অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अंकोरथोम

अंकोरथोम

कंबोडियातील म्हणजे सध्याच्या ख्मेर प्रजासत्ताकातील अभिजात ख्मेर कलेचे (८ वे ते १३ वे शतक) परिणत स्वरूप दाखविणारी, ख्मेर सम्राट सातवा जयवर्मन् (११८१-१२१९) याने वसवलेली राजधानी. अंकोरथोमच्या (मोठे अंकोर) वास्तुकलेवर व मूर्तिकलेवर हिंदू व बौद्ध वास्तुकला व मूर्तीकला यांचा प्रभाव आढळतो; तसेच ‘मंदिरगिरी’च्या कल्पनेप्रमाणे पर्वतप्राय मंदिररचना आणि ‘देवराजा’च्या कल्पनेप्रमाणे राजाच्या मूर्तीत देवत्व दर्शविण्यासाठी केलेली देवराजमूर्तीची निर्मीती ही अंकोरथोमच्या कलेची वैशिष्ट्ये होत. या नगरीचे आवार दहा चौ. किमी. असून तिच्याभोवती खंदक व सात मी. उंचीची दगडी तटबंदी आहे. एकूण पाच भव्य प्रवेशद्वारांपैकी चारांवर चौमुखी अवलोकितेश्वराच्या (काहींच्या मते बोधिसत्त्वाच्या) कोरीव मूर्ती आहेत. चारही दिशांना पसरलेल्या ख्मेर साम्राज्याची प्रतीकात्मकता त्यांत असावी. समुद्रमंथनाच्या पौराणिक कल्पनेची भव्य प्रतिकृती अंकोरथोमच्या कलेत आढळते .

मंदिरगिरीवरील उत्तुंग बेऑन मंदीर म्हणजे मेरू पर्वत, नगरीतील खंदक म्हणजे समुद्र, राजनगरी म्हणजे रवी व खंदकाच्या प्रवेशद्वारांना जोडणाऱ्या पुलावर दोन्ही बाजूंस हातात वासुकी सर्प घेतलेल्या सुरासुरांच्या चोपन्न मूर्ती, अशा प्रतीकांची ही वास्तुरचना आहे. बेऑन मंदिरातील ‘देवराजा’ची मूर्ती म्हणजे नागावर बसलेला बुद्ध होय. या मंदिराच्या शिखरावर अवलोकितेश्वराची मूर्ती आहे. मंदिराच्या चार चौथऱ्यांच्या रचनेत ऊर्ध्व व समांतर भांगाचे लयबद्ध संयोजन दिसते. खालच्या चौथऱ्याच्या (१५० X ९९ चौ. मी.) भोवताली ओवऱ्यांच्या भिंतीवर अपोत्थित शिल्पाकृती असून त्यांतूनरामायण-महाभारतातील दृश्ये व ख्मेरकालीन ऐतिहासिक घटना दृष्टोत्पत्तीस येतात. मंदिराची सगळीच वास्तू शिल्पाकृतींनी अलंकृत केलेली असल्याने वास्तुकलाविशेष निष्प्रभ झाल्यासारखे वाटतात. त्या शिल्पाकृतींत शारीर दृष्टीने काही उणिवा असल्या, तरी चेहऱ्यांवरील भावदर्शन मात्र जिवंत वाटते. शिवाय पूर्वकालीन ख्मेर शिल्पकलेपेक्षा अंकोरथोमची शिल्पकला अधिक सूक्ष्म व सफाईदार आहे. तेथील वास्तुकला तर अभिजात ख्मेर वास्तुकलेची अंतिम व गुंतागुंताची उत्क्रांती सूचित करते. .

संदर्भ: 1. Giteau, Madeleine; Trans. Imber, Dina,khmer Sculpture and the Angkor Civilization, New York, 1965.

2. Rowland, Benjamin,The Art and Architecture of India, Cambridge, 1959.

लेखक: प्र, वि दिवाकर

माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 9/8/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate