অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आडोशीपट

प्रस्तावना

(स्क्रीन). आडोशीपटाची कल्पना दुहेरी आहे, एक फर्निचर-प्रकार म्हणून आणि एक वास्तुरचनाविशेष म्हणून.वाऱ्यापासून वा उन्हापासून संरक्षण लाभण्यासाठी, तसेच एखाद्या जागेचे विभाजन करून आवश्यक तो खाजगीपणा साधण्यासाठी इमारतीमध्ये ज्या आडोसेवजा अलंकृत फलिका (पॅनेल) वा चौकटी (फ्रेम) वापरल्या जातात, त्यांना आडोशीपट अशी संज्ञा आहे. आडोशीपटाचे प्राय: दोन प्रकार पडतात :

(१) जागेचे विभाजन सोयीप्रमाणे वारंवार करता यावे, यासाठी विविध आकारांचे आडोशीपट योजले जातात. घराच्या बाह्यांगावर उभारलेले आडोशीपट हवामानाचे होणारे परिणाम सुसह्य होण्याच्या दृष्टीने योजले जातात. आडोशीपटाद्वारे खाजगीपणा साधला जातो, त्या दृष्टीने त्याची उंची प्राय: आधारित असते. आडोशीपटाचे पोत जाळीदार ठेवून किंवा त्यावर नक्षादार उठावरेखन करून आवाजाचे परिवर्तन व हवेचे प्रवाह यांवर नियंत्रण ठेवता येते. जाळीदार पोताच्या आडोशीपटाने अंशत: पारदर्शकपणाही साधता येतो. (२) घरातील काही वस्तूंचा आडोशीपटासारखा उपयोग करून घेता येतो. कपाटे, खुर्च्या, सोफा यांसारख्या फर्निचर-प्रकारांच्या मांडणीतून जागेचे विभाजन करता येते. या साधनांना दिलेल्या आकारांमुळे योग्य तो खाजगीपणा गृहाच्या अंतर्रचनेत साधला जातो. आधुनिक वास्तुरजनेत फ्रँक लॉइड राइट याने जेवणघरात उंच पाठीच्या खुर्च्यांचा उपयोग आडोशीपटासारखा केलेला आहे. दिवाणखाना व जेवणघर यांच्यात भिंत न बांधता वरील योजनेने खाजगीपणा साधला जातो.

स्वरूप

आडोशीपट कापड, कागद, चामडे इत्यादींना आच्छादिले जातात. ते एका फलिकेचे वा अनेक फलिकांच्या जुळणीने तयार केलेले असतात. लहान आकाराचे, एकफलकी, तारेचे वा जाळीचे, अलंकृत आडोशीपट उघड्या भट्टया किंवा अग्निस्थाने यांभोवती संरक्षणार्थ वापरतात. त्यांपैकी दोन पायांवर अधिष्ठित असलेल्या आडोशीपटांना ‘उत्तुंग आडोशीपट’ (शेव्हॅल स्क्रीन) म्हणतात. एकाच खांबावर बसविलेल्या, वर-खाली सरकविता येणाऱ्या, छोट्या फलिकेच्या आडोशीपटास ‘दंडी आडोशीपट’ (पोलस्क्रीन) अशी संज्ञा आहे. काही वेळा तिपाई वा अन्य भरीव बैठकीवर आडोशीपट उभारले जातात. स्थानांतरसुलभता हे आडोशीपटांचे एक ठळक वैशिष्ट्य आहे.

प्राचीन आडोशीपट

ज्ञात आडोशीपटांपैकी सर्वात प्राचीन आडोशीपट चीनमध्ये ख्रि. पू. दुसऱ्या शतकात आढळले. त्यांतील काही आडोशीपटांच्या चौकटीत अभ्रक अथवा काच यांचा वापर केला असून, काही आडोशीपट हरितमणी व विविध धातू जडविलेले तसेच तक्षणाने सुशोभित केलेले असे आढळतात. या काळापासूनच आडोशीपटांवर निसर्गचित्रे, संस्मरणीय तसेच दैनंदिन घटना यांची दृश्ये वगैरे रंगविण्याची प्रथा होती. भरतकाम केलेल्या रेशमी वस्त्रांचाही वापर चौकटीमध्ये केला जाई. अनेकफलकी आडोशीपटही त्या काळी अस्तित्वात होते. चाळीस फलिकांचे आडोशीपट उपलब्ध असल्याची उदाहरणे आहेत.

जपानी पद्धती

जपानी पद्धतीच्या घरांमध्ये आडोशीपटांचा वापर विशेषत्वाने होतो. त्यांना ‘बाय ओबू’ अशी संज्ञा आहे. उंच, घडीचे आडोशीपट कुटुंबीयांच्या आडोशासाठी वापरले जात; त्याचप्रमाणे दिवसा दारे, खिडक्या, तावदाने अशा घराच्या मोकळ्या जागी त्यांचा वापर होत असे. ठेंगण्या आडोशीपटांमध्ये ‘कौशी बाय ओबू’ या नावाने ओळखला जाणारा प्रकार सन्मान्य व्यक्तीच्या आसनाच्या पार्श्वभागी वापरला जाई. त्याचप्रमाणे द्विफलकी आडोशीपटाचा वापर चहापानासारख्या प्रसंगी आडोशासारखा केला जाई. जपानी आडोशीपट बहुधा सहा फलिकांचे असून सर्व फलिकांवर सलगपणे निसर्गचित्रे वा इतर आकृतिबंध चितारले जात. चिनी आडोशीपटांप्रमाणे एकेक फलिका स्वतंत्र रंगवून एकत्र जोडण्याचा प्रकार रूढ नव्हता.

वेगवेगळे कालखंडतील आडोशीपट

यूरोपात दुसऱ्या एडवर्डच्या काळात (१२८४–१३२७) आडोशीपटांचा उल्लेख आढळत असला, तरी त्यात वापरलेल्या आच्छादन-प्रकाराचा बोध होत नाही. आठव्या हेन्‍रीच्या काळात (१४९१–१५४७) रंगीत, वस्त्रांकित आडोशीपट वापरात असल्याचा उल्लेख आहे. इंग्‍लंडमध्ये पौर्वात्य पद्धतीचे (विशेषत: चिनी जीवनाची चित्रे, पक्षी व फुले, ग्रामीण दृश्ये) तसेच स्पॅनिश व फ्लेमिश चर्मकामातील वैशिष्ट्यपूर्ण अलंकृत आकृती इत्यादींचा आविष्कार घडविणारे आडोशीपट विशेष लोकप्रिय होते. सतराव्या शतकात घडीचे आडोशीपटदेखील मान्यता पावले होते. मध्ययुगानंतर यूरोपात काष्ठ, चर्म, वस्त्र यांनी आच्छादिलेल्या आडोशीपटांचा वापर ऊनवाऱ्यापासून संरक्षण व्हावे, म्हणून मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. फ्रान्समध्ये ‘रेझांस’ काळात (सु. १६८०–१७२५) तक्षणाने सुशोभित अशा काष्ठफलिकांचे उत्तमोत्तम आडोशीपट निर्माण झाले. या आडोशीपटांचा शिरोभाग काहीसा वक्राकार असून त्यात चित्रजवनिका तसेच भरतकाम केलेली वस्त्रे बसवीत. वास्तूमधील इतर पडदे तसेच टेबल-खुर्च्यांची वेष्टनवस्त्रे इत्यादींना शोभून दिसणाऱ्या रंगाकृत्यांची वस्त्रे आडोशीपटांमध्ये वापरीत. कित्येकदा आडोशीपटच्या वरील भागात आरसे बसविले जात. सोळाव्या लुईच्या काळात (१७५४–१७९३) अभिजात आयताकृती, सोन्याचा मुलामा दिलेल्या, कोरीव, वस्त्रांकित चौकटीचे आडोशीपट रूढ झाले. १७९०–१८०० यादरम्यान जपानी धर्तीचे रंगीबेरंगी कागदाचे मोठमोठ्या फलिकांचे आडोशीपट वापरले जात. आडोशीपटांना पुष्कळदा फडताळे जोडण्याचीही व्यवस्था होती.

कॉरोमांडेल

आडोशीपटातील एक वौशिष्ट्यपूर्ण प्रकार ‘कॉरोमांडेल’ म्हणून ओळखला जातो. त्यात काष्ठफलिकांवर लाक्षारोगणाचे लेप देऊन त्यांत विविध रंगांचे नक्षीकाम केले जाते. चिनी आडोशीपटांमध्ये हा प्रकार विशेषत्वाने आढळतो.

भारतीय आडोशीपट

प्राचीन भारतीय वास्तूंमध्ये स्त्रीदालनांत जाळीदार आडोशीपटांचा उपयोग केलेला आढळतो. आधुनिक काळात जाळीदार आडोशीपट थडग्यांभोवती योजिलेले आढळतात. अहमदाबाद, दिल्ली, आग्रा इ. ठिकाणचे जाळीदार आडोशीपट प्रसिद्ध आहेत. ताजमहालातील थडग्याभोवतीची संगमरवरी जाळी वास्तुशिल्पांत अजोड मानली जाते. फतेपूर सीक्री येथील हवाई महालातही जाळीदार आडोशीपटांचा वापर केलेला आहे.

आ़डोशीपट व संज्ञा

चर्च-वास्तूमधील तक्तपोशीपेक्षा ठेंगणी, लाकडी, दगडी वा धातूची विभाजनभिंत अथवा प्राकार यासही आ़डोशीपट अशी संज्ञा आहे. इतर भिंतीप्रमाणे ती भिंत वास्तूस आधार देण्यासाठी बांधलेली नसते. चर्च वा कॅथीड्रल यांतील निरनिराळ्या भागांच्या सीमा दर्शविणे, हा तिचा उद्देश असतो. ‘क्वायर’ अथवा ‘चॅन्सल’ या नावाने सर्वसाधारणपणे प्रचलित असलेला आडोशीपट गायक-वादकवृंद व धर्मगुरू यांचे दालन आणि चर्चचे मध्यदालन यांच्यात विभाजन करतो. ‘रूड’ हा क्वायरचाच पण अधिक सफाईदार व कोरीव घडणीचा प्रकार असून त्यावर क्रॉस बसविलेला असतो. चर्चमधील प्रार्थनामंदिर किंवा समाधी यांभोवती उभारलेल्या जाळीदार आडोशीपटास ‘पारक्लोज स्क्रीन’ अशी संज्ञा आहे. अनेक मध्ययुगीन कॅथीड्रलमधून शिलाशिल्पन व मूर्तिशिल्पन असलेल्या अलंकृत व जाळीदार क्वायर आडोशीपटांचे विविध नमुने आढळतात. शार्त्र व आल्बी (फ्रान्स) आणि यॉर्क, लिंकन, डरॅम (इंग्‍लंड) येथील कॅथीड्रलमध्ये असलेले आडोशीपट विशेष उल्लेखनीय आहेत. अनेक इंग्रजी चर्चमध्ये तक्षणाने सुशोभित व रंगीत असे काष्ठ आडोशीपट दिसून येतात. इटलीतील अनेक चर्चमधून संगमरवरी जडावकामाने विभूषित असे आडोशीपट आढळतात. यूरोपीय प्रबोधनकाळाच्या प्रारंभापासून चॅन्सल आडोशीपटांचे प्रमाण कमीकमी होत गेले. मात्र त्या काळातही स्पेनमध्ये जाळीदार, लोखंडी आडोशीपटांचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता. ग्रीक चर्चमधील क्वायर प्रकारातील भरीव आडोशीपट चर्चचे मध्य दालन व गर्भदालन संपूर्णत: विभक्त करणारे असून त्यांना बहुधा तीन दरवाजे असतात. तसेच त्यांवर धार्मिक प्रतिमाचित्रेही कोरलेली असतात.

लेखक : १) श्री. दे. इनामदार

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/5/2021



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate