অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

औद्योगिक सुयोजन

उद्योगधंद्यांतील उत्पादनतंत्र, व्यवस्थापन व उत्पादनाशी संबंधित असलेल्या इतर गोष्टी ह्यांची कार्यक्षमता वाढवून पर्याप्त उत्पादन साधण्याकरिता व जास्तीत जास्त नफा मिळविण्याकरिता शास्त्रशुद्ध पायावर केलेली उद्योगधंद्यांची पुनर्रचना.

औद्योगिक सुयोजनाच्या विविध अंगांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण करता येईल :

तांत्रिक

उद्योगधंद्यांच्या ह्या पैलूत उत्पादनाकरिता वापरीत असलेली यंत्रसामग्री, त्यांतील यांत्रिक क्रिया व उत्पादन होणारा माल ह्यांचा समावेश होतो. उद्योगधंद्यांच्या तांत्रिक सुयोजनाच्या कार्यक्रमात ज्या ठिकाणी शक्य असेल तेथे उत्पादनक्रियेचे यांत्रिकीकरण करणे, जुन्या प्रकारच्या यंत्रांऐवजी अद्ययावत् यंत्रांचा उपयोग करून उत्पादनक्रियेतील वेगवेगळ्या प्रक्रियांचे सुयोजन करणे, अनेक प्रकारचा माल उत्पादन करण्याऐवजी उत्पादनाचे विशेषीकरण करून ठराविक प्रतीचा व साच्याचा माल तयार करणे व अशा तर्‍हेने पर्याप्त उत्पादन वाढविणे वगैरे गोष्टींचा अंतर्भाव होतो.

संघटनात्मक

ह्या प्रकारच्या सुयोजनात अकार्यक्षम औद्योगिक घटकांचे एकीकरण साधणे किंवा त्यांची कार्यक्षम घटकांशी जुळणी करणे, अयोग्य स्पर्धा टाळण्याकरिता किंमत, उत्पादन व बाजारपेठ ह्यांच्या संदर्भात स्पर्धक घटकांचे करार घडविणे, कामाची शास्त्रशुद्ध वाटणी करणे, वाहतूक व विक्री व्यवस्थापन सुधारणे वगैरे कार्यक्रमांचा समावेश होतो.

आर्थिक

सुयोजनाच्या आर्थिक बाजूमध्ये उद्योगधंद्यांची आर्थिक दृष्टीने मजबुती करणे, अल्प व अतिरिक्त भांडवल प्रवृत्ती टाळणे, उद्योगधंद्यांच्या विकासाकरिता व अद्ययावतीकरणाकरिता नफ्यातून भांडवल पुरवठा करणे इ. बाबींचा समावेश होतो.

सामाजिक

कामगार जर सुखी व समाधानी नसतील, तर वरील पुनर्घटनेचे उत्पादनशक्ती व उत्पादनवाढीच्या स्वरूपात फळ मिळणार नाही. त्याकरिता योग्य वेतन, बढतीस वाव, वेतनाची प्रोत्साहन पद्धती वगैरे कार्यक्रमांद्वारा योग्य व सलोख्याचे मालक-मजूर संबंध स्थापन करणे ह्या सुयोजनाच्या सामाजिक बाजूचाही विचार करावा लागतो.

उद्योगधंद्यांचे सुयोजन हे नियोजित असते म्हणजे धोरण म्हणून ते पार पाडावे लागते. ह्या संदर्भात उद्योगधंद्यांचे सुयोजन व शास्त्रीय व्यवस्थापन ह्यांमधील फरक लक्षात घेतला पाहिजे. शास्त्रीय व्यवस्थापन म्हणजे कारखान्यातील अंतर्गत व्यवस्थापनातील सुधारणा. योग्य कामगार-व्यवस्थापन व कामगारांच्या उत्पादनशक्तीत वाढ ह्यांसंबंधीच्या कार्यक्रमांचाही प्रामुख्याने ह्यात अंतर्भाव होतो. याशिवाय शास्त्रीय व्यवस्थापन एखाद्या कारखान्यापुरते मर्यादित असणे शक्य आहे. याउलट सुयोजनाचा अर्थ जास्त व्यापक आहे. त्यात योग्य कामगार-व्यवस्थापन वगैरे गोष्टींचा अंतर्भाव तर होतोच, पण शिवाय आर्थिक, संघटनात्मक वगैरे अंगांचा अंतर्भाव होत असल्यामुळे शास्त्रीय व्यवस्थापन हे औद्योगिक सुयोजनाचे एक अंग बनते. सुयोजन ही एखाद्या उद्योगधंद्यांतील सर्व घटकांच्या शास्त्रशुद्ध पुनर्रचनेला उद्देशून वापरलेली सर्वसमावेशक संज्ञा आहे.

सुयोजनामुळे अयोग्य स्पर्धा कमी होऊन उद्योगधंद्याला स्थैर्य येते. उत्पादनक्षेत्रातील अकार्यक्षम घटक नाहीसे झाल्यामुळे कार्यक्षम घटक सतत चालू राहून त्यांना बाह्य काटकसरींचे फायदे मिळतात. अतिरिक्त उत्पादन व त्यामुळे होणारा अपव्यय टाळता येतो; प्रमाणित माल निर्माण होऊन बहुविध मालनिर्मितीमुळे होणारा अपव्यव टाळता येतो; त्याचबरोबर विक्री, खरेदी, जाहिरात, संशोधन, शास्त्रीय ज्ञान वगैरेंवरील खर्च वाचतो; उत्पादन व उत्पादनशक्ती वाढल्यामुळे कामगारांच्या कल्याणाकरिता विविध योजना हाती घेणे शक्य होते; व्यवस्थापनाच्या शास्त्रीय पद्धती अंमलात आणता येतात; उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य उपयोग साधला जाऊन आर्थिक वातावरणात सुधारणा होते. सुयोजनाचे जरी वरील फायदे असले, तरी त्यापासून तोटेही होण्याची शक्यता असते. उद्योगधंद्यांची संघटनात्मक पुनर्रचना होत असताना मजुरांवर बेकारीची पाळी निदान अल्पकाळात तरी येतेच. त्याचे कारण अकार्यक्षम आणि किफायतशीर नसलेल्या उद्योगसंस्था बंद पडतात अथवा दुसर्‍या संस्थांमध्ये विलीन होतात.

अस्तित्वात असलेल्या उद्योगसंस्थांकडून सुयोजनानंतर अतिरिक्त मनुष्यबळ बाहेर टाकले जाते. त्यातही कुशल कामगारांना सामावून घेऊन अकुशल व अर्धकुशल कामगारांवर बेकारीची पाळी येते. शिवाय नफ्याचा जास्त भाग भांडवलदाराकडे जात असल्यामुळे संपत्तीचे असमान वाटप होते व त्यामुळे मजूरवर्गात असमाधान पसरते. बेकारीची आपत्ती, सुयोजनामुळे होणार्‍या फायद्यांचे असमान वाटप व पडणारा कामाचा अधिक ताण ह्यांमुळे मजूरवर्ग सुयोजनास सर्वसाधारणे अनुकूल नसतो. त्याचबरोबर सुयोजनाचे एकूण उत्पादनव्यव जरी कमी झाला, तरी त्यामुळे किंमती कमी केल्या जातीलच असे नाही; कारण सुयोजनामुळे स्पर्धामय वातावरण कमी होते, उद्योगसंस्थांच्या विलीनीकरणामुळे मक्तेदारीचा प्रादुर्भाव होतो व मालाच्या उठावाकरिता किंमती कमी करण्याची उद्योगपतींना जरूरी भासत नाही. याउलट जास्त फायदा मिळविण्याकरिता ते उत्पादन कमी करतात व किंमती वाढवितात आणि त्यामुळे सुयोजनाने समाजाचा व ग्राहकाचा फायदाच होईल, असे सांगता येत नाही.

उद्योगधंद्यांना स्थैर्य आणण्याकरिता सुयोजन अटळ असते. ह्याला भारत अपवाद नाही. भारतात कापड व तागाच्या गिरण्या व कोळशांच्या खाणी ह्या धंद्यांच्या सुयोजनाचा चालना मिळाली आहे. भारतातील कापडगिरण्यांच्या धंद्यातील यंत्रसामग्री जुनीपुराणी झाली असून तीत बदल करण्याकरिता व आहे ती सुस्थितीत ठेवण्याकरिता योग्य दिशेने प्रयत्न झाले नाहीत. ह्यामुळे कामगारांच्या उत्पादनशक्तीवर अनिष्ट परिणाम झाला. उत्पादन-खर्च वाढल्यामुळे योग्य दर्जाचा व योग्य किंमतीत ग्राहकास माल देणे कठीण झाले. त्याचबरोबर काही कापडगिरण्यांची आर्थिक परिस्थिती व्यवस्थापनाच्या बेजबाबदारपणामुळे खालावली. कापडगिरण्यांच्या परिस्थितीतील हे दोष सरकारने नियुक्त केलेल्या अनेक समित्यांच्या अहवालात दाखविले आहेत. कापडगिरण्यांच्या आधुनिकीकरणाचा मर्यादित कार्यक्रम आता कार्यवाहीत आला आहे. तागाच्या उद्योगातही जवळजवळ ७५ टक्के उद्योगघटकांचे आधुनिकीकरण व सुयोजन झाले आहे. कोळशाच्या खाणधंद्यातही त्या दिशेने विचार झाला आहे, परंतु प्रत्यक्षात फारशी प्रगती झालेली नाही.

जगातील पुढारलेल्या देशांत आज तांत्रिक क्रांती झाली आहे, त्यामुळे त्या देशांत औद्योगिक उत्पादन व उत्पादनशक्ती वाढत आहे. त्या दृष्टीने भारताची प्रगती अगदीच तोकडी आहे. जागतिक बाजारपेठेत जर भारताला आपले स्थान टिकवावयाचे असेल, निर्यात व्यापार वाढवून औद्योगिक विकासाकरिता लागणारे परकीय चलन जर मिळवावयाचे असेल आणि उत्पादन व उत्पादनशक्ती वाढवून लोकांच्या राहणीमानात सुधारणा करावयाची असेल, तर भारतालाही सुयोजनाशिवाय तरणोपाय नाही.

 

संदर्भ : Srivastava, S. K.; Sahai, B; Nigam, R. S.; Banerjee, M. Industrial Economics, New Delhi, 1967.

लेखक - बा. रं. रायरीकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate