অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आदिमकला

मानवी संस्कृती

प्राचीन अवशेषांच्या कालनिर्णयासाठी अधिक विश्वसनीय अशी रेडिओ कार्बन (सी - १४) ही वैज्ञानिक पद्धती १९४० पासून वापरण्यात येते. या पद्धतीप्रमाणे उत्तर पुराणाश्मयुगाचे (इ. स. पु. सु. २५,००० ते १०,०००) सांस्कृतिक, प्रादेशिक असे ढोबळ पोटविभाग तज्ञांनी पाडले आहेत. यांतील ऑरिग्‍नेशियन काळ इ.स.पू.सु. २५,००० वर्षांच्या आगेमागे जातो. फ्रान्समधील मोरेव्हिया

प्रदेशातील व्हिलेन्डॉर्फ येथील व्हीनस  या शिल्पाचा काळ इ. स. पू. २९,२०० इतका येतो. याच काळात ऑरिग्‍नॅक गुहा मोडते. पेरीगोर्डियन काळ त्याच्या अलीकडचा. या संस्कृतीतील एका स्त्रीमूर्तीचा काळ इ. स. पू. २१,६०० येतो आणि इतर अवशेषांचा इ. स. पू. ११,६५० येतो. या दोन्ही शैलींच्या मिश्रणातून लॅस्को शैली तयार झाली आहे. लॅस्को येथील व्हीनस हे शिल्प कलादृष्ट्या अप्रतिम आहे. सॉल्यूत्रे (सोन ए ल्वार) येथे दगडाची हत्यारे, मुठीत भरलेले बाण, हाडांचे भाले, माशांसाठी गळ, पशुपक्ष्यांवर फेकण्याचे भाले आणि भाले फेकण्याचे आकडे तसेच हाडांची दाभणे वगैरे विपुल अवशेष सापडतात. यापुढील मग्डेलेन संस्कृतीला सॉल्यूत्रेचा वारसा मिळाला. दक्षिण फ्रान्स व उत्तर स्पेन या फ्रँकोकँटेब्रिअन नावाने ओळखल्या जाणाऱ्या मग्डेलेन गुहांतून अवशिष्ट राहिलेली संस्कृती हा आदिमानवी कलेचा परमोत्कर्ष म्हणावा लागेल. उत्तर स्पेनमधील  अल्तामिरा  गुहा यात मोडतात. जगण्यायोग्य सजविलेल्या या गुहांत वास्तव्य करणारा मानव मिळेल ते अन्न गोळा करी आणि जिवावर उदार होऊन शिकार करी. बी पेरून शेती करणे, घरे बांधणे त्याला अवगत नव्हते.

चित्रांचा शोध व शैली

या मग्डेलेनिअन किंवा फ्रँकोकँटेब्रिअन गुहांचा शोध १८३५च्या सुमारास लागला. यांतील दगडावर कोरलेल्या मनुष्य व प्राणी यांच्या आकृत्या ज्ञात होत्या; पण प्रत्यक्ष चित्रांचा शोध मात्र १८७९ मध्ये अगदी योगायोगाने लागला. बॅरन सॉतौला नावाच्या एका संशोधकाच्या लहान मुलीला ही चित्रे प्रथम दिसली. वडिलांबरोबर गुहा बघण्यासाठी ती गेली आणि तिने सहज वरती पाहिले, तेव्हा तोपर्यंत लक्ष न गेलेली डोक्यालगतच्या छतावरील चित्रे तिला प्रथम दिसली. तत्पूर्वी अशा काहीतरी झपाटणाऱ्या गूढ चित्रांबद्दलच्या आख्यायिका त्या प्रदेशात प्रचलित होत्या. विशेषतः रोमन काळातील ब्रास्क लोकांच्या दंतकथांमधील भूतपिशाचे, गाई, घोडे, तांबडे बैल, पक्षी, नाग यांचे मूळ संदर्भ या फ्रँकोकँटेब्रिअन चित्रांतच असावेत, असे तज्ञांचे मत आहे. कारण ब्रास्क लोकांची वस्ती याच टापूत होती. पंधराव्या शतकातील तिसरा कालिक्स्टस हा आर्चबिशप असताना, घोड्यांची वगैरे चित्रे असलेल्या झपाटणाऱ्या गुहांमध्ये धार्मिक विधी करण्यास त्याने बंदी घातली होती. एवढ्यावरूनही या चित्रांच्या उदंड सामर्थ्याची कल्पना येऊ शकते. शिलाखंडावर आणि भिंतीवर खोदलेली, लिंपलेली आणि रंगविलेली पशुचित्रे अजस्र आकाराची, अत्यंत ओजस्वी आणि खिळवून टाकणारी आहेत. रानगेंडे, रानबैल, अजस्र गाई, घोडे यांची कित्येक आणि रेनडियर व रानबकरे यांची काही चित्रे आहेत. मनुष्याकृती क्वचितच आणि असल्या तरी अगदी लहान, रेखनदृष्ट्या दुर्लक्षित आणि नगण्य. जनावरांस पकडण्याच्या फाशासारख्या दिसणाऱ्या जाळीदार अप्रतिरूपाकृतीही तुरळक दिसतात. याव्यतिरिक मात्र भौमितिक आकार नाहीत. काही ठिकाणी ओल्या भिंतीवर चिखलात बोटांनी काढलेल्या एकरंगी किंवा दुरंगी रेषांमधून पशूंच्या आकृत्या भासमान होतात. अगदी सुरवातीची चित्रे चिखलाने लिंपलेली, दगडावर खोदलेली असून काही ठिकाणी अनेक चित्रे एकमेकांवर कोरलेली आहेत.

अल्तामिरा, लॅस्को, लॉस्सेल, फाँ द गोम इ. फ्रँकोकँटेब्रिअन चित्रांची शैली अगदी अचूक बोलावयाचे, तर निसर्गनिष्ठ म्हणावी लागेल. त्यांत छायाप्रकाश, यथादर्शन वगैरे नाही. पण ठाशीव कसदार रेषेने वेढून रंगविलेले पशू, मूळ निसर्गातल्याहूनही काकणभर अधिक जिवंत आणि आक्रमक वाटावेत, असे आहेत. रंग नेमके, मोजके व रसरशीत आहेत. काळ्या रंगाच्या साहाय्याने उठावामध्ये विविध छटाछाया आणल्या असून, त्यामुळे आकार एकाच वेळी सघन आणि लवचिक वाटतात. या पशूंच्या अचाट शक्तीचा प्रत्यय मुख्यतः त्यांना बांधणाऱ्या दमदार आणि लयबद्ध रेषेमुळे येतो. जाड्याभरड्या भिंतीवरील उंचवट्यांचा आणि पोताचा उपयोग आदिमानवाने मोठ्या बहारीने केला आहे. त्यांतून क्वचित त्रिमितीचाही आभास मिळतो. ही भित्तिलेपचित्रे मृत्तिका रंगातील असून कोळशाचा उपयोग काळा रंग म्हणून केला आहे. व्याधशैलीची ही चित्रे गुणदृष्ट्या आणि तंत्रदृष्ट्या अजोड आहेत.

व्याध शैली शिकारी

व्याधशैली शिकारीच्या उद्योगातून सहजतया निर्माण झाली. रेनडियरसारख्या सामान्य शक्तीच्या निर्बुद्ध प्राण्याची शिकार करणे तसे सोपे. त्यामुळे तो या शैलीत गौण ठरला. पण रानगेंडा, रानबैल यांची शिकार जोखमीची व जिवावर बेतणारी होती. व्याधमानवाचे जीवनमरण शिकारीतच होते. शिकार नसेल, तर उपासमार आणि मृत्यू अटळ होता. शिकारीतील झुंज तर अमोघ शक्तीच्या प्राण्यांशी आणि आयुधे तर अगदी तुटपुंजी आणि तोकडी. अशा वेळी स्वतःची दुर्दम्य इच्छाशक्ती, अक्कलहुशारी, हिकमती कौशल्य आणि अखंड अवधान यांवरच त्याची मदार होती. नुसत्या भाल्यांसारख्या किंवा दगडांसारख्या तोकड्या आयुधांनिशी झुंजावयाचे, तर पशूहूनही अमोघ मानसिक शक्ती कमाविणे त्याला भाग होते. हत्येशिवाय जगणे तर अशक्यच होते आणि हत्या केल्याबद्दलची मानसिक टोचणीही तितकीच तीव्र होती. त्यामुळे परस्परविरोधी कल्पनांचा संकर असलेले असे एक तत्त्वज्ञान त्याने आपल्यापुरते निर्माण केले. व्याधमानवाचा आत्मा पशूंच्या शरीरात प्रथम शिरतो आणि त्यांच्याच तोडीच्या शक्तीने त्यांना पूर्ण वश करतो. मग या पशूंना मारण्‍याचे प्रत्यक्ष काम सहज सोपे होते. पशूंचे प्राण शरीराच्या विशिष्ट भागामध्ये असतात. त्यामुळे त्यांच्यावर नेमका घाव घालून त्यास ठार करता येते. परिणामी त्यांची फक्त शरीरे मरतात; पण प्राण किंवा आत्मे मरत नाहीत. तेव्हा त्यांची शरीरे मारण्यात खंत करण्यासारखे काही नाही. शरीराच्या हाडे, कवट्या इ. ज्या अवयवांत प्राण वसतात, ते अवयव जपून ठेवायचे आणि जादूटोणा करून त्यांना सजीव करावयाचे; त्यामुळे तो प्राणी शरीराने मेला, तरी आपल्यासारखे अनेक प्राणी अरण्यात पुन्हा निर्माण करतो आणि आपणास शिकारीची टंचाई न होता ती भरपूर मिळते, असे हे जीवनझगड्याचे भाबडे तत्त्वज्ञान होते.

हे तत्त्वज्ञान आणि भाबड्या कल्पना यांचे कर्तृत्व टोळीपेक्षाही टोळीतील एका प्रमुख व्यक्तीकडे जाते. व्याधसंस्कृतीत हा ‘शामान’ म्हणून ओळखला जाई शामान धर्म. क्वचित तो टोळीचा म्होरक्यासुद्धा असे. पण त्याचे खरे काम उपाध्यायाचे, धर्मगुरूसारखे तत्त्वाज्ञाचे, वैदूचे आणि चित्रकाराचे. मृगयेच्या प्राण्याला जादूटोण्याने वश करणे; मंत्र, तंत्र, वाद्यघोष, नाच या उपायांचा अवलंब करून टोळीला चेव आणणे; जखमींना व रुग्णाना औषधोपचार करणे अशी त्याची कामे असत. यासाठी लागणारी शक्ती त्याला सृष्टीतील मृतात्म्यांकडून मिळे. त्यासाठी तो ध्यानस्थ बसे. अशा वेळी त्याला वैश्विक कल्पना स्फुरत. भावी घटनांची, विशेषतः शिकारींच्या घटनांची, त्याला पूर्वकल्पना मिळे. त्याप्रमाणे तो मुहूर्त ठरवून देई. मृतात्मे अंगात संचरल्यावर त्याचा स्वतःचा आत्मा बाहेर पडे. त्याशिवाय त्याला सिद्धींची प्राप्ती होत नसे. ध्यानस्थ अवस्थेत तो काय बोलला याची त्याला जागृतावस्थेत सुतराम कल्पना नसे. हे आत्मे प्रसंगी त्याला ग्रासून टाकीत, त्रस्त करीत. पण इच्छा असो वा नसो, हे काम त्याला पार पाडावे लागे. कारण टोळीकडून त्याच्यावर ते सोपविलेले असे. पशूंना नमविण्याइतकी पैशाचिक शक्ती साध्य करावयाची, तर जादूटोण्याशिवाय गत्यंतर नव्हते. चित्रे रंगविणे हा त्या जादूटोण्यातील एक जालीम विधी होता. मानसशास्त्रीय दृष्ट्या पाहिले तर असे दिसते, की अशी अमोघ पाशवी शक्ती मिळवायची, तर त्या पशूशी मानसिक पातळीवर एकरूप होणे अपरिहार्य होते. बेभानपणे चित्रे रंगविण्याची प्रक्रिया ही परिणामी त्याला अशा मानसिक भोवऱ्यात भिरभिरत ठेवीत असावी. चित्रे रंगविणे, नाचणे, गाणे या सर्व क्रियांतून परिणामी अशी जीवनावश्यक एकतानता साधत होती. जीवन आणि मरण याचे भान उरत नसे. कला, धर्म, संस्कृती आणि रोजचे धोक्याच्या कड्यावरील जीवनमरण हे सर्व येथे एकजीव झाले होते. म्हणूनच एक प्रकारचे चैतन्य व्याधसंस्कृतीतील कलाकृतींमध्ये आढळते.

आमूलाग्र बदल

आजच्या आमूलाग्र बदललेल्या परिस्थितीत हे आदिमानवी व्याधाचे तत्त्वज्ञान आणि मनोवृत्ती समजणे कठीण असले, तरी त्याला मानसशास्त्रीय आधार आहे. उत्कट बेहोशीच्या आणि जिवावरच्या प्रसंगी सुसंस्कृत माणूसही असेच वर्तन करतो; नव्हे, प्रत्येक मानवामध्ये आदिम वारसा सुप्त स्वरूपात आहे, असे आजचे विश्लेषण मानसशास्त्र सांगते. युंगची सामूहिक अबोध आणि फ्रॉइडची आद्यतन किंवा आर्ष वारसा यांसारख्या मानसशास्त्रीय संकल्पनांतून हे स्पष्ट होते. प्रतिकूल निसर्गाशी जीवनमरणाचा झगडा देताना आदिमानवाला या तत्त्वज्ञानाची मानसशास्त्रीय गरज किती होती, हे स्पष्ट होईल. आदिमानवाची कला, धर्म आणि जगणे ही सर्व एकरूप होती.

व्याधसंस्कृती

सायबीरिया, ऑस्ट्रेलिया येथील आणि दक्षिण आफ्रिकेतील बुशमन आदिवासी जमातींनी व्याधसंस्कृतीतील शामानवादाचे हे अवशेष राखून ठेवलेले आजही दिसतात. भारतातही  वन्य जमातींत शामान दिसतात, हे व्हेरिअर एल्विन यांच्या संशोधनावरून स्पष्ट होते. त्यावरून आदिमानवी व्याधसंस्कृतीचा शोध संशोधकांनी घेतला आहे. अंगात संचरण्याचे प्रकार भारतातही खेडवळ व वन्य समाजांत प्रचलित आहेत. वाढत्या ज्ञानाबरोबर आणि संस्कृतीच्या वाढत्या व्यापाबरोबर शामानच्या अनेकांगी कार्याची विभागणी होऊन धर्मगुरू, तत्त्वज्ञ, पंचाक्षरी, शिपाई, कलावंत, संशोधक, उत्पादक, वितरक असे वेगवेगळे वर्ग कार्यानुरूप बनत गेले; पण या सर्वांचे मूळ शामानच्या आणि पर्यायाने आदिमानवाच्या प्रचंड एकाग्र शक्तीत आहे, हे विसरून चालत नाही. उलट हरघडीच्या जीवनसंग्रामामुळे त्याची दृष्टी अधिक धारदार आणि भावनाशीलता अधिक उत्कट व भेदक झाली होती. साधनत्रुटीमुळे त्याची इच्छाशक्ती दुर्दम्य झाली होती. प्रगल्भ संस्कृतीमध्ये साधनसुविधेमुळे ती कमजोर झाली आणि तिची जागा विचारशक्तीने घेतली. संस्कृतीच्या बदलत्या ओघात या उत्कटतेचा ऱ्हास होत गेला आणि आधुनिक मानव आपल्या कलाविष्कारातील जोमच घालवून बसला. त्यामुळे मूलभूत उत्कटतेच्या आणि चैतन्याच्या ओढीने आदिम प्रवृत्तींची जोपासना करण्याची आत्यंतिक गरज क्वचित मध्ययुगीन आणि बहुतेक आधुनिक कलावंतांना भासली आणि या प्रवृत्तींना ‘आदिमवाद’ असे संबोधण्यातही येऊ लागले. यूरोपातील एकोणिसाव्या शतकातील स्वच्छंदतावादी आणि नवअभिजाततावादी कलाविष्कारांतील उत्कटतेचे न्यून आधुनिक कलावंतांनाही जाणवले आणि आफ्रिकेतील आदिमानवी पातळीवरच्या  निग्रो कलेतील आणि बुशमन कलेतील आविष्काराची अस्सलता त्यांना हृद्य वाटली. वरपांगी कौशल्याला गौण लेखून कलाप्रवृत्तींच्या मूलस्रोतापर्यंत जाण्याच्या आधुनिकांच्या प्रयत्‍नांना आदिम कलेने असे खतपाणी पुरविले, ही वस्तुस्थिती लक्षणीय आहे.

आदिमानवाच्या कलाविष्कार

आदिमानवाच्या कलाविष्कारातील अस्सलपणा अजोड आहे. त्याने रंगविलेला किंवा शिल्पिलेला रानगेंडा किंवा रानबैल व त्यातील रगेल पशुत्व, नंतरच्या कलेला क्वचितच गवसले. पशूंच्या तुलनेने शिकारी मानवाची चित्रे त्याने फार लक्षपूर्वक चितारली नाहीत. पशुचैतन्याशी किंवा भोवतालच्या निसर्गाशी एकरूप होताना तो स्वतःच्या वेगळेपणाचे मान विसरला होता, असे म्हणावे लागते. नाहीतर शिकारी माणसाची त्याने चितारलेली मोजकी चित्रे इतकी दुर्लक्षित व नगण्य राहती ना. पण असे असले, तरी स्त्रीच्या स्त्रीत्वाने मात्र त्याला पशूइतकेच झपाटून टाकलेले दिसते. त्याना शिल्पिलेल्या स्त्रीच्या घनाकारात ओतप्रोत ओसंडणारे स्त्रीत्व नंतरच्या समूहशक्तीची जोपासना करणाऱ्या ग्रीक किंवा रोमन शैलींनासुद्धा गवसले नाही. स्त्रीकडे पाहण्याच्या दूषित आणि ऱ्हस्व दृष्टीमुळे तथाकथित सुसंस्कृत मानवांच्या आविष्कारात येणाऱ्या विकृतींवर मर्व्हिन लीव्ही या आंग्‍ल टीकाकाराने आपल्या मून्स ऑफ पॅराडाईज  (१९६२) या ग्रंथात अचूक बोट ठेवले आहे. उलट स्त्रीत्वाच्या अस्सल आविष्कारासाठी फ्रँकोकँटेब्रिअन संस्कृतीतील लॅस्को किंवा व्हिलेन्डॉर्फ येथील व्हीनसची शिल्पे पाहण्यासारखी आहेत. या व्हीनसच्या पुष्ट मांड्या, ओथंबलेले स्तन, भरदार नितंब इत्यादींतून स्त्रीच्या जननक्षमतेची त्याची स्पष्ट होणारी प्रखर जाणीव आपणाला थक्क करते. शिकारीतील प्राण्यांच्या पुनर्जननात त्याला जादूटोणा दिसला; तसेच स्त्रीचे मातृत्व आणि मुख्यतः तिचा रजःस्रावाचा देहधर्म ही त्याला जादूटोण्यासारखीच वाटली. जीवशास्त्रीय गरजेमुळे साक्षात मृत्यूसारखा असलेला पशू त्याला झपाटल्यासारखा अरण्यात नेत असे आणि तशाच जीवशास्त्रीय ओढीने स्त्रीमधील स्त्रीत्व त्याला झपाटून मूळ मुक्कामावर खेचून आणीत असे. स्त्रीचे कान व नाक टोचणे, अंगावर गोंदणे, हातापायात, गळ्यात, कानानाकात अलंकार घालणे, या चालीरीती मूलतः स्त्रीमध्ये अंगभूत मानल्या गेलेल्या चेटूकवृत्तीला लगाम घालण्यासाठी आलेल्या होत्या. शरीरावर टोचून जखम करून ते डागळविले, की पिशाच त्याला झपाटीत नाही, ही यामागील समजूत. पुढे नागर संस्कृतीने हे गोंदणे, टोचणे यांचा अलंकरण म्हणून सुंदर उपयोग करून घेतला ही गोष्ट वेगळी.

शेतीचा शोध

मग्डेलेनिअन किंवा फ्रँकोकँटेब्रिअन संस्कृती इ.स.पू.सु. दहा हजारांच्या आसपास येऊन भिडते. याच सुमारास शेवटचे हिमयुग आले असे तज्ञमत आहे. त्यानंतर आमूलाग्र बदललेले हवामान आजतागायत जवळजवळ तसेच आहे. यामुळे पृथ्वीवरची वनस्पतिसृष्टी आणि जीवसृष्टी पूर्ण पालटून गेली. पूर्वीचे अजस्र पशू पूर्वेकडे आणि उत्तरेकडे पांगले. त्याबरोबरच व्याधसंस्कृतीसुद्धा पूर्वी म्हटल्याप्रमाणे मध्यपूर्व, भारत, अतिपूर्व, ऑस्ट्रेलिया, रशिया, अलास्कामार्गे अमेरिका आणि दक्षिणेकडे आफ्रिका खंडभर पसरत गेली. या अजस्र प्राण्यांना नव्या हवामानात तग धरता आली नाही. शिवाय शिकार करून करून कळप संपुष्टात आले असावेत. उदरनिर्वाहाचा प्रश्न अत्यंत उग्र झाला असावा. याच सुमारास पश्चिम आशियात शेतीचा शोध लागला असावा, असे तज्ञ मानतात. शेतीच्या शोधाबरोबरच पोटार्थी वणवण थांबली आणि मानवी इतिहासाला अपूर्व असे स्थैर्य आले. माणसाने गावे, शहरे, राज्ये वसविली. व्याधमनोवृत्ती आणि कृषिसंस्कृतीमागची मनोवृत्ती अगदी भिन्न होत्या. ज्यांना नव्या परिस्थितीत आत्मविश्वासाने जुळवून घेता आले, त्यांची नागरसंस्कृती निर्माण झाली. ज्यांना हे जमले नाही किंवा ज्यांनी हे स्थिर जीवन नाकारले, त्यांची अन्न गोळा करीत आणि शिकार करीत भटकंती चालू राहिली. शेवटच्या हिमयुगानंतरच्या या काळाला मध्याश्मयुग म्हणतात. हा काळ इ.स.पू.सु. दोन हजार वर्षापर्यंत मानला गेला, तरी ही संस्कृती आदिवासींच्या रूपाने आजही तुरळक स्वरूपात शिल्लक आहे.

कलासंकल्पनांची  उत्क्रांती

आता अमोघ शक्तीचे प्राणी शिल्लक राहिले नव्हते. रानबकरे, रेनडियर, उंदीर-खारींसारखे कुरतडणारे प्राणी, ससे इ. मवाळ प्राणी आणि पक्षी यांची शिकार आणि फळे, कंदमुळे, मध अशी खाद्ये गोळा करीत हा मानव आजवर आपली विशिष्ट जीवनप्रवृत्ती टिकवून आहे. अमेरिकेतील रेड इंडियन, उत्तर ध्रुव प्रदेशातील एस्किमो, आफ्रिकेतील बुशमन, अर्धनागर निग्रो, भारतातील गोंड, संथाळ, लमाण, भिल्ल, वंजारी इ. शेकडो आदिवासी जमाती जगभर विखुरलेल्या आहेत. बदलत्या परिस्थितीमुळे आदिम मनःप्रवृत्तीतही बराच बदल झाला. फ्रँकोकँटेब्रिअन संस्कृतीमधील उन्माद आणि झपाटलेपणा आता बराच उतरला होता. शिकारीतील ते प्राणीच नाहीसे झाल्याने उन्मादाचे मूळ कारणच संपले. जादूटोणा, पिशाचकल्पना यांचा क्षीण वारसा तेवढा उरला. आधीच्या व्याधामध्ये कर्तुमकर्तुम् अशी मनःशक्ती होती. आताच्या व्याधासमोर नव्याने उभ्या राहिलेल्या स्थिर, विजिगीषू संस्कृती होत्या. त्यांच्या भव्यतेचा मानसिक दबाव या नव्या व्याधावर पडणेही स्वाभाविक होते. परिणामी उत्तर पुराणाश्मयुगीन कलेचा थोर वारसा हरवून त्यामानाने अगदी क्षीण अशा इतर कलाप्रवृत्ती मध्याश्मयुगीन काळात वाढू लागल्या. अर्थात आधीचे उदंड पाशवी चैतन्य गमावले, तरी इतर काही संचित या मानवाने जोडले आणि तेही कलासंकल्पनांच्या उत्क्रांतीमध्ये महत्त्वाचे ठरते. पूर्वीच्या शिकारचित्रात पशूच मुख्यतः लक्ष्य असत. मानवी आकृत्या किरकोळ आणि रेखनदृष्ट्या दुबळ्या असत. आता लक्ष्यबिंदू बदलला. शिवाय धनुष्ये, ढाली यांसारखी आयुधेही वाढत गेली. शिकारीतील प्राणी तुलनेने मवाळ असल्याने या नव्या व्याधाचा आत्मविश्वासही वाढला. त्यामुळे शिकारचित्रात पशूपेक्षाही व्याधमानवावर लक्ष केंद्रित झाले. लक्ष्यबिंदू प्राण्यावरून व निसर्गावरून माणसावर आला. एखाद्या मैदानी खेळासारखी सामुदायिक शिकारीची चित्रे आता दिसू लागली. उत्तर पुराणाश्मयुगीन शैली लोपून रेखनाची अचूकता आणि जोम गेला. आता मनुष्यासह सर्वच आकार किरकोळ, रेषात्मक आणि विशिष्ट लकबींचे दिसू लागले. आफ्रिकेतील बुशमन कलेसारखे काही थोडे अपवाद याला असले, तरी सर्व आदिम कलेचे रूप आता पालटून गेले होते हे खरे. या चित्रारेखनांत विवक्षित आकारांऐवजी आकारांच्या परस्परसंबंधांना महत्त्व आले. रेषेरेषेतून चलनवलन वाटत गेले. तत्कालीन मानवाच्या अस्थिर प्रवृत्तीप्रमाणेच आकाररेषाही अस्थिर आणि प्रवाही होत गेल्या.

या काळात व्याधसंस्कृती आणि कृषिसंस्कृती यांचा संघर्ष आणि संकर होणे स्वाभाविक होते. व्याधसंस्कृतीतून कृषिसंस्कृतीत उत्क्रांत होताना मूळ संकल्पनांचा कायापालट झाला. रेषेच्या चलनाला आदर्शीकरणाने वेगळे रूप आले. यांतून सर्पाकृती, वेटोळ्यासारखे किंवा मंडलाकृती आकार, भौमितिक आकार आणि त्यांपुढे अलंकरणात्मक आकार उत्क्रांत झाले. नागर, अर्धनागर आणि भटके जीवन जगणाऱ्या अशा संस्कृतींमुळे कलात्मक संकल्पनांचेही विविध प्रकार झाले. भटक्या आणि अर्धनागर प्रवृत्तींमधून पूर्वजपूजा आणि त्या अनुषंगाने पूर्वजदंड, पूर्वजांचे मुखवटे आणि तत्सदृश आलंकारिक आकारसंकल्पना रूड झाल्या. विशेष म्हणजे या काळातील अर्धनागर संस्कृतीच्या निवासस्थानांचे अवशेष सापडत नाहीत. पण भव्य शिलांचे गढीवजा बांधकाम, भूमध्य समुद्राच्या वायव्येकडील यूरोपीय प्रदेशात तसेच आयर्लंड, आफ्रिकेतील अल्जीरियन सहारा, सोमालिया, इथिओपिया इ. भागांत सापडते. आफ्रिकेतील झिंबाब्वे  संस्कृती या दृष्टीने विशेष लक्षणीय. तिच्यात व्याधसंस्कृती आणि कृषिसंस्कृती या दोहोंचा मिलाफ झालेला दिसतो. या संस्कृतीचा शेवट इ. स. पू. दोन हजार वर्षे किंवा त्यांहून अलीकडे येतो.

क्ष-किरण शैली

मध्याश्मयुगीन व्याधाने प्राण्यांचे चित्रण करताना त्याच्या शरीरातील प्रत्यक्षतः न दिसणारे अवयव क्षकिरणांनी पहावेत तसे दाखविले. ही शैली क्ष-किरण शैली अशा नावाने ओळखली जाते. यातून पुढे अलंकरणात्मक आणि अप्रतिरूप आकार उत्क्रांत झाले. याच काळात मातृकामूर्तीचा संप्रदायही वाढलेला दिसतो. जननफलनाच्या कल्पनेतूनच या स्त्रीशिल्पांची निर्मिती झालेली दिसते. धातूंचा आणि माती भाजून पक्की करण्याचा शोध या काळात लागलेला असल्याने, अशा साहित्यसाधनांतून मातृकामूर्ती आणि इतर विविध प्रकारची शिल्पे आणि जीवनोपयोगी कलावस्तूंची निर्मिती झाली. एकंदरीत मध्याश्मयुगीन काळ हा मानवी संस्कृतीमधील फार मोठ्या घडामोडींचा काळ होता. कलाप्रवृत्तींच्या दृष्टीने त्यांच उत्तर पुराणाश्मयुगीन झपाटलेपणा दिसला नाही, तरी तंत्रांची व आकारकल्पनांची विविधता आणि हृद्यता मात्र होती. प्रत्येक संस्कृतीला उत्क्रांतीच्या प्रक्रियेत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आदिमानवी संस्कृती एखादी संकल्पना निर्माण करते व प्रगल्भ संस्कृतीत तिचे विश्लेषण व विकसन होते. धार्मिक असोत किंवा तात्त्विक असोत, बीजरूपातील या आदिम संकल्पनांना नवा अर्थ देऊन प्रगल्भ संस्कृतींनी त्यांचा कायापालट केलेला असतो. पहिल्या व्याधमानवाने पशूच्या शरीरात घुसलेला बाण क्ष-किरणांनी पाहिल्यासारखा प्रथम दाखविला. दुसऱ्या व्याधशैलीत सर्वच अवयव क्ष-किरणपद्धतीने दाखविले गेले. कृषिसंस्कृतीच्या संस्कारांनी त्यांतून अप्रतिरूपाकार आणि अलंकरण निर्माण झाले. विकसित संस्कृतींनी त्यांतून विशुद्ध सौंदर्याकार निर्मिले. क्ष-किरणशैलीने अवयव दाखविण्यामागील मूळ कल्पना अशी, की प्राण्यांचे प्राण त्यांच्या विशिष्ट अवयवांत असतात. जादूटोण्याच्या विधीमध्ये हे अवयव चितारून त्यांवर मृगयेच्या दृष्टीने अवधान केंद्रित करणे, हा मूळ हेतू. नंतर हा हेतू गौण ठरून मूळ आकारसौंदर्य प्रधान ठरत गेले. प्राण्यांच्या वा माणसांच्या कवट्यांमध्ये त्यांचे प्राण असतात. त्यासाठी त्यांचे रक्षण पुढे त्या धर्तीवर मुखवट्यांची निर्मिती. पूर्वजांच्या या मुखवट्यांत त्यांचे प्राण असल्याने आणि पूर्वज आपले पाठीराखे असल्याने हे मुखवटे घातले, की आपण सुरक्षित राहू ही श्रद्धा. या श्रद्धेने रूढ झालेली पूर्वजपूजा वन्य जमातींत आणि ग्रामीण जीवनात आजही या ना त्या स्वरूपात शिल्लक आहे. हे मुखवटे सोज्वळ, सुखद, तसेच अक्राळविक्राळ अशा अनेकविध प्रकारांचे असत. उत्सव, नाच, नाट्य किंवा आपापसातील लढाया अशा अनेक प्रकारच्या प्रसंगी ते वापरले जात. त्या त्या हेतूंप्रमाणे त्यांना शेकडो कलात्मक आणि विलोभनीय रंगरूपे आली. ग्रीक रंगभूमीवर पात्रांनी मुखवटे घालण्याची प्रथा होती. ग्रामीण दशावतारी नाटके आणि अभिजात कथकळी नृत्यात आजही मुखवट्यांची प्रथा रूढ आहे.

निसर्गशक्ती

आदिमानव पाशवी शक्तीशी आणि निसर्गशक्तीशी एकरूप होऊन जगला. जगड्व्याळ निसर्गशक्ती ही त्याच्या दृष्टीने पाशवी शक्तीच होती. पाशवी आणि दैवी, शुभ आणि अशुभ अशी वर्गवारी त्याच्या लेखी नव्हती. मानव आणि पशू यांच्या एकात्म आकारामागील तसेच निसर्गपूजेमागील ही मूळ प्रवृत्ती होती. यातून ईजिप्शियन, ग्रीक, हिंदू वगैरे संस्कृतींमध्ये मानव आणि पशू यांच्या मिलाफाने ‘सेंटॉर’, ‘पॅन’, तुंबरू, गणेश अशी सुष्टदुष्ट प्रवृत्तींची पौराणिक रूपे निर्माण झाली. जननफलनाचा गूढ साक्षात्कार आदिमानवाला स्त्रीमध्ये झाला. दुसऱ्या व्याधशैलीच्या काळात यातून मातृकामूर्तिपंथच निर्माण झाला. पुढे मेरी, दुर्गा, आदिमाया, काली अशा वेगवेगळ्या रंगरूपांत अनेक धर्मांमध्ये हा मातृकापंथ फोफावला. सर्पाकृती किंवा वेटोळ्यासारखे मंडलाकृती आकार आदिमानवाने निर्माण केले. गर्भातील प्राथमिक अवस्थेतील जीव आणि मातीतील सर्प यांच्याशी या आकारांचे साहचर्य होते. व्याधसंस्कृती आणि कृषिसंस्कृती यांमध्ये स्त्री आणि धरणी यांच्या फलनाने समान संकल्पना निर्माण झाल्या. धरतीच्या कुशीतून निर्मिती तद्वतच धरतीच्या कुशीत गर्भसदृश अवस्थेत शेवटची विश्रांती, अशी ही संगती. प्राथमिक अवस्थेतील गर्भासारखे (एम्ब्रिओ) अंग वळवून बसलेल्या अवस्थेत मृताला

पुरण्याची आदिम प्रथा आजही काही वन्य जमातींत आहे. धरतीचे, स्त्रीचे, तद्वतच मातीत वळवळणाऱ्या नागाचे साहचर्य जननजीवन मृत्यू यांमागील मुलात्म प्रेरणेशी जुळले. पुढे या सर्पाकृती मूलात्म शक्तीच्या (योगातील कुंडलिनीची संकल्पना) आणि आता मानसशास्त्रातील मूलात्म लैंगिक प्रेरणेच्या प्रतीक ठरल्या. युंगच्या मानशास्त्रीय सिद्धांतामध्ये तर मंडलाकृती हे परमोच्च मानसिक उत्थानाचे प्रतीक ठरले आहे. फ्रँकोकँटेब्रिअन आदिमानवाची रेषा व आकार यांत उद्दाम उन्माद होता. याच प्रवृत्तीतून ईजिप्शियन, मेसोपोटेमियन, मोहं-जो-दडोसारख्या संस्कृतींनी लयसंस्कारित पोलादी रेषा घडविली.

प्रगल्भ संस्कृती वैश्विक घटनांची संगती अनेक प्रकारे लावू पाहते. आदिम संस्कृतीत या शोधाला सुरुवात झालेली दिसते. आदिमानवाने निव्वळ इच्छाबळाने निसर्गावर मात केली. निसर्ग आपल्याला जादूटोण्याच्या विधींनी काबूत आणता येतो, असे तत्त्वज्ञान त्याने निर्माण केले. यज्ञसंस्थेच्या मुळाशी हीच मनःप्रवृत्ती किंवा श्रद्धा असावी. धातूंचा व रसायनांचा शोध आणि उपयोग मूलतः या जादूटोण्याच्या हेतूने लागला आणि वाढला. विश्लेषण मानसशास्त्रात या आदिम किमयेचा (अ‍ॅल्केमी) बराच अभ्यास करण्यात आला आहे. अमेरिकेतील रेड इंडियन लोक अजूनही प्रच्छन्नपणे काही जालीम मंत्रविधी करतात. या विधींमुळेच सूर्यचंद्र आपले कार्य निर्वेधपणे पार पाडतात, अशी त्यांची श्रद्धा असल्याचे युंग या मानसशास्त्रवेत्त्याने आपल्या आठवणीत नमूद करून ठेवले आहे.

आधुनिक संस्कृतीं

आज आपल्या विकसित साधनांच्या आणि ज्ञानाच्या बळावर सुसंस्कृत मानवाने निसर्ग हळूहळू आपल्या काबूत आणला आहे. पण त्याबरोबरच आजच्या विज्ञानयुगात नैसर्गिक तोल बिघडला आहे. समृद्ध स्थिर संस्कृतींचा लोभ टाळून निसर्गाने दिलेल्या परिस्थितीत, निसर्गाशी संवाद साधून जगावे, या पूर्वसूरींनी दिलेल्या उपदेशाप्रमाणे आदिवासी टोळ्या जगत आहेत. निदान ऑस्ट्रेलियातील काही जमाती तरी पूर्वसूरींचा हा उपदेश पाळताना दिसतात. आदिमानवाचे आकलन सरधोपट, रांगडे, भाबडे आणि बहुधा संवेदनाच्या पातळीवरचे होते. तर्कस्पष्ट अवस्थेत ते फारसे आले नाही. पण त्याच्या उत्कट व मनस्वी जगण्याची सर असमाधानी बनलेल्या आधुनिक संस्कृतींना येणार नाही, हे स्पष्ट आहे.

नाही म्हणायला आधुनिक संस्कृतींमध्ये ही आदिमानवी प्रवृत्ती आधुनिक कलाप्रवाह आणि अस्तित्ववादासारखे तत्त्वज्ञानातील प्रवाह यांमध्ये अधूनमधून दिसते. पण त्याहूनही अधिक ती लहान बालकांमध्ये दिसते. बालके ही आदिम भाबडेपणा, सरलता आणि निर्व्याजता यांची जिवंत उदाहरणे होत. उलट आदिम संस्कृती ही एकूण संस्कृतीची बाल्यावस्था होय. बालांच्या चित्रांतून नेमकी हीच आदिम कलारूपे पुनःपुन्हा उमटताना दिसतात. क्ष-किरण शैली, आकारांची अप्रतिरूपता, भाबडे अलंकरण आणि उग्र प्राथमिक रंगांची ओढ या मूळ आदिम प्रवृत्ती बालांच्या चित्रांमध्ये स्पष्ट दिसतात. प्रचलित संस्कृतीचे संस्कार होत होत ही बालमने जसजशी वयात येतात, तसतशा त्यांच्यामधील निर्व्याज कलाप्रवृत्ती लोप पावतात. आदिम संस्कृतीमधून प्रगल्भ संस्कृतीची वाढ होताना काहीसे असेच झाले आहे. त्यामुळे या मूळ आदिम चैतन्याची जोपासना करावयाची, तर आधुनिक समाजातील सर्जनशील कलावंताला आदिम कलेतूनच प्रेरणा घ्यावी लागते.

लेखक : १) संभाजी कदम

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/28/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate