मानवाच्या जीवनात आरोग्याला विशेष महत्व आहे. ‘आरोग्यमं धनसंपदा’ असेही म्हटले जाते. कालानुरूप तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराबरोबर मानवी आरोग्याच्या समस्याही वाढत आहेत. आधुनिकीकरणाचे फायदे होत असताना त्यातील तोट्यामुळे आरोग्यावरही विपरीत परिणाम होताना दिसतात. आपल्या देशाला प्राचीन काळापासून वैद्यकीय परंपरा असून वैद्यक शास्त्रातील अनेक बाबींवर आपण संशोधन करत आहोत. आरोग्याच्या बाबतीतील योगा, प्राणायाम, ध्यान अशा अनेक गोष्टी आपल्याला दीर्घ काळापासून लाभलेल्या आहेत. त्याचबरोबर अनेक उपचारपद्धतीही विकसित झालेल्या दिसतात. त्यातीलच एक म्हणजे फिजिओथेरेपी ही होय. याचा एकंदरीत अर्थ भौतिक- उपचार असा होतो. भौतिकशास्त्रातील काही सिद्धांताचा वापर मानवी आरोग्यासाठी या पद्धतीच्या माध्यमातून केला जातो. आजमितीस तीनशेहून जास्त फिजिओथेरेपी संस्था देशात पहावयास मिळतात. आरोग्याविषयीची वाढती जागरूकता पाहता या क्षेत्रात करिअर करण्याच्या अनेक संधी आता उपलब्ध होत आहेत. त्या अनुषंगाने करिअरनामा या लोकप्रिय सदरासाठी घेतलेला आढावा खास महान्यूजसाठी....

पात्रता

या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी बारावी (विज्ञान) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यात पदवीही बॅचलर ऑफ फिजिओथेरेपी (बीपीटी) संपादित करता येते. तसेच पदव्युत्तर पदवी मास्टर ऑफ फिजिओथेरेपी (एम.पी.टी.) घेता येईल. या विषयात पीएचडी अभ्यासक्रमही पूर्ण करता येतो. तसेच प्रवेशासाठी प्रवेश परीक्षाही घेतली जाते. त्यातून गुणानुक्रमे प्रवेश दिला जातो. तसेच अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सहा महिन्यांसाठी आंतरवासिताही करावी लागते.

आवश्यक गुण

फिजिओथेरेपीस्टकडे विषयातील प्रभुत्वाबरोबरच उत्तम संवाद कौशल्य असणेही आवश्यक आहे. तसेच धैर्याने प्रतिकूल परिस्थिती हाताळण्याची तयारी हवी.

काय शिकवले जाते?

शरीर रचना, शरीर क्रिया, शरीर कार्य, शस्त्रक्रिया, औषधशास्त्र, स्त्रीरोग आणि प्रसूती शास्त्र, अस्थिरोग शास्त्र, बालरोग शास्त्र, मज्जातंतू शास्त्र, हृदयरोग आणि श्वसनरोग शास्त्र आदी बरेच विषय यात अंतर्भूत असतात आणि या सर्व व्याधींवर कशा प्रकारे फिजिओथेरेपीने उपाय करावे हे वैज्ञानिक दृष्टीकोनातून आणि संशोधनातून शिकवलं जातं.

फिजिओथेरेपी प्रकार

• ओर्थोपेडीक फिजिओथेरेपी

• न्युरोलोजी फिजिओथेरेपी

• कार्डीऑलॉजी आणि रेस्पीरेटरी फिजिओथेरेपी

• स्पोर्ट्स फिजिओथेरेपी

• कम्युनिटी फिजिओथेरेपी

कामाच्या संधी

सरकारी, खाजगी इस्पितळे किंवा काही खाजगी संस्थात काम मिळू शकते. तसेच स्वतःची प्रशिक्षण संस्थाही सुरु करता येते. पगाराची सुरुवात २० हजारापासून होते आणि अनुभवानंतर ती वाढूही शकते.

प्रशिक्षण संस्था

• महाराष्ट्र इन्स्टीट्युट ऑफ मेडिकल सायन्स, लातूर

• श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी सिहगड, पुणे

• एमआयटी, पुणे

• के.जे. सोमय्या कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी, मुंबई

• महात्मा गांधी मिशन कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी, नवी मुंबई

• निहारिका कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी, नागपूर

• एसिपिएम कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी, धुळे

• डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी, जळगाव

लेखक: सचिन के. पाटील

माहिती स्रोत: महान्युज