অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

उत्पादन

उत्पादन

मानवी गरजा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे पूर्ण करण्याची शक्ती असलेल्या वस्तूंची वा सेवांची निर्मिती. विज्ञानातील पदार्थ व शक्ती यांच्या अविनाशित्वाच्या सिद्धांतानुसार या विश्वात कोणत्याही नव्या पदार्थाची अथवा शक्तीची भर टाकणे मनुष्याच्या शक्तीपलीकडचे आहे. म्हणून वस्तू उत्पादन करणे म्हणजे निसर्गाने पुरविलेल्या पदार्थांत मनुष्याच्या गरजा तृप्त करण्याचे सामर्थ्य (उपयोगिता) उत्पन्न करणे होय.

निसर्ग मनुष्याला जो कच्चा माल पुरवीत असतो, त्याचे इष्ट वस्तूत रूपांतर करण्याचे काम मनुष्याला करावयाचे असते. मनुष्य उत्पादन करतो, तेव्हा तो उपयोगितेची निर्मिती करतो. ही निर्मिती रूपजन्य, स्थलजन्य आणि कालजन्य यांपैकी कोणत्याही प्रकारची असू शकते. पदार्थांच्या अंगी मनुष्याचा गरजा पूर्ण करण्याचे सामर्थ्य येण्यासाठी त्यांना विशिष्ट रूप आणि आकार प्राप्त होणे आवश्यक असते. सोनार सुवर्णकणातून दागिने निर्माण करतो व सुतार लाकूड कापून व रंधून टेबलखुर्ची बनवितो, तेव्हा सोनार व सुतार रूप-उपयोगितेची निर्मिती करीत असतात. अनेकदा पदार्थ एके ठिकाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. ज्या ठिकाणी त्या पदार्थांची कमतरता असते, तेथे ते पदार्थ हलवून त्यांत स्थल-उपयोगिता निर्माण करता येते. म्हैसूरमध्ये मिळणारे चंदन मुंबईला उपलब्ध करून देण्याने चंदनाची स्थल-उपयोगिता वाढते. मनुष्याच्या गरजा पूर्ण होण्यासाठी त्याला वस्तू हव्या त्या वेळी उपलब्ध करून देणे, हेदेखील महत्त्वाचे असते. आज तयार झालेल्या वस्तूला कालांतराने उत्पन्न होणारी गरज पूर्ण करण्याचे जे सामर्थ्य लाभते, त्याला काल-उपयोगिता म्हणतात. हंगामात काढलेली पिके कोठारात ठेवून बाराही महिने विकली जातात किंवा फळे, मासे यांसारख्या नाशवंत वस्तू हवाबंद डब्यात ठेवल्या जातात, तेव्हा काल- उपयोगितेची निर्मिती होत असते उपयोगिता.

व्यवहारात उत्पादनाचा संबंध केवळ कृषी व निर्मितिउद्योग ह्यांतील मूर्त वस्तूशी लावला जातो. तसे मानल्यास वाहतूक, व्यापार, खरेदीविक्री आणि व्यक्तीगत सेवा या गोष्टी उत्पादनाच्या व्याख्येतून वगळाव्या लागतील. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत तशा त्या वगळल्या जात असत. अठराव्या शतकातील प्रकृतिवादी अर्थशास्त्रज्ञांनी कृषिक्षेत्रातील वस्तूंचाच केवळ विचार केला आणि अ‍ॅडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो व जॉन स्ट्यूअर्ट मिल या अर्थशास्त्रज्ञांनी उत्पादनाच्या कल्पनेत निर्मिति- उद्योगात उत्पादित होणाऱ्या वस्तूंचाही समावेश केला. मात्र मूर्त पदार्थांची निर्मिती म्हणजेच उत्पादन, हा आग्रह त्यांनी सोडला नाही. जेव्हन्झ व कार्ल मेंगर या अर्थशास्त्रज्ञांनी उत्पादनाची व्याख्या व्यापक केली आणि तीत मूर्त वस्तूंच्या उत्पादनाबरोबर सेवेच्या निर्मितीचा अंतर्भाव केला.

मानवी गरजांची तृप्ती करणारी कोणतीही निर्मितीची कृती उत्पादनात मोडते, असे त्यांचे प्रतिपादन होते. वस्तू उपभोक्त्यापाशी पोहोचल्याशिवाय उत्पादनाची प्रक्रिया पूर्ण होत नाही, असा अर्थशास्त्रज्ञांचा आग्रह असल्याने वितरणासाठी आवश्यक असलेल्या वाहतूक, ठोक व्यापार, किरकोळ व्यापार, साठवण या क्रिया उत्पादनात अंतर्भूत होतात. औषधांची निर्मिती म्हणजे उत्पादक श्रम व रोगाचे निदान करून औषधांची शिफारस करणाऱ्या डॉक्टरांचे श्रम हे अनुत्पादक श्रम, असा भेद करावा की नाही अशा स्वरूपाच्या तात्त्विक वादावर पडदा पडला. देशात सर्व क्षेत्रांत निर्माण होणाऱ्या सर्व तऱ्हेच्या मूर्त वस्तू आणि शिक्षक, डॉक्टर, वकील, गवई आदी व्यावसायिकांची सेवा म्हणजे देशातील एकूण उत्पादन, हा अर्थ आता सर्वमान्य झाला आहे. उत्पादनाचे काही प्रकार सोबतच्या आकृतीत दाखविले आहेत.

उत्पादनाचे काही प्रकार

कोणत्याही वस्तूचे उत्पादन हे चार निरनिराळ्या घटकांच्या सहकार्याचे फल असते. त्यांपैकी पहिला घटक म्हणजे निसर्गाच्या देणग्या. त्यात हवा, पाणी, जमीन, डोंगर, खाणी, जंगले या सर्व प्रकारच्या नैसर्गिक सामग्रीचा समावेश झालेला असला, तरी या घटकात ‘भूमी’ असे नाव आहे. भूमीशिवाय कोणत्याही वस्तूचे उत्पादन शक्य नसते. कारण शून्यातून काही उत्पादन करण्याचे सामर्थ्य मनुष्याच्या अंगी नाही. भूमीइतकाच दुसरा मूलभूत महत्वाचा उत्पादक घटक म्हणजे ‘मानवी श्रम’. यात उत्पादनासाठी केलेल्या कुशल, अकुशल इ. सर्व प्रकारच्या मानवी श्रमांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे उत्पादनासाठी ‘भांडवला’ची गरज आहे. केवळ पैसा म्हणजे भांडवल नव्हे. उत्पादनास साहाय्यभूत होणारी अवजारे व आयुधे, ही भांडवली सामग्री होय. या वस्तू श्रमनिर्मित असतात. यंत्रांच्या शोधामुळे जुनी प्रत्यक्ष उत्पादन पद्धती बदलून तिच्या जागी टप्प्याटप्प्याची नवी उत्पादन पद्धती रूढ झाली आहे. या उत्पादन पद्धतीत भांडवलाला विशेष महत्त्व आलेले असल्यामुळे तिला ‘भांडवलप्रधान उत्पादन पद्धती’म्हटले जाते. या पद्धतीनुसार मानवी श्रमाच्या योगाने काही नैसर्गिक संपत्तीचे एकदम उपभोग्य वस्तूत रूपांतर न होता, प्रथम त्या संपत्तीपासून यंत्रे, उपकरणे, अवजारे इ. उत्पादन साधने तयार होतात आणि त्यांस मानवी श्रमशक्तीची जोड मिळून उपभोग्य वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते.

या तीन उत्पादक घटकांची जुळवाजुळव करून उत्पादनाविषयीचे निर्णय घेण्यापासून त्यांची अंमलबजावणी करण्यापर्यंतची जबाबदारी पार पाडणारा ‘प्रवर्तक’हा चौथा स्वतंत्र घटक मानला जातो. औद्योगिक क्रांतीनंतर उत्पादनाचे सुटसुटीत स्वरूप पार बदलून ते आता गुंतागुंतीचे झाले आहे. अशा परिस्थितीत उद्योगातील धोके पतकरण्यासाठी पुढे येणाऱ्या प्रवर्तकाला उत्पादन यंत्रणेत महत्त्वपूर्ण स्थान मिळणे स्वाभाविकच आहे.

उत्पादनात वाढ झाल्याशिवाय राहणीमानाची पातळी वाढणार नाही. एकूण उत्पादनात हे कच्च्या मालाचा दर्जा व परिमाण, मजूर व अवजारे, तांत्रिक ज्ञानाची मर्यादा, औद्योगिक (आर्थिक) संघटनेचे स्वरूप यांसारख्या गोष्टींवर अवलंबून असते. यांतील एक वा अनेक घटकांत बदल झाल्यास उत्पादनात पालट होऊ शकेल.

आधुनिक उत्पादनात उत्पादक घटकांची जुळवाजुळव करून प्रत्यक्ष उत्पादन सुरू करताना उत्पादकाला विविध प्रकारच्या जटिल समस्यांचा विचार करावा लागतो. माल लहान प्रमाणावर उत्पादित करावयाचा की मोठ्या प्रमाणावर, यंत्रांचा वापर कितपत करावयाचा, उत्पादनाची स्थाननिश्चिती कशी करावयाची आदी प्रश्नांवर त्याला प्रारंभी निर्णय घ्यावा लागतो. मोठ्या प्रमाणावर उत्पादन केल्यास सूक्ष्म श्रमविभागणी व यंत्रांचा वापर अपरिहार्य ठरतो. उत्पादनातील गुंतवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असेल, तर कारखान्याला अंतर्गत व बाह्य काटकसरी उपलब्ध होतात. उत्पादनसंस्थेचा आकार जेवढा मोठा, तेवढ्या या काटकसरी जास्त प्रमाणात मिळतात. उत्पादनसंस्थांचे केंद्रीकरण झाले, तर विशेषीकरणाचे अनेक फायदे मिळू शकतात. उत्पादन स्थळाची निवड

योग्य तऱ्हेने केल्यास उत्पादनखर्चात कपात होते. सारांश, कमीतकमी उत्पादनखर्चात उत्पादन कसे होईल, याकडे उत्पादकाचे लक्ष असते. केव्हा, कोठे, कशाचे व किती उत्पादन करावयाचे हे ठरविताना उत्पादकाचे लक्ष नफ्यावर असते. जास्तीतजास्त नफा कसा मिळेल, याची प्रेरणा त्याच्या उत्पादनविषयक आर्थिक निर्णयामागे असते.

भूमी, श्रम व भांडवल या तीन घटकांना एकत्र आणून त्यांना उत्पादनाच्या कामी राबविण्याचे कार्य करीत असताना त्या घटकांचे परस्परांशी प्रमाण किती असावे, हे प्रवर्तक ठरवीत असतो. कारण एकूण उत्पादन उत्पादक घटकांच्या वैयक्तिक गुणविशेषांवर जसे अवलंबून असते, तसेच ते उत्पादक घटकांचे परस्परांत प्रमाण काय आहे, यावरही अवलंबून असते. या प्रमाणात बदल झाल्यास उत्पादनखर्चाच्या प्रमाणात आणि उत्पादन प्रयत्नांपासून निर्माण होणाऱ्या फलांच्या प्रमाणात बदल होत जातात. उत्पादक घटकांचे परस्परांतील प्रमाण आणि उत्पादन प्रयत्नातून प्राप्त होणाऱ्या फलांचे प्रमाण, यांतील संबंध निश्चित करणाऱ्या सिद्धांतांना प्रतिलाभाचे नियम म्हटले जाते [ प्रतिलाभाचे नियम].

एकंदरीत उत्पादनाच्या कोणत्याही क्षेत्रात घटत्या उत्पादनफलांची प्रवृत्ती ही मूलभूत प्रवृत्ती आहे. शेती व्यवसायात ती अधिक प्रकर्षाने जाणवते व अन्य व्यवसायात तिचा अंमल विशिष्ट मर्यादेनंतर सुरू होतो. कोणत्याही व्यवसायक्षेत्रात तिचा अंमल काही मर्यादेपर्यंत पुढे ढकलता येईल, पण तो संपूर्णपणे टाळणे अशक्यप्राय असते. घटत्या प्रतिलाभांची ही प्रवृत्ती अस्तित्वात नसती, तर जमिनीच्या छोट्या तुकड्यावर सर्व जगाला पुरेल एवढे पीक काढता आले असते.

मीतकमी उत्पादन परिव्यय व जास्तीतजास्त नफा ही उद्दिष्टे डोळ्यापुढे ठेवल्यानंतर उत्पादकाला वस्तूंचे उत्पादन किती असावे आणि उत्पादक घटकांचे परस्परप्रमाण कोणते असावे, या दोन समस्या सोडवाव्या लागतात. जेव्हा उत्पादक घटकाच्या वापरापासून मिळणारा उत्पाद विकून हाती पडणारी रक्कम त्या उत्पादक घटकाला द्यावयाच्या मोबदल्याएवढी होते, तेव्हा कमाल नफ्याची मर्यादा गाठली जाते असे म्हणता येईल. तांत्रिक भाषेत सांगावयाचे म्हणजे जेव्हा सीमांत आय व सीमांत परिव्यय समान होतात, तेव्हा उत्पादक उत्पादनवाढ थांबवितो. या टप्प्यानंतरही उत्पादनवाढ चालू राहिली, तर घटत्या उत्पादनफलांच्या नियमानुसार फल कमी होते व परिव्यय वाढतो व उत्पादकाला नुकसान सोसावे लागते.

निरनिराळ्या घटकांची कोणत्या प्रमाणात जुळणी करणे किफायतशीर ठरेल, हे ठरविताना उत्पादक तुलनेने महाग असलेल्या घटकाऐवजी पर्यायी व स्वस्त घटकाची योजना करील. यंत्रे महाग असल्यास अधिक मजूर व कमी यंत्रे वापरील व मजुरांचे दर वाढल्यास मजुरांच्या जागी यंत्रांचा वापर करण्याचा प्रयत्न करील. उत्पादक घटकांपासून मिळणारा सीमांत आय व सीमांत परिव्यय यांच्यामधील प्रमाण सर्व घटकांच्या बाबतीत सम आणणे हे उत्पादकाच्या दृष्टीने सर्वांत इष्ट असते.

लेखक - सुभाष भेण्डे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate