অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

उत्पादन परिव्यय सिद्धांत

उत्पादनसंस्थेला वस्तूचे उत्पादन करण्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे खर्च करावे लागतात. उत्पादनाला सुरुवात करण्यापूर्वी कारखान्यासाठी इमारती बांधाव्या लागतात; विपुल पाणीपुरवठ्याची आणि जळणाची व्यवस्था करून घ्यावी लागते; यंत्रसामग्री खरेदी करून कारखान्याची उभारणी करावी लागते; पुरेसे खेळते भांडवल मिळवावे लागते. ह्या अधःसंरचनेची तरतूद झाल्यानंतर आवश्यक तंत्रविशारद, व्यवस्थापकीय कर्मचारी आणि मजूर नेमावे लागतात. प्रत्यक्ष उत्पादन सुरू झाल्यानंतरही कच्चा माल, मजुरांची सामाजिक सुरक्षा, चालू दुरुस्ती, कर यांसारख्या आवश्यक गोष्टींवर खर्च करावा लागतो. उत्पादनसंस्थेला कराव्या लागणाऱ्या अशा सर्व खर्चाचा समावेश वस्तूच्या उत्पादन परिव्ययात होतो.

वास्तविक उत्पादन परिव्यय आणि वैकल्पिक उत्पादन परिव्यय

पैशाच्या रूपातील उत्पादन परिव्ययाचा विचार व्यक्तीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असला, तरी समाजाच्या दृष्टिकोनातून वास्तविक परिव्ययाचा विचार महत्त्वपूर्ण ठरतो. वस्तूंचे उत्पादन करताना श्रमिकाला व प्रवर्तकाला शारीरिक आणि बौद्धिक कष्ट करावे लागतात. उत्पादनासाठी भांडवल उभारावयाचे, ते चालू उपभोगाचा त्याग करून टाकलेल्या शिलकीतून जमा होते. भांडवल म्हणजे संचित मानवी श्रमच होत. वास्तविक परिव्ययाच्या तत्त्वानुसार हे कष्ट व त्याग म्हणजे उत्पादनाची खरी किंमत होय. समाजातील संबधित व्यक्तींनी कष्ट व त्याग करण्यास प्रवृत्त व्हावे, म्हणून त्यांना पैशाच्या रूपात मोबदला द्यावा लागतो. हा मोबदला कष्ट आणि त्याग यांच्या प्रमाणात दिला जाणे स्वाभाविक आहे. सनातन अर्थशास्त्रज्ञांनी उत्पादनाचा परिव्यय उपयोगात आणलेल्या श्रमशक्तीच्या स्वरूपात मोजून ‘श्रमानुसार मूल्यनिर्धारण सिद्धांता’चा पुरस्कार केला. हा सिद्धांत म्हणजे वास्तविक उत्पादन परिव्यय सिद्धांतच होता.

वास्तविक परिव्ययाच्या कल्पनेत तथ्यांश असला, तरी तीत काही व्यावहारिक अडचणी आहेत. उत्पादन-घटकांचा मोबदला श्रम व त्याग यांच्या प्रमाणात ठरविला जाणार असेल, तर त्यांचे अचूक मापन करणे जरूर असते. परंतु श्रमिकाचे कष्ट व भांडवल जमा करणाऱ्याचा त्याग यांचे मोजमाप पैशाच्या स्वरूपात करणे शक्य नसते. दुसरी अडचण अशी की, मानवी श्रमशक्तीचा मोबदला श्रमावर अवलंबून ठेवणे वस्तुस्थितीला धरून होणार नाही. एकाच प्रकारचे काम करणाऱ्या कामगारांचे वेतन सारखेच असते; परंतु दोन कामगारांची शारीरिक प्रकृती सारखी नसेल, तर त्यांच्यावर सारख्याच कामाचा पडणारा ताण समान असणार नाही. शिवाय कामगारांची कार्यक्षमता एकसारखी नसते. म्हणून सर्व प्रकारचे श्रम एकाच मापाने मोजणे समर्पक नाही. या कारणामुळे वास्तविक परिव्ययाची कल्पना असमाधानकारक ठरते.

उत्पादक साधनसामग्रीला वैकल्पिक उपयोग असतात. म्हणून कोणत्याही वस्तूच्या उत्पादन परिव्ययाची मोजदाद वास्तविक परिव्ययाच्या स्वरूपात न करता, वैकल्पिक परिव्ययाच्या स्वरूपात करणे अधिक रास्त आहे. मौद्रिक अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्याही उत्पादक घटकाचा वैकल्पिक परिव्यय त्याच्या बदली किंमतीने ठरतो. म्हणून वस्तूच्या उत्पादनाचा परिव्यय म्हणजेच उत्पादक साधनसामग्रीला दुसऱ्या कोणत्याही वस्तूच्या उत्पादनाच्या कामी न लावता, त्या विशिष्ट वस्तूच्या उत्पादनाला लावून घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी दिलेली किंवा देऊ केलेली बदली किंमत होय. वैकल्पिक परिव्ययाचे हे तत्त्व सर्व उत्पादक घटकांना तसेच सर्व प्रकारच्या उद्योगधंद्यांना लागू आहे. वैकल्पिक उत्पादन परिव्यय नेहमीच नगद खर्चाच्या स्वरूपात असतो असे नाही. कारण स्वतःच्याच उद्योगधंद्याचे व्यवस्थापन करणारा मालक आपल्या स्वतःच्या श्रमाची किंमत, आपण स्वतः दुसऱ्या कोणाच्या उत्पादनसंस्थेचे व्यवस्थापन केल्यास जे कमीतकमी वेतन मिळू शकेल, त्या रकमेने ठरवितो आणि ती रक्कम वस्तूच्या वैकल्पिक उत्पादन परिव्ययामध्ये समाविष्ट करतो.

स्थिर परिव्यय आणि बदलता परिव्यय

उत्पादनसंस्थेच्या उत्पादन परिव्ययामध्ये स्थिर परिव्यय आणि बदलता परिव्यय असे दोन भाग येतात. वस्तूचे उत्पादन सुरू करण्यापूर्वी उत्पादनसंस्था जमीन, यंत्रसामग्री, कायम स्वरूपाचा कर्मचारीवर्ग यांवर जो खर्च करते, तो सर्व खर्च स्थिर परिव्यय म्हणून गणला जातो. उत्पादनाला सुरुवात केल्यावर उत्पादनसंस्थेला कच्चा माल खरेदी करण्यासाठी, तात्पुरत्या कामगारांना रोजंदारी देण्यासाठी, वीज, पाणी पुरवठा, सामाजिक सुरक्षेसाठी देणी, खेळत्या भांडवलावरही व्याज, घसारा, वाहतूक, सरकारला द्यावयाचे कर यांवर जो खर्च करावा लागतो, तो निर्मितीच्या प्रमाणात कमीअधिक होत असतो. म्हणून अशा खर्चाला बदलता परिव्यय म्हणतात. अल्पकाळात उत्पादन संस्था वस्तूच्या उत्पादनाचे परिमाण वाढवीत गेल्यास, सुरुवातीला दर नगामागील स्थिर परिव्यय कमी कमी होत असतो आणि स्थापित उत्पादनशक्तीचा सुयोग्य प्रमाणात परिपूर्ण उपयोग केला जातो, तेव्हा सरासरी स्थिर परिव्यय न्यूनतम होतो. तसेच उत्पादन परिमाणाच्या वाढीबरोबर दर नगाचा बदलता परिव्यय सुरुवातीला कमीकमी होत जातो; कारण एकंदर बदलता परिव्यय वाढत असला, तरी वस्तुपरिमाणाच्या वाढीचे प्रमाण बदलत्या परिव्ययाच्या वाढीच्या प्रमाणापेक्षा अधिक असते; म्हणजे बदलत्या उत्पादनसाधनांची उत्पादकता वाढत असते. परंतु कालांतराने सरासरी बदलता परिव्यय न्यूनतम होतो आणि त्यानंतर वस्तुपरिणामात वाढ केल्यास तो वाढत जातो.

आ. १. अल्पकालीन वस्तुपरिमाण व उत्पादन परिव्यय परस्परसंबंधदर्शक आलेख.

 

 

 

 

सरासरी उत्पादन परिव्यय आणि सीमांत उत्पादन परिव्यय

उत्पादनसंस्थेने उत्पादन केलेल्या वस्तुपरिमाणाने एकंदर उत्पादन परिव्ययाला भागिले असता, सरासरी उत्पादन परिव्यय येतो. अल्पकाळात सुरुवातीला उत्पादसंस्थेच्या वस्तुपरिमाणाचा सरासरी स्थिर परिव्यय आणि सरासरी बदलता परिव्यय कमी कमी होत असल्याकारणाने, एकंदर सरासरी उत्पादन परिव्ययसुद्धा कमीकमी होत जातो आणि कालांतराने तो न्यूनतम होऊन, पुढे सारखा वाढत जातो. आकृती क्र. १ मध्ये दाखविल्याप्रमाणे सरासरी परिव्यय रेषा ‘सव्य’ सुरुवातीला उतरती असून ‘म’ बिंदूजवळ सरासरी परिव्यय न्यूनतम झाला आहे आणि त्या बिंदूनंतर ती रेषा चढती दाखविली आहे. वस्तूचे परिमाण नगानगाने वाढविले असता, प्रत्येक वेळी समग्र उत्पादन परिव्ययामध्ये जी वाढ होते, तिला सीमांत उत्पादन परिव्यय असे म्हणतात. आकृतीत दर्शविल्याप्रमाणे सीमांत परिव्यय सुरुवातीला कमीकमी होत जातो आणि नंतर न्यूनतम झाल्यावर सारखा वाढत जातो. सीमांत परिव्यय रेषेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ती रेषा, सरासरी बदलता परिव्यय रेषा व एकूण सरासरी परिव्यय रेषा या दोहोंच्या न्यूनतम बिंदूंना छेदून जाते.

आ. २. दीर्घकालीन वस्तुपरिमाण व उत्पादन परिव्यय यांचा परस्परसंबंधदर्शक आलेख.

 

 

 

 

 

दीर्घकाळात उत्पादनसंस्थेच्या स्थिर परिव्यय आणि बदलता परिव्यय हा फरक नष्ट होतो; कारण उत्पादनसंस्थेची इमारत, यंत्रसामग्री इ. दीर्घकाळात बदलू शकतात. म्हणून सर्व प्रकारचा उत्पादन परिव्यय हा बदलता परिव्यय असतो. दीर्घकाळात उत्पादनसंस्था यंत्रसामग्रीच्या तसेच उत्पादनशक्तीच्या बदलाच्या शक्याशक्यतेचा विचार करून कोणत्या आकारमानाचे संयंत्र योग्य होईल, हे ठरवीत असते. निरनिराळ्या आकारमानाची संयंत्रे पर्याप्त क्षमतेपर्यंत वापरून, कोणते विशिष्ट संयंत्र अंगीकारावे, याविषयीचा निर्णय उत्पादनसंस्थेला घ्यावयाचा असतो. म्हणून दीर्घकालात सरासरी परिव्यय रेषा आणि तिला अनुसरून असलेली सीमांत परिव्यय रेषा अशा दोनच उत्पादन परिव्यय रेषा असतात. सरासरी परिव्ययरेषेच्या प्रत्येक बिंदूपाशी पर्याप्त क्षमतेपर्यंत चालविलेले एक विशिष्ट संयंत्र दर्शविलेले असते. आकृती क्र. २ मध्ये दाखविल्याप्रमाणे दीर्घकालात ‘दी सव्य’ आणि ‘दी सीव्य’ अशा सरासरी परिव्यय रेषा आणि सीमांत परिव्यय रेषा असतात.

अल्पकाळात उत्पादनसंस्थेच्या उत्पादन परिव्ययात होणारे बदल असमप्रमाण- प्रतिलाभाच्या नियमाने स्पष्ट केले जातात; परंतु दीर्घकाळात हा नियम लागू होत नाही; कारण सर्वच उत्पादन साधनांची परिमाणे बदलत असतात. म्हणून बदलत्या परिमाणाच्या प्रतिलाभांनी दीर्घकाळात उत्पादन परिव्ययातील बदल स्पष्ट केले जातात. या बदलत्या परिमाणाच्या प्रतिलाभांचे कारण म्हणजे अंतर्गत आणि बाह्य काटकसरी आणि बेबचती होत. पूर्ण स्पर्धेच्या बाजारपरिस्थितीत दीर्घकाळात प्रत्येक उत्पादनसंस्था आणि सबंध उद्योगधंदा संतुलनावस्थेत असताना, वस्तूची किंमत उत्पादनसंस्थेच्या सरासरी आणि सीमांत परिव्ययाबरोबर असते. त्यावेळी प्रत्येक उत्पादनसंस्थेचा सरासरी परिव्यय कमीतकमी असून सारखाच असतो. अशा वेळी प्रत्येक उत्पादनसंस्था पर्याप्त वस्तु-परिमाण उत्पादन करीत असते. प्रत्येक उद्योगधंद्याच्या वस्तूची एकंदर मागणी एकंदर पुरवठ्याबरोबर असते. म्हणून समाजाच्या अधिकतम कल्याणाच्या दृष्टीने, वस्तूची किंमत वस्तुपरिमाणाच्या सीमांत परिव्ययाबरोबर करावी, असा निष्कर्ष काढला जातो. परंतु पिगू ह्या अर्थशास्त्रज्ञाच्या मते या सीमांत उत्पादन परिव्ययामध्ये बाह्य बेबचतींचा समावेश झालेला असतो; म्हणून अधिकतम समाजकल्याण साधत नाही.

सीमांत सामाजिक उत्पादन परिव्यय आणि सीमांत खाजगी उत्पादन परिव्यय

वस्तूचे उत्पादन करीत असताना त्या वस्तूसाठी कराव्या लागणाऱ्या परिव्ययाचा निर्देश खाजगी उत्पादन परिव्यय म्हणून केला जातो. परंतु असे उत्पादन करीत असताना समाजाला काही आर्थिक हानी पोहोचत असेल, तर त्या हानीचाही समावेश करून त्या वस्तूच्या उत्पादनासाठी होणारा सामाजिक उत्पादन परिव्यय काढला पाहिजे. रेल्वे एंजिनातील ठिणग्यांमुळे आजूबाजूच्या जंगलाची हानी होत असेल, परंतु रेल्वे कंपनीला त्या हानीची भरपाई करावी लागत नसेल, तर रेल्वे कंपनी त्या हानीचा विचार आपल्या उत्पादन परिव्ययाची मोजदाद करताना करणार नाही, असे उदाहरण पिगूने दिले आहे. परंतु रेल्वेमुळे आपल्या एकूण उत्पन्नात किती वाढ झाली, याचा विचार करताना समाजात ही हानीही हिशोबात घेतली पाहिजे. उत्पादन प्रयत्नात बाह्य समाजावर होणारे असे परिणाम हानिकारक असतील, त्याप्रमाणे काही वेळा उपकारकही असू शकतील. सामाजिक उत्पादन परिव्ययाचा हिशोब करताना, खाजगी परिव्ययात त्या दृष्टीने आवश्यक ती वजावट वा बेरीज करणे आवश्यक असते.

पिगूच्या मते समाजाच्या अधिकतम कल्याणासाठी वस्तु परिमाणाच्या सीमांत सामाजिक उत्पादन परिव्ययाची त्याच्या सीमांत खाजगी उत्पादन परिव्ययाशी बरोबरी झाली पाहिजे. म्हणजे साधनसामग्रीच्या सीमांत सामाजिक वट्ट फळाची आणि तिच्या सीमांत खाजगी वट्ट फळाची बरोबरी झाली पाहिजे आणि सर्व उद्योगधंद्यांत व सर्व ठिकाणी साधन-सामग्रीचे सीमांत सामाजिक वट्ट फळ सारखे झाले पाहिजे. यासाठी सीमांत सामाजिक उत्पादन परिव्यय सीमांत खाजगी उत्पादन परिव्ययापेक्षा अधिक असल्यास, समाजाला पोहोचणारी हानी व तिचा समाजावरील भार दूर करण्याच्या दृष्टीने सरकारने दक्षता घेणे आवश्यक असते. जमीनमालकांचा एक वर्ग व जमीन करणाऱ्यांचा दुसरा वर्ग यांच्या अस्तित्वामुळे अशा प्रकारची तफावत शेतीव्यवसायामध्ये निर्माण होते. म्हणून ‘कसेल त्याची जमीन’ या भूमीधारणाकायद्याचे पिगूने प्रतिपादन केले. तसेच वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शहरांची लोकवस्ती वाढून, शहरांना बकाली स्वरूप प्राप्त होते; शहरांची लोकसंख्या प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे सामाजिक आरोग्याला धोका पोहोचतो. त्यामुळे सीमांत सामाजिक वट्ट फळ आणि सीमांत खाजगी वट्ट फळ यांमध्ये तफावत होते. ती तफावत नष्ट करण्यासाठी औद्योगिक विकेंद्रीकरणासारखे काही निश्चित उपाय सुचविण्यात येतात.

 

संदर्भ : 1. Chamberlin, E.H. The Theory of Monopolistic Competition : A Reorientation of the Theory of Value, Harvard, 1956.

2. Pigou, A. C. The Economic of Welfare, London, 1960 3. Ryan, J. W. L. Price Theory, London, 1964.

 

लेखक - गो. चिं. सुर्वे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate