অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भारतीय युनिट ट्रस्ट

भारतीय युनिट ट्रस्ट : (भारतीय एकक न्यास). लोकांजवळील, विशेषतः लहान गुंतवणूकदारांकडील, बचती एकत्र करून त्या त्यांच्या वतीने निरनिराळ्या औद्योगिक रोख्यांत गुंतविणारी एक मध्यस्थ वित्तसंस्था.

भारत सरकार गेली काही वर्षे समाजातील मध्यम व कमी उत्पन्न गटांतील लहान गुंतवणूकदारांनी औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्यांच्या समभाग भांडवलात सहभाग करावा या हेतूने अशा प्रकारच्या गुंतवणूक सुविधा पुरविणारी एखादी वित्तसंस्था स्थापन करण्याच्या विचारात होते. भारतीय युनिट ट्रस्ट (भारतीय एकक न्यास) या वित्तसंस्थेची १ फेब्रुवारी १९६४ रोजी याच उद्देशाने स्थापना करण्यात आली. या न्यासाचे मूळ भांडवल ५ कोटी रुपयांचे असून ते भारतीय रिझर्व्ह बँक (२.५ कोटी रु.), भारतीय आयुर्विमी निगम (७५ लक्ष रू.), भारतीय स्टेट बँक व तिच्या गौण बँका (७५ लक्ष रू.) आणि अनुसूचित बँका व इतर वित्तसंस्था (१ कोटी रू.) यांमध्ये विभागलेले आहे. या मूळ भांडवलाच्या आधारावर, भारतीय एकक न्यास विविध रोख्यांत गुंतवणूक करून, एकक (युनिटे) निर्माण करून ते गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या लोकांना विकतो.

गुंतवणूक केल्यामुळे मिळणारे उत्पन्न व भांडवलामध्ये होत जाणारी मूल्यवृद्धी, ही दोन्ही गुंतवणूकदारांमध्ये (युनिटधारकांना किंवा एककधारकांना-युनिटहोल्डर), खर्चवेच वजा जाता, वाटली जातात. एकक न्यासाची एकूण गुंतवणूक समान किंमतीच्या (मूल्याच्या) एककांमध्ये (युनिटांमध्ये) विभागण्यात आलेली असते. ‘एकका’ची मालकी असणाऱ्या गुंतरवणूकदाराला न्यासाने गुंतवणूक केलेल्या रोख्यांमध्येही लाभदायक मालकी हक्क प्राप्त होतो व गुंतवणुकीमुळे निर्माण होणारे लाभांश उत्पन्न किंवा भांडवली लाभ यावरही त्याचा हक्क प्रस्थापित होतो. एकक न्यास गुंतवणूकदारांकडून ‘एकक’परत खरेदी करण्यास सदैव तयार असतो, अशा रीतीने एककधारकाला मोठ्या प्रमाणात ‘रोखता’ निर्माण करण्याची संधी प्राप्त होते. एकक न्यासाने केलेल्या गुंतवणुकीच्या बाजारातील किंमतींवरच गुंतवणूकदारांना न्यासाकडून विकल्या जाणाऱ्या आणि गुंतवणूकदारांकडून न्यास ‘परत’ खऱेदी करणाऱ्या एककांच्या किंमती (म्हणजेच एककांच्या विक्री-फेरखरेदीच्या किंमती) ठरविल्या जातात.

न्यासाकडून विकल्या जाणाऱ्या एका एककाचे दर्शनी मूल्य (किंमत) दहा रु. व दहा एककांचे दर्शनी मूल्य १०० रु पेक्षा जास्त नसते. गुंतवणूकदाराला किमान दहा एकक व त्यांच्या पटीत कितीही एकक विकत घेता येतात. न्यासाकडून निर्धारित केल्या जाणाऱ्या किंमतींना एककांची विक्री केली जाते, न्यासाला हे निर्धारण मूल्य त्याने वेळोवेळी घोषित केलेल्या लाभांश दरावर लक्ष ठेवून ठरवावे लागते. एककधारकांनी कितीही एकक विकत घेतले तरी त्यांवर मर्यादा नसते. सांप्रत एककांमध्ये केलेल्या गुंतवणुकीपासून मिळणाऱ्या ६,००० रू. उत्पन्नापर्यंत प्राप्तिकर बसत नाही. ३० जून १९८० अखेर संपलेल्या वर्षात भारतीय एकक न्यासाने लाभांशदर ९ % वरून १० % वर नेला.

भारतीय एकक न्यासाचे आर्थिक व्यावहार व कार्यपद्धती यांचे सर्वसाधारण अधीक्षण, संचालन व व्यवस्थापन विश्वस्त मंडळामार्फत केले जाते. मंडळावर एकूण नऊ विश्वस्त असून त्यांपैकी अध्यक्ष व आणखी चार विश्वस्त यांची (त्या पाच जणांची) नियुक्ती भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारा, एका विश्वस्ताची भारतीय आयुर्विमा निगमाद्वारा, एक विश्वस्ताची भारतीय स्टेट बँकेद्वारा आणि उरलेल्या दोन विश्वस्तांची नियुक्ती उर्वरित वित्तसंस्थांमार्फत केली जाते.

न्यासाला रिझर्व्ह बँक, इतर बॅका व अन्य वित्तसंस्था यांच्याकडून पैसे कर्जाऊ घेण्याचे अधिकार प्राप्त झाले असून, न्यास हा एककधारकांच्या हिताकरिता व त्यांच्यातर्फे काम करणारी संस्था असल्याने, त्याला मिळणारे उत्पन्न हे प्राप्तिकर, अधिकर व इतर कर यांपासून सर्वस्वी मुक्त असते.

एकक न्यासाचे मूळ उद्दिष्ट दुहेरी आहे : (१) मध्यम व कमी उत्पन्न गटांतील लोकांच्या बचती गोळा करणे व त्यांना अधिक बचत करण्यास प्रवृत्त करणे आणि (२) देशातील जलद औद्योगिकीकरणामुळे निर्माण होणारे लाभ त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करणे. हे दुहेरी उद्दिष्ट पुढील तीन प्रकारांनी साध्य करण्याचा न्यासाचा प्रयत्न आहे : (१) न्यासाचे एकक देशाच्या सर्व भागांतील जास्तीत जास्त गुंतवणूकदारांना विकणे, (२) एकक विकून आलेले  द्रव्य तसेच मूळचा ५ कोटी रूपयांचा भांडवल निधी अशा दोन्ही रकमा औद्योगिक रोखे व ऋणपत्रे यांमध्ये गुंतविणे व (३) एकक धारकांना लाभांश देणे.

एककांपासून मिळणारे फायदे

भारतीय एकक न्यासाचे एकक खरेदी केल्याने गुंतवणुकदाराला पुढील चार लाभ निश्चितपणे मिळू शकतात. (१) एककामध्ये केलेली गुंतवणूक ही सुरक्षित मानली जाते, कारण जोखीम ही विविध प्रकारच्या रोख्यांमध्ये (स्थिर उत्पन्नाच्या व बदलत्या-कमीअधिक-उत्पन्नाच्या) वाटली जाते. (२) एककधारकांना वर्षानुवर्षे मिळत जाणाऱ्या लाभांशरूपाच्या उत्पन्नामध्ये सातत्य असते. न्यासाला एकूण मिळणाऱ्या उत्पन्नापैकी ९० टक्के उत्पन्न एककधारकांना वाटले जाते. (३) एकक न्यासाकडून एककधारकांना मिळणाऱ्या लाभांशरूपी उत्पन्नावर विविध प्रकारच्या करसवलती मिळू शकतात. (४) न्यासाचे एकक हे अतिशय रोकडसुलभ असतात; याचा अर्थ असा की, गुंतवणूकदाराला वाटेल तेव्हा या एककांचे रोकड रकमेत रूपांतर करता येते. हे एकक परत न्यासाला त्याने निर्धारित केलेल्या किंमतीस विकता येण्याची तरतूद आहे.

एकक न्यासाचे कार्य

भारतीय एकक न्यासाला ३० जून १९८० रोजी १६ वर्षे पूर्ण झाली. न्यासाच्या पहिल्या वर्षाच्या कारकीर्दीत एकक खरेदी करणाऱ्यांची संख्या सु. १.३५ लक्ष एवढी होती व अभिदत्त (स्वीकृत) भांडवलाचा आकडा सु. १९ कोटी रु एवढा होता. न्यासाच्या दुसऱ्या वर्षाच्या अस्तित्वात (कारकीर्दीत) एकक विक्रीमध्ये लक्षणीय घट झाली. परंतु पुढल्या वर्षांच्या अवधीत हळूहळू व सातत्याने एकक विक्रीचे प्रमाण वाढत गेले. ३० जून १९८० अखेर न्यासाजवळ नोदणी झालेल्या एककधारकांची संख्या ६.५ लाखांच्या घरात जाऊन पोहोचली व त्यांचे ३९१ कोटी रू. द्रव्य न्यासाजवळ जमा झाले.

एकक न्यासाने निरनिराळ्या रोख्यांमध्ये व भागांमध्ये गुंतवणूक केलेली असून ती स्थिर-उत्पन्न देणारे व अस्थिर (कमी-जास्त) उत्पन्न देणारे रोखे व भाग यांनी संतुलित असते. अर्थातच भांडवलाच्या सुरक्षिततेबरोबरच कमाल उत्पन्न हे यामागचे न्यासाचे प्रधान उद्दिष्ट असते. न्यासाजवळील एकूण निधिद्रव्यापैकी सु. २७ टक्के द्रव्य समभागांमध्ये, तर सु. २७ टक्के द्रव्य अधिमान भाग व ऋणपत्रे यांमध्ये गुंतविण्यात आलेले असते. उर्वरित द्रव्य बँकांकडे ठेवी स्वरूपात गुंतविण्यात आलेले असते. उर्वरित द्रव्य बँकांकडे ठेवी स्वरूपात गुंतविलेले असते. न्यासाने सु. २५० नामवंत व सातत्याने लाभांश देणाऱ्या कंपन्यांच्या समभागांत व रोख्यांत गुंतवणूक केली असून या कंपन्या वित्तीय संस्था, लोकोपयोगी सेवाउद्योग तसेच निर्मितिउद्योग या प्रकारच्या उद्योगधंद्यात मोडतात.

देशातील अल्प व मध्यम गटांतील उत्पन्नाच्या लोकांचा भारतीय एकक न्यासाला प्रथम मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक व अभूतपूर्व असाच होता. न्यासाच्या कार्यात फक्त १९७४-७५ या एका वर्षासाठी फार मोठे शैथिल्य आले, त्या वर्षी एककांच्या विक्रीऐवजी फेरखरेदीचाच आकडा फार मोठा होता. त्या वर्षी विक्री १७ कोटी रुपयांची (मध्यवर्ती ३० कोटी रु.), तर फेरखरेदी २० कोटी रुपयांवर (गतवर्षी ४ कोटींपेक्षाही कमी) पोहोचली. ३० जून १९७५ च्या अखेरीस विक्री केलेल्या व राहिलेल्या एककांची एकूण किंमत १४८ कोटी रु. होती, तर ३० जून १९७४ च्या अखेरीस हाच आकडा १५१ कोटी रु. होता. याची कारणे पुढीलप्रमाणे : (१) कंपन्या देत असलेल्या लाभांशावर घालण्यात आलेले नियंत्रण व मर्यादा, (२) १९७४ मध्ये बँकदरात ७ टक्क्यांवरून ९ टक्क्यांपर्यंत झालेल्या वाढीमुळे बँकांच्या ठेवींवरील व्याजदरांत झालेली वाढ. बँक ठेवींवरील वाढीव व्याजामुळे अल्प व मध्यम मिळकत असणारे लोक साहजिकच बँकांकडे आकृष्ट झाले, त्याचप्रमाणे इतर आकर्षक गुंतवणुकीच्या प्रकारांमुळे लोकांना एकक हे गुंतवणूकयोग्य असे विनियोगमाध्यम वाटेनासे झाले. यामुळे एकक न्यासाला मोठ्या प्रमाणावर एककांची फेरखरेदी करणे भाग पडले.

ही प्रवृत्ती वेळीच रोखून धरावी व एकक न्यासाला साहाय्य करावे, या हेतूंनी भारत सरकारने एककांमधील गुंतवणुकींना लागू होणारे प्राप्तिकर व संपत्तिकर यांबाबत विशेष सवलती जाहीर केल्या. उदा., एककांपासून मिळणाऱ्या २,००० रु. पर्यंतच्या लाभांशावर प्राप्तिकर आणि एककांमधील २५,००० रु. पर्यंत केलेल्या गुंतवणुकीवर संपत्तिकर माफ करण्यात आला. याआधी एकक व अन्य विशिष्ट प्रकारच्या क्षेत्रांमध्ये १.५ लक्ष रु. पर्यंत गुंतवणूक केल्यास त्यावर संपत्तिकराची तसेच एककांपासून मिळाणाऱ्या ३,००० रु. पर्यंतच्या लाभांशावर प्राप्तिकराची सूट लागू होती ती निराळीच. या प्रकारच्या सवलतींचा सुयोग्य परिणाम दिसून आला : एककांची विक्री वाढली व फेरखरेदी कमी झाली. १९७५-७६ मध्ये एककांची एकूण विक्री २९ कोटी रु. झाली, हेच प्रमाण १९७४-७५ मध्ये १७ कोटी रु. होते. १९७८-७९ मध्ये एककांची विक्री १०२ कोटी रुपयांच्या घरात पोहोचून एक विक्रमच निर्माण केला गेला.

एकक न्यासाचे नव्यानेच सुरू केलेली ‘एकक संबद्ध विमा योजना’ (युनिट लिंक्ड इन्शुअरन्स प्लॅन-युलिप) हीदेखील अल्पावधीतच लोकप्रिय झाली. १९७८-७९ या एकाच वर्षा या योजनेखाली झालेली विक्री व जमलेली रक्कम ही मागील सात वर्षांतील एकूण रकमेपेक्षा जास्त होती.

एकक न्यासाने तीन योजनांद्वारे एककांची विक्री चालू ठेवली आहे : (१) एकक योजना, १९६४; (२) एकक योजना, १९७१ व (३) एकक योजना, १९७६. विविध प्रकारच्या गुंतवणूकदारांच्या निरनिराळ्या गुंतवणूक गरजा लक्षात घेऊन, न्यासाने एकक योजनांशी संबद्ध (निगडित) अशा विशिष्ट बचतयोजना तयार करून त्या कार्यवाहीत आणल्या. उदा., पुनर्गुंतवणूक योजना, १९६६; बालक बक्षीस योजना, १९७०; एकक संबद्ध योजना, १९७१.

न्यासाने ३० जून १९८१ अखेर, एकक योजना, १९६४ च्या अन्वये विक्रीस काढलेल्या एककांच्या गुंतवणुकीवर ११.५ टक्के लाभांश जाहीर केला. ३० जून १९८२ अखेर संपलेल्या वर्षात (१९८१-८२) या लाभांशाचा दर १२.५% होता. ३० जून १९८३ अखेर संपलेल्या वर्षात (१९८२-८३) हा दर १३.५ % घोषित करण्यात आला. १९८१-८२ या वर्षात सर्व प्रकारच्या एकक योजनांखालील एककांची एकूण विक्री १०० कोटी रुपयांच्यावर गेली-ती अंदाजे १३५ कोटी रु. झाली. १९७८-७९ मध्ये ही विक्री अशीच १०० कोटी रुपयांवर गेली होती (१०१.५३ कोटी रु.). १९८२-८३ या वर्षात सर्व प्रकारच्या एकक योजनांखालील एककांची एकूण विक्री १६६ कोटी रु. झाली. १९८२-८३ या वर्षात एककांची झालेली विक्री म्हणजे न्यासाच्या कारकीर्दीतील एक विक्रमच मानला पाहिजे.

एकक योजना, १९६४ : या योजनेखाली पुनर्गुंतवणूक योजना व बालक बक्षीस योजना यांचा अंतर्भाव करून एककांची एकूण विक्री ६५.१५ कोटी रू. झाली. हीच विक्री १९८०-८१ मध्ये ३९.६६ कोटी रु. झाली होती. १९८२-८३ या वर्षात या योजनेखाली एककांची एकूण विक्री ७५.९४ कोटी रु.ची झाली. याच वर्षात (१९८०-८१) एककांची फेरखरेदी २१.७० कोटी रुपयांची झाली गतवर्षी ती १५.३८ कोटी रु. होती. एककांची फेरखरेदी १३.१० कोटी रु. ची झाली (१९८२-८३)

एकक योजना, १९७१ : एकक संबद्ध विमा योजना (युनिट लिंक्ड इन्शुअरन्स प्लॅन-युलिप). या वर्षात न्यासाकडे ३४,७०० अर्ज आले. गुंतवणुकीची एकूण रक्कम ३७.३० कोटी रु. होती. १९८२-८३ या वर्षात न्यासाकडे ५४,५०० अर्ज आले व गुंतवणूक रक्कम ६०.३० कोटी रू. झाली. ३० जून १९८३ रोजी सु. २.१३ लक्ष लोक या योजनेचा लाभ घेत होते.

धर्मादाय व धार्मिक न्यास तसेच नोंदणीकृत संस्था यांकरिता एकक योजना १९८१ : केवळ वरील संस्थांकरिता ही योजना १ ऑक्टोबर १९८१ पासून सुरू झाली. या योजनेखाली किमान लाभांश दर १२ % तसेच एककांच्या फेरखरेदीच्या सोयी, यांमुळे ही योजना या प्रकारच्या गुंतवणूकदार वर्गाला अतिशय सोईस्कर वाटली व तिला प्रतिसादही चांगला मिळाला. ऑक्टोबर १९८१ ते जून १९८२ या पहिल्याच वर्षात या योजनेखालील एककांची विक्री ५ कोटी रु. या अपेक्षित लक्ष्याहूनही अधिक म्हणजे ९.१६ कोटी रु. झाली १९८२-८३ या वर्षात या योजनेखाली एककांची एकूण विक्री ७.८२ कोटी रु. झाली. या योजनेचा लाभ घेणारे सर्व न्यास व संस्था ह्या लहान आकाराच्या होत्या, त्यांच्या सोयीसाठी किमान वर्गणीची रक्कम ५०.००० रु. वरून १०,००० रु. पर्यंत खाली आणण्यात आली.

उत्पन्न एकक योजना १९८२

मे १९८२ मध्ये न्यासाने पंचवर्षीय बचत योजना सुरू केली. या योजनेत प्रतिवर्षी १२ ते १३ टक्के व्याज मिळण्याची (म्हणजेच दर सहमाहीस एकदा) तसेच फेरखरेदीची हमी आणि विशेष करसवलती यांची तरतूद होती. अल्प व मध्यम उत्पन्न गटांतील लोकांकरिता ही चांगली योजना न्यासाने चालू केली. सबंध देशातून या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला व १९ जून १९८२ रोजी या योजनेखाली ४१ कोटी रुपयांची एकक विक्री झाली.

या सर्व योजनांमुळे ३० जून १९८२ अखेर न्यासाजवळ ६७९ कोटी रुपयांचा गुंतवणूकयोग्य निधी जमा झाला. ३० जून १९८१ अखेर हाच निधी ५२३ कोटी रु. एवझा  होता. ३० जून १९८३ अखेर या निधींचा आकडा ८८५ कोटी रू. झाला.

१९८१-८२ या वर्षात एकक योजना १९६४, तसेच एकक योजना १९७१ या दोन्ही योजनांपासून न्यासाला मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ झाल्याचे आढळते. एकक योजना १९६४ नुसार ७०.३० कोटी रु. (पूर्वीच्या वर्षी : १९८०-८१ मध्ये ५५.४१ कोटी रु.) न्यासाजवळ जमा झाले, तर एकक योजना १९७१ नुसार गतवर्षीच्या ४.७१ कोटी रू. वरून या वर्षी ६.९० कोटी रु. जमा झाले. न्यासाला १९८२-८३ या वर्षी सर्व एकक योजनांपासून प्रथमच  १०० कोटी रुपयांवर (१००.८८ कोटी रु.) प्राप्ती झाली.

सर्व योजनांखाली मिळून न्यासाजवळ राखीव ७६ कोटी रुपयांचा निधी जमला. १९८०-८१ मध्ये तो ५२.०३ कोटी रु. होता. १९८२-८३ मध्ये हा आकडा १०८ कोटी रुपयांवर गेला. पंचावन्न वर्ष वयाच्या लोकांकरिता तसेच विधवा व शारीरिक आणि मानसिक दृष्टया अपंग असलेल्यांकरिता न्यासाने मार्च १९८३ मध्ये ‘मासिक मिळकत योजना’ (मंथली इन्कम युनिट स्कीम) अशी एक नवीन योजना सुरू केली. या योजनेच्या अंतर्गत, व्यक्तींसाठी किमान ५,००० रु.व कमाल १ लक्ष रु. आणि संस्थांकरिता ५ लक्ष रुपयांची गुंतवणूक मर्यादा घालण्यात आली होती. गुंतवणूक कालावधी पाच वर्षांचा असून १९८२-८३ च्या अखेरीस ही योजना आणल्याने तिची मुदत मार्च व एप्रिल १९८३ अशी दोन महिन्यांकरिता होती. या योजनेनुसार गुंतवणूकदाराला दरमहा ठराविक पण निश्चित उत्पन्न मिळण्याची तरतूद होती. योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळून अल्पावधीतही २४,५८० अर्जदारांकडून सु. ५० कोटी रु. न्यासाकडे जमा झाले.

याच वर्षी ‘वृद्धी व मिळकत योजना, १९८३’(ग्रोथ अँड इन्कम युनिट स्कीम) अशी आणखी एक योजना न्यासाने सुरू केली. समाजातील सर्व थरांतील लोकांसाठी – विशेषतः लहान गुंतवणूकदारांकरिता – ही योजना खुली ठेवण्यात आली. हिच्यामध्ये किमान ३,००० रु. व कमाल १५,००० रु. पाच वर्षांकरिता गुंतवावयाचे असून प्रतिवर्षी १० % लाभांश मिळणार आहे. गुंतविलेल्या रकमेतही मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता सूचित करण्यात आली. या योजनेत सु. ८ कोटी रु. जमा होतील, असा न्यासाचा विश्वास आहे.

न्यासाने आकाशवाणी, दूरदर्शन, वृत्तपत्रे, मोठमोठे जाहिरात फलक यांसारख्या संपर्कमाध्यमांद्वारे एकक विक्रीची जाहिरात मोठ्या प्रमाणावर कार्यान्वित केली. स्थापनेपासून १९८२-८३ या वर्षाअखेर न्यासाने भारताची १८ राज्ये व २ केंद्रशासित प्रदेश यांमधील ८६ जिल्ह्यांमध्ये ५७ प्रमुख प्रतिनिधींची नियुक्ती केली. १९८०-८१ पासून राज्यनिहाय उप-कार्यालय स्थापण्याचे धोरण न्यासाने आखले असून आतापर्यंत न्यासाची त्रिचूर (केरळ), लुधियाना (पंजाब) व विजयवाडा (आंध्र प्रदेश) अशी तीन उपकार्यालये उघडण्यात आली आहेत.

मूल्यमापन

एकक न्यासाने १९६४ पासून एककांच्या विक्रीस केलेला प्रारंभ, ही भारतीय भांडवल बाजाराच्या विकासामधील एक अतिमह्त्वाची घटना मानली पाहिजे. तत्त्वतः एकक न्यासाचे उद्दिष्ट प्रशंसनीयच मानले पाहिजे, कारण तो समाजातील बचत गोळा करून ती व्यापार व उद्योग यांमध्ये गुंतवीत असतो. सरकारी क्षेत्रातील एक उपक्रम या नात्याने एकक न्यासाने सर्वसामान्य लोकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. केंद्र शासनाकडूनही त्याला अनेक करसवलती मिळाल्या. गुंतवणुकदाराने गुंतविलेली रक्कम सुरक्षित व मोठ्या प्रमाणात रोकडसुलभ (गुंतवणूकदाराला स्वतःजवळील एकक न्यासाला परत विकून पैसा मिळविण्याची सुविधा) असते. एकक न्यासाने आपल्या कार्याद्वारे गुंतवणूकदाराला त्याने गुंतविलेल्या भांडवलावरील मोबदला माफक प्रमाणात देता येतो, हे सिद्ध करून दाखविले आहे.

 

लेखक - वि. रा. गद्रे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate