অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आफ्रिकी विकास बँक

आफ्रिकी विकास बँक

आफ्रिकी विकास बँक : (आफ्रिकन डेव्हलपमेंट बँक). आफ्रिकेच्या आर्थिक आयोगाने पुरस्कार केल्यावरून सप्टेंबर १९६४ मध्ये ही बँक स्थापन होऊन जुले १९६६ पासून तिचे कार्य सुरू झाले. आफ्रिकेतील छत्तीस स्वतंत्र देश बँकेचे सदस्य असून हिचे प्रधान कार्यालय आबीजान (आयव्हरी कोस्ट) येथे आहे.

उद्दिष्टे

सदस्य-देशांच्या आर्थिक व सामाजिक विकासार्थ व्यक्तिशः किंवा त्या त्या देशातील राष्ट्रीय वित्तसंस्थांच्या सहाकार्याने ही बँक सरकारी वा खाजगी भांडवलगुंतवणुकीस प्रोत्साहन देते, कर्जे देते तसेच इतर संस्थांकरवी मिळणाऱ्या कर्जाबाबत हमी घेते आणि विकास प्रकल्पांबाबतचे आराखडे, अर्थप्रबंध व तांत्रिक साह्य उपलब्ध करते.

रचना

नियामक मंडळ आणि संचालक मंडळ अशी बँकेची दोन मंडळे असून नियामक मंडळावर प्रत्येक सदस्य-देशाचा एक, असे प्रतिनिधी असतात. संचालक मंडळ नऊ सदस्यांचे असून त्यावर बँकेच्या सर्वसाधारण कार्याची जबाबदारी असते. संचालक मंडळाचे अध्यक्ष म्हणून ट्युनिशियाचे अब्देलवाहाब लाबीदी ह्यांची नियुक्ती झाली असून केन्या, माली व नायजेरिया ह्या तीन देशांचे प्रतिनिधी उपाध्यक्ष म्हणून कार्य पाहतात.

भांडवल

बँकेचे अधिकृत भांडवल २५ कोटी डॉलर असून त्याचे २.५ लक्ष शेअर करण्यात आले आहेत. फक्त आफ्रिकी राष्ट्रांना शेअर घेण्याची मुभा आहे. एकूण भांडवलापैकी अर्धे भांडवल वसूल झालेले आणि अर्धे मागणीस्वरूपातील आहे. बँकेच्या सदस्य-देशावर वसूल भांडवल व मागणी-भांडवल ह्या दोहोंचेही समान शेअर विकत घेण्याचे बंधन आहे. आपल्या वाट्याची वसूल-भांडवलाची रक्कम एकूण सहा हप्त्यांमध्ये सुवर्णचलनात अथवा परिवर्तनीय चलनात, पाच वर्षांच्या काळात सदस्य-देशाने भरावयाची आहे. १९६८ अखेर खपलेले भांडवल २१.७८ कोटी डॉलरचे असून, त्यापैकी मोठा वाटा उचलणारी पहिली तीन राष्ट्रे संयुक्त अरब प्रजासत्ताक, अल्जीरिया व नायजेरिया ही होत. बँकेने दिलेल्या कर्जांचा तपशील पुढील तक्त्यावरून स्पष्ट होईल.

बँकेने स्थापनेपासून ३० जून १९७२ अखेर २० सदस्य-देशांतील ३६ प्रकल्पांना (यांतच ४ बहुदेशीय व वरील तक्त्यातील प्रकल्प अंतर्भूत) ६.२० कोटी डॉलर रकमेची कर्जे दिली.

सध्या बँकेने संयुक्त राष्ट्र-विकास कार्यक्रमांच्या सहकार्याने विविध सदस्य-देशांबाबत गुंतवणूक-पूर्व अभ्यास योजना होती घेतली असून त्यासाठी गुंतवणूक-पूर्व विभाग स्थापन केला आहे. विद्युतशक्ती, वाहतूक व संदेशवहन इ. क्षेत्रांमधील बहुदेशीय प्रकल्पांचा समन्वय साधण्याकरिता आफ्रिकी आयोग, जागतिक बँक आणि संयुक्त राष्ट्रांचा विकास कार्यक्रम ह्यांच्या सहकार्याने एक समन्वय समिती स्थापण्यात आली असून तिचे अध्यक्षपद ह्या बँकेस मिळाले आहे. बँकेने फाओ (अन्न व शेती संघटना) व यूनेस्को ह्या संस्थांशी सहकार्याचे करार केले असून इतर विशेष संस्थांशीही बँक संपर्क साधत आहे.

आपल्या भांडवलामध्ये वाढ व्हावी आणि कमी व्याजाने गरजू सदस्य-देशांना पैसा देता यावा, म्हणून बँकेने आफ्रिकी विकास निधी स्थापन करण्याचे ठरविले असून त्या निधीमध्ये प्रगत राष्ट्रांना भाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. १५ औद्योगिक राष्ट्रांनी ५७० लक्ष डॉलर आफ्रिकी विकास निधीला देण्याचे ठरविले आहे. आतापर्यंत (ऑगस्ट १९७३) सात राष्ट्रांनी एकूण ३१० लक्ष डॉलर देण्याचे आश्वासन दिले असून त्यांत जपानचा पहिला क्रम (१६० लक्ष डॉलर) लागतो. २ जुलै १९७३ रोजी लुसाका (झँबिया) येथे बँकेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत आफ्रिकी विकास निधीची स्थापना करण्यात आली.

खाजगी बँकांच्या सहकार्याने आफ्रिकी विकास बँकेने आफ्रिकेत गुंतवणूक व विकास घडवून आणण्याकरिता एका आंतरराष्ट्रीय अर्थ निगमाची (सोशिएत इंटरनॅशनल फिनॅन्शियल कॉर्पोरेशन फॉर इन्व्हेस्टमेंट अँड डेव्हलपमेंट इन आफ्रिका सिफिडा) १.२५ कोट डॉलर भांडवलावर लक्सेंबर्ग येथे जुलै १९७० मध्ये स्थापना केली.

घाना व समीपराष्ट्रे ह्यांमध्ये आर्थिक सहकार्याची कितपत वृद्धी करणे शक्य आहे, ह्यासंबंधात बँक अभ्यास-अहवाल तयार करीत आहे. त्याचप्रमाणे संयुक्त राष्ट्रांच्या सहकार्याने चौदा पश्चिमी आफ्रिकी देशांमधील पर्यटन सर्वेक्षणाचे कार्य बँकेने हाती घेतले आहे. वार्षिक अहवाल आणि त्रैमासिक विवरणपत्रे ही बँकेची  प्रकाशने आहेत.

 

लेखक - वि. रा. गद्रे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate