অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अशोकस्तंभ

अशोकस्तंभ

सम्राट अशोकाने प्रजाहित व धर्मोपदेश ह्यांच्या संदर्भात दिलेल्या आज्ञा ज्या दगडी आरसपानी स्तंभांवर कोरून ठेवलेल्या आहेत, त्यांना ‘अशोकस्तंभ’ म्हणतात. ते त्याच्या साम्राज्यभर विखुरलेले होते. यूआन च्वांग हा सातव्या शतकातील चिनी प्रवासी अशा पंधरा अशोकस्तंभांचा उल्लेख करतो; त्यांपैकी आज तेरा स्तंभ अवशिष्ट आहेत. आणखीही काही स्तंभ असणे संभवनीय आहे; तथापि अद्याप ते उपलब्ध झालेले नाहीत. उपलब्ध स्तंभांपैकी सर्वांत लहान स्तंभ ६ मी. उंचीचा असून, सर्वांत उंच स्तंभ २१ मी. उंचीचा आहे. सर्वांत मोठ्या स्तंभाचा जमिनीखालील भाग ०·३७ चौ.मी., वजन ५० टन व व्यास ०·७६ मी. आहे. बहुतेक स्तंभ उत्तर प्रदेशातील चुनार येथील खाणीतल्या एकसंघ वालुकाश्मात घडविले असावेत आणि नंतरच ते दूरवर वेगवेगळ्या स्थळी हलविले असावेत. वालुकाश्म मुळातच विविधरंगी असल्याने हे स्तंभही साहजिकच रंगीत घडले.

उदा., संकीसा येथील स्तंभ जांभळ्या रंगाचा आहे, तर पूर्वी बनारस येथे असलेला लाटभैरव स्तंभ हिरव्या रंगाचा होता. काही स्तंभ करड्या, पिवळ्या आदी रंगांचेही आढळतात. स्तंभांतील रंगांच्या विविधतेप्रमाणे स्तंभशीर्षांमध्येही वैविध्य दिसून येते. श्रावस्ती येथील जेतवन विहाराच्या पूर्व दरवाजा- च्या बाजूंना असणाऱ्या दोन स्तंभांत अनुक्रमे चक्र व वृषभ अशी स्तंभशीर्षे आढळतात. लौडिया-नंदनगढ, रामपुर्वा व कपिलवस्तू येथील स्तंभांची शीर्षे सिंहाच्या वेगवेगळ्या प्रतीकात्मक रूपभेदांची असून, त्यांच्या शिल्पशैलींमध्येही विविधता व गुणवत्ता दिसते. राजगीर (राजगृह) व संकीसा येथील स्तंभशीर्ष हत्तीच्या आकाराचे आहे, तर रूक्मिणीदेई येथील स्तंभशीर्ष अश्वाच्या आकाराचे होते. रामपुर्वा येथील वृषभ-स्तंभशीर्ष उल्लेखनीय आहे. स्तंभशीर्षांमधील प्राण्यांच्या मूर्तींत सारतत्त्वात्मक शिल्पांकन आढळते. स्तंभशीर्षांवरील कोरीव चित्रमालिकेत धार्मिक प्रतीके दर्शविलेली आहेत.

सर्व अशोकस्तंभांत सारनाथ येथील स्तंभास सांस्कृतिक व कलात्मक दृष्ट्या आगळे महत्त्व आहे. भारताने पहिल्या प्रजासत्ताकदिनी (२६ जानेवारी १९५०) या स्तंभाचे शीर्ष राष्ट्रचिन्ह म्हणून स्वीकारले. हा स्तंभ अशोकाने मृगदाव येथे उभारला होता. ह्या ठिकाणी भगवान बुद्धास ज्ञानप्राप्ती झाली व त्याने पहिले धर्म- प्रवचनही येथेच केले. तो हरितमणी या अश्मविशेषाप्रमाणेच गुळगुळीत व चकचकीत दिसे. सातव्या शतका- नंतर केव्हातरी तो उद्‌ध्वस्त केला गेला असावा; कारण १९०५ मध्ये केलेल्या उत्खननात पुरातत्त्वसंशोधन-विभागास त्याचे फक्त स्तंभशीर्षच सापडले. ते दोन मी. उंचीचे असून सध्या ते सारनाथ येथील संग्रहालयात ठेवले आहे. यातील सिंहशीर्षावर पूर्वी जे धर्मचक्र बसविले होते, त्याचेही अवशेष याच संग्रहालयात ठेवलेले आहेत. ह्या स्तंभशीर्षावरील चार सिंह विशिष्ट मौर्यशैलीत कोरलेले असून त्यांखालील नक्षीदार बैठकीच्या कोरीव चित्रमालिकेत हत्ती, घोडा, बैल, सिंह व चोवीस आरे असलेले चक्र आहे. त्याखाली उलटे कमळ कोरलेले आहे. अशोकाच्या एकूण स्तंभांवरून तत्कालीन मूर्तिकलेची भरभराट दिसून येते. त्यांतील सारनाथ स्तंभशीर्ष मौर्यकालीन मूर्तिकलेच्या अत्युच्च विकासाचे द्योतक समजले जाते.

संदर्भ :

  1. Basak, Radha-Govind, Ed. Asokan Inscriptions, Calcutta, 1959.
  2. Mookerjee, Radhakumud, Ashok, Delhi, 1962.
  3. भट्ट, जनार्दन, संपा. अशोक के धर्मलेख, दिल्ली, १९५७.

लेखक : गो. वि चांदवडकर,

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate