অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

औद्योगिक क्रांति

वस्तूंच्या उत्पादनासाठी यंत्रसामग्रीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला गेल्याने देशाच्या अर्थकारणात ज्या कालात औद्योगिकीकरणाला जोराची चालना मिळते, त्यास देशाच्या इतिहासातील औद्योगिक क्रांतीचा कालखंड म्हणतात. १७५० नंतर शंभर एक वर्षे ग्रेट ब्रिटनमध्ये निरनिराळ्या क्षेत्रांत नवनवीन शोध लागून पारंपरिक कृषिप्रधान समाजाचे मोठ्या झपाट्याने औद्योगिक समाजात रूपांतर झाले. या क्रांतिकारक बदलास फ्रेंच राजकीय अर्थशास्त्रज्ञ जेरोम अ‍ॅडॉल्फ ब्‍लांकी ह्याने ‘औद्योगिक क्रांती’ हे नाव दिले व नामवंत इतिहासकार टॉयन्बीने ही संज्ञा लोकप्रिय केली. औद्योगिक क्रांती हा एक निश्चित कालखंड नसून ती एक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया जगातील निरनिराळ्या देशांत निरनिराळ्या काळांत घडून आल्याचे दिसते. औद्योगिक क्रांतीचे लोण चीन, भारत ह्यांसारख्या देशांत पोहोचण्यास विसावे शतक उजाडावे लागले. मात्र या शतकात अमेरिकेची संयुक्त संस्थाने व पश्चिम यूरोपमधील देश दुसऱ्या क्रांतीच्या उंबरठ्यावर उभे असलेले दिसतात.

पहिल्या औद्योगिक क्रांतीचा ब्रिटनमधून यूरोपीय देशांत प्रसार झाला किंवा यूरोपातून जगातील इतर देशांत झाला; या प्रक्रियेला काही वेळा ‘दुसरी औद्योगिक क्रांती’ ही संज्ञा वापरली गेली. तर काही वेळा, बाष्पशक्तीची जागा विद्युत्‌शक्तीने घेणे ह्यांसारख्या विकासाच्या नवनव्या अवस्थाही ह्या संज्ञेन दर्शविल्या गेल्या. औद्योगिक क्रांती ह्या संज्ञेचा वापर करण्यात अचूकतेची समस्या उद्‍भवते, कारण अंतर्ज्वलन एंजिन किंवा अणुशक्ती किंवा संगणक ह्यांचा वापर अनुक्रमे तिसरी, चौथी किंवा पाचवी औद्योगिक क्रांती सुचवितो. सर्वसाधारणतः हल्ली औद्योगिक क्रांती ही संज्ञा ग्रेट ब्रिटनमधील यंत्रनिर्मितीच्या सुरुवा तीच्या अवस्थेस लावतात किंवा इतर देशांत जेव्हा हस्तव्यवसाय व त्यांवर आधारित समाजव्यवस्था ही यंत्रोत्पादनाच्या अवस्थेपुढे लुप्त झाली ,त्या अवस्थेला लावतात .याचमुळे भारतात औद्योगिक क्रांती येत आहे ,असे बोलले जाते .औद्योगिक क्रांती ही घडत आहे व ती चालूच राहणार आहे .सध्या औद्योगिक क्रांती म्हणून जे काही घडत आहे ते,‘स्वयंचलन’,‘संक्रांतिविज्ञान’(सायबरनेटिक्स)अशा विविध संज्ञांनी संबोधिले जात आहे.

पार्श्वभूमी

ग्रेट ब्रिटनमध्ये औद्योगिक क्रांती होण्यापूर्वी व्यापारक्रांती झाली होती; म्हणजेच व्यापारविस्तार होऊन व्यापाऱ्‍यांची भरभराट झाली होती. ही भरभराट टिकविण्यासाठी नव्या बाजारपेठांचा शोध घेणे व त्या काबीज करणे हे जेवढे आवश्यक होते, तितकेच विविध वस्तूंचे उत्पादन वाढविणेही आवश्यक होते. म्हणून उत्पादनतंत्र बदलावे लागले व त्यासाठी संशोधन करावे लागले, प्रयोगशीलता दाखवावी लागली. त्याकरिता पैसा खर्चण्यास तयार असणाऱ्‍या धनिकांचीही या देशात वाण नव्हती. हा धनिक वर्ग प्रामुख्याने भांडवलदार होता. हा व्यापारी भांडवलदारच पुढे उद्योगपती झाला आणि व्यापारी भांडवलशाहीचे रूपांतर औद्योगिक भांडवलशाहीत झाले. प्रथम झालेल्या व्यापारक्रांतीने शोधांना व त्यांचा परिणाम म्हणून झालेल्या औद्योगिक क्रांतीला चालना दिली.

औद्योगिक क्रांतीचे मूळ अनेक शतके आधी शोधता येईल. एखाद्या पिढीत होणाऱ्‍या प्रगतीस तत्पूर्वीच्या प्रगतीचा आधार असतो, हे उघड आहे. प्रबोधनकालात, म्हणजे साधारणतः १,३०० ते १,५०० या दोनशे वर्षांत घडून आलेल्या शास्त्रीय प्रगतीमुळे औद्योगिक क्रांतिकाळात तांत्रिक शोध लागणे सुकर झाले.

औद्योगिक क्रांतीपूर्वी कृषिक्षेत्रात महत्त्वाचे बदल घडून येत होते. प्रबोधनकालापासून कृषिक्षेत्रातील सरंजामशाहीचा लोप होत होता. शेतीचे हळूहळू पण निश्चितपणे व्यापारीकरण होऊ लागले होते. परंपरागत शेतीव्यवसाय मागे पडून उत्पादनव्यय व फलित यांकडे शेतकरी गंभीरपणे पाहू लागला होता. जमिनीची धूप थांबविण्यासाठी मध्ययुगीन काळात दरवर्षी क्रमाक्रमाने एक-तृतीयांश जमीन नापीक ठेवण्याची पद्धत अवलंबिण्यात येत असे. अठराव्या शतकात या पद्धतीऐवजी जमिनीस नैसर्गिक खतांचा पुरवठा करण्यावर अधिक भर दिला जाऊ लागला; पशुधनाची काळजीपूर्वक निगा राखली जाऊ लागली. ग्रेट ब्रिटनमधील शेतकुंपणाच्या चळवळीमुळे शेतीव्यवसायास एक प्रकारची शिस्त लागली. भूमीचा वापर योजकतेने व उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने करणे सुलभ झाले. औद्योगिक क्रांतीची प्रक्रिया सुरू झाल्यावर शेतीचे यांत्रिकीकरण झाले, पशुसंवर्धनास उत्तेजन मिळाले आणि कृषिउत्पादकता एकसारखी वाढीस लागली.

व्याप्ती

ग्रेट ब्रिटनमध्ये अठराव्या शतकात जी औद्योगिक क्रांती झाली, तिचे मूळ त्या काळात उत्पादनक्षेत्रात जे विविध शोध लागले त्यांत सापडते. या शोधांचा परिणाम उत्पादनतंत्र पूर्णतया बदलण्यात झाला. साध्या अवजारांच्या साहाय्याने व मुख्यतः मानवी शक्तीचा उपयोग करून घरोघर उत्पादन करणे हे मध्ययुगीन उत्पादनतंत्र होते. त्यात परिवर्तन होऊन उत्पादनाचे यांत्रिकीकरण झाले. औद्योगिकीकरणाचा लाभ प्रथमतः कापडधंद्यास मिळाला. कापडउत्पादनाचे तंत्र प्रगत अवस्थेस पोहोचले होते, परंतु कापडाची वाढती मागणी पुरविणे लँकाशरला शक्य होत नव्हते. या व्यवसायात अधिक लोक गुंतले होते आणि इंग्‍लंडचे दमट हवामान कापडधंद्यातील यांत्रिकीकरणास अनुकूल होते. या सर्व कारणांमुळे त्या व्यवसायास उपयुक्त अशा शोधांना चालना मिळाली. एकामागोमाग एक शोध लागत गेले. जॉन के ह्या संशोधकाचा उडत्या ‘शटल’ चा शोध (१७३३) हा पहिला महत्त्वाचा शोध होय. १७६४ मध्ये जेम्स हारग्रीव्हजने ‘स्पिनिंग जेनी’ हे सूत काढण्याचे यंत्र शोधून काढले. या यंत्राच्या योगाने पूर्वीपेक्षा आठपट सूत निघू लागले. रिचर्ड आर्कराईट याने १७६९ मध्ये तलम सूत काढणार्‍या 'वॉटर फ्रेम' यंत्राचा शोध लावला. १७७६ साली क्रम्पटनने शोधून काढलेल्या 'म्यूल' नावाच्या यंत्राने पुष्कळ तलम सूत थोडक्या वेळात काढता येऊ लागले. रेव्ह. एडमंड आर्कराईट यांनी केलेल्या प्रयत्‍नांमुळे १७८५ मध्ये यंत्रमागाचा शोध लागला. कापडाचे उत्पादन अनेकपटींनी वाढले, तरी कापसातील सरकी काढण्याचे काम मजूर करीत असल्याने कच्चा कापूस आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध होत नसे. १७९३ मध्ये अमेरिकेत ईली व्हिटनीने 'कॉटन जिन' चा शोध लावून या अडचणींवर मात केली. या सर्व शोधांच्या परिणामी मोठमोठ्या गिरण्या व कारखाने स्थापन झाले.

अन्य उद्योगांतही त्या काळात शोध लागून यंत्रांचा प्रसार होत होता. बर्मिंगहॅममध्ये धातुवस्तूंच्या निर्मितीचे जे कारखाने होते, त्यांतील कारागिरांनी अनेक शोध लावून त्या त्या वस्तूंचा उत्पादनखर्च कमी करण्यास हातभार लावला होता. लोखंडाच्या धंद्यात याच सुमारास क्रांती घडून आली. लोखंड गाळण्याच्या कामी लाकडी कोळशाऐवजी दगडी कोळशाचा उपयोग करण्यात येऊ लागला. इंग्‍लंडच्या पश्चिम व उत्तर भागांत लोखंड व पोलादाच्या खाणी सापडल्या. यामुळे लोखंड मुबलक व स्वस्त झाले, यंत्रनिर्मितीस उत्तेजन मिळाले व बर्मिंगहॅम, शेफील्ड आदी नवीन औद्योगिक शहरे भरभराटीस आली. १८१५ मध्ये डेव्ही याने कोळशाच्या खाणीत बिनधोक वापरता येईल असा 'सेफ्टी लँप' हा दिवा शोधून काढला. चिनी मातीच्या भांडी बनविण्याच्या उद्योगात जॉन वेजवूड (१७३० — १७९५) याच्या पुढाकाराने क्रांतिकारक बदल झाले.

औद्योगिक क्रांतीस जोराची चालना मिळण्याच्या कामी बाष्पशक्तीच्या शोधाने मोठाच हातभार लावला. त्यापूर्वी बहुतेक यंत्रे पाणी व वायू यांच्या शक्तीवर चालत होती. वॅटच्या शोधामुळे स्वयंचलित यंत्रांचा वापर कारखान्यांतून मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. मॅथ्यू बोल्टन या बर्मिंगहॅमच्या उद्योगपतीने प्रचंड भांडवल-गुंतवणूक करून बाष्पशक्तीवर चालणारी विविध यंत्रे प्रसारात आणली. बाष्पशक्ती ही औद्योगिक क्रांतीचे प्रतीक ठरली.

उत्पादकांना प्रचंड प्रमाणावर वस्तू उत्पादित करता याव्यात म्हणून कच्चा माल कारखान्याकडे व पक्का माल बाजाराकडे त्वरेने व कमी खर्चाने नेण्यासाठी कार्यक्षम वाहतूक व्यवस्थेची गरज होती. ब्रिंडले याने १७६१ मध्ये वर्स्ली ते मँचेस्टरपर्यंत कालवा खणून दाखविला व नंतर इतर पुष्कळ कालवे काढले गेले. मॅक्अ‍ॅडम नावाच्या इंजिनियरने गोटे व खडी यांचा उपयोग करून पक्के रस्ते तयार करण्याची नवी पद्धत शोधून काढली व तीप्रमाणे पुष्कळ रस्ते बांधले गेले. पक्के रस्ते व कालवे यांमुळे वाहतुकीत एकदम वाढ झाली. वाफेच्या शक्तीवर चालणारे एंजिन व आगबोट हे या काळातील महत्त्वाचे शोध होत. १८१२ मध्ये स्टीव्हेन्सन याने वाफेच्या शक्तीने चालणारी आगबोट व लोहमार्गावर चालणाऱ्‍या एंजिनचा शोध लावला; १८२५ मध्ये 'द स्टॉक्टन अँड डार्लिंग्टन रेल्वे' सुरू करण्यात आली आणि खाणीपासून खनिजे वाहून नेण्यासाठी तिचा उपयोग करण्यात येऊ लागला. थोड्या अवधीत लोहमार्गांचे जाळे देशभर पसरले. १८३० मध्ये मँचेस्टर ते लिव्हरपूल हा पहिला रेल्वेरस्ता तयार झाला. १८०७ मध्ये फुल्टनची वाफेवर चालणारी आगबोट हडसन नदीवर ये-जा करू लागली. सारांश, या काळात दळणवळणाची साधने व व्यापार यांत कल्पनातीत क्रांती झाली.

औद्योगिक क्रांतीचे स्वरूप

ग्रेट ब्रिटन : राजकीय एकात्मता व उद्योगक्षेत्रात कमीत कमी हस्तक्षेप करण्याची राज्यकर्त्यांची प्रवृत्ती या गोष्टी औद्योगिक क्रांती ग्रेट ब्रिटनमध्ये प्रथम होण्याच्या दृष्टीने उपकारक ठरल्या. ग्रेट ब्रिटन हा राजकीय दृष्ट्या एकसंध देश होता. तत्कालीन जर्मनीप्रमाणे तो विभागलेला नव्हता किंवा तत्कालीन फ्रान्सप्रमाणे त्याची राज्यसंस्था विस्कळित नव्हती. पंधराव्या शतकाच्या अखेरीस ट्यूडर घराण्याकडे जेव्हा राजसत्ता आली, तेव्हापासून इंग्‍लंडला शक्तिमान केंद्रीय सत्ता प्राप्त झाली. राजकीय व आर्थिक एकात्मतेचा फायदा ग्रेट ब्रिटनला त्या काळात सर्वांत अधिक मिळाला. व्यापारी वर्गाला ग्रेट ब्रिटनच्या सरंजामशाही अर्थव्यवस्थेत जमीनदाराच्या खालोखाल स्थान होते. औद्योगिक क्रांतिपूर्व काळातही सरकारच्या आर्थिक धोरणावर प्रभाव पाडता येईल, एवढे महत्त्व व्यापारी मध्यम वर्गाला ग्रेट ब्रिटनमध्ये आले होते आणि त्यामुळे व्यापारी वर्गाला जरूर तेवढे आर्थिक स्वातंत्र्य लाभू शकत होते. तेथील संसदेमध्ये त्या काळात जमीनदारवर्गाचा प्रभाव असला, तरी कॉमन्सचे सभासद या नात्याने व बाहेरून पुरेसा प्रभाव पाडण्याइतके बळ तेथील व्यापारी वर्गात होते. व्यापारी वर्गाची वाढती प्रतिष्ठा व प्रभाव हे ब्रिटनमधील औद्योगिक क्रांतीचे महत्त्वाचे कारण होते. जर्मनी, फ्रान्स, पोर्तुगाल, स्पेन या देशांत व्यापाराला कमीअधिक प्रमाणात उत्तेजन दिले जात असूनही, व्यापाऱ्यां ना समाजरचनेत गौण स्थान असल्याने व्यापारी हितसंबंधांचा व्हावा तेवढा अनुकूल परिणाम झाला नाही. व्यापारी वर्गाच्या आर्थिक हितसंबंधांचा प्रभाव ग्रेट ब्रिटनच्या अर्थकारणावर पडू लागला आणि व्यापारउद्योगावरील जाचक बंधने शिथिल होऊन औद्योगिक क्रांतीला मोकळेपणाचे वातावरण लाभले.

फ्रान्समध्ये औद्योगिक क्रांती होण्यास अनुकूल परिस्थिती असूनही तिला पोषक असे धोरण तेथील अनियंत्रित राजेशाहीकडून स्वीकारले न गेल्याने तेथील औद्योगिक क्रांतीची गाडी मागे पडली. व्यापारी व उद्योगपती वर्गांचा अर्थकारणावर पडावा तेवढा प्रभाव तेथे न पडल्याने, सरंजामशाही व सरंजामदारवर्ग दीर्घकाळपर्यंत बलवान राहिला. हॉलंडमध्ये व्यापारावर भर असल्याने व्यापारक्रांतीत दीर्घकाळपर्यंत तो देश अग्रभागी होता. तरीही औद्योगिक क्रांती प्रथम तेथे न होता ती ग्रेट ब्रिटनमध्ये झाली. सु. १७३० पर्यंत हॉलंड देश ग्रेट ब्रिटनचा एक मातब्बर प्रतिस्पर्धी होता. त्यानंतर मात्र तो मागे पडला; कारण व्यापाराला औद्योगिक उत्पादनाचे पाठबळ देण्याची दक्षता हॉलंडने घेतली नाही; तेथील व्यापारी भांडवलशाहीने औद्योगिक भांडवलशाहीचे रूप धारण केले नाही.

सारांश, पुरेशी साधनसंपत्ती, राजकीय एकात्मता, व्यापाराची आधीच झालेली वाढ व त्या वाढीचा फायदा पक्का करण्यासाठी त्याला उत्पादनाची जोड देण्याची व्यापाऱ्‍यांची दूरदृष्टी, त्या दूरदृष्टीला राज्यकर्त्यांनी दिलेला सक्रिय पाठिंबा या साऱ्‍या गोष्टींचा मिलाफ झाल्यामुळे ग्रेट ब्रिटन हा देश अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात औद्योगिक क्रांतीसाठी इतर देशांच्या तुलनेने परिपक्क झाला होता. त्यामुळे साहजिकच तेथे औद्योगिक क्रांती प्रथम झाली.

अन्य देश

औद्योगिक क्रांतीमुळे ग्रेट ब्रिटनला वैभव प्राप्त झाले, हे उदाहरण डोळ्यापुढे असताना जगाच्या इतर भागांत ग्रेट ब्रिटनचे अनुकरण करून आपली उन्नती करून घ्यावी, अशी प्रवृत्ती दिसून आल्यास नवल नाही. ग्रेट ब्रिटनच्या अनुभवानंतर औद्योगिकीकरणाची एक अहमहमिकाच जणू देशादेशांत सुरू झाली. ग्रेट ब्रिटनने दाखविलेल्या मार्गाने जे देश पुढे गेले त्यांमध्ये अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, रशिया व जपान यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. या सर्व देशांत काही गोष्टींबाबत साधर्म्य दिसून आले, तरी प्रत्येक देशाची खास अशी काही वैशिष्ट्ये होती व ती त्या त्या देशाच्या औद्योगिकीकरणाच्या प्रक्रियेत दिसून आली. परंतु औद्योगिक क्रांतीचा अर्थ स्थूलमानाने औद्योगिक उत्पादनतंत्रात आमूलाग्र परिवर्तन व त्यामुळे औद्योगिक उत्पादनात होणारी अफाट वाढ असा घेतला, तर औद्योगिक क्रांतीचा स्पर्श आजही जगाच्या लहानशा भागालाच झाला आहे, असे म्हटले पाहिजे. आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका या भागांतील बहुसंख्य देश व जनता आर्थिक दृष्ट्या अद्याप मागासलेल्या अवस्थेतच आहे. जगाच्या काही भागांत जी नेत्रदीपक शास्त्रीय व तांत्रिक प्रगती झाली आहे, तिचा अद्यापि जगातील बहुसंख्य लोकांचे राहणीमान वाढण्याच्या दृष्टीने उपयोग झालेला नाही. आर्थिक विकास झाला पाहिजे व त्याला औद्योगिक क्रांतीशिवाय अन्य मार्ग नाही, ही जाणीव मात्र सर्वत्र निर्माण झालेली आहे.

औद्योगिक क्रांती आणि राष्ट्रवाद यांचा घनिष्ठ संबंध आहे, असे दिसून येते. राजकीय व आर्थिक एकात्मता निर्माण होऊन जो देश स्वतंत्र व एकसंध राष्ट्र म्हणून नांदू लागला, त्या देशातच औद्योगिक क्रांती या संज्ञेत अभिप्रेत असलेला आर्थिक विकास होऊ शकला. जर्मनीमध्ये औद्योगिक क्रांतीला चालना १८३३ मध्ये प्रशियाच्या नेतृत्वाखाली जर्मनीचे आर्थिक एकीकरण झाल्यानंतरच मिळाली आणि तिला खरी गती १८७० नंतर म्हणजे जर्मन साम्राज्याची प्रस्थापना झाल्यानंतर लाभली. त्याचप्रमाणे अमेरिकेच्या औद्योगिक विकासाला सुरुवात अमेरिका ब्रिटिशांच्या कचाट्यातून मुक्त झाल्यानंतरच झाली व अमेरिकेचा जलद विकास मुख्यतः यादवी युद्धानंतर म्हणजे देशाच्या अभंगत्वाला असलेला धोका टळल्यानंतर झाला.

परिणाम

औद्योगिक क्रांती होण्यासाठी सर्वत्रच सरंजामशाही आर्थिक व्यवस्थेचा विलय व्हावा लागला. सरंजामदारांचे अथवा मोठ्या जमीनदारांचे अर्थव्यवस्थेवर आणि त्यामुळे आर्थिक धोरणावर वर्चस्व होते. ते वर्चस्व नाहीसे होऊन उद्योगानुकूल अशी आर्थिक नीती स्वीकारली जाईपर्यंत औद्योगिक क्रांती कोठेच होऊ शकली नाही. सरंजामशाहीच्या विलयाची प्रक्रिया औद्योगिक क्रांतीला चालना देणारी ठरली व औद्योगिक क्रांतीमुळे सरंजामशाहीच्या विलयाला गती मिळाली, असे म्हणता येते. औद्योगिक क्रांतीच्या प्रभावाने जमीनदार वर्गाचे अर्थव्यवस्थेवर व राजकारणावर वर्चस्व व्यक्त करणारी सरंजामशाही अर्थव्यवस्था सर्वत्र नष्ट झाली. ही घटना सर्व देशांत सुकरतेने घडली, असे नाही. सरंजामदारांचे वर्चस्व नष्ट होण्यासाठी फ्रान्समध्ये राज्यक्रांती व्हावी लागली. फ्रेंच राज्यक्रांतीचा धक्का जर्मनीलाही बसला. १७९३ नंतर फ्रेंचांनी जर्मनीचा जो भाग व्यापला, त्यात त्यांनी तेथील शेतकऱ्यांना दास्यातून मुक्त केले. १८०६ मध्ये नेपोलियनने प्रशियाचा पराभव केल्यानंतर तेथील राज्यकर्त्यांना आर्थिक, सामाजिक व लष्करी पुनर्घटनेची आवश्यकता पटल्याने त्यांनी शेतकऱ्‍यांची दास्यातून मुक्तता केली. १८४९ मध्ये विविध देशांत ज्या क्रांत्या झाल्या, त्यांनीच सरंजामशाहीली शेवटचा मोठा धक्का यूरोपमध्ये दिला. रशियात १८६१ मध्ये शेतकऱ्यांना दास्यातून मुक्त करण्यात आले. शेतकऱ्यांचे दास्य ही जमीनदार वर्गाचे वर्चस्व दर्शविणारी महत्त्वाची खूण असली, तरी शेतकरी कायद्याने मुक्त झाला की जमीनदारांचा अर्थव्यवस्थेवरील प्रभाव नाहीसा होतो, असे मात्र नाही.  शेतकऱ्यांचे दास्य नष्ट झाल्यामुळे उद्योगधंद्यांना कामगारवर्ग मिळण्यास मदत होते व उद्योगधंद्यांच्या वाढीमुळे कालांतराने औद्योगिक वर्गाचे अर्थव्यवस्थेवरील व पर्यायाने राज्यसंस्थेवरील वर्चस्व वाढून सरंजामशाहीचा ऱ्हास होतो. औद्योगिक क्रांती झालेल्या सर्व देशांत ही प्रक्रिया घडून आली आहे. सरकारची आर्थिक नीती जमीनदारांच्या हितसंबंधांना पोषक असावी की उद्योगधुरीणांना अनुकूल असावी, हाच अमेरिकेच्या यादवी युद्धामागील खरा प्रश्न होता. त्या यादवी युद्धाचा कौल उद्योगक्षेत्राच्या बाजूने पडला. जपानमध्ये १८६७ नंतरच्या क्रांतीनंतर तेथील राज्यकर्त्यांची आर्थिक नीती औद्योगिक क्रांतीला अनुकूल अशी झाली. औद्योगिक क्रांतीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य हे की, कोणत्याही देशात औद्योगिक क्रांतीचे परिणाम उद्योगक्षेत्रापुरते मर्यादित राहिले नाहीत; ते सर्वस्पर्शी आणि दूरगामी ठरले. असे होणे अपरिहार्यच होते. कारखान्यांत मोठ्या प्रमाणावर कामगारांनी एकत्र येऊन अजस्त्र यंत्रांच्या साहाय्याने केलेले उत्पादन हे स्वरूप औद्योगिक क्रांतीने धारण केले. औद्योगिक क्रांतीसाठी मोठ्या संख्येने कामगारवर्ग एकत्र येणे आवश्यक होते. त्यासाठी शेतीतून मोठ्या संख्येने मनुष्यबळ मोकळे व्हावयास हवे होते. शेतीची क्रांतिकारक पुनर्घटना त्यासाठी आवश्यक होती. जेव्हा ही पुनर्घटना झाली, तेव्हा औद्योगिक क्रांती शक्य झाली. आणखीही एका कारणाकरिता शेतीची पुनर्घटना औद्योगिक क्रांतीसाठी आवश्यक होती. कच्चा माल व कामगारांसाठी अन्न शेतीतून उपलब्ध होते. हा माल मोठ्या प्रमाणावर हाती येणे आवश्यक होते. शेतीची पुनर्घटना झाल्याने ते शक्य झाले. तसेच काहीसे वाहतूक-दळणवळण या बाबतीतही घडले. औद्योगिक क्रांती यशस्वी होण्यासाठी कच्च्या-पक्क्या मालाची वाहतूक शक्य तेवढी स्वस्त व जलद आणि मोठ्या प्रमाणावर होणे अगत्याचे होते. तेव्हा औद्योगिक क्रांतीच्या बरोबरीने शेती, वाहतूक आदी अन्य आर्थिक क्षेत्रांची पुनर्घटना होणे क्रमप्राप्तच होते. उद्योगधंद्यांना अल्पकालीन व दीर्घकालीन भांडवलपुरवठा सातत्याने व मोठ्या प्रमाणावर होणे अत्यावश्यक झाले. त्यामुळे त्या त्या क्षेत्रातही महत्त्वपूर्ण बदल झाले. म्हणूनच औद्योगिक क्रांती झालेल्या अर्थव्यवस्थेचे स्वरूप ज्या देशात ती झाली नाही, तेथील अर्थव्यवस्थेपेक्षा वेगळे आहे.

औद्योगिक क्रांतीच्या परिणामी मनुष्याला उत्पादन वाढविणे, शीघ्रगतीने प्रवास करणे आणि एकमेकांशी संपर्क ठेवणे सहजसाध्य झाले. देशाची राष्ट्रीय संपत्ती वाढली, सुबत्ता आली आणि मनुष्याच्या वाट्याला अधिक सुखसोयी आल्या. परंतु प्रारंभीच्या काळात क्रांतीमुळे मनुष्यप्राण्याचे दारिद्र्य आणि दैन्यावस्था अधिकच वाढीस लागल्याचे दिसते. खेड्यात राहणारा, घरात उत्पादन करणारा, घराभोवती थोडीफार शेती पिकविणारा श्रमिक क्रांतीनंतर शहराकडे ओढला गेला. सामाजिक दृष्टीने ‘नागरीकरण’ हा औद्योगिक क्रांतीचा एक अतिशय महत्त्वाचा परिणाम ठरला. औद्योगिक क्रांतीनंतर कामगारवर्ग मोठ्या संख्येने शहरांत स्थायिक झाला व शहरी लोकसंख्येचे प्रमाण वेगाने वाढत गेले. त्यामुळे शहरे व त्यांतील जीवन हा नवीन प्रश्न समाजापुढे उभा राहिला. कामगारांच्या प्रश्नाने वेगळे व तीव्र स्वरूप धारण केले. हे दोन्ही प्रश्न आपापल्या पद्धतीने सोडविण्यात औद्योगिक राष्ट्रे औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळात गुंतलेली दिसतात. मनुष्य यंत्रावर अवलंबून राहू लागला. श्रमविभागणी व श्रमाचे विशेषीकरण यांमुळे श्रमिकाला तेच ते काम एकसारखे करावे लागत असे. साहजिकच श्रमिकाचे व्यक्तिमत्व लोप पावले, त्याला यंत्राची कळा आली. यंत्र हे केवळ उत्पादनाचे साधन व राहता माणसाला गुलाम बनविण्याइतके सामर्थ्य यंत्रात निर्माण झाले.

ह्याचे सामाजिक परिणाम कमी भयावह नव्हते. तुटपुंज्या वेतनासाठी कारखान्यात अनेक तास श्रम करणे आणि गलिच्छ वस्तीत जीवन कंठणे श्रमिकांच्या नशिबी आले. प्रारंभीच्या काळात कामगारांना रोज तेरा तास काम करावे लागे. खेड्यातून शहराकडे लोकांचा ओघ चालूच राहिला. स्त्रिया व लहान मुले कारखान्यात दिवस-रात्र खपू लागली आणि वाढती बेकारी ही एक नवीन समस्या निर्माण झाली. नोकरीच्या शोधात वणवण भटकणाऱ्या हजारो लोकांव्यतिरिक्त मंदी, तात्पुरती टाळेबंदी किंवा कारखान्याची दिवाळखोरी यांमुळे कित्येक लोकांना बेकार व्हावे लागे. नवनव्या यंत्रांचा शोध लागल्यानंतर त्याचा अपरिहार्य परिपाक म्हणजे अनेक नोकरांना कामावरून काढून टाकावे लागे. औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीस कामगारांनी आपल्यावर बेकारीची पाळी आणणाऱ्‍या यंत्रांचा विध्वंस केल्याची उदाहरणे आहेत. १७७९ मध्ये लँकाशरला दंगे झाले आणि अनेक कापडगिरण्यांचा नाश करण्यात आला.

कारखान्यातील परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारला ‘कारखाना अधिनियम’ करावा लागला. १८०३ मध्ये प्रथमतः कारखाना अधिनियम लागू झाला. १८४४ मध्ये कारखान्यात लहान मुलांना काम करण्यास बंदी व कामाचे तास यांबाबत कायदा करण्यात आला. यानंतर अनेक प्रकारचे कायदे करून कामगारांच्या स्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी सरकारला प्रयत्‍न करावे लागले.

औद्योगिक क्रांतीमुळे भांडवलदार व कामगार असे दोन नवीन वर्ग निर्माण झाले. मालक-मजूर तंटे मिटविण्यासाठी मजूरविषयक कायदे करण्यात आले. मजुरांच्या संघटना स्थापन झाल्या. कामगारवर्ग व कामगार चळवळ ही देशादेशांच्या राजकारणात एक प्रभावी शक्ती उदयास आली. साम्यवाद, समाजवाद, नियंत्रित भांडवलशाही, वर्गसमन्वय इ. राजकीय व सामाजिक तत्त्वज्ञानांचा उदय झाला. कारखानदारांना मालाचा उठाव करून अधिक नफा मिळविण्याकरिता परदेशातील बाजारपेठा काबीज करण्याची लालसा निर्माण झाली. इंग्‍लंडसारख्यादेशाने खुल्या व्यापाराचे तत्त्व स्वीकारले. व्यापाराला स्थैर्य आणण्याकरिता सत्ता संपादन करण्याची देशांना इच्छा होऊ लागली. औद्योगिक क्रांतीमुळे आंतरराष्ट्रीय संघर्षाचे स्वरूपसुद्धा बदलले. औद्योगिक क्रांतीसाठी ज्या देशांत स्पर्धा होऊ लागली, त्यांच्यात कच्च्या मालाची उगमस्थाने व बाजारपेठा हस्तगत करण्यासाठी संघर्ष उद्‍भवला. त्यातूनच साम्राज्यवाद व साम्राज्यवादी युद्धे यांची बीजे रोवली गेली. साम्राज्यवादी देशांचे गुलाम बनलेल्या राष्ट्रांत स्वातंत्र्याची जी चळवळ सुरू झाली, त्यामागेदेखील स्वातंत्र होऊन उद्योगप्रधान राष्ट्र बनावे ही प्रेरणा महत्त्वाची होती. राष्ट्राच्या अंतर्गत अर्थकारणाच्या बाबतीत पहावयाचे झाल्यास, निर्हस्तक्षेपाचे धोरण मागे पडून गुंतागुंतीच्या उद्योगप्रधान समाजाच्या वाढत्या गरजा भागविण्यासाठी सरकारला सामाजिक व आर्थिक बाबतींत हस्तक्षेप करणे अपरिहार्य झाले.

औद्योगिक क्रांतीचे परिणाम समाजाच्या धार्मिक जीवनावरही झाले. औद्योगिक क्रांती ही सामान्यतः यंत्राच्या वाढत्या उपयोगांवर अधिष्ठित होती. यंत्र हे साहजिकच मानवाने निसर्गावर मिळविलेल्या विजयाचे प्रतीक ठरले आहे. या विजयाचे प्रमाण जसजसे वाढत गेले, तसतशी धार्मिक समजुती, अंधश्रद्धा यांची मानवी जीवनातून पाछेहाट होत गेली. धर्माचे महत्त्व कमी होऊ लागले व भौतिक उन्नतीवर मानवाच्या आशाआकांक्षा केंद्रित होऊ लागल्या.

ग्रेट ब्रिटनमधील अठराव्या शतकाच्या उत्तरार्धातील औद्योगिक क्रांती व तिचे परिणाम म्हणजेच, स्थूलमानाने गेल्या दोनशे वर्षांतील जागतिक इतिहास होय. औद्योगिक क्रांतीचे जे बहुविध परिणाम झाले ते सर्वच इष्ट होते, असे म्हणता यावयाचे नाही. त्यांतील काहींची इष्टानिष्टता निर्णायक स्वरूपात अद्यापि ठरावयाची आहे. औद्योगिक क्रांतीमुळे विज्ञान व उद्योग यांची हातात हात घालून वाटचाल सुरू झाल्याने भौतिक प्रगतीची घोडदौड सुरू झाली. भौतिक समृद्धी हे जर मानवी जीवनाचे उद्दिष्ट असेल, तर ते प्राप्त करून घेण्याची संधी औद्योगिक क्रांतीने मानवाला उपलब्ध करून दिली, असे म्हटले पाहिजे. आजही भौतिक समृद्धी फारच थोड्या देशांच्या व त्यांतील मूठभर लोकांच्याच वाट्याला आली आहे. ती सर्वांना मिळवून देण्याचे कर्तृत्व मानवाला अद्यापही करावयाचे आहे. त्या दृष्टीने औद्योगिक क्रांती अद्यापि पूर्ण झालेली नाही, असे म्हणता येईल.

 

संदर्भ: 1. Ashton, T. S. The Industrial Revolution, 1760-1830, New York, 1862.

2. Hobsbawm, E. J. The Age of Revolution, Cleveland, 1962.

3. Knowles, L. C. A. The Industrial and Commercial Revolutions in Great Britain during

the Nineteenth Century, London, 1961.

4. Kranzberg, M. W.; Pursell, C. W. Jr. Ed. Technology in Western Civilization, New

York, 1967.

5. Lampard, E. E. Industrial Revolution : Interpretations and Perspectives, Washington,

1957.

6. Mantoux, Paul, The Industrial Revolution in the Eighteenth Century, New York, 1961.

7. Toynbee, Arnold,The Industrial Revolution, Boston, 1956.

 

लेखक - सुभाष भेण्डे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/20/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate