অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अस्थिशिल्पन

अस्थिशिल्पन

मृत प्राण्याच्या अस्थीवरील शिल्पांकनाची एक प्राचीन व सार्वत्रिक हस्तकला. उंट, ससा, मासे यांसारख्या विविध प्राण्यांच्या अस्थींवर कोरीव नक्षीकाम करून सुंदर व सुबक वस्तू तयार करण्यात येतात. अस्थिशिल्पन व शृंगशिल्पन  या दोन्ही हस्तकलांत पुष्कळच साम्य आहे. क्वचित सामान्य जडावकामात हस्तिदंताऐवजी अस्थींचा उपयोग करण्यात येतो हस्तिदंतशिल्पन]. पूर्वी बोटीवरील कैद्यांनी वेळ घालविण्यासाठी आपल्या मांसाहारातून लाभलेल्या हाडांवर जहाजे व इतर वस्तूंच्या प्रतिमा कोरल्याचे उल्लेख आढळून येतात.

आजही वर्तुळाकार पेट्या, कंरडे, चाकूसुर्‍यांच्या मुठी, तलवारीची म्यान, गुंड्या, कंगवे, लहान आकाराची गोलाकार भांडी, दीपाधार, लेखण्या, मेजावरील शोभिवंत वस्तू, देवदेवतांच्या मूर्ती, अभिजात ग्रीक शिल्पांच्या प्रतिकृती, त्याचप्रमाणे शिसूच्या किंवा रोजवुडच्या बैठकीवर उभे असलेले माकड इ. वस्तू अस्थींपासून तयार करण्यात येतात. तसेच हरिण, हत्ती, घोडा, सुसर, सिंह इ. प्राण्यांच्या आकर्षक प्रतिमा आणि कागद कापण्याची सुरी, कुंचले, सिगारेटच्या डब्या, बुद्धिबळाच्या सोंगट्या, फुलदाण्या, अलंकारमंजूषा, साबण-डब्या आणि विविध आकारांचे पक्षी व प्राणी यांसारख्या काहीशा उपयुक्त पण मुख्यतः शोभादायक वस्तू हाडांपासून तयार करण्यात येतात. गुजरातमध्ये अस्थी व शृंगे यांपासून कंठमाला व बांगड्या यांसारखे मूल्यवान व आकर्षक अलंकार आणि पेशावरच्या बाजूला उंटाच्या हाडांपासून ‘सुरमादाणी’ सारख्या वस्तूही तयार करण्यात येतात.

अस्थिशिल्पनासाठी पूर्वी भारतीय कलाकार कात्री, करवत, सुरी, कानस, विविध आकारांच्या छिन्न्या, टोच्या, गिरमीट, बाहेरील धारेचे गोबरे, रंधा, पटल, वाकडी कानस इ. उपकरणे वापरीत व  त्यांच्या

साह्याने विविध आकारांची हाडे कापणे, त्यांना प्रथम स्थूलपणे इष्ठ तो आकार देणे, ती हाडे नंतर कोरणे, त्यांना भोके पाडणे व त्यांवर झिलई देणे इ. प्रक्रिया करून त्यांतून सुंदर व मनोवेधक कलाकृती निर्माण करीत असत. अलीकडे वरील उपकरणांच्या जोडीला विदेशी व यांत्रिक उपकरणांचाही वापर करण्यात येतो. अस्थींपासून वस्तुनिर्मिती करण्यापूर्वी त्यांना स्वच्छ करण्याची प्रक्रिया करण्यात येते.

ही प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक करावी लागते. प्रथम हाडे गरम पाण्यात उकळून त्यांवरील संपूर्ण मांसांश काढून टाकावा लागतो. नंतर ती सर्व काळजीपूर्वक विलग करून गार पाण्यात स्वच्छ धुऊन काढावी लागतात व पाण्यास ब्लीचिंग पावडर घालून ती पुन्हा एकदा उकळावी लागतात. नंतर गार पाण्याने ती धुऊन व स्वच्छ करून वाळविली जातात. तथापि पुष्कळदा हाडांचे मुळचे आकारच रंगलेपनादी संस्कारांनी कलापूर्ण ठरू शकतात.

अस्थिशिल्पन काष्ठशिल्पनापेक्षा थोडे सोपे असले, तरी ते नाजुक हाताने, काळजीपूर्वक व धीमेपणाने करावे लागते. अशा रीतीने एकदा आकृती कोरून पूर्ण झाली म्हणजे तिला नाजूक कुंचल्याने व हलक्या हाताने अनुरूप रंग देण्यात येतो. हे रंगलेपन विविध प्रकारे आकर्षक करण्यात येते. शिल्पाकृतीवरील रंग पूर्णपणे सुकला, म्हणजे त्या वस्तू लाखेच्या पाण्यात बुडविण्यात येतात किंवा लाखेचा पातळ थर कुंचल्याच्या साहाय्याने त्यांवर देण्यात येतो.

या क्रियेमुळे अस्थिशिल्पावरील रंगांना एकप्रकारची चमक येऊन ते उजळून दिसतात. अलीकडे वरील पद्धतीने उंट किंवा अन्य प्राण्यांप्रमाणे ससा व मासे यांच्याही अस्थींचा वापर करून त्यांपासून फुलपाखरू, घुबड, बगळा, पोपट, चिमणी, कुत्रा, मासा वगैरे विविध आकारप्रकारांच्या पशुपक्ष्यांची शिल्पे तयार करण्यात येतात. विशेषतः नाना आकारांच्या उडत्या पक्ष्यांच्या सुंदर व सुबक प्रतिकृती तयार करून त्यांचा उपयोग टोप्यांवरील किंवा पोषाखावरील शोभापदके म्हणून करण्यात येतो.

अलीकडे प्लॅस्टिकच्या सुंदर व आकर्षक वस्तूंचे विपुल प्रमाणात उत्पादन केले जाते. त्या मानाने अस्थिशिल्पाकृतींचे प्रमाण कमीच पडते; तथापि त्यांतील नाजुक कलाकुसर, प्राकृतिक आकृतिबंध व मानवी हस्तलाघवाचा जाणवणारा ठसा इ. मौलिक गुणांमुळे त्या मनोवेधक वाटतात.

संदर्भ : 1. Cone, J. G. Cone's Book of Handicrafts, London, 1961.

2. Mehta, Rustam J. The Handicrafts and Industrial Arts of India, Bombay,1960.

लेखक : चंद्रहास जोशी

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate