অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

श्रम विनिमय बँक

श्रम विनिमय बँक

श्रम विनिमय बँक : ( लेबर एक्स्चेंज बँक ). विनिमयाचे माध्यम म्हणून प्रत्यक्ष पैशाच्या ऐवजी वस्तूंचे उत्पादन करण्यात खर्ची पडलेल्या श्रमांच्या निदर्शक अशा खास नोटा वापरण्याचा उपक्रम सुरू करणाऱ्या एकोणिसाव्या शतकारंभीच्या काही योजनांना उद्देशून श्रम विनिमय बँक ही संज्ञा वापरण्यात आली. १८३२ मध्ये सुप्रसिद्ध इंग्रज व्यवस्थापनतज्ज्ञ रॉबर्ट ओएन याने ‘ नॅशनल इक्विटेबल लेबर एक्स्चेंज ’ या नावाची संस्था ब्रिटनमध्ये स्थापन केली; परंतु ती केवळ दोनच वर्षे तग धरू शकली. रॉबर्ट ओएनने त्याकाळी उत्पादन करणाऱ्या सहकारी संस्था स्थापन करण्याकरिता प्रोत्साहन दिले. या संघटना केवळ किरकोळ विक्रीचे काम करणाऱ्या नव्हत्या, तर आपण तयार केलेला माल ग्राहकांना विकणाऱ्या कामगारांच्या संघटना होत्या. त्या संघटना पुढे ‘ लेबर एक्स्चेंज ’ या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या.

विक्रीच्या प्रत्येक वस्तूमध्ये सरासरी किती श्रमशक्ती सामावलेली आहे, यावर वैयक्तिक सौदे आधारावेत असे ओएनचे मत होते. आज अनेक ठिकाणी वेतनपद्धती अंशदत्त मूल्याच्या ( व्हॅल्यू अ‍ॅडेड ) कल्पनेवर आधारल्याचे दिसून येते. त्यामध्ये मूल्य श्रमशक्तीवर आधारावे, हीच मुख्य कल्पना आहे. अशा प्रकारच्या व्यवस्थेमध्ये कामगारही संस्थेच्या आर्थिक भरभराटीमध्ये भागीदार असल्याने त्यांना परस्पर सहकार्याने आपली सांघिक कार्यक्षमता वाढविण्यास प्रोत्साहन मिळते. सुप्रसिद्ध स्कॉटिश अर्थतज्ज्ञ अ‍ॅडम स्मिथ याने मांडलेला ‘श्रममूल्य सिद्धांत’ हा ओएनच्या  उपक्रमाचा मुख्य आधार होता. कारखान्यात एखादया वस्तूचे उत्पादन करण्यासाठी किती श्रम खर्च झाले, त्यावर वस्तूचे मूल्य अवलंबून असते. एखादी वस्तू तयार करण्यासाठी जर दोन दिवस लागले, तर त्या वस्तूची किंमत, जी वस्तू तयार करण्यासाठी एकच दिवस लागतो, त्याच्या दुप्पट असली पाहिजे. तथापि वस्तूच्या निर्मितीसाठी निश्चित किती श्रम लागले, याचे तंतोतंत मोजमाप करणे हे खूपच अवघड असल्याचे प्रतिपादनही अ‍ॅडम स्मिथने केलेले आहे. एकतर प्रत्येक कामगाराच्या श्रमाचा दर्जा भिन्न असतो व अनेकदा त्यांना योग्य असे मार्गदर्शनही केले जात नाही. बहुधा अशाच प्रकारच्या अडचणींमुळे श्रम विनिमय बँकेची कल्पना मूळ धरू शकली नाही.

 

लेखक - जयवंत चौधरी

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate