिटल म्हणजे चोवीस तास सेवा द्यावी लागते त्यानुसार कुशल मनुष्यबळाची गरज अनेक हॉस्पिटलना असतेच. मित्रहो, हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन या क्षेत्राचं प्रशिक्षण घेतले असल्यास चांगले करिअर करता येईल. त्या अनुषंगाने या क्षेत्रातील संधींचा घेतलेला आढावा खास करिअरनामा या लोकप्रिय सदरासाठी..

पात्रता

हॉस्पिटल मॅनेजमेंट या विषयातील पदवी अभ्यासक्रमासाठी बायोलॉजी या विषयातून ५० टक्के गुणासहित बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. पदवीधर उमेदवार हॉस्पिटल मॅनेजमेंट या विषयात एमबीएही करू शकतो. बारावीतील गुणानुक्रमे प्रवेश प्रक्रिया पार पडली जाते तसेच काही ठिकाणी प्रवेश परीक्षा, समूह चर्चा, मुलाखतीद्वारेही दिला जातो. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन हाही अभ्यासक्रम आता उपलब्ध आहे. हा कोर्स मेडिकल किंवा नॉन मेडिकल अशा दोन्ही प्रकारच्या उमेदवारांना करता येईल. काही संस्थांमध्ये हॉस्पिटल मॅनेजमेंटचे सर्टिफिकेट, डिप्लोमा कोर्सेस उपलब्ध आहेत. तसेच या अभ्यासक्रमासाठी संगणक ज्ञानही महत्वाचे मानले जाते.

व्यक्तिगत गुण

यशस्वी हॉस्पिटल मॅनेजर व्हायचं असल्यास व्यवस्थापनाचे कौशल्य, लोकांकडून काम करवून घेण्याची कला, उत्तम नेतृत्वगुण, माहितीचे वर्गीकरण आणि समन्वय साधणे हे मुलभूत गुण असल्यास काम करणे सहजसोपे जाते.

कामाचे स्वरूप

हॉस्पिटलमधील संपूर्ण कामाचे व्यवस्थापनाचे करणे त्याच्या हातात असते. कामांचं नियोजन त्यात समन्वय साधने, कर्मचारी नियंत्रण आणि गुणवत्तापूर्ण काम करवून घेणे तसेच हॉस्पिटलच्या आर्थिक आणि भौतिक वाढीवर लक्ष ठेवणे, किंबहुना उन्नतीवर प्राधान्याने लक्ष देण्याचेही काम त्यास करावे लागते. आरोग्यसेवेचा खर्च, उपकरणांची खरेदी, वापर आणि त्यावरील देखरेख, व्यवस्थापनातील बदल, सुधार, इतर दर्जेदार सेवांची उपलब्धता या बाबींही हॉस्पिटल मॅनेजरकडे येतात. तसेच हॉस्पिटलचा लौकिक वाढत राहील याची काळजीही त्याला घावी लागते. अर्थात हॉस्पिटल मॅनेजर हॉस्पिटलच्या प्रगतीतील महत्वाचा कणा असतो.

संधी

हे क्षेत्र अतिशय वेगाने विस्तारत असल्याने रोजगाराच्या अमाप संधी सहज उपलब्ध आहेत. देशाबाहेरही कामानिमित्त जाता येईल. मोठी हॉस्पिटल तसेच वेगवेगळ्या हेल्थ एजन्सीज, प्रयोगशाळा तसेच आरोग्यविषयक सेवा देणाऱ्या विविध संस्था, इंटरनॅशनल हेल्थकेअर ऑर्गनायझेशन्स, हेल्थ इन्शुरन्स कंपन्या, नर्सिंग होम, मनोरुग्णालये, पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट्स, हॉस्पिटल कन्सल्टिंग फर्म आदी ठिकाणी नोकरी मिळू शकते. काही वर्षांचा अनुभव प्राप्त झाल्यास सिनिअर हॉस्पिटल प्रबंधक म्हणूनही मोठ्या पदावर जाता येईल. तसेच मास्टर डिग्री झाल्यानंतर चार ते पाच वर्षाचा अनुभव मिळाल्यास अध्यापनही करता येईल.

वेतन

हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ज्युनिअर हॉस्पिटल मॅनेजर म्हणून १५ ते २० हजार वेतन मिळू शकते. तसेच अनुभवानंतर ४० हजारापर्यंत वेतन घेऊ शकता. परदेशात गेल्यास चांगले आकर्षक पॅकेज मिळू शकते. परदेशात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सुसंधी आहेत फक्त परदेश गमनाची तयारी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व हवे.

उपलब्ध कोर्सेस

• बॅचलर ऑफ हॉस्पिटल मॅनेजमेंट

• पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन हॉस्पिटल मॅनेजमेंट

• मास्टर ऑफ हॉस्पिटल अॅडमिनीस्ट्रेशन

• एमबीए इन हॉस्पिटल अॅडमिनीस्ट्रेशन

प्रशिक्षण संस्था

• भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नवी दिल्ली.

• टाटा इन्स्टीट्युट ऑफ सोशल सायन्स (टीस), मुंबई

• महात्मा गांधी मिशन इन्स्टीट्युट ऑफ हेल्थ सायन्स, मुंबई

• एमटीई सोसायटी कॉलेज ऑफ हॉस्पिटल मॅनेजमेंट, पुणे

• नसीम इन्स्टीट्युट ऑफ पॅरामेडिकल सायन्स, औरंगाबाद

• सिम्बोयसीस सेंटर ऑफ हेल्थ केअर, पुणे

• एडीएन इन्स्टीट्युट ऑफ पॅरामेडिकल सायन्स अँड हॉस्पिटल, नागपूर

• डी.वाय. पाटील विद्यापीठ, मुंबई

लेखक: सचिन के. पाटील, संपर्क: ९५२७७७७७३२

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 7/3/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate