অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अकादमी - २

प्लेटोने प्रवर्तित केलेल्या ग्रीक अकादमीची परंपरा जवळजवळ नऊ शतके चालू होती. मध्ययुगीन काळानंतर पश्चिमी प्रबोधनकाळ सुरू होतो. प्रबोधन काळात विद्येच्या पुनरुज्जीवनानंतर यूरोपमध्ये व विशेषतः इटली देशात मानव्यविद्यांच्या अभ्यासासाठी अनेक मंडळी निर्माण झाली. ही सर्व कोणातरी धनवान व्यक्तीच्या आश्रयाखाली चालत. सोळाव्या व सतराव्या शतकांत युरोपमध्ये अकादमीच्या स्वरूपात बदल झाला. कोणाही धनिकाचा आश्रय न घेता वाङ्‌मय किंवा शास्त्रे यांतील एखाद्या शाखेच्या अभ्यासासाठी स्वच्छेने एकत्र आलेल्या विद्वानांचे मंडळ, असे अकादमी स्वरूप बनले. नंतर कलावंतांनीही ललितकलांच्या अभ्यासासाठी अशा अकादमी स्थापन केल्या. जगातील सर्वांत प्रसिद्ध अकादमी १६३५ साली पॅरिस येथे ‘फ्रेंच अकादमी’ या नावाने स्थापन झाली. हिचे उद्दिष्ट फ्रेंच भाषेचा अभ्यास व विकास करून तिला सर्व कला व शास्त्रे यांच्या अभिव्यक्तीसाठी समर्थ करणे हा होता. हिची सभासदसंख्या ४० पर्यंत मर्यादित होती. या अकादमीच्या स्वरूपात अनेक बदल झाले.

१८१६ साली केलेल्या पुनर्घटनेप्रमाणे या अकादमीच्या पाच शाखा

  1. भाषा
  2. ललित वाङ्‌मय
  3. भौतिक शास्त्रे
  4. कला आणि
  5. नीतिशास्त्र व राज्यशास्त्र

यांना वाहिलेल्या आहेत. तिसऱ्या शाखेचे ६६ सभासद त्या त्या विषयांतील तज्ञ असतात. पण पहिल्या शाखेवर लेखक, कलावंत, पंडित, मुत्सद्दी, योद्धे किंवा कोणत्याही क्षेत्रात चमकलेल्या व्यक्ती निवडून येऊ शकतात. विशेषतः या शाखेवर (व इतर शाखांवरही) सभासद म्हणून निवडून येणे हा फार मोठा मान समजतात. फ्रान्समध्ये अकादमीच्या सभासदांना ‘अमर’ ही गौरवसूचक संज्ञा देतात. इंग्लंडमधील सर्वांत जुनी अकादमी ⇨रॉयल सोसायटी ही १६६२ मध्ये स्थापन झाली. हिचा अभ्यासविषय भौतिक शास्त्रे हा होय. १७५४ साली स्थापन झालेली रॉयल अकादमी ऑफ आर्ट्‌स ही चित्रकला, शिल्पकला व स्थापत्य यांना वाहिलेली आहे. मानव्यविद्यांच्या उपासनेसाठी ब्रिटिश अकादमी १९०२ मध्ये स्थापन झाली. ‘अकॅडमी ऑफ आर्ट्‌स अँड लेटर्स’ ही अमेरीकेतील साहित्य, संगीत, व चित्रकला या क्षेत्रांतील नामवंत कलाकारांची मोठी संस्था आहे.

अशा अनेक अकादमी सर्व प्रगत देशांत स्थापन झालेल्या आहेत. पहिल्या महायुद्धानंतर मानव्यविद्यांच्या अभ्यासासाठी १९२० मध्ये व भौतिक शास्त्रांच्या उपासनेसाठी १९३१ मध्ये आंतरराष्ट्रीय अकादमी स्थापन झाल्या. यांचे स्वरुप सर्व राष्ट्रांतील अकादमींच्या प्रतिनिधींचा संघ असे असून कार्य जागतिक ज्ञानाचे एकीकरण व प्रसरण हे आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत सरकारने भारतीय कला, साहित्य व संस्कृती यांना उत्तेजन देण्याचे धोरण स्वीकारले व एतद्विषयक खाजगी संस्थांना अनुदान देण्यात सुरूवात केली. नंतर नुसत्या अनुदानदानात समाधान न मानता या क्षेत्रांत काही सक्रिय भाग घेण्याचे सरकारने ठरविले व मार्गदर्शनासाठी साहित्य, दृश्य कला, नृत्य, नाट्य आणि संगीत क्षेत्रांतील प्रथितयश व्यक्तींच्या परिषदा भरविल्या.

त्यांनी केलेल्या शिफारशींनुसार भारत सरकारने पुढील तीन अकादमींची स्थापना केली संगीत नाटक अकादमी

या अकादमीची स्थापना जानेवारी १९५३ मध्ये झाली. या अकादमीचे उद्दिष्ट भारतीय नृत्य, नाट्य, चित्रपट आणि संगीत या कलांना उत्तेजन देऊन तद्वारा भारताचे सांस्कृतिक ऐक्य साधणे हे आहे.

याशिवाय पुढील कामे ही अकादमी करते

  1. प्रादेशिक संस्थांच्या कार्यक्रमात एकसूत्रता आणणे
  2. संशोधनास उत्तेजन देणे
  3. उत्सव, समारंभ घडवून आणणे
  4. चर्चासत्रे भरविणे
  5. सांस्कृतिक विनिमय घडवून आणणे.

अकादमीने आजपर्यंत जवळजवळ १५० खाजगी संस्थांना मान्यता दिली असून त्यांपैकी काहींना अनुदानही दिले आहे. तसेच दर वर्षी नृत्ये, नाट्य, संगीत व चित्रपट या क्षेत्रांत विशेष प्रावीण्य दर्शविणाऱ्या व्यक्तींना अकादमी पारितोषिके देते.

साहित्य अकादमी

या अकादमीची स्थापना मार्च १९५४ मध्ये झाली. या अकादमीचे प्रमुख कार्य भारतातील साहित्यविषयक पूर्वधनाचे जतन करून नवीन, स्वतंत्र अथवा रूपांतरित वाङ्‌मयाच्या निर्मितीला उत्तेजन देणे, हे होय. उत्तेजनार्थ अकादमी पारितोषिके व मानचिन्हे देत असते. अकादमीने प्रकाशनाचा विविध व विस्तृत कार्यक्रम हाती घेतला आहे. भारतीय भाषांतील समकालीन वाङ्‌मयाची सूची तयार करणे, समकालीन लेखकांच्या कृतींचे संग्रह प्रसिद्ध करणे, आधुनिक भारतीय वाङ्‌मयाचा विकास व इतिहास या विषयांवर इंग्रजी व हिंदी भाषांत प्रामाणित ग्रंथ तयार करणे. संस्कृत महाकाव्ये व पुराणे प्रसिद्ध करणे इ. प्रत्येक योजना या कार्यक्रमात समाविष्ट आहेत. दर वर्षी प्रसिद्ध झालेल्या प्रत्येक भारतीय भाषेतील सर्वोत्कृष्ट वाङ्‌मयकृतीला अकादमी ५,००० रुपयांचा पुरस्कार देते.

ललित कला अकादमी

अकादमीची स्थापना ऑगस्ट १९५४ मध्ये झाली. चित्रकला, शिल्पकला, स्थापत्य व इतर कला यांचा अभ्यास व संशोधन यांना उत्तेजन देणे, हे या अकादमीचे प्रमुख कार्य होय.

याशिवाय पुढील कामे ही अकादमी करते

  1. प्रादेशिक अकादमींच्या कार्यक्रमांत एकसूत्रता आणणे
  2. कलाविषयक संघांमध्ये सहकार्य निर्माण करणे
  3. कलाविषयक भिन्न पंथांमध्ये विचारविनिमय घडवूण आणणे
  4. कलाविषयक वाङ्‌मय प्रसिद्ध करणे
  5. कलाकार व कलाकृती यांची देवाणघेवाण करविणे
  6. प्रदर्शनांच्या द्वारा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संपर्क साधणे.

अकादमीच्या वार्षिक कार्यक्रमांत कलाकृतींच्या राष्ट्रीय प्रदर्शनास महत्त्वा‍चे स्थान आहे. भारतीय चित्रे व लघुचित्रे यांचे बरेचसे संग्रह व सचित्र पोस्टकार्डे अकादमीने प्रसिद्ध केली आहेत. अशा रीतीने स्वातंत्र्योत्तर काळात या शासनपुरस्कृत अकादमींच्या द्वारा भारतीय संस्कृतीला संजीवन व नवजीवन देण्याचे कार्य चालू आहे.

लेखक:रा.म.मराठे

माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate