অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मूल्यनिर्धारण सिद्धांत

मूल्यनिर्धारण सिद्धांत : कोणत्याही वस्तूचे विनिमय-मूल्य बाजारात वस्तूंच्या देवघेवीने ठरविले जाते. एका वस्तूची दुसऱ्या वस्तूशी ज्या प्रमाणात देवघेव होते, ते प्रमाण वस्तूचे विनिमय-मूल्य दर्शविते. एक मीटर कापडाची दोन किलो गव्हाबरोबर देवघेव होत असेल, तर एक मीटर कापडाचे विनिमय-मूल्य दोन किलो गहू होय, तसेच एक किलो गव्हाचे विनिमय-मूल्य अर्धा मीटर कापड होय.

पैसा हे वस्तूंच्या परस्पर-विनिमयाचे माध्यम आहे आणि म्हणून पैशाचा वस्तूंच्या सापेक्ष मूल्यावर परिणाम होत नाही असे मानले, तर कोणत्याही वस्तूच्या विनिमय-मूल्याचे पैशाच्या स्वरूपात रूपांतर केले असता त्या वस्तूची किंमत कळते. म्हणून वस्तूची किंमत म्हणजे तिच्या विनिमय-मूल्याचा पैशाच्या स्वरूपात केलेला निर्देश होय. यामुळेच वस्तूचे सापेक्ष विनिमय-मूल्य आणि तिची सापेक्ष किंमत यांमध्ये फरक संभवत नाही

बाजारपेठ

वस्तूचे विनिमय-मूल्य बाजारपेठेत विक्रेते आणि ग्राहक यांच्या देवघेवीने ठरविले जाते. बाजारपेठेची अर्थशास्त्रीय कल्पना व्यवहारिक कल्पनेहून निराळी आहे. अर्थशास्त्रीय दृष्ट्या बाजारपेठ म्हणजे विशिष्ट स्थान नव्हे. केवळ खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना बाजारपेठ म्हणतात. म्हणून अर्थशास्त्रीय दृष्ट्या खरेदी-विक्रीची वस्तू, ग्राहक आणि विक्रेते यांचे अस्तित्व आणि ज्यामुळे वस्तूची किंमत सर्वत्र एकसारखी राहील इतपत निकटचे त्यांच्यामधील दळणवळण आणि स्पर्धा, ही बाजारपेठेची प्रमुख लक्षणे होत. कोणत्याही वस्तूच्या बाजारपेठची व्यापकता किंवा संकुचितपणा या लक्षणांवर अवलंबून असतात.

म्हणून स्थानदृष्ट्या वस्तूला स्थानिक, राष्ट्रीय, किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असू शकते. वस्तूचे स्वरूप, वाहतुकीची व संदेशवहनाची साधने, परतफेडीची सोय, वस्तू टिकविण्याची साधने, राजकीय परिस्थिती आणि सरकारचे आर्थिक धोरण यांवर वस्तूच्या बाजारपेठेचा विस्तार अवलंबून असतो. जेव्हा बाजारपेठेचा सर्व भागांत वस्तूचे मूल्य समान असते, तेव्हा तिला ‘पूर्ण बाजारपेठ’ म्हणतात.

पूर्ण बाजारपेठेत असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते असतात; वस्तू एकजिनसी असते. विक्रेते आपला माल खपविण्यासाठी खास प्रयत्न करीत नाहीत आणि तशी आवश्यकताही भासत नाही. म्हणून जाहिरातबाजीची जरूरी नसते. बाजारपेठेच्या अपूर्णतेची अनेक कारणे असू शकतात. वस्तूचे ग्राहक मर्यादित असतील, विक्रेते मर्यादित असतील, वस्तू एकजिनसी नसेल, ग्राहकांना अगर विक्रेत्यांना किंवा दोघांनाही बाजार परिस्थितीचे संपूर्ण ज्ञान नसेल, तर ती ‘अपूर्ण बाजारपेठ’ होय. बाजारपेठेच्या अपूर्णतेमुळे अपूर्ण स्पर्धा, मक्तेदारी किंवा मक्तेदारी स्पर्धा निर्माण होते. प्रत्येक प्रकारच्या बाजारपरिस्थितीत अत्यल्पकालीन, अल्पकालीन आणि दीर्घकालीन असे तीन प्रकारचे मूल्यनिर्धारण होत असते. बाजारपेठ.

पूर्ण स्पर्धा आणि किंमत

पूर्ण स्पर्धेच्या बाजारी परिस्थितीत अत्यल्प काळात वस्तूची किंमत ग्राहक व विक्रेते याच्यांमधील स्पर्धने ठरविली जाते. अत्यल्प काळातील वस्तूच्या किंमतीला ‘बाजारी किंमत’ किंवा ‘बाजारभाव’ (मार्केट प्राइस) असे म्हणतात. स्पर्धामय परिस्थितीत ग्राहकांमध्ये वस्तू खरेदी करण्यासाठी व विक्रेत्यांमध्ये वस्तूची विक्री करण्यासाठी स्पर्धा चालू असते. वस्तूची एकंदर मागणी व तिचा एकंदर पुरवठा यांच्या संतुलनाने वस्तूची बाजारी किंमत ठरली जाते.

वस्तूची बाजारी किंमत तिचे संतुलन-मूल्य किंवा स्थिर मूल्य दर्शविते. बाजारात विक्रेत्यांचे उद्दिष्ट आपला फायदा अधिकतम करण्याचे, तर ग्राहकांचे उद्दिष्ट आपले एकंदर समाधान अधिकतम करण्याचे असते. वस्तूची बाजारी किंमत किंवा स्थिर मूल्य ठरविण्याच्या कामी सीमान्त विक्रेते आणि सीमान्त ग्राहक फार महत्त्वाची कामगिरी बजावतात.

सीमान्त विक्रेते प्रचलित बाजारी किंमतीत वस्तू विकण्यास उद्युक्त झालेले असतात, परंतु त्या किंमतीपेक्षा थोड्याशाही कमी किंमतीत ते आपली वस्तू विकणार नाहीत. तसेच सीमान्त ग्राहक प्रचलित बाजार किंमतीत वस्तू खरेदी करण्यास उद्युक्त असतात, परंतु त्या किंमतीपेक्षा थोड्याशाही अधिक किंमतीस ते खरेदी करणार नाहीत. म्हणून वस्तूच्या मागणीच्या बाजूने तिचे संतुलन-मूल्य सीमान्त ग्राहकांच्या वस्तु-परिमाणांच्या सीमान्त उपयोगितेबरोबर असते; व वस्तूच्या पुरवठ्याच्या बाजूने तिचे संतुलन-मूल्य सीमान्त विक्रेत्यांच्या वस्तूंच्या किमान पुरवठा किंमतीबरोबर असते.

आ.१ अत्यल्प काळात कोणत्याही वस्तूचा एकंदर पुरवठा वाढविता येत नाही. परंतु वस्तू जर टिकाऊ असेल, तर विक्रेते किंमतवाढीच्या अपेक्षेने अधिक फायदा मिळविण्यासाठी आपल्याजवळील वस्तूचा साठा सावधगिरीने बाजारात विक्रीस काढतील; वस्तूची विक्री काही अंशी पुढे ढकलतील.

आपल्याजवळ असलेल्या वस्तूच्या साठ्याच्या निरनिराळ्या भागांना वेगवेगळ्या किमान पुरवठा किंमती ठरवितील. वस्तूंची किंमत जसजशी वाढेल, तसतसा वस्तूचा साठा अधिकाधिक प्रमाणात ते बाजारात विक्रीस काढतील. जर वस्तू अगदीच नाशवंत असेल, तर विक्रेते आपल्याजवळील साठा लवकरात लवकर विक्रीस काढतील. अत्यल्प काळात वस्तूचा बाजारी पुरवठा आणि

किंमत यांचा वस्तूच्या उत्पादन-व्ययाशी अर्थाअर्थी संबंध नसतो.


वस्तूच्या उत्पादन-व्ययाचा किंवा विक्रेत्यांनी केलेल्या परिव्ययाचा वस्तूच्या पुरवठ्यावर आणि किंमतीवर परिणाम होत नाही. बाजारी परिस्थिती प्रतिकूल असेल, तर विक्रेते आपल्याजवळील वस्तूचा साठा कमी किंमतीत विकून तोटाही सोसण्यास तयार असतात. अशा परिस्थितीत कमीतकमी तोटा सोसणे हेच त्यांचे ध्येय असते.

प्राप्त परिस्थितीत प्रत्येक विक्रेत्याची आपल्या वस्तूच्या संपूर्ण साठ्याचा किंवा त्याच्या वेगवेगळ्या भागांची विशिष्ट किमान पुरवठा-किंमत म्हणजे राखीव किंमत किंवा किंमती असू शकतात. प्रत्येक विक्रेता आपल्या मालाची किमान राखीव किंमत वस्तूच्या उत्पादनव्ययाच्या किंवा खरेदी किंमतीच्या संदर्भात ठरवीत नसून वस्तूचे स्वरूप, तिचा टीकाऊपणा किंवा नाशवंतपणा, विक्रेत्याला भासणारा पैशाची निकड, माल राखून ठेवण्याचा खर्च, भावी किंमतीची अंदाज आणि वस्तूचा उत्पादन काळ यांनी ठरवीत असतो. बाजारात जे विक्रेते अधिक आशावादी असतात, त्यांच्या आपल्या मालाच्या किमान राखीव किंमती अधिक असतील. उलट काही विक्रेते निराशावादी असतात, त्यांच्या किमान राखीव किंमती कमी असतात. त्यामुळे किंमत जसजशी वाढत जाते, तसतसा तिचा पुरवठा वाढत जातो. वरील आकृतीत (आ.१) ‘पफ’ ही वस्तूची पुरवठा रेषा आहे आणि ‘भम’ ही तिची मागणी रेषा आहे. पफ आणि भम एकमेकींना ‘क’ बिंदूत छेदतात. क या संतूलनबिंदूत वस्तूचा एकंदर पुरवठा (अग) वस्तूंच्या एकंदर मागणीबरोबर आहे. म्हणून कग = अख ही वस्तूची बाजारी किंमत (संतुलन-मूल्य) ठरली.

वस्तूच्या मागणीची आणि पुरवठ्याची परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत ‘अख’ पेक्षा अधिक, समजा ‘अख १ ’ असेल, तर विक्रेत्यांमध्ये माल खपविण्याची स्पर्धा लागेल व ग्राहक आपली मागणी संकुचित करण्याचा आटोकाट प्रयत्न करतील. म्हणजे विक्रेत्यांच्या आपला माल खपविण्य़ाच्या स्पर्धेचा परिणाम होऊन किंमत पुन्हा ‘अख’च्या पातळीत येईल. तद्‌वत वस्तूची किंमत ‘अख२’ पर्यंत कमी झाली, तर ग्राहकांमध्ये वस्तू खरेदी करण्यासाठी स्पर्धा लागेल आणि विक्रेते पुरवठा आखडून धरतील; परिणामी वस्तूची किंमत पुन्हा ‘अख’ च्या पातळीत येईल. अशा रीतीने ‘अख’ ही किंमत वस्तूचे संतुलन-मूल्य किंवा स्थिर मूल्य म्हणजे बाजारी किंमत होय.

आ.२ वस्तूच्या मागणी-परिस्थितीत किंवा पुरवठा परिस्थितीत किंवा दोहोंमध्ये बदल झाल्यास संतुलन-मूल्य बदलते. वस्तूच्या पुरवठ्याची परिस्थिती कायम असताना मागणीची परिस्थिती बदलली, समजा मागणीची वृद्धी झाली, तर वस्तूची किंमत वाढेल. मागणीची वृद्धी मागणी रेषा वरच्या बाजूला म्हणजे उजव्या बाजूला सरकवून दाखवली जाते. आ. २ मध्ये ‘भ १ म १ ’ ही मागणी रेषा मागणीची वृद्धी दर्शविते. म्हणून ‘पफ’ आणि ‘भ १ म १ ’ यांच्या छेदनबिंदूत म्हणजे ‘क’ या बिंदूत संतुलनावस्था प्राप्त झाली आहे. म्हणून वस्तूची किंमत ‘क’ पर्यंत वाढली आहे.

तसेच वस्तूच्या मागणीचा क्षय झाला, म्हणजे मागणी घटली आणि मागणीची घट डाव्या बाजूला सरकलेल्या ‘भ’ या नवीन मागणी रेषेने दर्शविली असेल, तर वस्तूची किंमत मागणी रेषा ‘भ’ पुरवठा रेषा ‘पफ’ यांच्या ‘क या छेदनबिंदूने ठरविली जाईल.



अशा रीतीने मागणी घटली असताना वस्तूची किंमत ‘क२ ग२’ पर्यंत कमी झाली आहे. मागणी वाढली असता वस्तूची किंमत कितपत वाढेल आणी मागणी घटली असता वस्तूची किंमत कितपत कमी होईल, हे पुरवठा रेषेच्या लवचिकतेवर अवलंबून असते. वस्तूचा पुरवठा सापक्षेतः लवचिक असेल, तर मागणी वाढली असताना किंमत कमी प्रमाणात उतरेल. आ. २ मध्ये ‘प’ ही पुरवठा रेषा ‘पफ’ पेक्षा अधिक लवचिक पुरवठा दर्शविते. म्हणून या पुरवठा रेषेवर मागणीची वृद्धी झाली असताना वस्तूची किंमत ‘क’ पेक्षा कमी व मागणीची घट झाली, तर ती ‘क’ पेक्षा जास्त असते.

आ. ३ त्याचप्रमाणे वस्तूची मागणी परिस्थिती कायम राहिली असताना पुरवठा परिस्थितीत बदल झाल्यास संतुलन-मूल्य बदलते. वस्तूच्या पुरवठ्याची वृद्धी झाली म्हणजे पुरवठा रेषा आ. ३ मध्ये दर्शविल्याप्रमाणे ‘प’ मूळ पुरवठा रेषेच्या उजव्या बाजूस सरकलेली असेल, तर वस्तूचे संतुलन मूल्य ‘क’पर्यंत घटेल. वस्तूच्या पुरवठ्यात घट झाली आणि घटलेला पुरवठा आ. ३ मध्ये दर्शविल्याप्रमाणे पुरवठा रेषा ‘प२’ ने दाखविला असता, वस्तूची किंमत ‘क २ ग २ पर्यंत वाढेल. वस्तूच्या पुरवठ्याची वृद्धी झाली असता संतुलन-मूल्य कितपत कमी होईल आणि पुरवठ्याची घट झाली असता, संतुलन-मूल्य कितपत वाढेल, हे मागणी रेषेच्या लवचिकतेवर अवलंबून असते. वस्तूची मागणी सापक्षेतः लवचिक असेल, तर पुरवठ्याची वृद्धी झाली असता किंमत फारशी वाढणार नाही. आ. ३ मध्ये ‘भ’ ही मागणी रेषा मूळच्या 'भम' या मागणी रेषेपेक्षा अधिक लवचिक मागणी दर्शविते.

वस्तूची मागणी परिस्थिती आणि पुरवठा परिस्थिती या दोहोंमध्ये बदल झाला असता संतुलन मूल्य वाढेल की कमी होईल, हे वस्तूची मागणी वाढली की घटली आणि पुरवठा वाढला की घटला यांवर आणि त्यांच्या परस्पर-प्रमाणावर अवलंबून असते.

अल्पकाळातील पुरवठा आणि किंमत

अल्पकाळात उत्पादनसंस्थेच्या स्थपित संयंत्रांच्या (प्लँटच्या) उत्पादनापेक्षा मर्यादेत उत्पादनसंस्थेला वस्तूचे उत्पादन कमी-अधिक करता येते. म्हणून उत्पादनसंस्थेला वस्तूचे उत्पादन वाढवून पुरवठा वाढविता येतो. अल्पकाळात उद्योगधंद्यातील उत्पादनसंस्थांची संख्या बदलण्याची शक्यता नसते. म्हणून उद्योगधंद्यातील सर्व उत्पादनसंस्थांनी वस्तूचे उत्पादन करून जो पुरवठा केला असेल, त्या सर्वांची बेरीज करून वस्तूचा एकंदर पुरवठा काढता येतो. म्हणून वस्तूचा समग्र पुरवठा आणि उद्योगधंद्यांची पुरवठा रेषा काढताना उत्पादनसंस्थेच्या संतुलनाचा विचार करावा लागतो.

पूर्ण स्पर्धेच्या परिस्थितीत उद्योगधंद्यांतील कोणतीही उत्पादनसंस्था उद्योगधंद्यांच्या मानाने इतकी लहान असते की, तिला स्वतंत्रपणे आपल्या वस्तूचा पुरवठा कमी-अधिक करून वस्तूच्या प्रचलित किंमतींवर थोडासाही परिणाम घडवून आणता येत नाही. याचा अर्थ प्रत्येक उत्पादनसंस्थेच्या दृष्टीने वस्तूची किंमत ही दिलेली (डेटम) असते. यास्तव उत्पादनसंस्थेला वस्तूच्या प्रचलित किंमतीच्या संदर्भात उत्पादन-परिमाण ठरवायचे असते. उत्पादनसंस्था वस्तुपरिमाणाच्या उत्पादनव्ययाच्या संदर्भात वस्तूचे परिणाम ठरवून संतुलनावस्था प्राप्त करून घेते.

अल्पकाळात उत्पादनसंस्थेला वस्तूच्या उत्पादनासाठी जो समग्र व्यव करावा लागतो, त्याचे प्रामुख्याने ‘स्थिर व्यय’ आणि ‘बदलता व्यय’ असे दोन भाग पडतात. स्थिर व्ययामध्ये कारखान्याच्या इमारतीचा खर्च, यंत्रसामग्री खरेदीचा व ती स्थापित करण्याचा खर्च, स्थायी व्यवस्थापकीय नोकरवर्ग व तंत्रविशारद यांच्या पगाराचा खर्च, परवाना शुल्क, दीर्घकाळच्या कर्जावरील व्याज यांचा प्रामुख्याने समावेश होतो. बदलत्या व्ययामध्ये कच्च्या मालाची खरेदी, मजुरांचे व इतर अस्थायी व्यवस्थापकीय नोकरवर्गाचे वेतन, वीज आणि पाणीपुरवठा यांवरील खर्च, अस्थिर भांडवलावरील व्याज, चालू दुरुस्त्या, घसारा, वाहतुकीचा खर्च, सरकारला द्यावे लागणारे कर, तसेच सामजिक सुरक्षेसाठी देणी यांवरील खर्च मोडतो.

समग्र वस्तु-परिमाणाचे त्याच्या समग्र स्थिर व्ययाला भागले असता सरासरी स्थिर व्यय काढता येतो. तसेच समग्र वस्तु-परिमाणाचे एकंदर बदलत्या व्ययाला भागून सरासरी बदलता व्यय काढता येतो. सरासरी स्थिर व्यय आणि सरासरी बदलता व्यय एकत्र करून त्या वस्तु परिमाणाचा सरासरी व्यय येतो. वस्तूचे उत्पादन-परिमाण अंशा-अंशाने वाढविले असता, समग्र उत्पादन व्यय वाढत जातो. वस्तूचे उत्पादन-परिमाण एका अंशाने (नगाने) वाढविले असता समग्र उत्पादन व्ययामध्ये जो वाढावा (इन्क्रिमेंट) होतो, त्याला सीमान्त व्यय असे म्हणतात.

अल्पकाळात उत्पादनसंस्थेने बदलत्या उत्पादन साधनांचा अधिक वापर करून उत्पादन-परिमाण वाढविले असता, सुरुवातीला सरासरी व्यय, सरासरी स्थिर आणि बदलता व्यय व सीमान्त व्यय हे कमीकमी होत जातात. यांपैकी प्रत्येक व्यय निरनिराळ्या उत्पादन-परिमाणाजवळ न्यूनतम होतो व नंतर उत्पादनपरिमाण त्यापेक्षा जास्त वाढवीत नेले, तर व्ययही वाढत जातो. आ. ४ मध्ये काढलेल्या उत्पादन-व्यय वक्ररेषांवरून स्पष्ट होते.

वरील आकृतीत उत्पादनसंस्थेच्या अल्पकाळातील उत्पादन व्ययरेषा सीव्ह, सव्य, स्थिव्य, बव्य म्हणजे अनुक्रमे सीमान्त व्यय, सरासरी व्यय, सरासरी स्थिर व सरासरी बदलाता व्यय रेषा काढल्या आहेत, यांपैकी उत्पादनसंस्थेच्या दृष्टीने सीव्य ही रेषा सर्वांत महत्त्वाची आहे. अल्पकाळात उत्पादनसंस्थेला वस्तूची किंमत दिलेली असते. उत्पादनसंस्थेच्या वस्तुपरिमाणाचा या किंमतीवर परिमाण होत नाही. म्हणून उत्पादनसंस्थेच्या वस्तुपरिमाणाचा सीमान्त आय आणि सरासरी आय नेहमीच समान असतात.

उत्पादनसंस्थेने आपले उत्पादन केवळ एका अंशाने (नगाने) वाढवून समग्र आयमध्ये जी थोडीशी वाढ होते, तिला सीमान्त आय असे म्हणतात. उद्योगधंद्यातील वस्तूची किंमत म्हणजे सरासरी आय होय. उत्पादनसंस्थेची मागणी रेषा म्हणजे सरासरी आय रेषा होय. ही रेषा वस्तूच्या प्रचलित किंमतीत ‘अक्ष’ अक्षाशी समांतर असते. म्हणून सीमान्त आय रेषा आणि सरासरी आय रेषा एकच असतात. आ. ४ मध्ये दाखविल्याप्रमाणे वस्तूची प्रचलित किंमत ‘अक’ असेल, तर ‘क-सआ-सीआ’ ही उत्पादनसंस्थेची मागणी रेषा म्हणजे सरासरी आय रेषा आहे आणि तीच सीमान्त आय रेषाही आहे. वस्तूच्या निरनिराळ्या किंमतींत (अक, अक, अक) ‘क-सआ = सीआ’, ‘क-सआ = सीआ’, ‘क-सआ = सीआ’ या उत्पादनसंस्थेच्या मागणी रेषा दाखविल्या आहेत.

आ. ४   कोणतीही उत्पादनसंस्था संतुलनावस्था प्राप्त करून घेण्यासाठी आपला सीमान्त आय सीमान्त व्ययाबरोबर करते (सीआ = सीव्य). कारण असे केल्यावर उत्पादनसंस्थेला शेवटच्या उत्पादित नगावर फायदा अगर तोटा काहीच नसतो. उत्पादनसंस्था सीमान्त आय सीमान्त व्ययाबरोबर करून जे वस्तुपरिमाण उत्पादन करते, ते उत्पादनसंस्थेचे संतुलन दर्शविते.

आ.४ मध्ये दाखविल्याप्रमाणे ग-ग-ग-ग या बिंदूत उत्पादनसंस्थेचे निरनिराळ्या किंमतींच्या संदर्भात संतुलन झाले आहे. हे प्रत्येक बिंदूत किंमत = सरासरी आय = सीमान्त आय = सीमान्त व्यय अशी समानता झाली आहे. सआ नेहमीच सीआ- बरोबर असतो. म्हणून हे सर्व बिंदू सीमान्त व्यय रेषेवर आले आहेत. याचाच अर्थ असा की, अल्पकाळात वस्तूची किंमत बदलली असता, उत्पादनसंस्थेच्या उत्पादन परिमाणात तिच्या ‘सीव्य’ या रेषेला अनुसरून बदल होतो.

सारांश, सीमान्त व्यय रेषेचा ‘गव्य’ हा भाग उत्पादनसंस्थेची पुरवठा रेषा आहे. वस्तूची किंमत ‘अक’ असेल, तर उत्पादनसंस्था ‘अड’ हे वस्तू-परिमाण उत्पादन करील. वस्तूची किंमत ‘अक’ च्या खाली उतरली. तर उत्पादनसंस्था उत्पादन थांबवील; कारण यापेक्षा कमी किंमतीत वस्तूचा सरासरी बदलता व्ययसुद्धा भरून निघत नाही. म्हणून ‘अक’ ही वस्तूची अशी कमीतकमीं किंमत आहे की, ज्या किंमतीत उत्पादनसंस्था अधिकतम कष्टाने उत्पादन चालू ठेवील. ‘ग’ आणि ‘ग’ (आ. ४) या संतुलन बिंदूत उत्पादनसंस्थेला तोटा सहन करावा लागत आहे.

परंतु तोटा सोसूनही उत्पादनसंस्था उत्पादन चालू ठेवील, कारण वस्तूची किमत वाढून लाभाची अपेक्षा असते. ‘ग’ या संतूलनबिंदूत सरासरी आय सरासरी व्ययाबरोबर झाला आहे. म्हणून ‘अइ’ या वस्तूपरिमाणात ‘अक’ ही किंमत असताना उत्पादनसंस्थेचा एकंदर आय आणि एकंदर व्यय समान झाले आहेत. या परिस्थितीत उत्पादनसंस्थेला निव्वळ लाभ किंवा तोटा काहीच नाही. वस्तूची किंमत ‘अक २’ पेक्षा जास्त असेल, तर उत्पादनसंस्थेला निव्वळ लाभ होईल.

अशा रीतीने ‘गव्य’ ही उत्पादनसंस्थेची पुरवठा रेषा आहे आणि ती उजव्या हाताला खालून वर जाणारी आहे. अल्पकाळात उद्योगधंद्यातील उत्पादनसंस्थांची संख्या कायम रहाते आणि प्रत्येक उत्पादनसंस्थेची पुरवठा रेषा आकृती ५ अ मध्ये दाखविलेल्या ‘गव्य’ रेषेप्रमाणे उजव्या हाताला वर जाणारी असते. म्हणून सर्व उत्पादनसंस्थांच्या पुरवठारेषांचे एकत्रीकरण करून उद्योगधंद्यांची पुरवठारेषा ‘पफ’ आकृती ५ ब मध्ये दाखविल्याप्रमाणे काढता येते.

आ. ५ अ आ. ५ ब

अल्पकाळात पुरवठ्याची परिस्थिती बदलत नाही, म्हणून वस्तूच्या मागणीची परिस्थिती दिलेली असताना उद्योगधंद्यांची मागणी रेषा ‘भम’ (आ.५ ब) आणि पुरवठा रेषा ‘पफ’ यांच्या छेदनबिंदूमध्ये म्हणजे ‘र’ मध्ये मागणी आणि पुरवठा यांचे संतुलन झाले आहे. म्हणून वस्तूची अल्पकालीन सर्वसाधारण किंमत ‘डर’ आणि उद्योग धंद्यांचा एकंदर वस्तु-पुरवठा व मागणी ‘अड’ आहे. उद्योगधंद्यांच्या मागणी परिस्थितीत बदल झाल्यास आणि बदललेली परिस्थिती ‘भ’, ‘भ’, ‘भ’ या मागणी रेषांनी दाखविली असली, तर अनुक्रमे ‘र’ ‘र’ व ‘र’ या बिंदूंत संतुलनावस्था प्राप्त होतील आणि ‘इर’, ‘उर’ व ‘ऋर’ अशी वस्तूची अल्पकालीन संतुलनमूल्ये ठरली गेलेली दिसून येतील.

दीर्घकालीन पुरवठा आणि किंमत

दीर्घकाळात उत्पादनसंस्था आपले संयंत्र बदलून किंवा उत्पादनशक्तीत वाढ करून उत्पादनपरिमाण वाढवू शकते; तसेच उद्योगधंद्यातील उत्पादनसंस्थाची संख्या कमी-जास्त होऊ शकते. म्हणून दीर्घकाळात संतुलनावस्था गाठण्यासाठी उत्पादनसंस्थेचे आणि त्याचबरोबर सबंध उद्योगधंद्याचे संतुलन झाले पाहिजे. यासाठी उत्पादनसंस्थेच्या सीमान्त आय आणि सीमान्त व्यय यांची समानता झाली पाहिजे आणि त्याचबरोबर सरासरी आय आणि सरासरी व्यय यांचीही समानता व्हावयास पाहिजे. कारण असे झाल्याशिवाय उद्योगधंद्यांत उत्पादनसंस्थाच्या संस्थेची स्थिरता होणे शक्य नाही. दीर्घकाळात उत्पादनसंस्थेच्या आणि त्याचबरोबर सबंध उद्योगधंद्याच्या संतुलनासाठी पूर्ण स्पर्धेत काही अधिक गोष्टी गृहीत धरल्या पाहिजेत.

त्या म्हणजे

  1. नवीन उत्पादनसंस्थांना उद्योगधंद्यात प्रवेश करण्यास पूर्ण मुभा असली पाहिजे; आणि धंद्यात असलेल्या उत्पादनसंस्थांना तो धंदा सोडून जाण्याचे स्वातंत्र्य पाहिजे.
  2. सर्व उद्योगधंद्यांत प्राप्त होऊ शकणाऱ्या ‘प्रसामान्य नफ्याच्या दरा’ची (नॉर्मल रेट ऑफ प्रॉफिट) कल्पना असावयास पाहिजे.
  3. उत्पादन घटक साधने पूर्णपणे गतिक्षम असून वाहतूकीचा खर्च विचारात घेतला जाऊ नये.

जो कमीतकमी नफ्याचा दर प्राप्त झाल्याने उत्पादनसंस्थेला उद्योगधंद्यात राहाणे परवडते, त्याला ‘प्रसामान्य नफ्याचा दर’ म्हणतात. दीर्घकाळात उत्पादनसंस्था आणि उद्योगधंदा संतुलनावस्थेस कसा पोहोचतो, हे स्पष्ट करण्यासाठी अल्फ्रेड मार्शल यांनी प्रसामान्य नफ्याची कल्पना अर्थशास्त्रीय विवेचनात आणली. सर्व उद्योगधंद्यांत उत्पादनसंस्थांना प्राप्त होणारा सर्वसाधारण नफ्याचा दर म्हणजे प्रसामान्य नफ्याचा दर होय. जेव्हा उद्योगधंद्यातील कोणत्याही उत्पादनसंस्थेला आपले उत्पादन-परिमाण बदलण्याची इच्छा नसते आणि उत्पादनसंस्थांची संस्थांची संख्या स्थिर झालेली असते, तेव्हा सर्व उत्पादनसंस्थांना प्रसामान्य नफा प्राप्त होतो आणि संतुलनावस्था होते.

उत्पादनसंस्थेचे आणि उद्योगधंद्याचे संतुलन

दीर्घकाळात उत्पादन परिमाणाच्या वाढीबरोबर होणाऱ्या व्ययाची प्रवृत्ती दीर्घकालीन सरासरी व्ययरेषा आणि सीमान्त रेषा या दोन रेषांनी दाखविली जाते. आ. ६ मध्ये ‘सीव्य’ या अनुक्रमे दीर्घकालीन सरासरी व्ययरेषा आणि सीमान्त व्ययरेषा आहेत.

आ. ६ दीर्घकालीन ‘सव्य’ रेषेच्या प्रत्येक बिंदूशी सुयुक्त वस्तुपरिमाणाच्या उत्पादनात असलेले एकक विशिष्ट संयंत्र दाखविले आहे. यांपैकी ‘ग’ बिंदूशी असलेले संयंत्र उत्पादनसंस्था स्वीकारील, कारण तेथे सरासरी व्यय न्युनतम झाला आहे.

आकृतीत ‘कठ’ ही उत्पादनसंस्थेची मागणीरेषा ‘अक्ष’ अक्षाशी प्रचलित किंमतीत समांतर आहे. कारण पूर्ण स्पर्धेत उत्पादनसंस्थेच्या वस्तूची मागणी पूर्णपणे लवचिक असते. म्हणून सरासरी आय सीमान्त आयबरोबर असतो. वस्तूची किंमत ‘अक’ असली, तर उत्पादनसंस्थेचे ‘ग’ बिंदूजवळ संतुलन होईल, कारण ह्या ठिकाणी सीमान्त आय = सीमान्त व्यय = सरासरी आय अशी समानता झाली आहे. वस्तूची किंमत ‘अक’ पेक्षा कमी असेल, तर उत्पादनसंस्थेला तोटा होईल, म्हणून ती वस्तूचे उत्पादनच करणार नाही.

वस्तूची किंमत ‘अक’ पेक्षा जास्त असेल, तर उत्पादनसंस्थेचे ‘र’ बिंदूत संतुलन होणे शक्य आहे, परंतु संतुलन बिंदूत स्थैर्य नाही. कारण सरासरी आय सरासरी व्ययपेक्षा जास्त असल्यामुळे संस्थेला अवास्तव नफा होत आहे. म्हणून नव्या उत्पादनसंस्था उद्योगधंद्यात प्रवेश करतील, नंतर वस्तूचा एकंदर पुरवठा वाढेल आणि त्यामुळे वस्तूची किंमत उतरेल. किंमत ‘अक’ पर्यंत खाली आल्यावर उत्पादनसंस्थेला प्रंसामान्य नफा मिळेल आणि स्थिर संतुलनावस्था प्राप्त होईल. अशा रीतीने दीर्घकालात प्रत्येक उत्पादनसंस्था सुयुक्त (ऑप्टिमम फर्म) असेल आणि उत्पादनसंस्थांची संस्था स्थिर होईल.

आ. ७ अ आ. ७ ब आ. ७ क

दीर्घकालीन स्थिर किंमत

उद्योगधंद्यांतील सर्व उत्पादनसंस्थांच्या सुयुक्त वस्तुपरिमाणांची बेरीज करून वस्तूचा एकंदर पुरवठा काढता येतो. संतुलनावस्थेत प्रत्येक उत्पादनसंस्था सुयुक्त वस्तुपरिमाण उत्पादन करील. परंतु वस्तूच्या निरनिराळ्या किंमतीत पुरवठ्याचे स्वरूप व पुरवठा रेषा कशी असेल, हे बहिर्गत बचती आणि बेबचतींवर अवलंबून राहील. या संदर्भात मार्शलनी उद्योगधंद्याचे तीन विभाग पाडले आहेत. ते म्हणजे

  1. स्थिर व्ययाचे उद्योगधंदे,
  2. उतरत्या व्ययाचे उद्योगधंदे आणि
  3. वाढत्या व्ययाचे उद्योगधंदे, हे होत.

पूर्ण स्पर्धेच्या परिस्थितीत उत्पादन घटक साधनांचा पुरवठा प्रचलित किंमतीत पूर्णपणे लवचिक असल्यामुळे आणि बहिर्गत बचती आणि बेबचती नसल्यामुळे प्रचलित उत्पादनतंत्राच्या परिस्थितीत उद्योगधंदे सर्वसाधारणपणे स्थिर व्ययाचे असतात, म्हणून उद्योगधंद्याची पुरवठा रेषा आ.७ अ मध्ये दाखविल्याप्रमाणे ‘अक्ष’ अक्षाशी समांतर असेल. उद्योगधंद्याच्या वस्तूच्या मागणीची परिस्थिती कायम असताना आणि आकृतीत ‘भम’ या मागणी रेषेने दाखविली असता वस्तूची किंमत ‘गड’, पुरवठा रेषा ‘दीपु’ आणि मागणी रेषा ‘भम’ यांच्या छेदनबिंदूच्या म्हणजे ‘ग’ बिंदूच्या संदर्भात ठरविली गेली आहे.

स्थिर व्ययाच्या उद्योगधंद्यात वस्तूची मागणी वाढली, तरी किंमत वाढणार नाही; कारण वस्तूचा सरासरी पुरवठा सारखाच राहतो. म्हणून ‘गड’ ही वस्तूची दीर्घकालीन सर्वसाधारण (स्थिर) किंमत आहे.

उतरत्या व्ययाच्या उद्योगधंद्यात वस्तूच्या मागणीची वृद्धी झाली असता, वस्तूची दीर्घकालीन किंमत उतरते, कारण आ. ७ व मध्ये दर्शविल्याप्रमाणे उद्योगधंद्याची पुरवठा रेषा ‘दीफ’ डावीकडून उजवीकडे खाली उतरणारी असते. म्हणून मागणीची वृद्धी झाली असताना वस्तूच्या किंमती ‘गड’, ‘ग’, ‘ग’ उतरत असलेल्या दिसतात. अर्थात उद्योगधंद्यात उतरत्या व्ययाची परिस्थिती ही कल्पनामय अवस्था असली, तरी मार्शल यांच्या मते ही कारखानदारी उद्योगधंद्यांमध्ये निदर्शनास येणे शक्य आहे, कारण या उद्योगधंद्यांत बहिर्गत बचतींचा प्रभाव प्रकर्षाने दिसून येतो.

उद्योगधंद्यात वेगवेगळ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या उत्पादनसाधनांचा पुरवठा व त्यांच्या प्रतिस्थापनीयतेची लवचिकता आणि त्यांच्या सापेक्ष किंमतींतील बदल यांच्या संदर्भात काही उद्योगधंद्यात उतरत्या व्ययाची परिस्थिती असू शकेल, असे जोन रॉबिन्सन यांनी प्रतिपादन केले आहे.

वाढत्या व्ययाच्या उद्योगधंद्यात वस्तूच्या मागणीची वृद्धी झाली असता वस्तूची दीर्घकालीन किंमत वाढत जाते, कारण आ. ७ क मध्ये दाखविल्याप्रमाणे उद्योगधंद्याची पुरवठारेषा डावीकडून उजवीकडे खालून वर गेलेली असते. म्हणून मागणीची वृद्धी झाली असता वस्तूच्या किंमती ‘गड’, ‘ग, ‘ग’ वाढत असलेल्या दिसतात.

मार्शल यांच्या मते काही उत्पादनसाधनांचा पुरवठा-विशेषतः जमिनीचा-पूर्णपणे लवचिक असणे शक्य नाही, म्हणून जमिनीची पुरवठा किंमत वाढत जाणार. या कारणास्तव शेती, खाणी या सारख्या धंद्यांमध्ये वाढत्या व्ययाची परिस्थिती अनुभवास येते. याउलट कारखानदारी उद्योगधंद्यांमध्ये जमिनीच्या वापराचा भाग फारच कमी असल्यामुळे स्थिर उतरत्या व्ययाची परिस्थिती दृष्टोत्पत्तीस येते. उत्पादनसाधनांचा वेगवेगळ्या प्रमाणात उपयोग, उत्पादन घटक साधनांच्या सापेक्ष किंमतींत बदल, वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनसाधनांच्या वापराची आवश्यकता, उत्पादन घटक साधनांच्या प्रतिस्थापनीयतेची लवचिकता यांच्या संदर्भात मार्शल यांच्या विधानास जोन रॉबिन्सन यांनी पुष्टी दिली आहे.

आ. ८     मक्तेदारी आणि किंमत मक्तेदारीच्या परिस्थितीत उत्पादक वस्तूच्या उत्पादन परिमाणाचे नियंत्रण आणि नियमन करून वस्तूची किंमत ठरवू शकतो. म्हणून मक्तेदाराच्या वस्तूची मागणी थोडीफार स्थिर असून सापक्षेतः अलवचिक असते. मक्तेदाराच्या वस्तूची मागणी रेषा म्हणजेच मक्तेदारी उद्योगधंद्याची मागणी रेषा होय. ही मागणी रेषा (आ. ८ मध्ये ‘पफ’) वरून खाली उजव्या हाताकडे म्हणजे अक्ष अक्षाकडे उतरणारी असते. हीच मागणी रेषा म्हणजे मक्तेदारांची सरासरी आय रेषा होय. मक्तेदारीच्या परिस्थितीत सरासरी आय रेषा वरून खाली उतरणारी असल्यामुळे सीमान्त आय रेषा सीआ-तशीच खाली उतरणारी असते.


मक्तेदाराची सरासरी आय रेषा तिच्या काही विशिष्ट भागात-आकृतीत टठ-सरासरी व्ययरेषेच्या वर असते. म्हणून मक्तेदार आपला अवास्तव नफा अधिकतम करण्यासाठी वस्तूची किंमत ठरविताना सरासरी आय आणि सरासरी व्यय यांमधील फरक जास्तीत जास्त असेल आणि सीमान्त आय सीमान्त व्ययाबरोबर होईल, हे पाहतो. अशा रीतीने आकृतीत दाखविल्याप्रमाणे मक्तेदार वस्तूची किंमत संतुलनबिंदू ‘र’ च्या संदर्भात ठरवील. वस्तूची किंमत ‘गड’ ही ठरेल आणि मक्तेदार ‘गतथद’ हा अवास्तव नफा प्राप्त करून घेईल. उतरत्या व्ययपरिस्थितीत दाखविल्याप्रमाणे (आ. ८) मक्तेदार ‘वाढत्या व्यय’ परिस्थितीतसुद्धा संतुलनावस्थेत पोहोचून आपल्या वस्तूची किंमत ठरवील.

आ. ९ अ आ. ९ ब

अपूर्ण स्पर्धा, मक्तेदारी स्पर्धा आणि किंमत : पूर्ण स्पर्धा आणि शुद्ध मक्तेदारी या दोन परस्परविरोधी टोकांना असणाऱ्या बाजारी परिस्थितीमध्ये अपूर्ण स्पर्धा किंवा मक्तेदारी स्पर्धा या अवस्था येतात. प्रत्यक्ष जीवनात अपूर्ण स्पर्धा किंवा मक्तेदारी स्पर्धा असलेली दिसून येते. अपूर्ण स्पर्धेच्या कल्पना आणि त्या परिस्थितील मूल्य-सिद्धांत जोन रॉबिन्सन या अर्थशास्त्र विदुषींनी पुढे मांडले. मक्तेदारी स्पर्धेची कल्पना आणि तद्‌विषय मूल्यसिद्धांत इ. एच्. चेंबरलिन या अर्थशास्त्रज्ञांनी प्रसृत केले. हे मूल्यठराव-सिद्धांत आधुनिक मूल्यविषयक विवेचनात येतात.

जोन रॉबिन्सन यांच्या अपूर्ण स्पर्धेमध्ये मक्तेदारीचाअंश नाही, तर चेंबरलिन यांच्या मते मक्तेदारी स्पर्धा ही वास्तव बाजारपरिस्थिती असून तीमध्ये स्पर्धा व मक्तेदारी यांच्या अंशांचा संयोग झालेला असतो. या दोन्ही अवस्थांत उत्पादनसंस्थेच्या संतुलनाचा आणि किंमत ठरावाचा विचार सरासरी आय रेषा, सरासरी व्ययरेषा, सीमान्त आय रेषा व सीमान्त व्ययरेषा यांच्या परस्परसंबंधात करावा लागतो. आ. ९ (अ, ब) मध्ये दाखविल्याप्रमाणे ‘सआ’ आणि ‘सीआ’ ह्या उत्पादनसंस्थेच्या अनुक्रमे सरासरी आय रेषा व सीमान्त आय रेषा आहेत, तर ‘सव्य’ आणि ‘सीव्य’ उत्पादनसंस्थेच्या अनुक्रमे सरासरी व्ययरेषा आणि सीमान्त व्ययरेषा आहे. उत्पादनसंस्था सीआ = सीव्य करून ‘र’ या संतुलनबिंदूच्या संदर्भात आपल्या वस्तूची किंमत ‘गड’ ठरवील. उत्पादनसंस्थेची सरासरी आय रेषा सरासरी व्ययरेषेला दोन बिंदूंत छेदत असेल, तर आ. ९ (अ) मध्ये दाखविल्याप्रमाणे ‘गतथद’ इतका अवास्तव नफा मिळवील. परंतु उत्पादनसंस्थेची ‘सआ’ रेषा ‘सव्य’ रेषेला आ.९ (ब) मध्ये दाखविल्याप्रमाणे ‘ग’ बिंदूशी स्पर्शरेषा असेल, तर सरासरी आय बरोबर सरासरी व्यय होईल आणि अवास्तव नफा मिळणार नाही. परंतु तरीसुद्धा उत्पादनसंस्थेचे उत्पादन परिमाण सुयुक्त वस्तु-परिमाणापेक्षा कमीच असणार. कारण सरासरी आय रेषा सरासरी व्यय रेषेला न्यूनतम बिंदूशी स्पर्शरेषा म्हणून असणार नाही.

अपूर्ण स्पर्धेच्या आणि मक्तेदारी स्पर्धेच्या परिस्थितीत वेगवेगळ्या उत्पादनसंस्थांच्या आय रेषा व व्यय रेषा वेगवेगळ्या असल्यामुळे उद्योगधंद्यांच्या संतुलनाचा विचार गुंतागुंतीचा होतो. म्हणून हे आधुनिक मूल्यठराव विवेचन जवळजवळ उत्पादनसंस्थेच्या पातळीशीच थांबते. जोन रॉबिन्सन यांनी तर उद्योगधंद्यांच्या संतुलनाचा फारसा विचारच केलेला दिसत नाही. कारण अपूर्ण स्पर्धेच्या अवस्थेत उद्योगधंद्यांची पुरवठा रेषा काढण्यात अपयश आले म्हणून उद्योगधंद्यातील एक सोडून बाकीच्या सर्व उत्पादनसंस्था संतुलनात आहेत असे मानले, तर त्या उरलेल्या उत्पादनसंस्थेचे संतुलन झाल्याबरोबर आपोआप संबंध उद्योगधंद्याचे संतुलन होते, असे जॉन रॉबिन्सन यांनी प्रतिपादले.

चेंबरलिन यांनी मात्र उद्योगधंद्याची मार्शलप्रणीत कल्पनाच अग्राह्य मानली, परंतु उत्पादनसंस्थेच्या संतुलनविवेचनाची चर्चा संपल्यावर मार्ग खुंटला; तेव्हा त्यांनी उत्पादनसंस्थांच्या ‘समूहाची’ (ग्रुप) कल्पना पुढे मांडली. तीमध्ये ‘लहान समूह’ आणि ‘मोठा समूह’ असे दोन भाग दाखविले. उत्पादनसंस्थांच्या आय रेषा व व्ययरेषा यांसंबंधी समाकारतेचे (सिमेट्रि) ‘बाणेदार गृहीतपक्ष’ (हिरॉइक असम्प्शन्स) धरून उत्पादनसंस्थांच्या समूहांच्या संतूलनाविषयी काही रम्य शक्यतांचे विचार त्यांनी पुढे मांडले. चेंबरलिन यांचे मक्तेदारी स्पर्धेत विवेचन जोन रॉबिन्सन यांच्या अपूर्ण स्पर्धेच्या विवेचनापेक्षा अनेक दृष्टींनी प्रगत वठले आहे.

उत्पादन घटक साधनांच्या किंमती

वस्तूच्या किंमत-ठरावाविषयीचे हे सिद्धांत थोड्याफार फरकाने उत्पादन घटक साधनांच्या किंमती ठरविताना उपयोगी पडतात. परंतु प्रत्येक उत्पादन घटक साधनांची काही वैशिष्ट्ये आहेत. त्यांतील काही मागणीच्या बाजूला, तर काही पुरवठ्याच्या बाजूला आहेत. उत्पादन घटक साधनांची मागणी परप्रवृत आणि ‘संयुक्त’ आहे. निरनिराळ्या उत्पादन घटक साधनांचा पुरवठा वेगवेगळ्या प्रमाणात लवचिक किंवा अलवचिक असतो. उत्पादन घटक साधने सारखीच गतिक्षम नाहीत. ही वैशिष्ट्ये लक्षात घेता मागणी पुरवठ्याच्या सिद्धांत सर्वसाधारणपणे उत्पादन घटक साधनांच्या बाबतीत लागू पडतो.


संदर्भ : 1. Chamberlin, Edward Hastings, The Theory of Monopolistic Competition: A Re-Orientation of The Theory of Value, Cambridge (Mass.), 1962.

2. Marshall, Alfred, Principles of Economics, London, 1930.

3. Robinson, Joan, The Economics of Imperfect Competition. London, 1961.

4. Stigler, George y3wuoeph, The Theory of Price, New York, 1947.

 

लेखक - गो. चिं. सुर्वे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate