অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गीत : सागरा, प्राण तळमळला

गीत : सागरा, प्राण तळमळला

ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला

भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ । सृष्टिची विविधता पाहू
त‍इं जननी-हृद्‌ विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें
मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन । त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी । मी
जगदनुभव-योगे बनुनी । मी
तव अधिक शक्त उद्धरणी । मी
येईन त्वरे कथुन सोडिलें तिजला
सागरा, प्राण तळमळला

शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु यापुढती । दशदिशा तमोमय होती
गुण-सुमनें मी वेचियली या भावें । की तिने सुगंधा घ्यावें
जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबहि आता । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला । सागरा, प्राण तळमळला

नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परि मज भारी । आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा । वनवास तिच्या जरि वनिंच्या
भुलविणें व्यर्थ हें आता । रे
बहु जिवलग गमतें चित्ता । रे
तुज सरित्पते जी सरिता । रे
त्वद्‌विरहाची शपथ घालितो तुजला । सागरा, प्राण तळमळला

या फेन-मिषें हससि निर्दया कैसा । का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिउनि का आंग्लभूमीते
मन्मातेला अबला म्हणुनि फसवीसी । मज विवासनातें देशी
तरि आंग्लभूमी-भयभीता । रे
अबला न माझिही माता । रे
कथिल हे अगस्तिस आता । रे
जो आचमनी एक क्षणी तुज प्याला । सागरा, प्राण तळमळला

 

कवी : स्वातंत्र्यवीर सावरकर

अंतिम सुधारित : 8/13/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate