অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

औद्योगिक शिक्षण

औद्योगिक शिक्षण

औद्योगिक शिक्षण : उद्योग व व्यापार या क्षेत्रांतील व्यावसायिक कार्यक्षमता व समायोजन ह्यांचे शिक्षण-प्रशिक्षण देणारी शिक्षणाची एक शाखा. त्यायोगे ज्ञानाचे व अनुभवांचे पाठबळ मिळून व्यक्ती औद्योगिक व्यवसायात यशस्वी होऊ शकते. औद्योगिक शिक्षण ही एक व्यापक संज्ञा असून तीमध्ये व्यवसाय शिक्षण, तांत्रिक शिक्षण, धंदे शिक्षण, व्यवस्थापन शिक्षण वगैरेंचा समावेश होतो. औद्योगिक शिक्षणाचा अंतिम उद्देश राष्ट्राची अर्थयंत्रणा कार्यक्षमतेने चालू ठेवणे व तिला विकसनशील करणे हा असतो. चालू युगात केवळ एखाद्या औद्योगिक व्यवसायाचे किंवा प्रक्रियेचे शिक्षण देणे, एवढाच औद्योगिक शिक्षणाचा उद्देश असून चालणार नाही. जुन्या सवयी, पूर्वग्रह व जुनाट प्रथा टाकून देऊन नव्या बदलत्या परिस्थितीशी मिळतेजुळते घेण्याची कला व मनोवृत्ती औद्योगिक शिक्षणाने विद्यार्थ्यांना हस्तगत करता आली पाहिजे. ज्याप्रमाणे औद्योगिक शिक्षणाने मानवाला यंत्राचा गुलाम बनविता कामा नये, त्याचप्रमाणे बौद्धिक शिक्षणाने केवळ पांढरपेशा व्यवसाय करू इच्छिणारे नागरिक निर्माण करूनही राष्ट्रहित साधता येणार नाही.

तंत्रशास्त्राच्या सतत चालू असणाऱ्‍या प्रगतीमुळे विशिष्ट कार्यक्षेत्रात विशेषज्ञता मिळविणाऱ्‍यांची गरज एकीकडे वाढत जाते, तर या प्रगतीमुळे होणारे बदल या विशेषज्ञतेचे धोके दर्शवितात. म्हणूनच औद्योगिक शिक्षणाने केवळ विशेषज्ञ निर्माण न करता बुद्धी, ज्ञान व अनुभव यांचा योग्य उपयोग करून आपली कार्यशक्ती लवचिकपणे औद्योगिक प्रक्रियांसाठी वापरण्यास समर्थ असणारे नागरिक तयार करावे लागतात. आपल्या विशिष्ट विषयाचा इतरही संलग्‍न विषयांशी काय संबंध आहे, याची जाणीव औद्योगिक शिक्षणाने विद्यार्थ्यांना झाली पाहिजे. हे उद्दिष्ट यशस्वीपणे गाठण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला कोणत्या प्रकारचे औद्योगिक शिक्षण द्यावयाचे ते ओळखून शिक्षणानंतर ती व्यक्ती कोणत्या उद्योगधंद्यात सामावली जाऊ शकेल, ह्याचाही शोध घेणे जरूरीचे असते. याकरिताच औद्योगिक समाजव्यवस्थेत समाजातील तरूणवर्ग, व्यवस्थापकवर्ग, कामगारवर्ग व शिक्षणवेत्ते ह्या सर्वांचे सहकार्य अटळ असते. ऑस्ट्रेलिया, अमेरिका व ग्रेट ब्रिटन यांसारख्या देशांत असे सहकार्य उपलब्ध असल्यामुळे तेथील औद्योगिक शिक्षणाचे कार्यक्रम बऱ्यांच अशी यशस्वी झाले आहेत.

औद्योगिक शिक्षणाचा इतिहास हा संस्कृतींच्या इतिहासाइतकाच प्राचीन आहे. आदिम समाजांमध्ये युवकांना समुदायांचे व टोळ्यांचे जीवन सुरळीत चालेल, अशा तऱ्हेचे व्यवसाय शिकविले जात. सबंध मध्ययुगात ज्यांना निरनिराळ्या उद्योगधंद्यांत काम करावयाचे होते, त्यांना उमेदवारी पद्धतीने सर्वसामान्य व औद्योगिक शिक्षण दिले जाई. कारखानदारीचा उदय व शक्तिचालित यंत्रांचा वापर होईपर्यंतच्या काळात उमेदवारी ही औद्योगिक शिक्षणाचाच एक प्रकार म्हणून मान्यता पावली. काही कुशल व्यवसायांत ती अजूनही प्रचलित आहे [→उमेदवारी]. कारखानदारीचा उदय झाल्यावर व आधुनिक यंत्रयुग सुरू झाल्यानंतर उमेदवारी पद्धती योग्य तऱ्हेचे औद्योगिक शिक्षण देण्यास पुरेशी समर्थ ठरली नाही. म्हणूनच औद्योगिक शिक्षणाचे नवीन कार्यक्रम शोधून काढणे व त्यांकरिता स्वतंत्र शाळा उघडणे, ह्याची समाजाला गरज भासू लागली. पहिल्या नेपोलियनच्या कारकीर्दीतच (१८०२ — १८१५) फ्रान्समध्ये सैनिकी व तांत्रिक शिक्षणाच्या शाळा स्थापन करण्यात आल्या. त्याच पुढे यूरोपीय राष्ट्रांना व अमेरिकेलाही आदर्श ठरल्या.

१८७० नंतर उदयास आलेल्या जर्मन साम्राज्यामुळे तसेच संघटित जर्मनीने केलेल्या औद्योगिक प्रगतीमुळे त्या देशात कामगारांना कुशल काम शिकविणाऱ्‍या शाळांच्या स्थापनेस फार महत्त्व प्राप्त झाले. ग्रेट ब्रिटनमध्ये स्थापलेली कामगारांची महाविद्यालये, तसेच अमेरिकेतील यंत्रविशारदांकरिता उभारलेल्या शाळा म्हणजे त्या देशांनी औद्योगिक कामगारांना प्रशिक्षण देण्याच्या कामी केलेल्या प्रयत्‍नांची प्रतीकेच होत. रशियानेही सात वर्षांचा शालेय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी चार वर्षांचे तांत्रिक शिक्षण देणाऱ्‍या व दहा वर्षांच्या शालेय शिक्षणानंतर दोन वर्षांचे तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्था काढून औद्योगिक शिक्षणाची सोय केली आहे. या रशियन संस्थांमधून विशेषीकरणावर अमेरिकेच्या मानाने जास्त भर दिला जातो. ब्रिटिश राजवटीत भारतामध्ये जी शिक्षणपद्धती रूढ झाली, तीमध्ये परीक्षांना वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिले गेले व परीक्षा पास होऊन एखादी दर्जेदार व पांढरपेक्षा व्यवसायातील नोकरी मिळविणे हेच शिक्षणाचे उद्दिष्ट समजले गेले. साहजिकच जीवनोपयोगी व व्यवसायप्रधान अशा औद्योगिक शिक्षणाकडे दुर्लक्ष करण्यात आले. ही परिस्थिती केवळ विद्यापीठीय शिक्षणासंबंधीच होती असे नव्हे, तर तिचे प्रतिबिंब शालेय शिक्षणातही उमटले.

प्राशमिक शाळांचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांनी परीक्षा पास होऊन माध्यमिक शाळांत प्रवेश मिळवावा हे ठरले, तर माध्यमिक शाळांचे धोरण विद्यार्थ्यांनी शालांत परीक्षा पास होऊन महाविद्यालयांत प्रवेश मिळवावा, असे आखले गेले. साहजिकच शालेय शिक्षण व विद्यापीठीय शिक्षण सर्वसामान्य, विद्यैकनिष्ठ व केवळ बौद्धिक स्वरूपाचे बनले. स्वातंत्र्योत्तर काळात तांत्रिक शिक्षणाच्या, व्यवसाय शिक्षणाच्या व कामगार प्रशिक्षणाच्या काही सोयी जरी नव्याने उपलब्ध झाल्या असल्या, तरी एकंदर शिक्षण-यंत्रणेत व शिक्षणाच्या धोरणात औद्योगिक शिक्षणाच्या दिशेने विशेष प्रगती अद्यापही झालेली नाही. औद्योगिक शिक्षणाच्या महत्त्वाची जाणीव बर्‍याच शिक्षणविषयक अहवालांनी करून दिली आहे. त्याचप्रमाणे शिक्षण जीवनसंवादी व्हावे म्हणून शैक्षणिक क्रांतीची आवश्यकता आहे, यावरही शिक्षण आयोगाने (१९६६) भर दिला आहे. प्रौढ शिक्षणाचा प्रसार व निरक्षरतेचे उच्चाटन या कार्यक्रमांना अग्रक्रम देऊन औद्योगिक शिक्षणाच्या सोयी अधिक प्रमाणावर पुरविण्यावरच भारताच्या अर्थव्यवस्थेचा भावी विकास बऱ्याच अंशी अवलंबून आहे. औद्योगिक शिक्षणाचे व्यवस्था समाजातील वेगवेगळ्या गटांसाठी निरनिराळ्या प्रकारची करावी लागते.

शालेयविद्यार्थ्यांच्या सर्वसामान्य शिक्षणाच्या अभ्यासक्रमातही प्रगत राष्ट्रे औद्योगिक शिक्षणाची सोय करतात. उदा., अमेरिकेतील शाळांतून तंत्रशास्त्रासंबंधी सामान्य ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यात येते. वस्तुनिर्माण, दळणवळण, बांधकाम इ. क्षेत्रांतील प्रक्रियांची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली जाते. प्राथमिक शाळांतून औद्योगिक शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांचे इतर विषयांचे शिक्षण अधिक जीवनोपयोगी करण्याचा प्रयत्‍न केला जातो. माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना मातीकाम, प्लॅस्टिक, इलेक्ट्रॉनिकी, आरेख्यक-कला, धातुकाम, लाकूडकाम, तांत्रिक रेखन इ. विषयांचे शिक्षण दिले जाते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष काही वस्तू बनविण्याचीही संधी मिळते. या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना निरनिराळ्या व्यवसायांची ओळख होते, निर्मित वस्तूंच्या गुणवत्तेची पारख करता येते व उद्योगधंदे आणि तंत्रविद्या यांची महती व कार्ये यांविषयी ज्ञान मिळते. उच्च माध्यमिक शाळांतून विद्यार्थ्यांना निरनिराळ्या उद्योगक्षेत्रांतील संघटना व नियोजन यांचीही माहिती दिली जाऊन त्यांच्या औद्योगिक आसमंताची पुरी ओळख त्यांना पटावी, असा प्रयत्‍न केला जातो.

प्रौढांसाठी खास औद्योगिक शिक्षणक्रम आखून नवीन नवीन व्यवसायांची माहिती त्यांना दिली जाते. औद्योगिक शिक्षणाचीच एक शाखा म्हणजे व्यवसाय शिक्षण होय. नोकरी मिळविण्यासाठी व नोकरीत यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारी गुणवत्ता देणारे जे शिक्षण, ते व्यवसाय शिक्षण. शिवाय तांत्रिक शिक्षणाची व्यवस्थाही निरनिराळ्या वयोगटांच्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात येते व विशिष्ट तंत्राची तात्त्विक आणि प्रात्यक्षिक माहिती देऊन ते तंत्र प्रत्यक्ष हाताळता येण्याइतकी कार्यक्षमता विद्यार्थ्यांमध्ये येईल, अशा हेतूने तांत्रिक शिक्षणाचे वेगवेगळ्या दर्जांचे अभ्यासक्रम विशिष्ट तंत्रनिकेतनांमधून शिकविले जातात. व्यवसाय शिक्षण; तांत्रिक शिक्षण. औद्योगिक शिक्षणाचे आणखी एक अंग म्हणजे कामगार प्रशिक्षण. विशिष्ट उद्योगधंद्यांत अथवा व्यवसायांत प्रवेश मिळाल्यानंतरही कामगारास प्रशिक्षणाची गरज भासतेच. नोकरी करून मिळेल त वेतन घ्यावयाचे एवढाच नोकरी करण्याचा दृष्टिकोण नसतो. त्याला आपली कार्यक्षमता वाढवावीशी वाटते. उच्च श्रेणीची कार्ये करता यावीत अशी महत्त्वाकांक्षा तो बाळगून असतो. त्याचा हा मार्ग सुकर व्हावा म्हणून कामगार प्रशिक्षणाचे निरनिराळे कार्यक्रम चालू ठेवणे आवश्यक असते कामगार प्रशिक्षण.

औद्योगिक शिक्षणात व्यवस्थापनशास्त्राचाही समावेश करणे आवश्यक आहे. निरनिराळ्या उत्पादक घटकांचे पर्याप्त प्रमाणात संयोजन करून उपभोग्य वस्तू व सेवा यांचे यथोचित उत्पादन करण्याचा प्रयत्‍न उत्पादनसंस्था करीत असतात. त्यांच्या प्रयत्‍नांची दिशा ठरविणे व त्यासाठी आवश्यक ते नियोजन करून त्याप्रमाणे सर्व प्रक्रियांचा नियंत्रणपूर्वक समन्वय साधणे ही व्यवस्थापनाची जबाबदारी असते व्यवस्थापनशास्त्र. आधुनिक उद्योगप्रधान युगात व्यवस्थापन ही केवळ कला नसून ते एक शास्त्रही झाले आहे. ते शिकविण्याची सोयही प्रत्येक राष्ट्रास करावी लागते. अशा रीतीने निरनिराळ्या शिक्षणक्रमांद्वारा औद्योगिक अर्थव्यवस्था विकासोन्मुख राखण्यासाठी औद्योगिक शिक्षणाचे कार्यक्रम काळजीपूर्वक आखणे आवश्यक ठरते.

 

संदर्भ : Badger, A. B. Man in Employment, London, 1966.

लेखक - ए. रा. धोंगडे / वि. रा. गद्रे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate