অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

घसारा

घसारा

घसारा : कालक्षेप, वापर व झीज, अप्रचलन, बाजारभावांतील उतार इ. कारणांमुळे मालमत्तेच्या परिमाणात, गुणवत्तेत किंवा मूल्यात सतत होत जाणारी घट. उत्पादनात साधनसामग्रीचा वापर होत असताना ती झिजते व तिचे मूल्य आणि उपयोगिता हळूहळू कमी होत जातात. कालांतराने ती सामग्री निरुपयोगी होऊन तिच्या जागी नवीन सामग्री विकत घ्यावी लागते. त्यासाठी पैसा उपलब्ध व्हावा, म्हणून प्रतिवर्षी नफातोटापत्रक तयार करताना त्यात घसाऱ्याची रक्कम खर्ची घालून घसारा-निधीची तरतूद करावी लागते. अशा रीतीने साठविलेल्या निधीचा उपयोग योग्य वेळी नवीन सामग्री विकत घेण्यासाठी करता येतो आणि कारखान्याची उत्पादकता टिकवून ठेवता येते. घसाऱ्याची आवश्यकता केवळ वापरामुळेच नव्हे, तर नवनवीन शोधांमुळे निर्माण होणाऱ्या नवीन यंत्रांमुळे किंवा नवीन उत्पादनपद्धतीमुळेही जाणवते. नवीन यंत्रांची व पद्धतींची उत्पादकता अधिक असल्यामुळे जुनी यंत्रे व पद्धती टाकाऊ नसल्या, तरी त्यांची उत्पादकता कमी असल्यामुळे त्यांच्याऐवजी नवीन यंत्रांचा व उत्पादनपद्धतींचा वापर करणे अधिक फायदेशीर असते. म्हणून अप्रचलित यंत्रे काढून त्यांच्या जागी नवीन यंत्रे जरूर तेव्हा खरेदी करता यावीत, यासाठीसुद्धा घसारा-निधी साठविण्याची काही उद्योगसंस्थांना गरज भासते.

नफातोटापत्रकात खर्ची टाकण्यात येणाऱ्या रकमेसाठी रोकड खर्चाचा प्रश्न उद्‌भवत नाही, कारण घसाऱ्याची तरतूद केल्याने नफ्याचे प्रमाण तेवढ्याच रकमेने कमी होते. याचा परिणाम रोकड त्या प्रमाणात नफा म्हणून वाटली न जाता उद्योगसंस्थेतच भांडवल म्हणून शिल्लक राहते व कालांतराने तिचा विनियोग नवीन यंत्रे किंवा सामग्री घेण्यासाठी करता येतो. ही रक्कम दुसऱ्या एखाद्या मालमत्तेसाठी वापरली जाऊ नये, यासाठी वेगळा घसारा-निधी निर्माण करता येतो. वापरात असलेल्या यंत्राचे किंवा सामग्रीचे मूल्य ताळेबंदात दाखविताना त्यांच्या मूळ खरेदी किंमतीतून घसाऱ्याची रक्कम वजा करण्यात येते. अशा रीतीने उद्योगसंस्थेच्या मालमत्तेचे वाजवी मूल्य ताळेबंदात दाखविता येते. घसाऱ्याची तरतूद न केल्यास मालमत्ता झिजलेली असतानासुद्धा तिचे मूल्य मूळ खरेदी किंमतीइतकेच दाखविले जाईल व ताळेबंदाचे स्वरूप अवास्तव होईल.

लेखाशास्त्रात घसारा आकारण्याच्या मुख्यत्वे तीन पद्धती आहेत : एका पद्धतीत भांडवली साधनसामग्रीची मूळ किंमत व तिच्या मोडीचे मूल्य यांतील फरक, त्या सामग्रीच्या मानलेल्या आयुर्मर्यादेच्या कालवधीत प्रतिवर्षी सारख्याच प्रमाणात विभागण्यात येतो. हिला ‘सरळ रेषा पद्धत’ (स्ट्रेट लाइन मेथड) असे म्हणतात. दुसऱ्या पद्धतीत घसाऱ्याची रक्कम चालू सामग्रीमूल्याच्या ठराविक टक्केवारीने आकारण्यात येते. प्रतिवर्षी सामग्रीमूल्यातून घसारा वजा केल्याने सामग्रीमूल्य कमी कमी होत जाते व म्हणून घसाऱ्याची रक्कम सरळ रेषा पद्धतीप्रमाणे प्रतिवर्षी सारखीच न राहता कमी कमी होत जाते. या पद्धतीस ‘घटणाऱ्या शिल्लकमूल्याची पद्धत’ (रिड्यूसिंग बॅलन्स मेथड) असे नाव आहे.

तिसऱ्या पद्धतीत घसारा म्हणून बाजूस ठेवलेली रक्कम व्याजाने गुंतवितात व अशा रीतीने बाजूस ठेवलेल्या रकमा व त्यांवरील मिळणारे व्याज यांची बेरीज सामग्रीच्या आयुर्मर्यादेनंतर नवीन सामग्री खरीदण्यासाठी पुरेशी होईल, अशा बेताने घसाऱ्याची आकारणी करतात. या पद्धतीस ‘वार्षिकी व गंगाजळी पद्धत’ (ॲन्युइटी अँड सिकिंग फंड मेथड) म्हणतात. याच पद्धतीचा वापर काही वेळा विमा हप्त्याप्रमाणे ठराविक वार्षिक रक्कम घसाऱ्यासाठी दाखवून करता येतो. साधनसामग्रीच्या मूल्यात एकसारखा फरक होत असल्याने, प्रतिवर्षी तिचे पुनर्मूल्य निश्चित करून नंतरही घसारा-रक्कम ठरविण्याचा मार्ग काही उद्योगसंस्था पतकरतात.

उद्योगसंस्थांकडून प्राप्तिकर आकारताना त्यांचे उत्पन्न शासनाला निश्चित करावे लागते. म्हणून त्यांना होणाऱ्या नफ्यातून कोणत्या प्रमाणावर त्यांना घसाऱ्यासाठी सूट द्यावयाची, याची कर-आकारणी नियमांत तरतूद करावी लागते. ही सूट जास्त प्रमाणावर दिल्याने उद्योगसंस्थांना उत्तेजन मिळते. याउलट ती कमी प्रमाणात दिल्यास उद्योगसंस्थांची वाढ खुंटण्याचा संभव असतो.

 

लेखक - ए. रा. धोंगडे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/9/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate