অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बूर्झ्वा

बूर्झ्वा

बूर्झ्वा : ‘बूर्झ्वा’ हा फ्रेंच शब्द असून त्याचा मूळचा अर्थ ‘आश्रयदाता’, ‘मालक’ असा आहे. मध्ययुगीन काळात कला व हस्तव्यवसाय यांवर जगणाऱ्या आणि सामाजिक -आर्थिक दृष्टया कृषकवर्ग व सरंजामदार यांच्यामध्ये मोडणाऱ्या मध्यमवर्गीयाला ‘बूर्झ्वा' म्हणण्यात येऊ लागले. ‘बूर्झ्वाझी’ ही संज्ञा वर्गवाचक असून ‘बूर्झ्वा’ संज्ञा नाम/विशेषण अशा दोन्ही प्रकारे वापरण्यात येते. यांत्रिकीकरण व कारखानदारी यांमुळे मध्ययुगीन हस्तव्यवसायी नाहीसे होऊन त्या जागी मालक व कामगार असे दोन वर्ग निर्माण झाले. वर्गकलहाच्या संदर्भात बूर्झ्वा हा शब्द केवळ मालकांना उद्देशून वापरण्यात येऊ लागला. एकोणिसाव्या शतकातील साम्यवादी लेखकांनी शब्दाचा हा बदलता अर्थ लोकप्रिय केला. मार्क्सच्या तत्त्वज्ञानात ‘बूर्झ्वाझी’व ‘श्रमिकवर्ग’ यांच्या कलहावर भर आहे. भांडवलशाहीच्या उदयाच्या आधीच्या काळात सामंतशाहीमध्ये सरंजामदारांचा वरिष्ठ वर्ग व कुळे आणि इतर कृषिक यांचा कनिष्ठ वर्ग असे दोन प्रमुख वर्ग अर्थव्यवस्थेत अस्तित्वात होते.

व्यापारी भांडवलशाही व औद्योगिक भांडवलशाही यांचा जसजसा विकास होत गेला, तसतसा व्यापारी व कारखानदार आणि या वर्गाची पांढरपेशी कामे करणारे लोक यांचा आणखी एक महत्वाचा वर्ग अर्थव्यवस्थेत निर्माण झाला.‘बूर्झ्वाझी’ हे नाव ह्या वर्गाला लावण्यात येऊ लागले व या वर्गातील कनिष्ठ भागाचा निर्देश ‘कनिष्ठ बूर्झ्वांझी’ म्हणून होऊ लागला. बूर्झ्वा व कनिष्ठ बूर्झ्वाझी वर्गाचे हितसंबंध सरंजामदार व कृषकवर्ग या वर्गाच्या हितसंबंधांहून वेगळे असतात. अर्थव्यवस्थेला सरंजामशाहीपासून भांडवलशाहीच्या अधिक प्रगत अवस्थेपर्यंत नेण्याचे कार्य हा वर्ग करीत असतो. देशकालपरिस्थितीप्रमाणे या वर्गाच्या स्वरूपात वेगवेगळया राष्ट्रांत काही फरक पडला, तरी मूलतः त्याचे स्वरूप सारखेच असते. परंपरेवर आधारित जुन्या समाजव्यवस्थेच्या जागी करारमदारावर चालणारी नवी अर्थव्यवस्था या वर्गाच्या नेतृत्वाखाली अस्तित्वात येत असते. नफ्याची प्रेरणा ही अर्थव्यवस्थेची मूलभूत प्रेरणा असते. या प्रेरणेतूनच मजुरांचे आर्थिक शोषण होत असते. या प्रेरणेवरच अवलंबून राहिल्यामुळे मुख्यत्वेकरुन या अर्थव्यवस्थेला तेजी-मंदीच्या चक्राच्या फेऱ्यात पुन्हापुन्हा फिरावे लागते. अनेक विशिष्ट टप्प्यांपर्यंत या वर्गाचे कार्य अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने प्रगतिपर असले, तरी त्या अर्थव्यवस्थेच्या मर्यादा जसजशा स्पष्ट होत जातात, तसतशी या वर्गाच्या ऱ्हासाची अंतर्गत चक्रे अर्थव्यवस्थेत गतिमान होऊ लागतात.

मजुरांचे शोषण, आर्थिक तेजी-मंदीचे चक्र, साम्राज्यशाही प्रवृत्ती यांमुळे भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या विरोधी समाजवादी शक्ती भांडवलशाहीच्या पोटातच वाढू लागतात व त्या पुरेशा प्रभावी झाल्या की, भांडवलशाहीची जागा समाजवादी अर्थव्यवस्था घेते आणि भांडवलशाहीबरोबरच या वर्गाचा निरास होतो. क्रांतीच्या प्रक्रियेत या वर्गातील बुध्दिजीवी वर्गाचे कार्य महत्वाचे असते. हा वर्ग क्रांतीला पूरक अशी भूमिका घेऊन तिचे नेतृत्व करतो की, क्रांतीला विरोधी भूमिका घेऊन वरिष्ठ वर्गाच्या बाजूला उभा राहतो, यावर क्रांतीच्या प्रक्रियेची परिणती समाजवादात होणार किंवा फॅसिस्ट वा हुकूमशाही पद्धतीच्या राजवटीत होणार, हे पुष्कळसे अवलंबून असते. उद्योगधंद्यांचे केंद्रीकरण, युद्धकाळ, तदनंतरची भाववाढ यांमुळे भांडवलशाही देशांत बूर्झ्वाझी वर्गाचे स्थान बदलू लागले आहे. श्रमिकवर्गाचे जीवनमान उंचावू लागले असून या ‘नव्या मध्यमवर्गा’ चे भवितव्य अनिश्चित होऊ लागले आहे. मिश्र अर्थव्यवस्थेचे तत्त्वज्ञान बूर्झ्वाझी वर्गाचा पूर्ण निरास न करता अर्थव्यवस्थेत या वर्गाच्या लोकांना योग्य नियंत्रणाखाली ठेवून त्यांच्याकडून उपयुक्त कार्य करून घेण्याची आशा राखते.

लेखक - देवदत्त दाभोलकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate